अभिनेत्री भूमी पेडणेकरने अलीकडेच तिचा ३३ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अनेकांना माहिती आहे की, भूमी मूळची गोव्याची आहे. तिच्या वडिलांचे गाव उत्तर गोव्यातील पेडणे येथे आहे. त्यामुळे अनेकदा अभिनेत्री सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गोव्याला जाते आणि तेथील सुंदर फोटो शेअर करते.
गोव्याशी खास नातं असल्याने भूमीने अलीकडेच तिथे ‘KAIA’ नावाचे फाइव्ह स्टार रेस्टॉरंट प्लस बुटीक स्टे सुरु केला आहे. समुद्रकिनाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर असणारे अभिनेत्रीचे नवे रेस्टॉरंट सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. मीडियाशी संवाद साधताना भूमीने सांगितले, “मी वर्षातून किमान चारवेळा गोव्याला जाते. पण, आता बागा ते अश्वेम (गोव्यातील जागा) कुठेही गेले तरीही आयुष्य एका वर्तुळात अडकल्यासारखे वाटते. त्यामुळे हे रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार केला.”
अभिनेत्रीला हे रेस्टॉरंट सुरु करताना निकिता हरिसिंघानी, धवल उदेशी आणि क्रोम आशिया हॉस्पिटॅलिटीचे पवन शहरी यांची मदत मिळाली. तसेच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत भूमी पेडणेकरने ‘KAIA’ शब्दाचा अर्थ ‘शुद्धता’, ‘जीवन’ असा असल्याचे सांगितले आहे. भूमी पुढे म्हणाली, “नाश्त्याच्या हेल्दी पर्यायांसह मी वैविध्यपूर्ण मेन्यू डिझाइन केला. आमच्या रेस्टॉरंटमधील शेफ मोहित सावरगावकर चांगले शाकाहारी जेवण बनवतात. तसेच रेस्टॉरंटमध्ये मांसाहारी पदार्थही मिळतात. याचबरोबर येथे पर्यटक राहू सुद्धा शकतात.”
दरम्यान, भूमी पेडणेकर लवकरच ‘द लेडी किलर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंग प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.