- ललिता वैद्य
मी पोतनीसकाकांना फोन केला. ते रिटायर्ड ए.सी.पी. आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला. काकांनी सर्व ऐकून घेतलं. आणि श्रीकांतला त्याच्या मुलाला सर्व सांगून त्याच्याकडे फोन दिला. श्रीकांत मला घरीच बोलवत होता, म्हणजे नीट प्लॅन आखता येर्ईल, असं त्याचं म्हणणं होतं. पण काका म्हणाले, “जर तुझ्या घरावर पाळत असेल तर उगीच संशय येईल.” म्हणून फोनवरच आम्ही प्लॅन ठरवला.
“ट्रिं ग ट्रिंग”- फोन वाजला. “आत्ता कोणाचा फोन असावा?” मी चकीतच झाले. यावेळी माझ्या मैत्रिणी कोणीच फोन करत नाहीत.
“हॅलो!”- मी फोन उचलला.
“हॅलो, मुकुंदराव आहेत का?”- “मुकुंद कुलकर्णी इथेच नं?”
“कोण बोलतंय?” मी मनात हसत विचारलं.
“मी रविंद्र सातार्डेकर… मी मित्र आहे त्यांचा. … अं, जरा काम होतं.”
“सॉरी, पण आता तो घरी नाहीये. तुम्ही त्याच्या ऑफिसमध्येच आहात का? तो आत्ता ऑफीसच्या कामासाठी बंगलोरला गेलाय. दोन दिवसानंतर येईल. तुम्हाला ते माहितच असेल. सतत बाहेरगावी जात असतो.” मी पुन्हा गमतीने बोलले.
“मग मी दोन दिवसांनंतर करतो फोन. चालेल?”
“हं… हरकत नाही. पण तुम्ही असं करता का? तुमचा फोन नंबर देऊन ठेवा. तो आल्यावर फोन करायला सांगते. त्याचं काय आहे. कधी कधी तर अचानकच कुठेतरी दौरा करायचा असतो, मग घरी येऊन कशी तरी बॅग भरायची आणि पळायचं! तेवढ्या वेळात आलेले फोन वगैरे सर्व मी लिहून ठेवलेलं असतं ते नजरेखालून घालतो, पण तेवढाही वेळ नसेल, तर कोणालातरी पाठवून सामान किंवा कागदपत्र, पैसे मागवून घेतो. माझ्याशी बोलायलाही वेळ नसतो त्याला. म्हणून म्हटलं-- अं, हा नंबर त्यानंच दिला का तुम्हाला? नाही सहसा तो कोणाला हा नंबर देत नाही. तुम्ही त्याचे जवळचे मित्र असणार म्हणून दिला असेल. तुमचा नंबर त्याच्याकडे असेल नं? मी सांगते आल्यावर त्याला… तुमचं नाव रविंद्र सातार्डेकर म्हणालात नं? मी सांगते त्याला. ठेवू फोन?” मी हसतच फोन ठेवून दिला.
मला गंमतच वाटत होती. काल संध्याकाळी त्या रविंद्रचा फोन आला, तेव्हा मी थोडी भांबावले होते. म्हणजे जरा घाबरलेच होते मी! कारण ऐकलंत तर तुम्हालाही तसंच वाटेल. पण मग मी सावरले, म्हटलं “करूया जरा मजा! तेवढाच टाइमपास!” असा विचार करून बिनधास्त थापा मारत राहिले. म्हणजे अजून तुम्हाला गंमत काय झाली ते सांगितलंच नाही नं मी? काय झालं?… अहो त्यानं मुकुंदराव विचारलं नं? तर इथे कोणी मुकुंदराव वगैरे नाहीये… दारावर एम.एस. कुलकर्णी आणि खाली नेमप्लेटच्या बोर्डवर ‘मु. श्री. कुलकर्णी’ हे नाव वाचून त्यानं ‘मु’ म्हणजे मुकुंद असा सोयीस्कर अर्थ लावून ‘मुकुंदराव’ विचारलं असावं. मी मुक्ता श्रीधर कुलकर्णी. हा फ्लॅट माझ्या नावावर आहे. म्हणजे मुकुंदराव कोणी नाहीच. इथे पुरुष माणूस कोणी नाहीये. मला मूलबाळ कोणी नाही. लग्नानंतर यांची फिरतीची नोकरी होती, पण मी इथे नोकरी करत होते, म्हणून इथे घर केलं आम्ही. महिन्यातून 15-20 दिवस ते फिरतीवर, 10-15 दिवस घरी मुक्काम असायचा. असे फिरतीवर असतानाच अपघाती मरण आलं त्यांना. कंपनीनं कॉम्पेन्सेशन म्हणून रक्कम दिली. त्यांचा फंड वगैरे दिला. माझी नोकरी चालू होती. म्हणून नोकरी देण्याचा प्रश्नच नव्हता. मी त्यावेळी 47 वर्षांची होते. घाबरणं हा माझा स्वभाव नाही. आणि तशीही एकटी राहण्याची थोडी सवय होतीच. घाबरायचं काय? त्यांच्या विम्याचेही पैसे फार खटपट न करता मिळाले. सगळे पैसे निरनिराळ्या ठिकाणी गुंतवले आणि नोकरी चालू होती, त्यामुळे कसलीच काळजी नव्हती. ही जागा आधीपासून माझ्याच नावावर आहे, त्यामुळे तोही प्रश्न आला नाही. साडेतीन वर्षांपूर्वी मी रिटायर झाले. आता पेन्शन घेते आणि मजेत एकटी राहते. म्हणून त्या रविंद्रला वाटेल त्या थापा मारल्या -जरा गंमत!
मी गंमत म्हणून केलं आणि विसरून गेले आणि त्या रविंद्रची पुढची चाल ऐकली आणि घाबरायचं नाही म्हटलं तरी पोटात गोळा आला. त्याचा परत फोन आला की, “मुकुंदला अपघात झालाय आणि तो रायपूरच्या कोणत्यातरी सरकारी दवाखान्यात आहे, आणि आता तिथे पंधरा हजार रुपये भरायचे आहेत, तर ते मी रविंद्रबरोबर पाठवावेत!” हा फोनवरचा निरोप ऐकला. त्याची चाल कळली, आणि मला माझ्या बाबांची आठवण आली. ते ए.सी.पी. पांडे तुम्हाला ऐकून माहीत असेल. आता ते नाहीत. पण त्यांचे पोलीस खात्यातले कितीतरी मित्र माझ्या माहितीचे आहेत. त्यांच्यापैकी कोणाची तरी मदत घेईन मी. घाबरायचं कशाला? असिस्टंट पोलीस कमिशनरची मुलगी घाबरेन का? अजिबात नाही?
त्याचा परत फोन आला, तेव्हा मी काही बोलायच्या आधीच त्यानं सांगायला सुरूवात केली, “ताई मुकुंदाला अपघात झालाय. कुठे, कसा ते मला नीटसं कळलं नाही. पण आता तो रायपूरच्या सरकारी दवाखान्यात आहे, आणि तिथे 15 हजार रुपये ताबडतोब भरायचे आहेत. तर मी ते तुमच्याकडून घेऊन यावे असं त्यानं सांगितलंय. नंतर ऑफिसकडून ते तुम्हाला मिळतील. पण आधी आपणच भरावे लागतात ना? नंतर ऑफिस त्यांच्या नियमाप्रमाणे किती द्यायचं ठरवतं आणि त्याप्रमाणे देतं. मी उद्याच निघतोय रायपूरला जायला. तर आत्ताच येऊ का पैसे घ्यायला?”
हे ऐकलं आणि मी क्षणात निर्णय घेऊन त्याला म्हटलं. “अरे बाबा… सॉरी. एकेरी हाक मारली म्हणून रागावू नको हं. मुकुंदाचा मित्र म्हणजे मुलासारखाच नं? जाऊ दे. तर काय सांगत होते, एवढे पैसे घरात कसे ठेवू रे मी? हा असा सारखा बाहेर असतो. मी अशी म्हातारी! अगदी थोडे पैसे घरात असतात. मी उद्या बँक उघडल्यावर पैसे काढून आणेन. ते कार्ड वगैरे माझ्याकडे नाहीये. तुझी उद्या कितीची गाडी किंवा विमान असेल ते सांग-- मी जास्तीत जास्त लवकर म्हणजे उद्या सकाळी साडेदहापर्यंत पैसे घेऊन येऊ शकेन. तू असं कर, साडेदहाच्या सुमारास घरी ये, मी पैसे तयार ठेवते. आणखी काही मागितलं का त्यानं? त्या रायपूरच्या हॉस्पीटलचा नंबर मिळेल का मला? एकदा त्याच्याशी प्रत्यक्ष बोलले असते नं मी, म्हणजे जरा मनाला शांती वाटली असती.”
काकांशी बोलून काहीतरी प्लॅन ठरवायला हवा, म्हणून वेळ मागून घेतला. “ताई, सॉरी हॉस्पीटलचा नंबर माझ्याकडे नाहीये. मी उद्या साडेदहापर्यंत येतो, म्हणजे मला लगेच निघता येईल. चालेल नं? तुम्हाला जरा घाई होईल, पण मी तरी काय करू?”
त्याला “चालेल, साडेदहापर्यंत ये,” असं म्हणून फोन बंद केला. मला वाटलं होतं, तो स्वतःचाच नंबर देईल आणि दुसर्याच कुणाला तरी हॉस्पीटलची रिसेप्शनिस्ट करेल. त्याचा नंबर माझ्या कॉलर आय.डी. वर आला होता.
मग मी पोतनीसकाकांना फोन केला. ते रिटायर्ड ए.सी.पी. असून त्यांचा मुलगा इन्सपेक्टर आहे हे, मला माहित होते, पण कोणत्या हुद्यावर ते मला माहित नव्हते. आता त्यांचं नावही आठवत नाही. त्यांच्याशी संपर्क साधला. काकांनी सर्व ऐकून घेतलं. आणि श्रीकांतला त्याच्या मुलाला सर्व सांगून त्याच्याकडे फोन दिला. श्रीकांत मला घरीच बोलवत होता, म्हणजे नीट प्लॅन आखता येर्ईल, असं त्याचं म्हणणं होतं. पण काका म्हणाले, ‘जर तुझ्या घरावर पाळत असेल तर? उगीच संशय येईल.’ म्हणून फोनवरच आम्ही प्लॅन ठरवला.
दहा वाजता मी तयारीला लागले. पायाच्या घोट्याजवळ बॅण्डेज बांधून लंगडत चालण्याची प्रॅक्टीस केली. मुद्दामच कपडे बदलले नाहीत. घरात नेसलेली साडी जरा बरी होती तीच ठेवली, आणि रविंद्रची वाट पाहात बसून राहिले.
सव्वादहाच्या सुमारास तो आला. माझी बाई आत काम करीत होती. मीच लंगडत दरवाजा उघडला. त्याला आत घेतलं, आणि लंगडत परत कोचावर बसण्यासाठी चालू लागले. तेवढ्यात शांती बाहेर येऊन म्हणली, “आजी तुम्ही कशाला उठलात? मी उघडत होते नं दार? हात धुवून मी येतच होते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे डॉक्टरकाकांनाही फोन केलाय. मला वाटलं तेच आले की काय? तुम्ही नका हालचाली करू. मी बघते.”
रविंद्र तोपर्यंत उभाच होता. तो लगेच म्हणाला, “काय झालं ताई? डॉक्टरांना बोलावलंय म्हणजे?”
“काही नाही हो. मी आंघोळ करून बाहेर येताना बाथरूममध्ये पडले. पाय मुरगळलाय. सुजलाय. चालताच येत नाहीये. म्हणून डॉक्टरांना बोलावलं. शांतीलाच सांगितलं फोन करायला. फ्रॅक्चर वगैरे नसले म्हणजे बरं…”
तेवढ्यात परत बेल वाजली. शांतीनं बाहेर येऊन दार उघडलं. श्रीकांतच डॉक्टर बनून आला होता.
“या डॉक्टर- हा पाय बघा. मी बाथरूममध्ये पडले. नुसता मुरगळलाय की फ्रॅक्चर आहे? काही कळत नाहीये.” मी श्रीकांतला पाय दाखवत होते. श्रीकांत एकदा माझ्याकडे, एकदा रविंद्रकडे बघत होता. “हे कोण? हे पण डॉक्टर आहेत का? काय नाव?” श्रीकांतनं रविंद्रलाच विचारलं.
“नाही ते डॉक्टर नाहीयेत. मुकुंदला अपघात झालाय आणि तो रायपूरच्या दवाखान्यात आहे. तिथे भरायला पैसे हवेत नं? ते न्यायला त्यानं यांना पाठवलंय. मी पैसे काढून आणणार होते नं- पण हा पाय… मी आता घरातही चालू शकत नाहीये, खूप दुखतोय पाय. म्हणून शांतीला सांगितलं होतं तुम्हाला आणि माझ्या भाच्याला फोन करायला. पण त्याला लागलाच नाही. आता बँकेतून पैसे काढणार कसे, आणि कोण? हे रविंद्र सातार्डेकर, ते आत्ता लगेचच निघणार होते रायपूरला जायला. काय करावे?”
“आजी, तुम्ही आधी तुमचा पाय नीट करण्याचं पहा. फ्रॅक्चर असेल तर एक्सरे काढल्याशिवाय कळणार नाही. तुम्हाला मी हॉस्पीटलमध्ये घेऊन जातो. तिथे एक्सरे काढू. मग पुढे काय, ते ठरवता येईल. तुम्ही काळजी करू नका. उगीच बी.पी. वाढेल.” श्रीकांत डॉक्टर म्हणाला.
“अहो, पण मुकुंदाला पैसे पाठवणे जरूरीचे आहे हो. मी असं करते. या रविंद्रला बेअरर चेक देते. म्हणजे ते पैसे काढून तसेच रायपूरला जाऊ शकतील.”
रविंद्रच्या चेहर्यावर लगेच आनंद दिसू लागला. मी शांतीला बोलावलं आणि माझं चेकबुक आणायला सांगितलं. ती ते घेऊन आली. श्रीकांतनं अॅम्ब्युलन्सला फोन केला. (म्हणजे त्याच्या वडीलांना पोतनीसकाकांना) ताबडतोब अॅम्ब्युलन्स घेऊन येण्यास सांगितलं. पोतनीसकाका येईपर्यंत मला वेळ काढायचा होता.
मी शांतीकडून चष्मा मागवून घेतला. नंतर पेन आणायला सांगितलं. तिलाही सर्व नाटकाची कल्पना दिल्यामुळे तीही हळूहळूच सर्व गोष्टी करत होती. पेन तर किती वेळ शोधत बसली. नंतर दहा मिनिटांनी पेन सापडलं. तर त्यात रिफील संपलेलं. मी तिच्यावर वैतागण्याचं नाटक केलं. आणि पोतनीसकाका आत्ता येताहेत हे कळल्यावर श्रीकांतनं त्याचं पेन
मला दिलं.
“आजी, शांतपणे लिहा चेक, चुका करू नका, नाहीतर त्यांना पैसे देणार नाही बँक. सावकाश शांतपणे लिहा. घाबरू नका.”
मी चेक लिहीण्याचं नाटक सुरू करणार तेवढ्यात पोतनीसकाकांनी बेल वाजवली. श्रीकांत चटकन उठला आणि त्यानंच दार उघडलं.
“या… अॅम्ब्युलन्स आली?” “हो, कुठे आहे पेशंट? या स्ट्रेचरवर निजवायला पाहिजे.” हे सगळं नाटक चालू असताना मी चेक लिहीणं थांबवलंच होतं. पोतनीसकाकांनी सुत्रं हातात घेतली.
“या आजी पेशंट आहेत? तुम्ही यांचे चिरंजीव का? पेशंटबरोबर चला मग. आमचे पैसे कोण देणार? तुम्हीच फोन केला नं. चला बरोबर.”
“नाही, मी यांचा डॉक्टर आहे. मीच केला होता फोन. आणि हे यांच्या चिरंजीवाचे मित्र. ते आणि मी. आम्ही दोघेही येतो अॅम्ब्युलन्समधून.”
पोतनीसकाकांनी लगेच बरोबरच्या दोन माणसांना स्ट्रेचर घेऊन आत बोलावलं. मला त्याच्यावर निजवलं, आणि रविंद्रकडे पाहून ‘चला’ म्हणाले. मी आत दरवाजापाशी असलेल्या शांतीला म्हटलं. “तुझं काम झालं आणि तरीही मी आले नसेल तर शेजारी किल्ली ठेवून तू गेलीस तरी चालेल.” तिला खूण केली आणि चेकबुक आत नेऊन ठेवायला सांगितलं. आता रविंद्रला काय करावं ते सुचेना.
तो म्हणाला, “डॉक्टर, मला आता ताबडतोब ते पैसे घेऊन रायपूरला जायला हवं… ताई चेक देता नं? म्हणजे मी पैसे…”
पण त्याला मध्येच थांबवत पोतनीसकाका जरबेच्या आवाजात म्हणले, “अहो, सत्येंद्रनाथ. तुम्ही तुमच्या आईबरोबर हॉस्पीटलला नाही येत? डॉक्टर आहेतच बरोबर. गरज असली तरच ते अॅडमिट करून घेतात, नाहीतर परत तुम्ही आईला घेऊन घरी येऊ शकता.” पोतनीसकाकांनी ‘सत्येंद्रनाथ’ असं म्हटल्यावर रविंद्र जरासा चपापला होता. पण एका क्षणात चेहरा परत कोरा करून म्हणाला, “अहो, तुम्ही - माझं नाव… रविंद्र सातार्डेकर- मी यांचा मुलगा नाही. यांच्या मुलाचा मित्र आहे. त्याच्यासाठीच पैसे न्यायला मी आलोय. आत्ता लगेच मला निघावं लागेल. ताई तुम्ही चेक द्या चटकन. म्हणजे मला उशीर होणार नाही. आधीच उशीर झालाय. मी लगेच.”
“एक मिनिट… मग सत्येंद्रनाथ कोण? हा फोटो बघ. हा तुझाच फोटो आहे ना? त्याच्या मागे सत्येंद्रनाथ असं नाव आहे.” पोतनीसकाकांनी बोलता बोलता बरोबरच्या पोलीसांना खूण केली. त्या दोघांनी रविंद्रला- ‘सत्येंद्र’ला बेड्या घालून धरून ठेवलं.
“आता मी सांगतो, मी इन्स्पेक्टर श्रीकांत. मी डॉक्टर नसून पोलीस इन्स्पेक्टर आहे. सी.आय.डी. मध्ये नुकतीच माझी नेमणूक झाली आहे. तुझे फोटो आमच्या रेकॉर्डला आहेत. हे माझे वडील ए.सी.पी. पोतनीस आणि ते दोघे कॉन्स्टेबल आहेत. चला रे याला घ्या आपल्या गाडीत. अॅम्ब्युलन्समध्ये नाही. या आमच्या अॅम्ब्युलन्समधून पोलीस स्टेशनलाच न्यावं लागेल या पेशंटला. हॉस्पीटलमध्ये नाही. मावशी सोडा ती पट्टी आणि घरीच विश्रांती घ्या. आता मला सांग मुकुंद कुठे भेटला? त्यालाही अटक करावी लागेल. सांग कुठे आहे तो?” श्रीकांतचं बोलणं ऐकत असतानाच ‘सत्येंद्र’ की ‘रविंद्र’चे डोळे पांढरे होत होते. तो काय उत्तर देणार? त्याची बोबडी वळली होती.
मग पोतनीसकाकाच म्हणाले, “इथे मुकुंद कोणीही नाही. या मुक्ताला मूलबाळ झालंच नाही. तू खाली बोर्डावर ‘मु.श्री. कुलकर्णी’ हे नाव वाचून मुकुंद उभा केलास. बरोबर? तिलाही मजा वाटली आणि तिनंही मजेत मुकुंदबद्दल थापा मारल्या. ती म्हातारी आहे असं वाटल्यावर तू तिला फसविण्याचा बेत आखलास. ती ज्येष्ठ नागरिक असली तरी अबला नाही. तिचे वडील ए.सी.पी. होते. मी त्यांचा मित्र. तू पैसे मागितलेस तेव्हा तिनं मला कळवलं आणि मग हे नाटक केलं. आता तुला काय सांगायचं असेल ते कोर्टात सांग. चल.” पोलीस त्याला घेऊन गेले आणि मी अन् शांती हसत बसलो.