- लता वानखेडे
अमृतला विसरणं तिच्यासाठी शक्य नव्हतं… पण आई-वडिलांच्या आग्रहापुढे तिचं काहीच चाललं नाही. खुशी आता पंधरा वर्षांची झाली होती. तिला समज आली होती. माझी आई फक्त माझीच राहणार. तिची वाटणी मी कधीच होऊ देणार नाही.ङ्घ या शब्दात तिने या विवाहाला विरोध केला होता.
आषाढ महिना लागला होता. आकाशात काळ्या मेघांची गर्दी झाली होती. प्रत्येक क्षणी त्यांचे आकार बदलत होते. डॉक्टर अंजनाच्या मनातही अनेक विचारांनी गर्दी केली होती. आकाशात अधून मधून विजांचा लपंडावही सुरू होता. आता काळे मेघ पावसाच्या रूपात धरतीवर बरसू लागले होते. डॉ. अंजनाने गाडीची गती वाढवली. अर्ध्या तासातच तिची गाडी डॉ. काद्रींच्या मानसिक उपचार केंद्रासमोर उभी राहिली.
डॉ. अंजनाला पाहताच खुशी ओरडली ‘तो आला, तो राक्षस आला!’… ती हाताने केस ओरबाडू लागली. तिचं सर्वांग थरथरत होतं. तिला पुन्हा वेडेपणाचा झटका आला होता. दोन डॉक्टर्स आणि दोन नर्स यांनी तिला पकडलं होतं… पलंगाला बांधून ठेवलं होतं. डॉक्टरांनी तिला झोपेचं इंजेक्शनही दिलं होतं.
आपल्या लाडक्या लेकीची ही अवस्था पाहून डॉक्टर अंजना ओक्साबोक्शी रडू लागली. दवाखान्यातील सर्व डॉक्टर्स आणि नर्सेस तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागले. तिच्यावर दुःखाचा जणू डोंगर कोसळला होता. कसं पेलणार होती ती एवढं मोठं दुःख!
दहा वर्षांपूर्वी तिचे पती डॉक्टर अमृत एका अपघातात गेले… ते दुःख आणि आता पोटच्या पोरीचं हे दुःख! जणू नियतीनं तिच्या जीवनात दुःखांची मालिकाच लिहून ठेवलेली होती.
तिने घड्याळात पाहिलं… रात्रीचे दहा वाजले होते. एवढ्या रात्री एकटीने मुंबईला जाणं शक्य नव्हतं. दवाखान्यातल्याच एका रूममध्ये आराम करण्याचा निर्णय तिने घेतला.
ती खिडकीतून बाहेर पाहत होती. पाऊस धो… धो कोसळत होता. काळ्याभोर अंधारातून वीज चमकली. तिच्या काळजात चर्र झालं. तिने खिडकी लावून घेतली. पलंगावर अंग झोकून दिलं आणि निद्रादेवीची आराधना करू लागली. छतावरचा पंखा जोरजोरात फिरत होता. त्याहूनही जास्त वेगात तिचं विचारचक्र सुरू झालं. तिचं मन नकळत भूतकाळात जाऊन पोहोचलं.
मुंबईच्या एका उपनगरात अॅड. महादेव काळे यांचा ‘राजगृह’ बंगला दिमाखात उभा होता. बंगल्याच्या सभोवताली मन प्रसन्न करणारी बाग… बागेत रंगीबेरंगी सुगंधित फुलं फुलली होती.
महादेव काळेंना दोन अपत्य होती. मोठी अंजना एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षात शिकत होती, तर तिचा भाऊ रंजन बारावीत शिकत होता. त्यांच्या नशिबात भरभरून सुखं होती. पण या सुखांनाही दुःखाची झालर नियतीने लावली होती. त्यांची पत्नी सुशीला एका अपघातात अपंग झाली होती. अपघातानंतर तिला चालता
येत नव्हतं.
डॉक्टर झाल्याबरोबर अंजनाचा विवाह तिच्या प्रियकराशी, अमृतशी लावून देण्यात आला. एका वर्षातच त्यांच्या संसारवेलीवर एक कळी उमलली. अंजना-अमृतचं आयुष्य आनंदाने
फुलविणार्या त्या कळीचं नावं ‘खुशी’ ठेवण्यात आलं. खुशी कलेकलेनं वाढत होती. ती तीन वर्षांची झाली आणि अंजनाच्या सुखी जीवनाला नजर लागली. डॉ. अमृत एका अपघातात मरण पावले. अमृतचा छिन्न विच्छिन्न देह पाहून डॉ. अंजना बेशुद्धच पडली होती. निरागस खुशीने तर रडून रडून आकांत केला होता.
आता अंजनाला आपल्या खुशीसाठी जगायचं होतं. अमृतला विसरणं तिला शक्य नव्हतं… पण काळच सर्व रोगांवरील रामबाण उपाय होता. खुशी पाच वर्षांची झाली आणि तिचं नाव शाळेत घालण्यात आलं.
अॅड. महादेवांना आपल्या लेकीचं एकटेपण… दुःख पाहवत नव्हतं. तिचा पुनर्विवाह करून द्यायचं, त्यांनी ठरवलं. अंजनाने मात्र वडिलांच्या या निर्णयाचा कडाडून विरोध केला. पण आई-वडिलांच्या आग्रहापुढे तिचं काहीच चाललं नाही.
खुशी मात्र आता पंधरा वर्षांची झाली होती. तिला समज आली होती. “माझी आई फक्त माझीच राहणार. तिची वाटणी मी कधीच होऊ देणार नाही”, या शब्दात तिने या विवाहाला विरोध केला होता.
“खुशी बेटी, समजून घे त्यांना. ते तुझे बाबा आहेत. तुझ्यावर फार माया
आहे त्यांची.”
“नाही… नाही… नाही ते माझे बाबा कधीच होऊ शकणार नाहीत. ते तुझे पती आहेत, पण माझे बाबा नाहीत. ते या घरात राहणार असतील, तर मी आजीकडे राहायला जाईन.”
खाडकन तोंडात ठेवून दिली होती अंजनाने तिच्या. त्याच दिवशी खुशी आजीकडे राहायला गेली.
“आजी, तो माणूस मला नाही आवडत. मी त्याला बाबा कधीच म्हणणार नाही.”
“बरं बाई! पण तो माणूस तुला का आवडत नाही, ते तरी सांग.”
“तो ना, माझ्याकडे वाईट नजरेने पाहतो. आमच्या वर्गातला रंजित पण माझ्याकडे वाईट नजरेने पाहतो. त्या दिवशी वही देताना त्याने माझ्या हाताला मुद्दाम स्पर्श केला… शी!”
आजीला खुशीचा हा गैरसमज वाटला. तिने सर्व शांतपणे ऐकून घेतलं आणि अखेर खुशीची समजूत काढली. आजीने तिला आईकडे पाठवून दिलं.
अंजनाचे नवे पती प्रवीण उद्योगपती होते. ते खुशीचे फार लाड करीत. तिच्या वाढदिवसाला त्यांनी महागडा मोबाईल आणि संगणक घेऊन दिला. भारी-भारी ड्रेस घेऊन दिले. खुशीचा राग आता मावळला होता.
एके दिवशी अंजना सकाळीच एका सेमिनारसाठी दिल्लीला निघून गेली. दुसर्या दिवशी खुशीच्या नव्या बाबांचा वाढदिवस होता. बेडरूममध्ये बसून ती ग्रिटिंग कार्ड बनवीत होती. त्यावर तिने लिहिलं होतं… ‘डिअर पपा…’ उद्या ती बाबांना सरप्राइज गिफ्ट
देणार होती.
बेडरूमच्या दारात उभं राहून प्रवीण खुशीला एक टक न्याहाळीत होता. तिची ओढणी खाली पडली होती. ग्रिटिंग कार्ड रंगवण्यात ती अगदी गुंग झाली होती की, तिला कमीजच्या उघड्या गळ्याची ही शुद्ध नव्हती. प्रवीण नजर रोखून खुशीकडे पाहत होता आणि तिला मात्र कसलंच भान नव्हतं.
“खुशी काय करते आहेस?” त्याने विचारलं.
“मी… मी… काही नाही…” तिने तो कागद लपवण्याचा प्रयत्न केला. ओढणी गळ्यात घालून ती उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्या राक्षसासमोर तिची शक्ती क्षीण पडली.
सेमिनार रद्द झाला म्हणून अंजना काही वेळातच घरी परतली. खुशीच्या खोलीत प्रवेश करताच तिला तिची खुशी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिची शुद्ध हरपली होती.
हे सर्व पाहून डॉक्टर असूनही अंजना अगदीच सुन्न झाली होती. तरीही
स्वतःला सावरत तिने सर्वप्रथम प्रवीणला पोलिसांच्या स्वाधीन केलं अन् मग खुशीला घेऊन दवाखाना गाठला. खुशी मानसिकदृष्ट्या कमकुवत झाली होती.
“तो आला, तो राक्षस आला”, खुशीच्या आवाजाने अंजना वर्तमानात आली. ज्या संकटाची चाहूल खुशीसारख्या चिमुरडीला लागली होती, ती डॉक्टर अंजनाच्या लक्षात कशी आली नाही? परपुरुषावर विश्वास ठेवला तिने… स्वतःसाठी… आपल्या लाडक्या खुशीसाठी. खुशीला
लागलेली संकटाची चाहूल गंभीरपणे घेतली असती, तर निदान खुशीचे जीवन बरबाद होण्यापासून तरी वाचलं असतं!
Link Copied