तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंज करत आहे. टीव्हीवर पाहताना सर्व सुखासुखी दिसत असले तरी पडद्यामागचे चित्र काही औरच आहे. गेल्या काही वर्षांत अनेक कलाकारांनी या शो ला रामराम केला आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेचे निर्माते असित मोदी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पोलिसांनी असित मोदी आणि 'तारक मेहता'शी संबंधित इतर दोन लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. या शोमध्ये मिसेस सोढीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने काही दिवसांपूर्वीच असित मोदींवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. अभिनेत्रीने असित मोदी तसेच 'तारक मेहता'चे कार्यकारी निर्माते जतीन बजाज आणि ऑपरेशन्स हेड सोहेल रमाणी यांच्याविरोधातही तक्रार केली होती आणि आता पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई पोलिसांनी माहिती दिली की असित मोदी, सोहेल रमाणी आणि जतीन बजाज यांच्या विरोधात कलम ३५४ आणि ५०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून असित मोदी यांच्यावर लैंगिक छळ आणि शोषणाचे आरोप होत आहेत. शोच्या अनेक कलाकारांनी असित मोदींकडून सेटवरील खराब वातावरण तसेच फी न देण्याबाबत तक्रार केली होती.