तीळ-आवळा पाचक रोल
साहित्य : 1 वाटी किसलेला आवळा, 1 वाटी भाजलेले तिळकूट, अर्धा वाटी खवा, पाव वाटी किसलेला गूळ, 2 चमचे पिठीसाखर, स्वादानुसार वेलची पूड व जायफळ पूड, 2 चमचे साजूक तूप, सजावटीसाठी थोडे तीळ व बदाम.
कृती : पॅनमध्ये साजूक तूप गरम करून त्यात किसलेला आवळा परतवून घ्या. नंतर त्यात तिळकूट, दाणेकूट, खवा, गूळ आणि पिठीसाखर घालून 2 मिनिटे परतवून घ्या. नंतर आच बंद करून वेलची पूड व जायफळ पूड घालून एकत्र करा. मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्याचे लहान-लहान रोल तयार करा. हे रोल तिळात घोळून, त्यावर बदाम लावून सर्व्ह करा.
काळ्या तिळाची खीर
साहित्य : अर्धा वाटी काळ्या तिळाची पेस्ट (गरम पाण्यात भिजवून वाटलेले), स्वादानुसार मीठ, पाव वाटी भाजलेल्या दाण्यांचे कूट, 1 वाटी नारळाचे दूध, 2 चमचे कॉर्नफ्लोअर पेस्ट, पाव वाटी किसलेला गूळ, सजावटीसाठी सुका मेव्याचे पातळ काप व डेसिकेटेड कोकोनट.
कृती : एका भांड्यात थोडे पाणी गरम करून त्यात सुकामेवा व डेसिकेटेड कोकोनट व्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य घालून चांगले उकळवून घ्या. मिश्रण शिजल्यावर आच बंद करा. खिरीवर सुकामेव्याचे काप व डेसिकेटेड कोकोनट घालून सर्व्ह करा.