विक्रांत मेस्सी अभिनीत १२वी फेल चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. लाखो लोकांना या चित्रपटाच्या कथेने आणि विक्रांतच्या अभिनयाने वेड लावले आहे. १२वी फेलच्या उत्तुंग यशानंतर विक्रांतच्या हातात एक मोठा प्रोजेक्ट आला आहे. विक्रांत मेस्सी लवकरच चित्रपट निर्माती एकता कपूरसोबत काम करणार आहे.
विक्रांत एकता कपूरच्या 'द साबरमती रिपोर्ट' नावाच्या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. नुकतंच एकता कपूरचं प्रॉडक्शन हाऊस बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडने विक्रांत मस्सेची प्रमुख भूमिका असलेल्या या राजकीय थ्रिलर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
एकता कपूरच्या द साबरमती रिपोर्ट या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर त्याची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. 'द साबरमती रिपोर्ट' २७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरात राज्यातील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या भीषण घटनेवर आधारित आहे.
द साबरमती रिपोर्ट या चित्रपटात विक्रांत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात विक्रांतसोबत राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ३ मे २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन रंजन चंदेल यांनी केले आहे. ज्यांनी यापूर्वी ग्रहण ही वेब सिरीज देखील दिग्दर्शित केली होती.