स्टार प्रवाहची ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. वैदेहीप्रमाणे हुबेहुब दिसणारी मंजुळा वैदेही नसून मंजुळाच असल्याचं सत्य मोनिकासमोर येणार आहे. रागाच्या भरात टोकाची भूमिका घेणाऱ्या मोनिकाची समजूत काढायची कशी हा मोठा प्रश्न मल्हारसमोर आहे. मंजुळा, मोनिका आणि मल्हार यांचं नातं दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होत असतानाच आता मालिकेत आणखी एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे.
साहेबराव असं या नव्या पात्राचं नाव असून मंजुळासोबत लग्न करण्याचं त्याचं स्वप्न होतं. मात्र मंजुळाला साहेबरावासोबत लग्न कधीच मान्य नव्हतं. साहेबरावाने जबरदस्तीने मंजुळाशी साखरपुडा केला. मात्र मंजुळाने गावातून पळ काढून थेट मुंबई गाठली आणि तिचा योगायोगाने कामतांच्या घरात प्रवेश झाला. मात्र आता साहेबरावाला मंजुळा कामतांच्या घरी रहात असल्याचं समजलंय. त्यामुळे तिला मिळवण्यासाठी त्याचे पुन्हा प्रयत्न सुरु झाले आहेत. मंजुळाला मिळवण्यासाठी तो स्वराचं आय़ुष्यही पणाला लावणार आहे. साहेबरावाचा मनसुबा यशस्वी होणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून कळेलच. मात्र निरागस स्वराचं आयुष्य पुन्हा धोक्यात आल्यामुळे मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे.
सुप्रसिद्ध अभिनेता अभिजीत केळकर साहेबरावांची भूमिका साकारणार असून साहेबराव या हटके नावाप्रमाणेच त्याचा लूकही हटके असणार आहे. अभिजीतने याआधी स्टार प्रवाहच्या पुढचं पाऊल आणि तुझ्या इश्काचा नादखुळा मालिकेतही लक्षवेधी भूमिका साकारली होती. तुझेच मी गीत गात आहे मालिकेत तो साकारत असलेला साहेबराव हा खलनायक नक्कीच वेगळ्या धाटणीच असेल.