२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात शिक्षा भोगत असलेला सुकेश चंद्रशेखर अनेकदा जेलमधून जॅकलिन फर्नांडिसवर प्रेमाचा वर्षाव करत असतो. आतापर्यंत त्याने जेलमधून जॅकलिनला अनेक पत्रे लिहिली आहेत. प्रत्येक पत्रात तो जॅकलिनवरील प्रेमाची कबुली देत असतो. सुकेशने आता पुन्हा एकदा जेलमधून जॅकलिनसाठी पत्र लिहिले आहे आणि तिच्यासाठी नवरात्रीचे व्रत ठेवल्याचे सांगितले.
सुकेशने तुरुंगातून लिहिलेले पत्र त्याच्या वकिलाने जारी केले आहे. यात त्याने लिहिले की, "माझी शेरनी, बेबी जॅकलीन, दोहा शो दरम्यान तू सुपर हॉट आणि खूप सुंदर दिसत होतीस. बेबी, तुझ्यापेक्षा सुंदर कोणी नाही, माझी बोम्मा. उद्यापासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. या वेळी मी पुन्हा नऊ दिवस उपवास करणार आहे, जेणेकरून देवी दुर्गा सर्व काही ठीक करेल आणि आपण पुन्हा एकमेकांसोबत राहू."
सुकेशने पत्रात पुढे लिहिले की, "नवरात्रीच्या नवव्या दिवशी मी तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी माता वैष्णव देवी मंदिर आणि महाकालेश्वर मंदिरात विशेष पूजा-आरतीचे आयोजन करीन. आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांसोबत राहू. आपल्यावर हसणाऱ्यांना आणि टीका करणाऱ्यांना ते चुकीचे असल्याचे दाखवून देऊ. विजय आपलाच होईल आणि तोही लवकरच."
सुकेशने लिहिले, "माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप लवकरच खोटे ठरतील. तुला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. मी तुझ्या मदतीसाठी आणि तुझे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर आहे. मी तुझ्यावर एक ओरखडाही पडू देणार नाही. हे जग तुझ्यावर प्रेम करण्यापासून मला रोखू शकत नाही बाळा, मला माहित आहे की तू माझ्यावर किती प्रेम करतेस, तुला हे देखील माहित आहे की मी फक्त तुझ्यासाठी जगतो आणि तुझ्यासाठी काहीही करू शकतो. तू माझी लाइफलाइन आहेस. मी तुझ्यावर वेड्यासारखे प्रेम करतो, माझ्या बाळा, माझी सिंहीण, माझी शक्ती."
200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनची अनेकवेळा चौकशी करण्यात आली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये, ईडीने जॅकलीन फर्नांडिसचे नाव सुकेश चंद्रशेखरच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून घोषित करण्यात आले.