- विनायक रामचंद्र अत्रे
- गजाननाची आळवणी झाली आणि पाठोपाठ कोळी गीताचा कुणीतरी आवाज काढला- ‘एकवीरा आई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी कोल्यावरी!’ आणि मग एकामागून एक गाण्यांचा रतीबच सुरू झाला. बायका, मुलं, पुरुष असे सारेच जल्लोषात सामील झाले. परंतु, वसंतराव, अपर्णा आणि श्वेता मात्र यापासून अलिप्तच दिसले.
‘गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ!
मंगलमूर्ती मोरयाऽऽऽ!’
गणपती बाप्पाच्या जयजयकाराने बस दणाणून गेली. ‘हुर्रेऽऽऽ’ सगळे आनंदाने ओरडले. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमची वर्षा सहल खंडाळ्याला निघाली होती. पहाटे लवकर निघायचे… खंडाळ्याला जायचे… पावसात मस्त भटकंती करायची… झेपेल त्याने पावसात, धबधब्यात मनसोक्त भिजायचे… किंवा नुसतेच भटकायचे… गरमागरम भजी, वडे… मिळेल ते हादडायचे… आमची दरवर्षीची खंडाळ्याची वर्षा सहल म्हणजे मज्जाच असते!
खंडाळ्यात माझ्या एका मित्राचं घर… घर कसलं, चांगला ऐसपैस वाडाच तो… तिथेच आम्ही दरवर्षी उतरतो… गाणी, नकला, कविता, कथाकथन, भजन, अंताक्षरी असे नानाविध खेळ खेळतो… रात्रीचं मात्र वास्तव्य करत नाही… घरी परततो… असा एकदम धम्माल कार्यक्रम करतो आम्ही. त्यातच आमच्या सहलीचे आयोजक, श्री व सौ. चित्रे म्हणजे, तर उत्साह मूर्तीच! या सहलीत आमच्या आदर्श सोसायटीतले सगळे आबाल वृद्ध, मुलंबाळंही सामील होतात. यंदा आमच्या सोसायटीत नवीनच राहायला आलेले वसंत गंधे, त्यांच्या सौ. अपर्णा गंधे आणि दहा-बारा वर्षांची मुलगी श्वेताही सहलीत सामील होणार होते.
सहलीसाठी निघायला म्हणून वसंतराव, अपर्णा आणि श्वेता बिल्डिंगमधून बाहेर आले, तर त्यांच्याकडे सर्व पाहतच राहिले. प्रत्येकाच्या पाठीवर भली मोठी सॅक, गळ्यात पिशवी, हातात एक-दोन पिशव्या आणि पायात ट्रेकिंग शूज होते! जणू काही एव्हरेस्टवरच चाललेत… चढाई करायला!
“गंधे? अहो, हे एवढं सामान?” चित्र्यांनी विचारलं.
“पावसात भिजायला जायचंय ना? मग तयारी नको? ”
“तयारी? कसली?”
“चित्रे काका, अहो तिथे धो धो
पाऊस असणार… थंडी असणार!
मग काय दिवसभर ओल्या कपड्यांनीच हिंडायचं? म्हणून पावसाळी कपडे घेतलेत. शिवाय
या छोटीचं खायचं-प्यायचं, आम्हा दोघांचं खायचं-प्यायचं… असंच काही सामान आहे.” गंधेंच्या सौ. अपर्णाने खुलासा केला.
“अहो गंधे वहिनी, कपडे-बिपडे ठीक आहे, पण हे खायचं-प्यायचं कशाला? तिथे गरमागरम जेवणाची, नाश्त्याची, चहा-कॉफीची, अगदी हवं असल्यास मुलांसाठी दुधाचीही सोय करतो आम्ही.” चित्रे म्हणाले.
“असं का? बरं राहू द्या आता. बसमधूनच जायचंय ना? कुठे डोक्यावरून न्यायचंय?” गंधे म्हणाले.
“ठीक आहे. राहू द्या.” चित्रेंनी विषय संपवला.
बस सुरू झाली तसा चित्र्यांनी आवाज दिला…
‘गाडी हळूहळू चालवा, मुखाने मोरया बोलाऽऽऽ’
त्यांच्या मागून सगळ्यांनी कोरसचा दणका लावला!
गजाननाची आळवणी झाली आणि पाठोपाठ कोळी गीताचा कुणीतरी आवाज काढला- ‘एकवीरा आई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी कोल्यावरी!’ आणि मग एकामागून एक गाण्यांचा रतीबच सुरू झाला. बायका, मुलं, पुरुष असे सारेच जल्लोषात सामील झाले. परंतु, वसंतराव, अपर्णा आणि श्वेता मात्र यापासून अलिप्तच दिसले.
मधेच चित्र्यांनी आलेपाकाच्या वड्या वाटल्या. पोरांनी ‘काका मला दोन’, असं म्हणून गलका केला. मग सुकी भेळ वाटली गेली. त्यावर तर सर्व तुटूनच पडले होते आणि नंतर पेंडसे काकूंनी खमंग बेसनाचे लाडू वाटले. त्याने तर कडीच केली. अपर्णाने त्या आलेपाकाच्या वड्या घेतल्या, मात्र पिशवीत ठेवून दिल्या. तिने तर श्वेताच्या हातूनही वड्या काढून पिशवीत ठेवून दिल्या. भेळ आणि लाडूला नकोच म्हणाली.
“अहो, या प्रवासात भूक लागते.” असं चित्रे काकू म्हणाल्या तर…
“नको काकू. श्वेताला बाहेरचं खायची सवय नाही. आम्ही पण शक्यतो टाळतोच… आणि मी घेतलंय् ना बरोबर.” अपर्णा म्हणाली.
खरं तर, श्वेताला भेळ खावीशी वाटत होती. धमाल-मस्तीमध्येही भाग घ्यावासा वाटत होता. पण ती सारखं आईकडे बघत होती आणि आईने डोळे वटारताच गप्प बसत होती. तरी ती म्हणालीच, “आई भूक लागलीय.”
अपर्णाने वसंताला ऑर्डर सोडली, “वसंता, तुझ्या पिशवीत ते खायचं सामान आहे ना, ते काढ बरं.” त्याने तत्परतेने डबा काढला. तिघांनी एकेक सॅण्डविच खाल्लं. श्वेताला बोर्नव्हिटाचा कॅन दिला आणि नंतर तर श्वेताने इतरांच्या धम्माल-मस्तीपासून दूर राहावं, म्हणून तिला चक्क वॉकमन आणि हेडफोनही दिला गेला. ती कॅसेट ऐकत बसली. वसंता आणि अपर्णाही पुस्तक काढून वाचत बसले.
बसने वेग घेतला, तसा खिडकीतून थंडगार वारा येऊ लागला. अपर्णाने लगेच वसंताला सांगून तिघांचेही विंडशिटर काढून घेतले. तिघांनीही ते घातले. शिवाय श्वेताच्या कानावरून स्कार्फही आवळला. वर्षा सहलीच्या वार्याचाही श्वेताला स्पर्श होऊ नये, यासाठी अपर्णा आणि वसंताने पक्का बंदोबस्त केला होता. इतर मुलं मात्र खिडकी हवी म्हणून भांडत होती.
बस खंडाळ्याला पोहचली. मित्राच्या वाड्यावर सामान टाकून सारी मंडळी भटकायला बाहेर पडली. नेमका त्याच वेळी जोरात पाऊस सुरू झाला. मग तर काय, मंडळींचा उत्साह अगदीच शिगेला पोहचला. तरुण मंडळी भिजतच निघाली. प्रौढांनी रेनकोट-छत्र्या घेतल्या… पोरं तर पावसात भिजायला मिळणार म्हणूनच आलेली! असा तो सगळा बालगोपाळांचा मेळा हसत-खिदळत निघाला!
“आई, आपण नाही का जायचं?” श्वेताने विचारलं.
“श्वेता, अगं पाहतेस ना किती पाऊस पडतोय ते! त्यापेक्षा आपण तिघं इथेच खेळूया. पुष्कळ खेळ आणलेत मी सोबत.” अपर्णा म्हणाली.
मी आणि माझी पत्नी त्यांचं बोलणं ऐकून थांबलो. त्यांना एकटं सोडून जाण्यापेक्षा आपणही त्यांना कंपनी द्यावी, असा विचार करून मी म्हटलं, “काय श्वेता, आम्ही दोघंही आलो खेळायला, तर चालेल ना तुला?” तिला आनंदच झाला, पण ती आईकडे पाहू लागली.
अपर्णा पटकन म्हणाली, “हो हो,
दाते काका, काकू या ना. तुम्ही पण या.” आम्ही मग बराच वेळ पत्ते
खेळत बसलो.
“वसंतराव, अहो श्वेताला पाठवलं असतं तर बरं झालं असतं. इतर मुलांसोबत तिनेही मजा केली असती ना?” न राहवून मी विचारलं.
“अहो दाते काका, या मुलांचा काय भरवसा आहे? एकदा खेळात रमले की काही सुमार नसतो. त्यात हिला एकटीला कसं पाठवणार? तिच्यावर कोण लक्ष ठेवणार? त्यातून हरवली-बिरवली म्हणजे? एक तर सारा परिसर नवीन! इथली काहीच माहिती नाही. कशाला उगाच नसता ताप?” अपर्णानेच उत्तर दिलं.
तसं मी म्हणालो, “छे छे. अगं अपर्णा, आमचे चित्रे काका आहेत ना बरोबर. मग काही काळजीच नाही. मुलांचे जेवढे लाड करतील, तेवढीच शिस्तही असते बरं का त्यांची. कोणी वावगं वागलं तर त्यांची मुळीच गय करत नाहीत. आज इतकी वर्षं आम्ही काढतोय सहल, पण चित्रे काका-काकू आहेत म्हटल्यावर सगळे बिनधास्त असतात.”
“ते खरं आहे हो. पण आम्हाला अजून अनुभव नाही ना! आणि शेवटी मुलं ती मुलंच. काळजी वाटायचीच. शिवाय पुढच्या आठवड्यात तिची युनिट टेस्ट सुरू होतेय. प्रकृतीलाही जपायला
हवं ना.” अपर्णा म्हणाली.
दोन-तीन तास भटकून सगळी गँग परत आली. वाड्यावरच कपडे बदलून मग तिथेच जेवायचा बेत होता. वाड्याचे मालक सावंत माझे जिगरी दोस्त. त्यांची थोडीफार शेती आणि दुधाचा व्यवसाय आहे. घरी दोघंच नवरा-बायको. बाकी नोकर-चाकर होतेच. तांदळाची भाकरी, कुळथाचं पिठलं आणि लसणाची चटणी असा साधाच, पण झणझणीत बेत होता. त्यानंतर घरचाच खरवसही होता. बाहेर पाऊस कोसळत होता आणि आत गरमागरम पिठलं-भाकरीवर आम्ही ताव मारत होतो! जेवणानंतर पुन्हा पडवीत टाकलेल्या सतरंज्यांवर मंडळी जमली आणि गाणी, भजनं, अंताक्षरी, भेंड्या असे धम्माल कार्यक्रम सुरू झाले. वसंतराव, अपर्णा आणि श्वेताला मात्र या मौजमस्तीचा काहीच गंध वाटत नसावा. ते कुटुंब जरा अलिप्तच राहत होतं. परतीचा प्रवासही तसाच होता.
परतल्यावर मी श्वेताला विचारलं, “काय श्वेता? कशी वाटली सहल? पावसाची मला आली ना?”
तर ती म्हणाली, “कसली मजा?
आई मजा करू देईल, तर ना?
कुठे पडले-बिडले म्हणजे? भिजले, सर्दी झाली तर? नशीब… निदान आज पाऊस तरी पाहायला मिळाला!”
तिचे ते बोल मला अस्वस्थ करून गेले. पिंजर्यातला पक्षी जसा खुल्या आकाशाकडे विस्मयाने पाहत
असावा ना, तसे तिचे बोल होते.
पण हाच पक्षी मोठा होऊन खरोखरच खुल्या आकाशात झेप घेईल, तेव्हा खुल्या आकाशात उडण्याचं बळ असेल त्याच्या पंखात? का खुल्या आकाशातील कठोर वास्तवाच्या झंझावातात तो भरकटेल? पिंजर्यात जखडून त्याच्या पंखातली शक्ती, आत्मविश्वास तर तो गमावणार
नाही ना?
श्वेताच्या आईवडिलांशी एकदा
तरी याविषयी बोलायचं, असं मी ठरवून टाकलं.
Link Copied