बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याचा लोकप्रिय टॉक शो ‘कॉफी विथ करण’चा ८वा सीझन खूप गाजला. आता हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या आठवड्यात ‘कॉफी विथ करण’च्या ८व्या सीझनचा शेवटचा भाग प्रसारित केला जाणार आहे. मात्र, यावेळी शोमध्ये काही ट्वीस्ट असणार आहेत. या भागामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी नाही तर, सोशल मीडिया कंटेंट क्रीएटर आणि काही इन्फ़्लुएसर हजेरी लावताना दिसणार आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींचा लाडका ओरी म्हणजेच ओरहान अवत्रामणी हा देखील या भागात करण जोहरसोबत दिलखुलास गप्पा मारताना दिसणार आहे. यावेळी ओरी आपल्या लव्ह लाईफबद्दल मोठा खुलासा करणार आहे.
ओरी व्यतिरिक्त कुशा कपिला, दानिश सैत, तन्मय भट्ट आणि सुमुखी सुरेश यासारखे सोशल मीडिया स्टार्स देखील या शोमध्ये दिसणार आहेत. डिस्ने प्लस हॉटस्टारने या अंतिम भागाचा प्रोमो नुकताच रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये ओरीने त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ‘कॉफी विथ करण ८’च्या या प्रोमोमध्ये करण जोहरने ओरीला प्रश्न केला की, तो सिंगल आहे का? यावर उत्तर देताना ओरी म्हणतो की, ‘माझ्याकडे पाच जणी आहेत.’ तेव्हा आश्चर्यचकित झालेला करण त्याला विचारतो की, ‘तू एकाचवेळी पाच लोकांना डेट करत आहेस?’ या प्रश्नाला उत्तर देताना ओरी गमतीने म्हणतो की, ‘मी चीटर आहे. मी खूप चीटिंग करतो. ओरी एक चीटर माणूस आहे.’ यावर करण जोहर देखील त्याला गंमतीने म्हणतो की, ‘तू लीवर आणि चीटर दोन्ही आहेस.’ ओरीच्या या वक्तव्यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. खरच ओरी एकाचवेळी ५ मुलींना डेट करत असेल का?, असा प्रश्न देखील नेटकऱ्यांना पडला आहे.
त्यानंतर ओरीच्या कपड्यांवर स्टिकर्स का आहेत? याचा खुलासा झालाय. ओरीने सांगितले की, त्याच्या कपड्यांवर दिसणारे स्टिकर्स प्रत्यक्षात त्याचे स्वतःचे इमोजी आहेत. ज्याला ओरिजी म्हणतात. हे स्टिकर्स तो लवकरच सोशल मीडियावर लॉन्च करणार आहेत.
याशिवाय त्याच्या केसांवर त्याने पेन का खोवला असतो, हे सुद्धा करणने त्याला विचारले. तेव्हा ओरीने सांगितले की, खरं तर हे एक पेन आहे जे तो केसांमध्ये ठेवतो. जेणेकरून जेव्हा कोणी ऑटोग्राफ घेण्यासाठी येतो तेव्हा लगेच तो पेन काढतो आणि त्यातून ऑटोग्राफ देतो.
ओरी हा एक ह्यूमन स्टार्टअप आहे. लोकं तुझ्याबद्दल बोलतात, तुझ्या मागे का येतात? याला उत्तर देताना ओरीने अतिशय धाडसाने सांगितले की, "जेव्हा लोक माझ्याबद्दल चर्चा करतात तेव्हा मी जिंकत असतो. जेव्हा कोणी माझ्यावर हसते तेव्हा मी जिंकतो. जेव्हा माझे मीम्स बनवले जातात तेव्हा मी पैसे कमवत असतो."
‘कॉफी विथ करण सीझन ८’ची सुरुवात अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह या जोडीने केली होती. यानंतर सनी देओल-बॉबी देओल, सारा अली खान-अनन्या पांडे, करीना कपूर खान-आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा-वरूण धवन, काजोल-राणी मुखर्जी, विकी कौशल-कियारा अडवाणी, आदित्य रॉय कपूर-अर्जुन कपूर, अजय देवगन-आर. शेट्टी, शर्मिला टागोर-सैफ अली खान, जान्हवी कपूर-खुशी कपूर आणि झीनत अमान-नीतू कपूर यांनी देखील या शोमध्ये हजेरी लावली होती.