मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला दिसतोय. कारण गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून होत असलेल्या हिंसाचारात मणिपूरमधल्या लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे. तर अनेकांना घर सोडून जावं लागलं. त्यातच आता माणुसकीला लाज आणणारी घटना समोर आल्याने सर्वांना धक्का बसलाय. काही महिलांना विवस्त्र करत त्यांची रस्त्यावरुन धिंड काढण्यात आल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यावरून सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
राजकीय क्षेत्रातील विविध नेतेमंडळी तसंच बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी या हिंसाचाराबाबत संताप व्यक्त करत आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. यावर आता अभिनेत्री उर्फी जावेदचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
आपल्या चित्रविचित्र फॅशनसोबतच उर्फी तिच्या बेधडक वक्तव्यांसाठीही ओळखली जाते. अनेकदा चालू घडामोडींवर ती तिची मतं बिनधास्तपणे मांडताना दिसते. मणिपूरमधल्या हिंसाचाराबद्दल तिने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहिली आहे. घटनेविषयीची एक पोस्ट शेअर करत तिने लिहिलं, ‘मणिपूरमध्ये जे काही घडलं ते फक्त मणिपूरसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी लज्जास्पद आहे.’ उर्फीशिवाय या प्रकरणी अक्षय कुमार, मीरा चोप्रा, वीर दास, कमाल आर. खान यांसारख्या सेलिब्रिटींनीही ट्विट करत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून रस्त्यावर धिंड काढल्याचा हा व्हिडीओ समोर आला आहे. या महिलांवर लैंगिक अत्याचारसुद्धा करण्यात आला होता. हा व्हिडीओ ४ मे रोजी घडलेल्या घटनेचा आहे. ज्यात पोलिसांनी याआधीच एफआयआर दाखल केला होता. मात्र आतापर्यंत कोणतीच कारवाई झाली नव्हती. बुधवारी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यावरून चांगलाच गदारोळ झाला. या प्रकरणातील एका आरोपीला गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली.
गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरच्या व्हायरल व्हिडीओवरून केंद्र आणि राज्य सरकारला फटकारलं आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले, “हे मान्य नाही. जे व्हिडीओ समोर आले आहेत ते अत्यंत चिंताजनक आहेत. याप्रकरणी मे महिन्यातच कारवाई व्हायला हवी होती. अशा मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.”
२० जुलै रोजी सकाळी अधिकृत ट्विटर हँडलवर घडलेल्या घटनेचा संदर्भ देत अक्षय कुमार म्हणाला, "मणिपूरमधील महिलांवरील हिंसाचाराचा व्हिडिओ पाहून धक्का बसला, तिरस्कार वाटला.
मला आशा आहे की दोषींना इतकी कठोर शिक्षा होईल की कोणीही पुन्हा असे घृणास्पद कृत्य करण्याचा विचार करणार नाही." असं अक्षय म्हणाला