अभिनेत्री राखी सावंतचा पती आदिल खानने तुरुंगातून बाहेर येताच तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आदिलने तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याने राखीविषयी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. राखीने तिचा पहिला पती रितेशला अद्याप घटस्फोट दिला नसल्याचंही त्याने सांगितलं आहे. पहिल्या पतीला घटस्फोट न देताच राखीने माझ्याशी लग्न केलं, असं तो म्हणाला. इतकंच नव्हे तर राखीने ड्रग्ज देऊन माझा न्यूड व्हिडीओ शूट केला, असा धक्कादायक आरोपसुद्धा आदिलने केला आहे. आईच्या निधनाबद्दल राखीने आदिलवर काही आरोप केले होते. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना आईच्या निधनानंतर राखीने काय केलं, त्याचा खुलासा त्याने केला आहे.
बॉलिवूड बबल या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत आदिल म्हणाला, “ज्या दिवशी राखीच्या आईचं निधन झालं होतं, तेव्हापासून मला जाणवू लागलं की ती किती खालच्या पातळीची आहे. आईच्या निधनाच्या दिवशी ती बिर्याणी खात होती. चिली चिकन, मटण बिर्याणी आणि प्रॉन्स कबाब यांचा आस्वाद घेत होती. तिच्यासाठी काहीच महत्त्वाचं नव्हतं. मी जेव्हा तिला अंत्यसंस्काराविषयी विचारलं तेव्हा ती म्हणाली की, तुला जसं करायचं आहे तसं कर.”
“मी राखीवर लाखो रुपये खर्च केले. तिच्यासोबत नेहमी चांगला वेळ घालवण्याचा प्रयत्न केला. तिला ब्रँडेड कपडे घेऊन दिले आणि दुबईच्या मॉलमध्ये शॉपिंग करून दिली. राखी स्वत: मीडियासमोर म्हणायची की आदिल माझे कपडे डिझाइन करतो. मी तिला लाखोंच्या किंमतीचे ब्रँडेड कपडे घेऊन दिले आहेत. हे सर्व मी माझी पत्नी राखीसाठी केलं होतं. तर मग मी चुकीचा कसा ठरलो”, असा सवाल आदिलने केला.
मीडियाशी बोलताना राखीने तिचा गर्भपात झाल्याचे सांगितले होते. आता यावरही आदिलने खुलासा करत असे सांगितले की, “ती गर्भवती कशी असू शकते. तिला काही समस्या होत्या. त्यानंतर तिचे ऑपरेशन करून गर्भाशय काढण्यात आले. मी स्वतः तिला रुग्णालयात भर्ती केले होते. मी तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये असताना मला पोलिसांनी अटक केली होती.”
राखी सावंत ही आधीपासूनच बॉलिवूडमधील ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाते. तिने वर्षाच्या सुरुवातीला आदिल खानसोबत लग्नगाठ बांधून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र, काही महिन्यांतच राखी सावंतने पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज केला. तिने आदिल विरोधात पोलिसात तक्रार केली होती. आता तब्बल ६ महिन्यांनंतर आदिल तुरुंगातून बाहेर आला आहे. त्याने बाहेर येताच याबाबतचे सत्य सांगताना राखीवर अनेक आरोप केले आहेत.
आता आदिलच्या सर्व आरोपांवर राखीची प्रतिक्रिया समोर आली आहे. राखीने आदिलवर पलटवार केला आहे. आपण सर्व पुरावे देणार असल्याचं राखी सावंतने म्हटलं आहे. ‘ई-टाइम्स’शी बोलताना राखी सावंत म्हणाली, “तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या समोर येईन. सध्या मी जरा व्यग्र आहे. पण मी सर्व पुरावे घेऊन माध्यमांसमोर येईन आणि त्याचा पर्दाफाश करेन. मी लवकरच काही व्हिडीओ सर्वांसमोर आणेन आणि सगळे खुलासे करेन. मी या माणसाचा पर्दाफाश करेन. त्याचे व्हिडीओ पाहून संपूर्ण देशाला धक्का बसेल.” असे तिने म्हटले आहे.