तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार रिकी केजचं भारतात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. एवढंच नव्हे तर सर्व भारतीयांना त्यांचा अभिमान वाटत आहे. त्यांच्या कृतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आनंदीत झाले आहेत.
रिकीने स्वतंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी अर्थात १४ ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने १०० ब्रिटीश रॉयल फिलहारमोनिक ऑर्केस्ट्रासह संगीतबद्ध केलेले भारतीय राष्ट्रगीताचे नवे व्हर्जन सादर केले होते. त्याचा हा व्हिडीओ स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शेअर केला आहे. त्याने सादर केलेले हे राष्ट्रगीत पाहून सर्वांनीच रिकीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिकीचा हा व्हिडीओ शेअर करत 'अद्भूत, यामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल' असे म्हटले आहे.
रिकी केजने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जगभरातील प्रत्येक भारतीयासाठी ६० सेकंदाचा हा व्हिडिओ भेट दिला. त्याने लंडनमधील प्रसिद्ध अॅबे रोड स्टुडिओमध्ये जगातील सर्वात मोठ्या सिम्फनी ऑर्केस्ट्राद्वारे रेकॉर्ड केलेले, भारतीय राष्ट्रगीत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शेअर केलं. हा व्हिडीओ शेअर करत रिकीने, "काही दिवसांपूर्वी, मी लंडनच्या प्रसिद्ध अॅबे रोड स्टुडिओमध्ये भारताचे राष्ट्रगीत सादर करण्यासाठी १०० जणांचा ब्रिटिश ऑर्केस्ट्रा, द रॉयल फिलहारमोनिक ऑर्केस्ट्रा आयोजित केला होता. भारताचे राष्ट्रगीत रेकॉर्ड करणारा हा सर्वात मोठा ऑर्केस्ट्रा होता. शेवटच्या 'जय हे...' ने माझ्या अंगावर अक्षरश: शहारे आले होते. भारतीय संगीतकार असल्याचा आनंद होतो. या स्वातंत्र्यदिनी मी हे ऐतिहासिक रेकॉर्डिंग तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे. आदराने वापरा, शेअर करा आणि पहा. ते आता तुमचे आहे. जय हिंद. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा" या आशयाचे कॅप्शन दिले आहे.