Close

मराठी सिनेसृष्टीचे विनोदवीर संतोष चोरडिया यांचे निधन, वर्षा उसगांवकर यांच्यासोबतच्या मुलाखतीमुळे मिळालेली लोकप्रियता (Marathi cinema comedian Santosh Chordia passed away popularized by an interview with Varsha Usgaonkar)

आम्ही एकपात्री' या संस्थेच्या माध्यमातून एकपात्री कलाकारांची मोट बांधून त्यांच्या समस्या आणि गाऱ्हाणी सरकार दरबारी मांडणारे मृदू आणि प्रेमळ स्वभावाने जनमानसात लोकप्रिय असलेले एकपात्री कलाकार संतोष चोरडिया यांचे आज पहाटे हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी ४ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात भाऊ, मुलगा अजिंक्य, कन्या अपूर्वा असा परिवार आहे. चोरडिया यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून सातत्याने एड्स ग्रस्त आणि कृष्ठरोग्यांमध्ये आनंद पेरण्याचे काम केले. कलेला समाजसेवेची जोड देत त्यांची वाटचाल सुरू होती. माध्यम प्रतिनिधींपासून राजकीय ,सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात ते सुपरिचित होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे .

रंगभूमी , दूरचित्रवाणी आणि चित्रपट अश्या तिनही माध्यमात ते गेली ३८ वर्षे कार्यरत होते.  झी टीव्ही वरील 'हास्यसम्राट' आणि सह्याद्री वाहिनीवरील 'एम 2 जी 2' या कार्यक्रमात वर्षा उसगावकर यांनी घेतलेल्या मुलाखतीद्वारे ते घराघरात पोहोचले.. 'दुसरी गोष्ट' , 'कँपँचिनो ', ' दगडाबाईची चाळ ' , 'प्रेमा ', 'सरगम' अशा अनेक मराठी गाजलेल्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका  प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.  'जीना इसी का नाम है' आणि 'फुल २ धमाल' या कार्यक्रमांची निर्मिती आणि सादरीकरण त्यांच्या चौफेर कलावृतीची साक्ष देणारे होते.

भारतासह परदेशात त्यांनी आपल्या कलाकर्तृत्वाचा झेंडा आपण रोवला. लंडन ,इस्राइल, ओमान येथील रसिकांना  'हसवा हसवी' या एकपात्री प्रयोगाने खळखळून हसविणारा विनोदवीर म्हणून ते परिचीत होते.

ललितकला म्हणजेच भारतीय संगीत, नाटक , लोककला, अभिजात नृत्य या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवोदित कलाकारांना प्रोत्साहन आणि व्यासपीठ उपलब्ध करून या कलांच्या प्रसारासाठी चोरडिया यांनी २०२१ मध्ये‘ रंगकर्मी चोरडिया फाउंडेशन ‘ स्थापन केले होते. त्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.

Share this article