निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी प्रोजेक्टची नुकतीच घोषणा झाली आहे. रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट्ट यांच्यासोबत भन्साली 'लव्ह अँड वॉर' नावाच्या नवीन चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. यानिमित्ताने भन्साली १७ वर्षानंतर पुन्हा एकदा रणबीर कपूरसोबत काम करणार आहेत. याशिवाय 'गंगूबाई काठियावाडी'च्या यशानंतर भन्साली आलियासोबत पुन्हा एकत्र आले.
काल बुधवारी २४ जानेवारीला या सिनेमाची घोषणा करण्यात आली. विकी आणि आलिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. या चित्रपटाची कथा काय असेल याविषयीची अधिक माहिती अद्याप समोर आली नाही.
रणबीर-आलिया आणि विकीच्या या चित्रपटाची शूटिंग येत्या काही दिवसांत सुरू होईल. हा चित्रपट पुढच्या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूरने २००७ मध्ये भन्साळींच्या ‘सावरियाँ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता बऱ्याच वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी २००५ मध्ये रणबीरने ‘ब्लॅक’ या भन्साळींच्या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. त्याचप्रमाणे भन्साळी आणि विकी कौशल यांचा हा पहिलाच प्रोजेक्ट असेल. आलियासोबत त्यांनी २०२२ मध्ये ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठी काम केलं होतं. या चित्रपटातील भूमिकेसाठी आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारदेखील मिळाला.
‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर आणि आलियासुद्धा लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. भन्साळींचा चित्रपट आणि त्यातील स्टारकास्ट हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. म्हणूनच ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आलिया आणि विकीच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी चित्रपटाविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे.
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)