Close

रुश्मिका (Short Story: Rasmika)

  • मीनू त्रिपाठी
    तिला बघितलं की मितालीला चीड यायची. चांगल्या घरातली असूनही अजागळासारखी राहते! काही विचारलं तर तोंडाला कुलूप लावल्यासारखी चुप्प बसते, अशी ही रुश्मिका!

‘सकाळ झाली की, हाताला मिनिटभरही विश्रांती नसते. कामाने नुसती तारांबळ उडते. स्नेहा आणि सृष्टीला अंथरुणातून बाहेर काढता काढता स्वयंपाकातही लक्ष घालावं लागतं. शिशिरचा टिफिन तयार करायचा, त्याचबरोबर त्याला चहाही द्यायचा. मी तिकडे कामाला जुंपलेली असते नि शिशिर मला विचारतो, मिताली, अगं तुझा चहा झाला का?… अस्सा राग येतो ना त्याचा! मी इकडे ट्रेडमिलवर धावल्यासारखी धावपळ करतेय, याचा विचार तरी या सुस्त माणसाला येतो का? कधी कधी तर मलाच प्रश्‍न पडतो… एवढी धावपळ करून मी सृष्टी आणि स्नेहाबरोबर साडेसात वाजता शाळेत पोहचते तरी कशी? एरव्ही घरातली कामं उरकायला अख्खा दिवस अपुरा पडतो. पण शाळेच्या दिवसांत सकाळी दोन तासांत कामांचा निपटारा होतो. एरव्ही आळसावलेलं वाटत असलं तरी, कामाच्या वेळी बायकांची कार्यक्षमता कदाचित वाढत असावी.’ सकाळची कामं भराभर उरकताना, मिताली मनातल्या मनात बडबडत होती.
स्नेहाचा प्रोजेक्ट सांभाळत मिताली शाळेत पोहचली, तर तिला समोरच रुश्मिका दिसली. ‘आजही या पोरीनं बेल्ट घातलेला दिसत नाही’, मिताली पुटपुटली… ‘का कोण जाणे, पण ही पोरगी कधी टापटीप दिसत नाही. कायम आळसावलेली असते. कधी युनिफॉर्म धड नाही, तर कधी होमवर्क अपूर्ण! कधीही बघावं तर ही घुम्यासारखीच असते.’ तिला बघितलं की मितालीला चीड यायची. चांगल्या घरातली असूनही अजागळासारखी राहते! काही विचारलं तर तोंडाला कुलूप लावल्यासारखी चुप्प बसते, अशी ही रुश्मिका!
एकदा तर, लंच ब्रेकमध्ये सर्व मुलं टिफिन उघडून जेवत होती, तर ही पोरगी स्वस्थ बसली होती. मितालीने दोन-तीनदा तिला जेवणावरून टोकलं तर, तिनं नाइलाजानं आपला छानसा टिफिन उघडला. त्यात फक्त थोडे तळलेले काजू आणि बदाम होते. मुलं त्या सुक्यामेव्याकडे आशाळभूत नजरेनं पाहू लागली. रुश्मिकानं दोन-तीन काजू तोंडात घातले. मग हळूच टिफिनमधले उरलेले काजू-बदाम खाली सांडले. अन् रागारागाने आपल्या बुटांनी ते चिरडून टाकले. मितालीला तिचा एवढा राग आला की, तिच्या दोन थोबाडीत लगावून द्याव्या, असं वाटलं. पण मितालीने मन आवरून तिला फक्त राग दिला… रुश्मिकाची आई एक नामांकित समाजसेविका आहे, हे मितालीला ठाऊक होतं. मागे एकदा ती शाळेच्या कार्यक्रमाला आली होती. तेव्हा… साधारण आठ महिन्यांपूर्वी मितालीने तिला पाहिलं होतं.
तिचं व्यक्तिमत्त्व प्रभावी होतं. दिसायला सुंदर, बांधेसूद शरीर, बोलण्यात चतुराई, अंगावर उंची कपडे, सफाईदार इंग्रजी बोलणं… अशी होती रुश्मिकाची मम्मी, शालिनी जोशी. एका प्रख्यात सामाजिक संघटनेची अध्यक्ष. जवळपास दररोज तिचं नाव वर्तमानपत्रातून झळकायचं. कोणावरही सहज छाप पडावी, असं तिचं व्यक्तिमत्त्व होतं. अशा या प्रभावी महिलेची रुश्मिका ही मुलगी असेल, असं कोणीही म्हणणार नाही.
एरव्ही शाळेमध्ये मात्र नेहमी तिचे पप्पा, मिस्टर जोशी हेच येत. रुश्मिकाच्या तक्रारींचा पाढा शिक्षक मंडळी त्यांच्यासमोरच वाचत. ते ऐकून मिस्टर जोशी खजील होत. तेव्हा मिताली त्यांच्यापुढे जास्त काही बोलायची नाही. शाळा सुटल्यावर ते नेमाने तिला घरी न्यायला येत. शाळेत येताना मात्र रुश्मिका स्कूल व्हॅनमधून येत असे. स्कूल बॅगपासून पेन्सिलपर्यंत… रुश्मिकाची प्रत्येक वस्तू अगदी वेगळीच असे. त्यामुळे त्या वस्तूंचं इतर मुलांना प्रचंड आकर्षण होतं. ‘मला पण रुश्मिकासारखीच बार्बी डॉलवाली बॅग हवी’, म्हणून एकदा स्नेहानेही हट्ट धरला होता.
“बेटा ही बॅग खूप महाग आहे”, असं मोठ्या प्रेमाने
मितालीने तिला पटवून दिलं होतं. पण ती ऐकली नाही. त्यांच्या वर्गात समाजाच्या सर्व थरातील मुलं होती. रुश्मिकाच्या वेगवेगळ्या वस्तूंबद्दल त्या मुलांना वाटणारं आकर्षण मितालीला सहन होत नव्हतं. एके दिवशी न राहवून तिने रुश्मिकाच्या पप्पांना सांगूनच टाकलं, “प्लीज, तुम्ही लोक हिला डब्यात रोज ड्रायफ्रूट्स, केक, चिप्स असे पदार्थ देऊ नका.” हे ऐकून मिस्टर जोशींच्या चेहर्‍यावरचे भावच पालटले होते.


आज जेव्हा मिताली मुलांची हजेरी घेत होती, तेव्हा रुश्मिका गैरहजर असल्याचं तिच्या
लक्षात आलं. शाळा सुटली अन् मुलांना रांगेने मिताली गेटपर्यंत घेऊन गेली, तेव्हा रुश्मिकाचे पप्पा तिची नेहमीप्रमाणे वाट बघत असलेले, तिने पाहिलं. मितालीजवळ येऊन त्यांनी विचारलं, “मॅम, आज रुश्मिकाची टेस्ट कशी झाली?”
मिताली गोंधळात पडली, त्यांना म्हणाली, “अहो, रुश्मिका तर आज शाळेतच आली नाही.”
“काय? सांगताय का? अहो, आज तर तिची इंग्लिशची टेस्ट होती ना!”
“होय तर! पण ती शाळेत आलीच नाही.”
काहीही न कळून तिचे पप्पा स्तब्ध झाले. तेवढ्यात तिथे मुख्याध्यापिका आल्या. काय झालंय ते कळल्यावर सगळीकडे खळबळ माजली. व्हॅनवाल्याला विचारलं, तर त्यानेही सांगितलं की, बेबी आज सकाळी व्हॅनमधून आलेलीच नाही. म्हणून मग मिस्टर जोशींनी घरी फोन लावला. बोलण्यासाठी ते लांब गेले. त्यांच्या हावभावांवरून कळत होतं की ते खूप रागात आहेत. नंतर ते मितालीकडे आले नि रुश्मिका घरीच असल्याचं त्यांनी सांगितलं. मितालीला राग अनावर झाला.
“किती निष्काळजीपणा हा! आपली मुलगी घरात आहे की बाहेर, हेही तुम्हाला ठाऊक नाही? कमाल झाली. अख्ख्या शाळेला घोर लावलात तुम्ही…” मितालीने आगपाखड केली.
“सॉरी मॅम, मी सकाळी नऊ वाजताच ऑफिससाठी निघालो होतो. त्यामुळे माझ्यामागे ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली असेल, असंच मला वाटलं. ती घरीच आहे, हे मला कळलंच नाही…” जोशी चाचरत म्हणाले.
“ओह माय गॉड! एवढी मोठी कम्युनिकेशन गॅप? अहो, निदान आपल्या बायकोला तरी विचारायचं होतं?” त्रासलेल्या मितालीच्या बोलण्याने त्यांच्या चेहर्‍यावर कटुता दिसू लागली. ते लज्जित झाले. पुन्हा असं घडू देऊ नका, अशी मुख्याध्यापिकांनी त्यांना ताकीद दिली. मुख्याध्यापिकांनी सांगितल्यावरून मितालीने रुश्मिकाच्या घरी फोन लावला.
“हॅलो” तिकडून नोकराणीचा आवाज आला.
“मी रुश्मिकाची क्लास टीचर बोलतेय. रुश्मिकाच्या मम्मीशी बोलायचं आहे.”
“पण मॅडम तर झोपल्या आहेत…”
“झोपल्या आहेत? अशा अवेळी?” मितालीने आश्‍चर्याने विचारलं.
“होय मॅडम. त्यांची तब्येत ठीक नाही.
काल रात्री तीन वाजता त्या पार्टीतून आल्या. ड्रिंक्स जास्त झाल्यामुळे त्यांचं डोकं आणि अंगं जड झालंय. म्हणून त्या आराम करताहेत.”
नोकराणीच्या या रहस्योद्घाटनाने मिताली दिड्मुढ झाली. रुश्मिकाचं घुम्यासारखं वागणं, तिची राहणी, तिच्या पप्पांची अगतिकता सारं काही तिच्या लक्षात आलं. पेज थ्रीवरील व्यक्तिमत्त्व असणार्‍या शालिनी जोशीच्या जीवनात आपल्या निष्पाप मुलीचं स्थान काय आहे, ते उमगलं. शहरातील ख्यातनाम समाजसेविका आपल्या खासगी जीवनात कोणत्या आदर्शांचं पालन करत होती, ते पाहून तिच्या मनात शालिनीविषयी कमालीचा तिरस्कार निर्माण झाला.
दुसर्‍या दिवशी रुश्मिका शाळेत आली. आता मितालीला तिचा राग नाही, तर दया आली होती. प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत तिने विचारलं,
“बेटा, मम्मीची तब्येत आता कशी आहे?” तिने मान झुकवत काही खूण केली.
“तुझी मम्मी घरी काय करतेय?”
“ती… झोपली आहे…”
“तुझी तयारी कोणी केली?” जिज्ञासेने
प्रश्‍नांचं रूप घेतलं होतं.
“रोझी ऑन्टीने…”
“रोझी ऑन्टी कोण गं?” प्रेमाची ऊब मिळताच रुश्मिका थोडी विरघळली होती.
“ती आमच्या घरी काम करते.”
“तुझी शाळेची तयारी कोण करतं?”
“रोझी ऑन्टी…” रुश्मिकाने त्रस्त स्वरात उत्तर दिलं.
“तुझी मम्मी काय काम करते गं?”
“माहीत नाही…”
मितालीच्या डोळ्यासमोर रुश्मिका राहत असलेलं ते आलिशान घर आलं. काही दिवसांपूर्वीच तिने मोठ्या अभिमानाने आपल्या नवर्‍याला दाखवलं होतं. पण या घरात राहणार्‍या लोकांमध्ये इतका दुरावा आहे,
हे त्या वेळी तिला ठाऊक नव्हतं.
“काल तू शाळेत का आली नव्हतीस?”
“त्या रोझी ऑन्टीने मला वेळेवर उठवलंच नाही.”
मायेला पारखी झालेल्या नि यंत्रवत संगोपन होत असलेल्या रुश्मिकाची तिला अतिशय दया येऊ लागली आणि तिच्या आईविषयीचा तिरस्कार वाढू लागला. कोण जाणे, कुठलं लक्ष्य गाठण्यासाठी ती आपलं मातृत्व कलंकित करत होती. त्या निरागस मुलीची व्यथा मितालीला समजत होती. लंच ब्रेकमध्ये आपल्या टिफिनमधील फक्त सुुकामेवा पाहता, दुसर्‍या मुलांच्या टिफिनमधील पोळी-भाजी, पराठा लोणच्याकडे रुश्मिका आशाळभूत नजरेनं पाहत असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिला बघवलं नाही. तिनं आपल्या टिफिनमधल्या पोळी-भाजीचा मोठा घास करून रुश्मिकाकडे सरकवताच तिचं तोंड आपोआपच उघडलं. डोळ्यांत पाणी तरळलं.
सर्व प्रकारच्या सुखसुविधांची रेलचेल असलेल्या घरात रुश्मिका राहत होती, पण मायेचं सुख तिला पारखं झालं होतं. खरोखरच, दिसतं तसं नसतं! तिने मायेने आपल्या तळहातांवर रुश्मिकाचे लहानसे तळवे ठेवले नि ते हलकेच दाबले. रुश्मिकाच्या अंगातून तरंग निघत असल्याची तिला जाणीव झाली.
‘छेः छेः वात्सल्यास पारखी झालेल्या या मुलीला ते दिलंच पाहिजे. तिचं असं आतल्या आत पोखरलं जाणं, मला पाहवणार नाही. मातृत्वाचं महत्त्व हिच्या आईला समजावून सांगायलाच हवं. तिनं केलेल्या उपेक्षेचे दुष्परिणाम मी या मुलीला भोगू देणार नाही. पण कसं करू…?’ या अनुत्तरित प्रश्‍नांची उत्तरं शोधण्यात मिताली गुरफटून गेली. घरी आल्यावरही ती कमालीची बेचैन होती. एका समाजसेविकेची मुलगी स्वतःच संकटात होती. केवढा हा विरोधाभास!
दुसर्‍या दिवशी, रविवारी मितालीने आठवडाभराची कामं उरकली. थकूनभागून ती संध्याकाळी चहा घेत बसली होती. तिला रुश्मिकाची आठवण झाली. ती पटकन उठली आणि बाजारात गेली. पी.सी.ओ.वरून तिने रुश्मिकाच्या आईला मोबाईलवर फोन केला.
“हॅलो!” शालिनीचा आवाज येताच, ती म्हणाली, “शालिनीजी, मी एक समाजसेविका आहे. मला एका केसबाबत तुमच्याशी बोलायचं आहे.”
“हं, बोला ना!” शालिनीच्या स्वरात उत्सुकता होती.
“खरं म्हणजे, मला एका लहान मुलीसंदर्भात बोलायचंय. ती फार अडचणीत आहे. तिचं घर, घरातील लोक खूप संपन्न आहेत. तिच्या संगोपनात मात्र ते कमी पडतात.”
“म्हणजे? तिच्या संगोपनात काय कमी पडतं आहे?”
“अं… तिची आई, एक वर्किंग वूमन आहे. पण तिचं मुलीकडे खूप दुर्लक्ष होतंय. मुलीची उपेक्षा होत आहे. शाळेतून तिच्या रोज तक्रारी येतात.”
“अहो, पण घरात आणखी कोणी असेल ना… म्हणजे वडिलांची काय भूमिका आहे?” शालिनीने विचारताच मिताली म्हणाली, “असं बघा शालिनीजी, मुलांच्या संगोपनात आईबाबा असं दोघांचंही योगदान असतं. तेव्हाच मुलांचं जीवन बहरतं. या मुलीची आई घराबाहेरच्या कार्यक्षेत्रात जितकी यशस्वी आहे ना, तेवढीच आईच्या भूमिकेत अपयशी ठरली आहे. त्या मुलीच्या शाळेतून आपल्याला तिची माहिती मिळू शकेल. आपण मिडियाची मदत घेऊ शकतो. असं बघा मॅडम, आपण कितीही आधुनिक झालो ना, तरी मुलांच्या संगोपनात आईचं योगदान मोलाचंच असतं, हे नाकारू शकत नाही.”
“हो तर! अगदी बरोबर आहे तुमचं.
अशा केसमध्ये आम्ही मुलांच्या आईबाबांना काऊन्सिलिंगसाठी बोलावतो. तिच्या आईला आमच्यावतीने नोटीसही बजावू.”
“येस मॅडम. आपल्याला योग्य वाटेल ते करा.” एका सच्च्या समाजसेविकेसारखी मिताली बोलत होती.
शालिनी म्हणाली, “त्या मुलीचं नाव, पत्ता जरा सांगता का?”
“घ्या ना! त्या मुलीचं नाव रुश्मिका! पत्ता- कार्टर रोड, बंगला नंबर बारा बाय तीन…” मितालीच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच पलीकडे स्तब्धता पसरली. तिचा भंग करीत मिताली एकेका शब्दावर भर देत म्हणाली, “हॅलो… शालिनीजी, आपण ऐकताय ना? आपण या प्रकरणी मिडियाची मदत घ्यायची का?”
शालिनी निःशब्द झाली होती. जणू तिची वाचा गेली होती.
“मी तुम्हाला पुन्हा फोन करेन. आपण पुढे काय करायचं, हे तोवर तुम्ही ठरवा”, एवढं बोलून मितालीने फोन कट केला. अन् शांतपणे घरी परतली.
दुसर्‍या दिवशी… मिताली शाळेत पोहचताच आश्‍चर्यचकित झाली. रुश्मिका आपल्या आईसोबत आली होती. मिताली आपलं हसू आणि चेहर्‍यावरील भाव लपवू लागली. मिताली आणि रुश्मिकाच्या अन्य शिक्षिकांशी शालिनीने चर्चा केली. मितालीने अगदी शांतपणे रुश्मिकाच्या वर्तनाची तिला कल्पना दिली. इतर पालकांसारखंच तिला समजावलं. तिच्या चेहर्‍यावर सर्वसाधारण आईसारखे भाव उमटले. मी रुश्मिकाची पूर्ण काळजी घेईन, असं तिने मितालीला आश्‍वासन दिलं. फोनवर केलेल्या बातचितीचा हा परिणाम आहे, हे मिताली जाणून होती. शालिनी मात्र याबाबत अनभिज्ञ होती. रुश्मिकावरही याचा चांगलाच परिणाम झाला होता. तिच्यात हळूहळू योग्य बदल घडू लागले. एक छोटंसं नाटक करून मितालीने एका भरकटलेल्या कुटुंबाला एका सूत्रात बांधलं होतं.
पॅरेन्ट्स-टीचर्स मिटिंगच्या दिवशी प्रफुल्लित चेहर्‍याने रुश्मिका आपल्या आईबाबांसह आली, तेव्हा मितालीलाही उत्साह वाटला. रुश्मिकाची खर्‍या अर्थाने प्रगती दर्शविणारं प्रगती पुस्तक तिने त्यांना दाखवलं. शालिनीच्या चेहर्‍यावर आपल्या मुलीविषयी अपार माया दिसत होती…

Share this article