२०२४ ला लवकरच सुरुवात होणार आहे. या वर्षात अनेक हिंदी-मराठी सिनेमांची पर्वणी लोकांना पाहायला मिळणार आहे. मनोरंजन हा आयुष्याचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणूनच चित्रपटसृष्टीशी संबंधित कल्लाकार नवनवे विषय घेऊन आपल्या रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतात.
अशातच २०२४ मधील नवीन मराठी सिनेमाची घोषणा झालीय. सिनेमाचं नाव आहे श्रीदेवी प्रसन्न. नाव वाचून प्रसन्न वाटलं तरी सिनेमात काय असेल याबद्दल काही तर्क लावता येतोय का? नाही ना. जाणून घेऊया.
"श्रीदेवी प्रसन्न" या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वासह बॉलीवूडलाही भुरळ घालणारी मोस्ट ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर आणि स्मार्ट अँड डॅशिंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर अशी भन्नाट आणि बेमिसाल जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहे.
आजवर अनेक हीट चित्रपट देणारे हे दोन्ही दमदार कलाकार एकत्र येऊन एक वेगळीच प्रेमकहाणी फुलवणार आहेत. या निमित्ताने नव्या वर्षात, एक नवी आणि आगळीवेगळी लव्ह स्टोरी आपल्या लाडक्या जोडीसह प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिकेसह सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वांखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे अशी दमदार कास्ट या चित्रपटात आहे. त्यामुळे श्रीदेवी आणि प्रसन्न यांच्या लव्हस्टोरी सोबत हा एक कंप्लीट फॅमिली सिनेमा असणार यात शंका नाही.
या चित्रपटाचे लेखन अदिती मोघे यांनी केले असून विशाल विमल मोढवे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर अमित राज यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. लवकरच हा चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालायला येत आहे.
हा सिनेमा २ फेब्रुवारी २०२४ पासून जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.