बॉलिवूडमधील सेलिब्रिटी हे त्यांच्या चाहत्यांचे आदर्श असतात. आपल्या आवडत्या कलाकारांच्या फिटनेस आणि डाएट बद्दल जाणून घेण्यात त्यांना भलताच रस असतो. एवढंच नाही तर सेलिब्रिटी देखील त्यांच्या आहाराबद्दल चाहत्यांना मनमोकळेपणाने सांगतात. प्रत्येक सेलिब्रिटींची खाण्या-पिण्याबाबतची आवड वेगवेगळी असते. एक काळ असा होता जेव्हा अभिनेता अक्षय कुमार मासे-मटणावर ताव मारायचा. पण आता खिलाडी कुमारने आयुष्यात आलेल्या एका प्रसंगानंतर अभिनेत्याने मांसाहार करणं सोडून दिलं आहे. अक्षयने त्याच्या आईच्या सल्ल्यानुसार मांसाहार करणं सोडून दिलं असल्याचं समजतं.
अक्षयच्या बाबतीत सांगायचं झालं तर, अक्षय कोणत्या सिनेमात कोणती भूमिका साकारणार आहे याबद्दल सर्व माहिती अभिनेत्याच्या आईला असायची. एवढंच नाही तर अक्षयच्या आई अरुणा मुलाला अनेक महत्त्वपूर्ण सल्ले देखील द्यायच्या. जेव्हा अक्षयच्या आईला कळलं की, ‘ओ माय गॉड’ सिनेमात अक्षय कृष्णाची भूमिका साकारणार आहे. तेव्हा त्यांनी मुलाला मांसाहार करु नकोस असा सल्ला दिला होता.
रिपोर्टनुसार, अक्षयच्या आई त्याला म्हणाल्या, ‘सिनेमाचं शुटिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत मांसाहार करु नकोस. कारण तू देवाच्या भूमिकेत दिसणार आहेस…’ आईने दिलेल्या सल्ल्याचा आदर ठेवत अक्षयने ‘ओ माय गॉड’ सिनेमाचं शुटिंग पूर्ण होईस्तोवर मासे – मटण न खाण्याचा निर्णय घेतला. अखेर ‘ओ माय गॉड’ सिनेमाचं शुटिंग पूर्ण झालं. सिनेमा प्रदर्शितही झाला पण अक्षयने मांसाहाराला हात लावला नाही. मांसाहार करणं सोडल्यानंतर ते पुन्हा खाण्याची त्याची इच्छाच झाली नाही. अक्षय कुमार याने ‘ओ माय गॉड’ सिनेमानंतर मांसाहार करणं सोडूनच दिलं.
अभिनेत्याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अक्षय लवकरच ‘ओ माय गॉड २’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. मंगळवारी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाच्या टीझरने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. सध्या सर्वत्र खिलाडी कुमार याच्या ‘ओ माय गॉड २’ सिनेमाची चर्चा सुरु आहे.
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओह माय गॉड ’ सिनेमा नास्तिक कांजीलाल मेहता याच्या कथे भोवती फिरत होता. पण सिनेमाच्या सिक्वलमध्ये पंकज त्रिपाठी यांची शंकरावर असलेली निस्सिम भक्ती दिसून येत आहेत. पंकज त्रिपाठी सिनेमात कान्ती शरण मुदगल ही व्यक्तीरेखा साकारताना दिसत आहे.
दिग्दर्शक अमित राय दिग्दर्शित ‘ओह माय गॉड 2’ सिनेमा १ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सिनेमात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत यामी गौतम आणि अरुण गोविल यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत.