बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील अदिती राव हैदरी ही सर्वोत्कृष्ट आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. मोजक्याच पण खास चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत लाखो चाहत्यांची हृदय जिंकली आहेत. अत्यंत कमी वयात तिनं बरच यश संपादन केलं आहे.
काही महिन्यांपूर्वी आलेली तिची 'ज्युबिली' वेब सिरिज विशेष गाजली. याच वेब सिरिजसाठी तिला खास पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सध्या सगळीकडे तिच्याच नावाची चर्चा आहे.
पीरियड ड्रामाची राणी अदिती राव हैदरीला ‘ज्युबिली’ मधील तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रतिष्ठित ट्रेलब्लेझर परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आहे. मनोरंजन इंडस्ट्रीत प्रतिभावान अभिनेत्री म्हणून अदितीला ओळखलं जातं.
‘ज्युबिली’ हा एक अफलातून सिनेमॅटिक अनुभव असून त्याच्या कथेने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. अदितीने यामधील ‘सुमित्रा कुमारी’ हे पात्र अनोख्या तऱ्हेने साकारून या भूमिकेला चार चाँद लावले आहेत.
पद्मावत, रॉकस्टार, वजीर आणि इतर अनेक चित्रपटांमधील भूमिकांमधून अदितीने तिची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. लवकरच ती संजय लीला भन्साळीच्या 'हीरा मंडी' या वेब सिरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या वेब सिरिजमधील तिचा फर्स्ट लुक पाहून चाहते घायाळ झाले होते. आता तिला पुन्हा मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी सारेच उत्सुक आहेत.