बिपरजॉय चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत आहे. या चक्रीवादळाचे गंभीर परिणाम दिसून येत आहे. चक्रीवादळामुळे होणारा धोका लक्षात घेता केंद्रापासून राज्य सरकारपर्यंत सर्वच सतर्क आहेत. NDRF च्या १७ टीम आणि SDRF च्या १२ टीम गुजरातमध्ये तैनात आहेत. त्याचबरोबर नौदलाची ४ जहाजे स्टँडबाय ठेवण्यात आली आहेत. याशिवाय, खबरदारीचा उपाय म्हणून किनाऱ्यालगत राहणाऱ्या ७४,००० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. वादळमुळे किनारपट्टीवर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रासह नऊ राज्यांना धोका
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि महाराष्ट्रासह ९ राज्यांना बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका आहे. लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि राजस्थान (पश्चिम) ही ९ राज्ये आहेत. जेव्हा बिपरजॉय गुजरातच्या किनारपट्टीला धडकेल, त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १५० किमीवर जाण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे आधी ऑरेंज अलर्ट जारी केले होते. आता रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे.
हवामान विभागाचे प्रमुख मृत्यूंजय मोहपत्रा यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभाग आणि एनडीएमए विभागाने लोकांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचा सल्ला दिला आहे.
घरात असल्यावर सुरक्षित कसे राहाल?
१) वीज आणि गॅस सप्लाय बंद करा.
२) सुरक्षिततेसाठी दरवाजे आणि खिडक्या बंद करा.
३) चक्रीवादळ येण्यापूर्वी धोकादायक ठिकाणांपासून दूर राहा.
४) रेडिओच्या माध्यमातून या चक्रीवादळाबाबत अपडेट्स जाणून घ्या.
५) उकळलेले पाणी किंवा शुद्ध पाण्याचे सेवन करा.
घराबाहेर असल्यावर स्वत:ला सुरक्षित कसे ठेवाल?
१) धोकादायक इमारतींमध्ये प्रवेश करू नका.
२) वीजेचे तुटलेले पोल, तुटलेल्या केबल्स आणि धारदार गोष्टींपासून दूर राहा.
३) सुरक्षित जागेवर राहण्याचा प्रयत्न करा.