मराठी मनोरंजनसृष्टीतील एकापोठापाठ एक सेलिब्रिटींच्या लग्नाचे बार उडत आहेत. नुकताच शिवानी सुर्वेने अजिंक्य ननावरेसोबत लग्न केले. आता शिवानी पाठोपाठ आणखी एक मराठमोळी अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडे (Titeeksha Tawde) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तितीक्षा तावडे 'दृश्यम 2' फेम अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबत (Siddharth Bodke) लग्न करणार आहे.
तितीक्षा तावडेने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिद्धार्थ बोडकेसोबतचा फोटो पोस्ट करत लग्नाबाबतची गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तितीक्षाने इन्स्टाग्रामवर सिद्धार्थसोबतचा जो फोटो शेअर केला आहे त्यात दोघेही एकमेकांकडे पाहून गोड स्माइल देताना दिसत आहेत. सिद्धार्थसोबतचा हा फोटो शेअर करत तितीक्षाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'He asked me out on a date, it turned out to be a केळवण.' तितीक्षाने या पोस्टसोबत रेड हार्ट इमोजी देखील पोस्ट केला आहे.
तितीक्षा आणि सिद्धार्थच्या केळवणाला सुरुवात झाली आहे. पण त्यांचे लग्न कधी होणार याबाबत अद्याप काही माहिती समोर आली नाही. तरीही तितीक्षाच्या लग्नाच्या बातमीनेच तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. ते दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी देखील कमेंट्स करत या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. तितीक्षा आणि सिद्धार्थ हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेम व्यक्त करत होते.
तितीक्षा आणि सिद्धार्थ यांची मैत्री खूपच जुनी आहे. २०१५ साली ‘असे हे कन्यादान’ या मालिकेत मुख्य कलाकारांच्या मित्र-मैत्रिणींची भूमिका हे दोघेजण साकारत होते. त्या मालिकेपासूनच त्यांची मैत्री आहे. सिद्धार्थ आणि तितीक्षा यांची जोडी प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच आवडते. सिद्धार्थ आणि तितीक्षाने झी मराठीवरील 'तू अशी जवळी राहा' मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या होत्या. २०१८ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या मालिकेने सर्वांचे मन जिंकले होते. या मालिकेमधील मनवा अन् राजवीरने आता रिअल लाइफमध्ये देखील एकमेकांना आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकारले आहे. दरम्यान, तितीक्षा तावडे सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत काम करत आहे. तर सिद्धार्थ बोडके नुकताच 'दृश्यम २' चित्रपटातील भूमिकेमुळे चर्चेत आहे.