फॅशन डिझायनर अधुना भाबानी आणि अभिनेता फरहान अख्तर या बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडीने १६ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोटाचा निर्णय घेत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. यानंतर फरहानने शिबानी दांडेकर हिच्यासोबत पुन्हा लग्नगाठ बांधली. मात्र, आता लेकीच्या ग्रॅज्युएशन सोहळ्याच्या निमित्ताने हे संपूर्ण कुटुंब एकत्र पाहायला मिळालं आहे. फरहान अख्तरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फॅमिली फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो त्याची माजी पत्नी अधुना भबानी आणि पत्नी शिबानी दांडेकरसोबत दिसला आहे.
फरहानने त्याची मोठी मुलगी शाक्याच्या लँकेस्टर विद्यापीठातील पदवीदान समारंभातील हे फोटो पोस्ट केले आहेत. या सोहळ्यामध्ये समस्त आजी-माजी अख्तर कुटुंबाने सहभाग घेत शाक्याला प्रोत्साहन दिले. यात फरहानसोबत पत्नी शिबानी दांडेकर, माजी पत्नी अधुना भबानी, वडील जावेद अख्तर, त्यांची पत्नी शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांची पहिली हनी इराणी अर्थात फरहानची आई यांचा देखील समावेश आहे. फरहानने या सोहळ्याचे फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
केवळ फरहानच नव्हे, तर यात त्याच्या वडिलांच्या म्हणजे जावेद अख्तर यांच्या आजी-माजी पत्नींचा देखील समावेश आहे. एका फोटोमध्ये, स्टेजवर शाक्या महाविद्यालयीन पदवी स्वीकारतानाचा व्हिडीओ देखील दिसत आहे. इतर तीन फोटोंमध्ये शाक्या आई-वडील फरहान आणि अधुना, आजोबा जावेद आणि आजी हनीसोबत पोज देताना दिसत आहे. फरहानने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आमच्या पदवीधर शाक्याचे अभिनंदन. एक कुटुंब म्हणून तिथे उपस्थित राहून, तिचे यश साजरे करणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. पुढचे जग तुझेच आहे.’ फरहानने याच कॅप्शनमध्ये लिहिले की, कुटुंबातील दोन सदस्य या समारंभात पोहोचू शकले नाहीत. एक त्याची बहीण आणि चित्रपट निर्माती झोया अख्तर आणि धाकटी मुलगी अकिरा अख्तर यावेळी अनुपस्थित होत्या.
मात्र, फरहानच्या पोस्टवरील कमेंट सेक्शनमध्ये झोयाने देखील प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिले की, ‘फोमो!!!!!! अभिनंदन माझ्या शकलाका बाळा!!! तू कुटुंबातील सर्वात हुशार व्यक्ती आहेस.’ या पोस्टवर अनेक कलाकारांनी देखील कमेंट केल्या आहेत.