बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने आपल्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेता चौथ्यांदा बाबा झाला आहे. अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स तिच्या प्रेग्नेंसीमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. आता तिने एका मुलाला जन्म दिला आहे.
अर्जुन रामपालने गुरुवारी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपला आनंद चाहत्यांसोबत शेअर केला. त्याने पोस्टमध्ये बाळाच्या टॉवेलचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर लिहिले आहे - हॅलो वर्ल्ड आणि त्यावर विनी-द-पूहचे कार्टून होते.
अर्जुन रामपालने पोस्टला कॅप्शन दिले, "माझ्या कुटुंबाने आणि मी आज एका मुलाचे स्वागत केले आहे. आई आणि बाळ दोघेही ठीक आहेत. डॉक्टर आणि परिचारिकांच्या अद्भुत टीमचे आभार. आमच्या आनंदाला सीमा नाही. तुमच्या प्रेम आणि समर्थनासाठी तुम्हा सर्वांचे आभार. हॅलो वर्ल्ड, 20.07.2023."
अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्याची पहिली पत्नी मेहर जेसियापासून घटस्फोट घेतल्यापासून अभिनेता गॅब्रिएलाशी रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांना आधीच एक मुलगा एरिक आहे, तो नुकताच चार वर्षांचा झाला आहे. अर्जुनने मंगळवारी इन्स्टाग्रामवर मुलाला शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्टही शेअर केली.
पहिल्या लग्नापासून दोन मुली
अर्जुन रामपालने पहिले लग्न सुपरमॉडेल मेहर जेसियाशी केले होते. दोघांना मिहिका रामपाल आणि मायरा रामपाल या दोन मुली आहेत. 21 वर्षांच्या लग्नानंतर अर्जुन आणि मेहर यांचा 2019 मध्ये घटस्फोट झाला, त्यानंतर अभिनेता गॅब्रिएलाला डेट करू लागला.
अर्जुन रामपालचे आगामी चित्रपट
अर्जुन रामपालच्या कामाबद्दल सांगायचे तर, अभिनेता लवकरच अब्बास मस्तानच्या पेंटहाऊस चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत बॉबी देओलही आहे. याशिवाय त्याच्याकडे क्रॅक हा स्पोर्ट्स अॅक्शन चित्रपटही आहे. क्रॅकमध्ये अर्जुनसोबत विद्युत जामवाल आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्याही भूमिका आहेत.