बॉलिवूड, हिंदी सिनेसृष्टीला आपल्या अभिनयाची भुरळ पाडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर आता पुन्हा एकदा हिंदीतील मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. सई ताम्हणकर आता नागराज मंजुळेच्या 'मटका किंग' या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. अभिनेता विजय वर्मा हा लीड रोलमध्ये असणार आहे. काही महिन्यांपूर्वी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची घोषणा केली होती. त्यात 'मटका किंग'ची ही घोषणा करण्यात आली होती. 'मटका किंग' असलेल्या रतन खत्री याच्या आयुष्यावर ही वेब सीरिज बेतली आहे.
यंदाचे २०२४ वर्ष हे सई ताम्हणकरसाठी खास आहे. काही दिवसांपूर्वी एक्सेल एंटरटेनमेंट सोबत दोन नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा करत सईने तिच्या बॉलिवूड प्रोजेक्टबद्दल माहिती दिली होती. आता अॅमेझॉन प्राईमने "मटका किंग' "ची अधिकृत घोषणा करून सईने देखील या खास प्रोजेक्टचा भाग असल्याचं सांगितले आहे.
'भक्षक' या चित्रपटानंतर सई ताम्हणकर ही 'अग्नी', 'ग्राउंड झिरो', 'डब्बा कार्टेल', ''मटका किंग'' सारख्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. 'मटका किंग'चे शूटिंग काही दिवसांपूर्वी सुरू झाले आहे. विजय वर्मासह इतर बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी या वेब सीरिजमध्ये असणार आहे.
सई ताम्हणकर आणि नागराज मंजुळे यांचा हा पहिला प्रोजेक्ट असणार आहे. त्यामुळे सईच्या चाहत्यांना तिच्या या नव्या प्रोजेक्टची उत्सुकता लागली आहे. नागराज मंजुळे मंजुळेसोबत काम करण्याबद्दल सईने म्हटले की "नागराज मंजुळे सोबत काम करण्याची इच्छा माझी होती आणि ही गोष्ट माझ्या विशलिस्ट मध्ये देखील होती. आता आम्ही 'मटका किंग' सारख्या प्रोजेक्टसाठी सोबत काम करतोय आणि या निमित्ताने ही इच्छा पूर्ण होते याचा आनंद आहे. अनेक इंटरव्ह्यू आणि सोशल मीडिया पोस्ट मधून त्यांच्या सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त देखील केली होती आणि स्वप्नपूर्ती होते म्हणून एक वेगळं सुख असल्याचेही सई ताम्हणकरने म्हटले.
या वेब सीरिजच्या माध्यमातून पहिल्यांदाच विजय वर्मासोबतही काम करण्याचा अनुभव यामुळे मिळणार असल्याचे सईने सांगितले. तो एक उत्तम कलाकार आहे आणि त्याच्यासोबत हा प्रोजेक्ट करतेय म्हणून मी खूप उत्सुक असल्याचेही सई ताम्हणकरने सांगितले. नागराज मंजुळे, विजय वर्मा आणि ''मटका किंग''साठी मला खूप उत्सुकता आहे. हे वेगळं थ्रील असणार यात शंकाच नाही असेही सईने म्हटले.
एकंदरीत कामाचं सातत्य जपत सई बॉलिवुडवर अधिराज्य गाजवणार यात शंका नाही.