Close

‘हायवे मॅन ऑफ इंडिया’ नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास लवकरच पडद्यावर; ‘गडकरी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित (Nitin Gadkari’s Life Can Be Seen On The Big Screen; The First Poster Of The Film Is Out)

नितीन गडकरी…  देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ऑफ इंडिया’ अशीही आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. ‘गडकरी’मध्ये नितीन गडकरींची भूमिका कोण साकारेल? या प्रमुख भूमिकेत कोण पाहायला मिळेल यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली असून लवकरच याचा खुलासा होणार आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुराग भुसारी म्हणतात, ‘’ नितीन गडकरी यांची राजकारणातील कारकिर्द निश्चितच उल्लेखनीय आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या विविध बाजू जनतेला माहितच आहेत. समाज कल्याणाचा ध्यास असणाऱ्या या नेत्याचा राजकारणातील प्रवास तसा अनेकांना माहित आहे. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य व तरुण काळ तितकाच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.’’

२७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे अनुराग भुसारी, मिहिर फाटे सहनिर्माते आहेत.

Share this article