Close

करावं तसं भरावं! (Short Story: Karave Tase Bharave)

  • ज्योती आठल्ये
    घरातील तिघंही कसे माझ्या आज्ञेत आहेत, याचं त्याला भूषण वाटत होतं. मात्र त्याचा हा अहंकारी, हम करेसो स्वभाव कुणालाच आवडत नव्हता…
    अगदी त्याच्या आई व भावंडांनाही! म्हणून तर एकाच गावात, अगदी हाकेच्या अंतरावर राहूनही कुणी त्याच्याकडे येत नव्हतं.
    “आई, जरा उमेशकडे जाऊन येतो.”
    असं म्हणत प्रसादने पायात चपला घातल्या. खरं तर त्याने ‘आई’ असं म्हटलं असलं, तरी ते बाबांकडे पाहूनच म्हटलं होतं. बाबा काही बोलणार, तोच तो म्हणाला, “सात वाजलेत. सव्वा आठला जेवायला येईन.” तरी त्याचे बाबा म्हणजेच, श्रीपाद नेहमीप्रमाणेच म्हणालाच, “दार नीट लावून जा. आधी डावा दरवाजा पूर्ण लाव आणि मग उजवा… कळलं!”
    “हो” म्हणत तो बाहेर पडला. तेवढ्यात टॉवेलला हात पुसत प्रसादची आई, प्रतिभा बाहेर आली आणि
    अगदी हळू आवाजात म्हणाली, “अहो, मी काय म्हणतेय… प्रसाद आता मोठा झालाय. त्याला जरा मित्रांबरोबर मजा करू द्या. याच वयात वाटतं, जरा मित्रांबरोबर भेळ खावी, पिक्चरला जावं.”
    त्यावर श्रीपाद नेहमीसारखाच चिडला आणि म्हणाला, “पण हे मला चालणार नाही. कधीतरी मजा म्हणून केलेलं नंतर रोजचंच होऊन बसतं. अन् मग पुढे मुलं सिगरेट-दारू यांच्या आहारी कधी जातात, कळतच नाही. तेव्हा पुन्हा तेच सांगू नकोस. त्यापेक्षा माझ्या संध्याकाळच्या पूजेची तयारी कर. आणि हो, ताम्हन, पळी घासले आहेस ना. चांदीचे आहेत ते, तेव्हा चकचकीत दिसलेच पाहिजेत.”
    हे ऐकून प्रतिभा आत गेली आणि हळूच दार उघडत दीपा घरात आली. ती कोपर्‍यातल्या ठरावीक ठिकाणी चपला काढत असताना श्रीपादचं तिच्याकडे लक्ष गेलं. कपाळावर आठ्यांचे जाळे पसरवत श्रीपाद म्हणाला, “हा कोणता ड्रेस घातलास?
    किती वेळा सांगितलं, हे असले कपडे, रंग मला आवडत नाहीत म्हणून. प्रतिभा, बाहेर ये जरा.”
    चावी दिल्यावर बाहुली कशी सरकते, तशी प्रतिभा निर्विकार चेहर्‍याने बाहेर आली. ‘चावीची बाहुली’ हे तिला तिच्या नणंदेने, वहिनीने, जावेने दिलेलं टोपण नाव. अर्थात तिला ते माहीत नव्हतं. तर प्रतिभा बाहेर आली आणि खालच्या मानेनेच म्हणाली,
    “आज शांभवीचा वाढदिवस होता. तेव्हा सगळ्या मैत्रिणी हिला म्हणाल्या की, हाच ड्रेस घालून पार्टीला ये. अगदी माधुरी दीक्षित दिसशील.”
    “व्वा! आपली मुलगी एखाद्या नटीसारखी दिसते, याचा तुलाही अभिमान वाटतो! काय आई
    आहेस गं…” छद्मीपणे तो म्हणाला.
    यावर काही न बोलणंच इष्ट, हे जाणून त्या
    दोघी आत गेल्या. प्रतिभाच्या अशा या माघार घेण्याच्या स्वभावामुळे श्रीपादचा अहंकार, चक्रमपणा वाढतच चालला होता. घरातील तिघंही कसे माझ्या आज्ञेत आहेत, याचं त्याला भूषण वाटत होतं. मात्र त्याचा हा अहंकारी, हम करेसो स्वभाव कुणालाच आवडत नव्हता… अगदी त्याच्या आई आणि भावंडांनाही. म्हणून तर एकाच गावात, अगदी हाकेच्या अंतरावर राहूनही कुणी त्याच्याकडे येत नव्हतं. कारण श्रीपादच्या घरी जायचं म्हणजे, संध्याकाळी पाच ते सात या वेळेतच. शिवाय चहाही मिळेल याची खात्री नसे. त्याच्या चक्रमपणाचा सर्वांनीच धसका घेतला होता.
    श्रीपादचा धाकटा भाऊ विजय आणि त्याची पत्नी विनया आपल्या एका वर्षाच्या प्रणवला घेऊन एकदा त्यांच्या घरी गेले होते. प्रणवने खेळता-खेळता हॉलमध्येच सू केली तर, श्रीपादने विनयाला अख्खा हॉल डेटॉलने पुसून काढायला लावला होता. हा प्रकार अर्थातच तिने आपल्या सासूबाईंच्या कानावर घातला होता. पण त्या तरी आपल्या
    या चक्रम मुलाविषयी काय बोलणार होत्या?…
    पण या सगळ्यात सर्व जण प्रतिभालाच दोषी मानत होते. त्यांच्या मते, अगदी प्रतिभाच्या आईच्या मतेही श्रीपादचा इगो प्रतिभानेच जपला होता. त्याचे अहंकारी, तुसडे वागणे तिने सहन केले, म्हणूनच तो आणखीन अहंकारी झाला. तिने वेळीच निषेध केला असता, तर तो जरा माणसात राहिला असता. काहींचं म्हणणं असंही होतं की, नवर्‍याच्या आड लपलं की, कुणासाठी काही करायला नको आणि वाईटपणाही घ्यायला नको. कारण श्रीपाद एका बाबतीत अतिशय दक्ष होता… प्रतिभावर कुणाचेही काही करायचे टाकत नव्हता. पण त्याच्या या अतिरेकी प्रेमाने तिची किती घुसमट होत होती,
    ते इतरांना काय माहीत?
    खरं म्हणजे, प्रतिभाच्या या भेदकपणाचे कारण काही वेगळेच होते. तिला सतत श्रीपादच्या उपकारांचे ओझे जाणवायचे. तिचे बाबा अचानक नोकरी सोडून घरी बसले होते. त्यांना म्हणे कानात सारखा आवाज यायचा की, ‘तू कामाला जाऊ नकोस!’ त्यामुळे आईची प्रचंड ओढाताण व्हायची… आर्थिकही आणि मानसिकही. त्यात प्रतिभा सतरा वर्षांची झाली होती. खूप सुंदर नव्हती, त्यामुळे
    ‘हिचे लग्न कसे होणार?’ असे सारखे आई म्हणे. या सर्व परिस्थितीचा राग ती नकळतपणे प्रतिभावर काढू लागली होती. या अचानक झालेल्या बदलांमुळे हळुवार मनाची प्रतिभा भांबावली होती. अशा वेळी समजूत घालायला, आधार द्यायला कुणीच नसल्यामुळे ती भित्री झाली होती. आईच्या या अशा स्वभावामुळे नातलग केव्हाच दुरावले होते. आपण काय केलं तर आईला आधार वाटेल,
    हे तिला समजत नव्हतं.
    अचानक एके दिवशी ऑफिसचं पत्र द्यायला एक
    मुलगा घरी आला. पुढे तो चार-पाच वेळा आल्यावर त्याचे नाव श्रीपाद जोशी असल्याचे तिला कळले. खूप रुबाबदार होता तो. स्वच्छ परीटघडीचे कपडे, केसांना व्यवस्थित पाडलेला भांग… हिच्या आईला तो प्रचंड आवडला होता. एके दिवशी त्याने प्रतिभा समोर असतानाच तिच्या आईला थेट विचारलं, “तुम्ही हिच्या लग्नाचा विचार करता आहात का? करत असाल, तर मी तयार आहे हिच्याशी लग्न करायला. फक्त मला कडक मंगळ आहे.”
    तेव्हा हिची आई
    चाचरत म्हणाली होती, “लग्न तर करायचं
    आहेच, पण आमच्याकडे आत्ता काहीच नाही. त्यामुळे लग्नाचा खर्च
    कसा झेपणार? त्यातून तुमच्या आईच्याही काही अपेक्षा असतीलच ना!”
    “लग्न आईला करायचंय की मला? त्यांना कुणाला नाही पटलं, तर येणार नाहीत लग्नाला. तेव्हा बघा अन् ठरवा.” असं तो खाडकन म्हणाला होता.
    मग काय, प्रतिभाला न विचारताच लग्न झालं. श्रीपादने म्हटल्याप्रमाणे त्याच्याकडचं कुणीच काहीच बोललं नाही. अन् त्याचा नि प्रतिभाचा संसार सुरूही झाला. हळूहळू त्याचा हा विक्षिप्तपणा तिच्या लक्षात येऊ लागला. त्याचा अति शिस्तीचा, स्वच्छतेच्या कल्पनांचा तिला त्रास होऊ लागला. एक-दोनदा तिने बोलून दाखविण्याचा प्रयत्नही केला. तसा
    तो फिस्कारत म्हणाला, “हे घर माझं आहे. इथे माझेच नियम चालतील. राहायचं असेल, तर राहा!”
    हे ऐकून तिचं मन थिजलं… ते थिजलंच! तरीही कधी तरी ती त्याला म्हणे, “अहो, सासूबाईंना बोलवा ना राहायला. तेवढाच त्यांना पण बदल!”

  • तर तो म्हणाला, “तिला बदल हवा असेल, तर
    ती येईल. पाहुण्यांना बोलावतात, घरच्यांना नाही. आणि हे बघ, कुणाचे पुळके आणू नकोस.” यावर ती काय बोलणार?
    असेच मन मारून दिवस चालले होते. खरं तर, लग्नाला जेमतेम सहा महिने झाले असतील, पण तिच्या मनातली ओढ, नवलाई कधीच संपली होती. इथून पुढे नेहमीच त्यांच्यामागे फरफटत जायला लागणार याची तिने खूणगाठ बांधली होती. प्रत्येक गोष्ट त्याच्या तोंडाकडे पाहून करू लागली होती. म्हटल्याप्रमाणे त्याने खरंच घर सोडून जायला सांगितलं तर! ना नोकरी, ना चाकरी. त्यापेक्षा तोंड शिवून राहणं तिने पसंत केलं. पुढे संसार वाढला. प्रसाद आणि दीपा अशी दोन फुलं त्यांच्या संसारवेलीवर बहरली. त्यांच्या बाललीला पाहून तरी श्रीपाद बदलेल असं तिला वाटलं. पण काही बदललं नाही. त्याचा हा स्वभाव जणू मुलांना जन्मतःच कळला होता. म्हणूनच त्यांनी कधी खाऊसाठी हट्ट केला नाही, की अमुकच हवं असं म्हटलं नाही. त्यांनाही घरातला एक नियम न सांगता कळला होता, ‘बाबा वाक्यंम प्रमाणम्।’ अशा वातावरणातच ती दोघं मोठी झाली. नंतर जावई-सूनही आले.
    खरं तर, जावई-सून आल्यावर जीवनात दुसरा अध्याय सुरू होतो. जीवन बदलतं, पण श्रीपादच्या बाबतीत काहीच बदललं नाही. उलट सासर प्रेमळ आणि हौशी भेटल्यामुळे दीपा सासरीच रमली. पण बिचारा प्रसाद आणि त्याची बायको प्राची श्रीपादच्या कैदखान्यात बंदिस्त झाले. नवीन पिढीतली मजा करणं त्यांच्या कुंडलीत नव्हती. आणि श्रीपादचंच राज्य अबाधित राहिलं. हे सर्व पाहून सर्वांनाच
    प्रश्‍न पडे की, देवाचं करतो, गुरुचरित्र वाचतो,
    तरी याच्या स्वभावात शांतपणा कसा येत नाही? देवाचं इतकं करून मन मोठं झालं पाहिजे, तर
    इथे सगळाच आनंदी आनंद!
    प्रतिभाला तरीही आशा होती… नातवंड आल्यावर तरी श्रीपाद सुधारेल. अन् लवकरच तो योग आला. ते आजी-आजोबा झाले. अथर्व रात्री अपरात्री रडायचा. श्रीपादला मात्र हे आवडत नव्हतं. तो याचा दोष प्रसाद आणि प्राचीला देऊ लागला. म्हणायचा मूल सांभाळता येत नाही, तर होऊ कशाला दिलं? तो मूल कसं सांभाळावं यावरून त्यांचं बौद्धिक घेऊ लागला. पदोपदी श्रीपादकडून येणार्‍या सूचनांमुळे प्रसाद कुठेतरी दुखावला जाऊ लागला. शिवाय ऑफिसातल्या मित्रांकडून त्यांचे आईवडील आपल्या नातवंडांचे कसे लाड करतात, सुनेच्या वाढदिवसाला कसं सरप्राइज गिफ्ट देतात, याचे किस्से तो ऐकत होता. कधीतरी मुलांना आईवडिलांकडे ठेवून मित्रांनी ठरवलेले पिक्चर, डिनरचे प्लान ऐकले की तो उदास व्हायचा. अन् खूप विचार करून त्याने एक धाडसी निर्णय घ्यायचा विचार केला.
    एका रविवारी सकाळचे नाश्ता-पाणी झाल्यावर तो म्हणाला, “बाबा, लांबड न लावता सरळच सांगतो. मी वेगळं राहायचं ठरवलं आहे.”
    “का? इथे काय कमी आहे?” जरबेने श्रीपादने विचारलं.
    तसं अंगात हिंमत आलेला प्रसाद म्हणाला, “स्वातंत्र्य, प्रेम यांची कमी आहे. मनासारखं काहीच करता येत नाही. माझे मित्र तुम्हाला हिटलर म्हणतात. कायम गळचेपी केलीत आमची… बिचारी आई! पण आता नाही. भले झोपडीत राहावं लागलं, तरी चालेल! पण आता मला… प्राचीला मोकळा श्‍वास हवाय.”
    ते ऐकून श्रीपाद रागाने थरथरला आणि काही कळायच्या आत प्रसादच्या थोबाडीत मारून म्हणाला, “जा! चालता हो! इथून पुढे आपला
    संबंध संपला. मला कुणाचीही गरज नाही.”
    आठच दिवसांत प्रसाद वेगळा झाला. बाथरूममध्ये जाऊन प्रतिभा खूप रडली, पण आपण किती असहाय्य आहोत, हे तिला माहीत होतं. ना ती प्रसादला थांबवू शकत होती, ना श्रीपादचं मन वळवू शकत होती. तिचं मन मात्र प्रसादकडे ओढ घेत होतं. नातवाची आठवण येत होती. नवरा ऑफिसला गेल्यावर नातवाला गुपचूप भेटून येण्याएवढं तिच्यात धाडस नव्हतं. मनातल्या मनात कुढणंच हातात होतं.
    बघता बघता पाच वर्षं गेली. इतरांकडून प्रसादचे छान चालले आहे, हे कानावर येत होतं. दीपा
    मात्र कधीमधी माहेरी यायची. माहेरी येण्यापूर्वी
    ती आवर्जून प्रसादकडे जायची. तिला मात्र
    श्रीपाद अडवू शकत नव्हता. कारण जावई
    कितीही चांगला असला, तरी खमका होता. त्यामुळे दीपाकडून प्रसादची खुशाली कळे.
    पण माणसाच्या आयुष्यात सगळेच दिवस सारखे नसतात, हे श्रीपाद विसरला होता. अचानक तो आजारी पडला. सुरुवातीला डॉक्टर म्हणाले, फारसे गंभीर नाही. मात्र आता तो वरचेवर आजारी पडू लागला आणि कायम नवर्‍याच्या छायेत राहिलेली प्रतिभा गोंधळू लागली. म्हणूनच आता
    तरी प्रसाद घरात येऊन राहावा, असं तिला वाटू लागलं. पण ते वाटणंही निरर्थक आहे, हे तिला माहीत होतं.
    अन् आता हळूहळू श्रीपाद बिछान्यावरच पडून राहू
    लागला. त्यामुळे खूप चिडचिड करू लागला. म्हणू लागला, “बापाची जबाबदारी नको, म्हणून प्रसाद आधीच वेगळा झाला. बेइमान, कृतघ्न!”
    त्याचं हे बोलणं ऐकून जिभेवर आलेलं बोलणं मागे करताना प्रतिभाला खूप कष्ट होत होते. तिला ओरडून विचारावंस वाटे, “तुम्ही काय वेगळं केलंत?” पण वरकरणी म्हणत होती, “जाऊ देत हो!”
    आता तर आणखीन नवल घडत होतं. एक दिवस प्रसाद शिरस्त्यानुसार बाबांना बघायला आला. तेव्हा श्रीपाद त्याला म्हणाला, “अरे! पुढच्या वेळी नातवाला घेऊन ये. हो की नाही गं?”
    हे अनपेक्षित असल्यामुळे प्रतिभा आणि प्रसाद दोघंही गोंधळले होते. परंतु, काहीतरी बोलायला हवं म्हणून तो म्हणाला, “आणलं असतं हो बाबा, पण खूप मस्ती करतो. टी.व्ही. कार्टून बघतो. जेवताना खूप सांडतो. ते बघून तुम्हाला त्रास होईल.”
    हे ऐकून आपल्याच मुलाने आपले दात घशात घातले,
    हे न समजण्याइतका श्रीपाद खुळा नव्हता. अन् हे सगळं प्रतिभाला अस्वस्थ करत होतं. खूप एकटी पडली होती ती. पण हे आजारपण श्रीपादमध्ये बरेच बदल घडवत होतं. एरव्ही न आवडणार्‍या शेजारच्या वैद्य भाऊंना गप्पा मारायला बोलव म्हणून तो प्रतिभाच्या मागे लागता होता, तर कधी घरकाम करणार्‍या लक्ष्मीच्या नातवाला चॉकलेट देत होता. मला कुणाचीच गरज नाही, असं म्हणणारा तिखट जिभेचा श्रीपाद आता माणसं जवळ यावीत म्हणून उतावीळ होत होता. सारंच नवल होतं. ‘पुढे काय होणार?’ असा प्रश्‍न प्रतिभाला पडायचा. पण त्या देवाने पुढचं सारं
    आधीच ठरवलं होतं.
    एक दिवस ती झोपेतून बराच वेळ उठली नाही. श्रीपाद चहासाठी हाका मारून मारून दमला. शेवटी हेलपटत
    उठला आणि तिला हलवायला लागला. तेव्हा त्याला जाणवलं की, तिचं अंग थंड लागतंय. त्याने लगेच प्रसादला फोन केला. तो डॉक्टरांना सोबत घेऊनच आला. पण सर्व कधीच संपलं होतं.
    नंतर दिवस कार्य झालं, तसं तो प्रसादला म्हणाला,
    “आता इथेच येऊन राहा किंवा मला तुझ्याकडे
    घेऊन चल.”
    “नाही बाबा! दोन्हीही शक्य नाही. मी तुमची एका
    चांगल्या वृद्धाश्रमात सोय केली आहे. खूप स्वच्छ आहे,
    ते वृद्धाश्रम. सगळं वेळच्या वेळी मिळतं. त्यामुळे तुम्हाला नक्की आवडेल. हो की नाही गं दीपा?” दीपाकडे पाहत प्रसाद म्हणाला.
    अन् मग नंतर श्रीपादच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला. पण हे आवडतं की नाही, हे विचारायलाही जवळ कुणी नव्हतं. नातेवाईक दबक्या स्वरात म्हणत होते, “शेवटी खर्‍या हिटलरलाही मवाळ होणं भाग पडलं, तर याची काय कथा! उगाच म्हणत नाहीत, करावं तसं भरावं म्हणून. याने याच्या आईवडिलांना, भावंडांना दुखावलं होतं, म्हणूनच देवाने त्याला ही शिक्षा दिली. नाही तर खरं श्रीपाद चांगला होता. पण कुठे थांबायचं हे न कळल्यामुळे त्याच्यावर अशी एकाकी जीवन व्यथित करण्याची
    वेळ आलीय.”

Share this article