Others Marathi

आठवणीतील दिवाळी (Athvanitil Diwali)


मनाला दिलासा देणारी चंद्राची कोर आजही आकाशात उगवते, तेव्हा दिवाळीतल्या आठवणी मनात दाटून येतात… अशी ही गावाकडची दिवाळी आनंद देणारी, मनाला तजेला देणारी होती. आज इतकी वर्षं उलटून गेली, तरी त्या आठवणी ताज्या आहेत. दिवाळीच्या आसपास त्या दरवर्षी आणखीनच टवटवीत होतात.

जच्या ग्लोबल युगात विद्युतरोषणाईनं, सुवासिक फुलांच्या मोठमोठ्या तोरणांनी दिवाळी सजलेली दिसत असली, तरी माइया आठवणीत आहे ती माइया गावाकडची दिवाळी. तेलाच्या पणत्यांच्या प्रकाशात उजळलेली, सडा-रांगोळयांनी सजलेली, झेंडूच्या फुलांनी, आंब्याच्या पानाच्या तोरणांनी सुशेभित झालेली… कुडकुडायला
लावणार्‍या बोचर्‍या थंडीतल्या अभ्यंगस्नानानं आल्हाददायक वाटणारी दिवाळी.
दिवाळी म्हटलं, की माझ्या डोळयासमोर तरळतो तो 35-40 वर्षांपूर्वीचा काळ. त्यावेळी, म्हणजे आमच्या लहानपणी आमच्या घरी दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत असे. दिवाळी आली की आनंदही व्हायचा आणि आर्थिक ओढाताणीमुळं घरात काळजीचंही वातावरण असायचं. असं असलं तरी घरा-दाराची साफसफाई केली जायची. मातीच्या भिंतींना पांढरीच्या मातीनं आतून-बाहेरून पोतेरं दिलं जायचं. घर-अंगण शेणानं लख्ख सारवलं जायचं. सडा टाकला जायचा. दारापुढं, देवापुढं रांगोळी काढली जायची. त्यात हळदी-कुंकवाची लक्ष्मीची पावलं काढली जायची. घरासमोर, तुळशीसमोर चार दिवस तेलाच्या पणत्या लावल्या जायच्या. वीज आल्यानंतरच्या काळात आम्ही भलामोठा आकाशकंदील बनवायचो. बांबूच्या कामठ्यांचा. आकाशकंदीलाच्या त्या कामठ्यांच्या सांगाड्याला लाल-पिवळे रंगीत कागद चिटकवायचो.
आई, काकी गोडधोड पदार्थ बनवायची. आम्ही आईला मदत म्हणून लाडवांसाठीच्या कळ्या चुरण्यापासून ते सारण करण्यापयर्यंत कामं मोठ्या आनंदानं करायचो. लाडू, शंकरपाळ्या, चकल्यांचा खमंग सुवास कसा घरभर पसरायचा. त्यावेळी आमचं घर एकत्र कुटुंब पद्धतीचं. त्यामुळं सगळयांनाच नवे कपडे घेतले जाणं शक्य नसे. ज्याचे कपडे फाटलेले असतील, त्यालाच दिवाळीला नवे कपडे मिळत असत. ज्याला असे नवे कपडे मिळायचे, त्यानं ते अंगावर घालून मिरवताना दुसर्‍या भावंडांच्या अंगावरचे जुने कपडे बघून त्याला थोडं उदासही वाटायचं. दर दिवाळीला आम्हाला फटाके मिळायचे. पण, तेही फक्त टिकल्या आणि छोटे लवंगी फटाके मिळायचे. त्यांची माळ एकदम न लावता आम्ही ते फटाके सुटे-सुटे करून वाजवायचो. जेणेकरून, चार-पाच दिवस ते आम्हाला पुरायचे. गावातून, मोठ्या वाड्यांसमोरून येणार्‍या फटाक्यांच्या आवाजापेक्षा आमच्या लवंगीचा आवाज खूपच कमी असायचा. मग आम्ही फटाक्यांच्या आवाजानंतर उमटणार्‍या पडसादाबरोबर तोंडानेच मोठ्याने ङ्गठोफ असा आवाज करून आमच्या मनाचं समाधान करून घ्यायचो. 8-15 दिवसात डब्यातल्या फराळाची चवही वाढलेली असायची. आता दोन दिवसांतच गोड पदार्थ नकोसा वाटतो. पण त्या वेळी बुरशी आलेला शेवटचा गोड पदार्थ खाल्ला, तरी त्याची चव जिभेवर रेंगाळायची.
दिवाळीची सुट्टी कधी सुरू होणार, याची आम्ही मुलं वाटच पाहत असायचो. सहामाही परीक्षा झाली, सुट्टी लागली, की गावाला जायचा बेत व्हायचा. गावाला गेल्यावर विटा, माती, वाळू आणून आम्ही छान किल्ला करायचो. पहाटे थंडीत गरम पाणी, सुवासिक उटणं व साबण लावून कुडकुडत केलेली आंघोळ अजूनही आठवते. आमची आई सगळ्यांना
औक्षण करायची.
दिवाळीतला महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा. त्या दिवशी घरात चौरंगावर दागिने, पैसे यांची पूजा व्हायची. वातावरण एकदम मंगलमय असायचं. फटाक्यांची आतषबाजी व्हायची. रात्री उशिरापर्यंत घरात सोंगट्यांचा खेळ रंगायचा. आई-मामा कवड्यांचा डाव टाकण्यात वाकबगार. खेळताना छोटे-छोटे वादही होत. पण त्यात मजाही असे. पाडवा-भाऊबीजेला सगळी भावंडं एकत्र येऊन आम्ही खूप गप्पा मारायचो. हास्य-विनोद, चेष्टा-मस्करी हे सगळं चालायचं. दिवाळी एकत्र साजरी करण्यामुळं सांघिक वृत्ती जोपासायला मदत होते. द्वेष, मत्सर, असूया, स्पर्धा हे त्यावेळी नसायचं. प्रत्येकजण प्रत्येकाचं योग्य वेळी कौतुक करणारच व योग्य वेळी मार्गदर्शनसुद्धा करणार! कुणाची कुणावर कुरघोडी नसे. असं ते बालपण निरागस आणि जीवन सुंदर होतं.
दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. त्या दिवशी आम्हा भावांचा रूबाब असे. संध्याकाळी आकाशात चंद्राच्या बीजेची कोर निघाली, की आई प्रथम चंद्राला औक्षण करी. मग बहीण आम्हाला औक्षण करत असे. त्यानंतर आजू-बाजूच्या मुलींबरोबर कुणाला ओवाळणीत किती पैसे मिळाले, मामाने कोणत्या बांगड्या आणल्या, यावरही तिच्या गप्पा चालायच्या.
दिवाळीत एकमेकांना फराळ देण्याची पद्धत गावात होती. बरेच जण घरीही येत. त्यातूनच स्नेहभाव वाढायचा. सगळे पदार्थ घरीच तयार केलेले असल्यामुळं त्यांचीही चव काही औरच असे. मनाला दिलासा देणारी चंद्राची कोर आजही आकाशात उगवते, तेव्हा दिवाळीतल्या आठवणी मनात दाटून येतात… अशी ही गावाकडची दिवाळी आनंद देणारी, मनाला तजेला देणारी होती. आज इतकी वर्षं उलटून गेली, तरी त्या आठवणी ताज्या आहेत. दिवाळीच्या आसपास त्या दरवर्षी आणखीनच टवटवीत होतात.
-दादासाहेब येंधे

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

दिशा परमारने शेअर केले नव्यासोबतचे गोड फोटो, मायलेकीची जोडी पाहून खुश झाले प्रेक्षक (Disha Parmar Shares Cutest Pics With Daughter Navya, Writes – Main Aur Meri Parchhai)

'वो अपना सा' या टीव्ही मालिकेतून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी दिशा परमार ही एक लोकप्रिय…

February 14, 2025

छावाच्या सेटवरुन या दोन गोष्टी घेऊन गेला विकी कौशल, कतरिनाही झाली खुश (Vicky Kaushal Revealed Katrina Kaif As Happy When He Brought This Home From Chhaava Sets )

विकी कौशल सध्या त्याच्या आगामी 'छावा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या संदर्भात तो सतत मुलाखती…

February 14, 2025

शेवटच्‍या क्षणी व्‍हॅलेंटाइन्‍स डेचे नियोजन करत आहात? व्हिसाच्‍या या टिप्‍सचा वापर करा (Planning a last-minute Valentine’s Day? Use these visa tips)

परिपूर्ण व्‍हॅलेंटाइन्‍स डे गेटवेचे नियोजन करण्‍यासाठी वेळ नाही आहे का? व्हिसा अधिक बचत करणाऱ्या टिप्‍स…

February 14, 2025

“बाईपण भारी देवा” महिला दिनाच्या दिवशी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस! सिनेमागृहांत re -release होणारा पहिला वहिला मराठी चित्रपट! ( Baipan Bhari Deva Movie Rerelease In theater At Womans Day)

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाईपण भारी देवा पुन्हा सिनेमागृहांत…

February 14, 2025

चिकी चिकी बुबूम बुम सिनेमात प्राजक्ता माळीचा अनोखा अंदाज ( prajakta mali new movie chiki chiki bubum boom With Swapnil Joshi And Prarthana Behere)

अभिनय, नृत्य व निर्माती अशा विविध भूमिकेतून अभिनेत्री प्राजक्ता माळीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली…

February 14, 2025

रिश्ते को कैसे बचाएं एक्पायरी डेट से (How To Save A Relationship From Expiry Date)

मॉडर्नाइजेशन के इस दौर में हर चीज़ के मायने बदल रहे हैं, रिश्तों के भी.…

February 14, 2025
© Merisaheli