अमेरिकन पराठा
साहित्य : सारणासाठी : अर्धा कप मक्याचे दाणे (शिजवलेले), 1 कप बारीक चिरलेला कोबी (मिळाल्यास जांभळ्या रंगाचा), 1 गाजर (किसलेले), 1 बटाटा (उकडून स्मॅश केलेला),
अर्धा कप बारीक चिरलेली फरसबी, 1 सिमला मिरची (बारीक चिरलेली), 2 टीस्पून चिली सॉस, 1 टीस्पून व्हिनेगर, 1 टीस्पून आले-हिरवी मिरची-लसूण पेस्ट, 2 टीस्पून तेल, स्वादानुसार मीठ.
कणकेसाठी : 2 कप मैदा, 1 कप गव्हाचे पीठ, 2 टीस्पून तेल, स्वादानुसार मीठ.
इतर : बटर.
कृती : मऊ कणीक मळून घ्या. एका कढईत तेल गरम करून त्यात आले-मिरची-लसूण पेस्ट परतवून घ्या. नंतर सर्व भाज्या व मीठ घालून मोठ्या आचेवर परतवा. त्यात चिली सॉस व व्हिनेगर एकत्र करून चांगले परतवा आणि आचेवरून उतरवून ठेवा. कणकेच्या लिंबाएवढ्या गोळ्या तयार करून त्यात सारण भरा आणि पराठे लाटून घ्या. हे पराठे मध्यम आचेवर दोन्ही बाजूने बटर लावून खमंग भाजून घ्या. गरमागरम अमेरिकन पराठा चिली सॉससोबत सर्व्ह करा.