Uncategorized

वाटसरू सदन (Short Story: Vatsaru Sadan)

  • ऊर्मिला भावे
    पहाटे पहाटे, उजाडता उजाडता त्याला थंडी वाजू लागली. कुडकुडायला व्हायला लागलं. गोधडी गुरफटून घ्यावी म्हणून त्यानं प्रयत्न केला. पण गोधडी काही हाताला लागेना. त्यासाठी त्यानं डोळे उघडले आणि तो जागेवरून
    तीनताड उडालाच.
    मच्या कोकणात भुतंच लई.
    भूतकाळात मृत झालेली व्यक्ती चालू काळात, वर्तमानकाळात समोर साकार होणं त्या आकाराला भूत (भुतं) म्हणतात.
    ही कथा घडली आहे साधारण 1995 च्या मध्यात. भंडारदर्‍यातील एका खेडेगावातील म्हणजेच ही सत्य कथाच आहे. नाव नसलेली घटना, घडलेली आहे. हे सत्य आहे. पात्रांना महत्त्व नाही. सदन महत्त्वाचं आहे. ‘वाटसरू सदन’!
    स्थलांतरीत मुंबईकर. पोटासाठी कोकणातून आलेले कामगार. कोकणी कर्मचारी हे गणपतीत मुंबईहून कोकणात आपल्या गावी जाणारच. तेथे ते आपल्या मायला, बापाला भेटणार. लहानग्यांना भेटणार. त्यांना कपडे, खाऊ नेणार. एकमेकांना भेटून त्यांना खूप आनंद होतो. त्या आनंदासाठी ते वर्षभर वाट पाहतात.
    एवढ्या वर्षात परिस्थिती बदलली आहे तरी कोकणाला, तेथील निसर्गाला पर्याय नाही. कोकण, गोवा हे आता पर्यटन स्थळांच्या यादीत बर्‍याच वरच्या क्रमांकावर स्थान मिळवून आहे.
    आता तेथील भुतंही कमी झाली असतील. तरी भुतांच्या कथा निघतातच. त्या बालांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच फार खमंग वाटतात. शहरी लोकांना ती एक उत्सुकता असतेच. त्यांच्यामध्ये संवाद घडतातच.
    “सतीश ना रे, आमच्या कोकणात भुतं असत्यात!”
    “बुड्या, अरे, आता भुतं-खेतं राहिली नाहीत. माझा तर विश्‍वास नाही या असल्या भारूड कथेवर.” अनय म्हणाला.
    “खरं आहे. मी पण हे भुतं-बितं मानत नाही. अरे, माणसाच्या मनाचे ते खेळ आहेत.”
    यावर सुंब्या म्हणाला,“अन्या, बन्या, सत्या एक वेळ या आमच्या दापोलीला. या पडघवलीला. मग तुमची खात्री होईल.”
    “येणार. नक्की येणार भुतांना भेटणार.” सतीश.
    “हं. मी त्यांची मुलाखत घेणार.” अनय.
    “बुड्या, अरं इथं माणसांना जागा पुरंना तिथं तुझी भुतं रं कुठं राहणार?” बन्या.
    सतीश म्हणाला, “अरे भूत वगैरे काही खरं नसतं रे. ते सारे मनाचे खेळ आहेत.”
    “हो रे भुतं असतात म्हटले की उगीचच त्याचा इथे तिथे भास होतो. जशी दोरी नाही का साप वाटते?”
    “नाही तर काय रे?”
    “सतीश, खरेच या आमच्या गावी, माझ्या घरी. या गणपतीलाच या.”
    “हो. आमच्या बरोबरच या.”
    “बुड्या, तुमच्या बरोबर नाही येणार. कारण एक तर आम्हाला एवढी रजा मिळणार नाही. घरीही गणपती असतो.”
    “सुंब्या, दुसरं खरं आणि मुख्य कारण म्हणजे सांगू का?”
    “सांग की.”
    “अरे, तू आमच्या बरोबर असताना ते तुझे मित्र म्हणजे तो वेताळ-खवीस-झोटिंग हे सारे आम्हाला दर्शन देणार नाही का?”
    “सतीश, ही पण एक योनी आहे. असते, हे विसरून चालणार नाही.”
    “तू नको ना विसरूस, पण ते आम्ही लक्षात ठेवायची गरज नाही.”
    “हे पहा. जोवर अनुभव येत नाही, तोवर तरी चेष्टा…”
    “चेष्टा नाही, पण अनुभव घेतल्यावर खरं मानू. ओके?”
    “ठीक आहे. केव्हाही या. पण या जरूर.”
    त्या सर्वांना त्या वेळी म्हणजे गणपतीमध्ये कोकणात जायला जमलं नाही पण त्यांनी माघ महिन्यात जायचं ठरवलं. त्यावेळी सुंब्या दापोलीला जाणार होता.
    सुंब्याने निघताना मित्रांना घरचा पत्ता दिला व म्हणाला, “हे पहा माझं घर सापडायला तसं कठीण नाहीये. तरी एस.टी.तून उतरण्यापूर्वी मला फोन करा. मी न्यायला येतो.”
    ठरवल्याप्रमाणे ते तिघे निघाले. ऑफिस करून निघायला त्यांना वेळ झाला. दापोलीला एस.टी.तून उतरून ते फोन करणारच होते.
    सतीश म्हणाला, “आपण थोडं आधीच फोन करू या म्हणजे आपण स्टॅण्डवर पोचोतो तो तेथे येईल.”
    त्याप्रमाणे त्यांनी फोन केला तर फोनची रेंजच गेली होती. त्यांची चांगलीच पंचाईत झाली होती.
    एकाने खाली उतरल्यावर एका वाटसरूला विचारले,
    “इथं सुंब्या दाते कुठे राहतात?”
    “ते इथे नाही. त्या फाट्यावरून पुढं राहतात.”
    “प्लीज. त्यांचं घर दाखवाल का?”
    “दाखवलं असतं पण मला या बाजूला जायचंय. सॉरी.”

  • “ठीक आहे.”
    आता तिथं रस्त्यावर कुणीच नव्हतं. रस्त्यावर फारसा उजेडही नव्हताच. तोच रस्त्यावर एक माणूस कंदील घेऊन चालताना सत्याला दिसला. त्याने दोघांना तो दाखवला. म्हणाला, “थांबा मी त्याला विचारतो.” म्हणत तो त्याच्या जवळ गेला. सतीशनं विचारलं, “भाऊ, इथं सुंब्या दाते कुठे राहतात?”
    “ते पार त्या बाजूला राहतात. या वेळी असं एकट्या दुकट्यानं तेथे जाणं फार धोक्याचं आहे.”
    “का बरं? आणि आम्ही तीन जण आहोत.”
    “तीन कुठे आहेत?”
    “ते काय?” म्हणत सतीशने पाठीमागे हात केला तर तेथे कुणीच नव्हतं.
    “आँ? हे काय? आम्ही एकत्रच आलो. ते गेले कुठे?”
    “साहेब, तेही भेटतील. प्रथम तुम्ही तुमचा जीव वाचवा.”
    “जीव वाचवा? म्हणजे?”
    “तसं नाही, या उघड्यावर थांबू नका. वारा झोंबेल. तुम्ही त्या समोरच्या घराचा आसरा घ्या.”
    “पण ते दोघं गेले कुठे?”
    “सांगितलं ना भेटतील तेही. कदाचित तुमच्या आधीच त्या घरात, त्या ‘वाटसरू सदन’मध्ये गेलेही असतील. चला, तुम्हीही जा.”
    “शक्यच नाही. ते मला सोडून जाणार नाहीत.”
    “हे पाहा, सांगायचे काम माझे. काय करायचं ते तुम्ही ठरवा. तेथे आसरा मिळेल, जेवण मिळेल. रात्री अंथरूण पांघरूण मिळेल.”
    “ते सारं ठीक आहे हो. पण ते दोघे? त्यांना सोडून…”
    तोच तो कंदिलवाला पुन्हा म्हणाला
    “साहेब, त्या वाटसरू सदन मध्ये सुरक्षित राहाल. बाहेर चकवा लागेल. भुतं भेटतील.”
    “काय? भुतं?”
    सतीशला वाटले आपण मारे भुतं या शब्दाचीच टर उडवत होतो, पण त्याने असे म्हणताच आपली तंतरली आहे. या उघड्यावर रात्र काढणं शक्य नाही. आपण वाचलो तर त्यांना शोधता येईल.
    “हूं. वाजवा दार.”
    “मी? आणि तुम्ही?”
    “माझी काळजी करू नका. रातच्याला तुमच्या सारखा चुकला माकला जीव इथंच निवार्‍याला येतात. इथवर रस्ता दाखवायचं काम माझं… जा. मी हाय हितच. वाजवा दार.”
    सतीशला वाटलं, हा बाहेर थांबतोय ते बरंच आहे. त्या दोघांना हाच इथं आणेल. सतीशने मागे, इकडे तिकडे पाहत हलकेच दार वाजवलं. त्याच क्षणी एका वृद्धेनं दार उघडलं. जणू ती दार वाजायची वाट पाहत दारातच उभी होती. आणि… आणि… सतीशची बोबडीच वळली. कारण…
    तिच्या मागे तो उभा होता. तोच कंदीलवाला. हातात कंदील धरून त्याने भयाण हसत विचारलं,
    “काय? पटली का ओळख? भुतांची?”
    सतीशला वाटलं, मरू दे हे वाटसरू सदन! बाहेर पळत सुटावे. या घरापेक्षा तो मोकळा ओसाड माळ बरा.
    तोच ती म्हातारी म्हणाली,
    “ये बाळा. त्याचं बोलणं नको मनावर घेऊस. ये आत!”
    काय करावे? सतीशबाळाला संभ्रम पडला. त्याला वाटलं तिला विचारावं,“त्याचं बोलणं मनावर कसं नको घेऊ? जरी ते सोडून दिलं तरी तो बाहेरून या बंद दारातून घरात गेला कसा?”
    ती म्हणाली, “बाळा, सांगितलं ना? विचार करून दमू नकोस. ये आत. ”
    खरं तर त्याच्या अंगात, पायात ताकदच उरली नव्हती. त्याचे पाय पाषाणाचे झाले होते.
    तो भयकारी होता, पण ती प्रेमळ वाटत होती. पण काय सांगता येतंय? ती देखील भूतच असेल तर! तीच फसवून-भुलवून गोड बोलून आत घेत नसेल कशावरून? काय करावे?
    तीच पुन्हा म्हणाली,
    “ये. चिंता करू नकोस. हे सदन केवळ वाटसरूंसाठीच आहे. वाटसरू सदन इथे येणार्‍या प्रत्येकाची अशीच अवस्था होते. त्यांची पण अशीच तुझ्यासारखीच बोबडी वळते, पण एक लक्षात घे. इथे या घरी कुणाही वाटसरूला अपाय होत नाही. तू कोणतंही भय बाळगू नकोस.”
    तिच्या बोलण्याने विश्‍वासाने त्याला थोडा धीर आला. थोडा विश्‍वासही वाटला. त्याच विश्‍वासावर तो आत घरात गेला. तिने त्याला पाणी दिलं. थोड्याच वेळात जेवणाचं ताट दिलं. भाकरी, पिठलं होतं. छान होतं. त्याला संकोच वाटला. ती म्हणाली –
    “जेव शांतपणे. संकोच करू नकोस.”
    तो जेवत असताना त्याचं लक्ष सहज दाराबाहेर गेलं. बाहेर तोच उभा होता. कंदीलवाला, कंदील घेऊन. त्याचा घास घशातच राहिला. पुन्हा तीच म्हणाली “या घराला पाठीमागे पण दार आहे.”
    “हूंं”
    त्याचं भय जरा कमी झालं.
    त्यानं विचारलं,
    “इथं या घरात कोण राहतं?”
    ती वृद्धा, तोंडाचं बोळकं
    (दात नसलेलं तोंड) पसरून हसत बोलली,“ या घरात मी एकटीच राहते.”
    “मग, तो कंदीलवाला?”
    “तो होय? तो बाहेरच असतोय. चुकलेल्या वाटसरूंना तो फक्त इथं आणून सोडतो.”
    “ हूं. पण मग हे जेवण? ते कोण बनवतं? तुमची देखभाल कोण करतं?”
    “तुला ना प्रश्‍नच फार पडतात. जेव शांतपणे व शांतपणे झोप. सारी उत्तरं तुला सकाळ झाल्यावर मिळतील.”
    “पण आजी, माझे ते मित्र! ते अजून नाही आले?”
    “ते ही सकाळी भेटतील.”
    “सकाळी?”
    “हो.”
    “पण रात्रभर ते बिचारे कुठे भटकत राहतील?”
    “त्यांची चिंता नको करूस. त्यांचंही तुझ्यासारखंच सारं व्यवस्थित होईल. विश्‍वास ठेव.”
    “हो. ठीक आहे.”
    बाहेरून टीचभर दिसणार्‍या त्या सदनात आतल्या अंगाला त्याची झोपायची सोय केलेली होती. जमिनीवरच एका चटईवर वाकळ घातली होती. पांघरायला गोधडी होती. त्याचं जेवणही खाली जमिनीवर बसूनच झालं होतं. त्याला वाटलं आपल्याला झोप येणं शक्य नाही. ते दोघं कुठे आहेत माहीत नाही. आपण एकटेच या भूत सदनात सापडलोय!
    बसल्या जागेवरून ती वृद्धा
    म्हणाली, “बाळा, विचार न करता शांतपणे झोप.”
    “हूं”
    आणि त्याला खरंच छान शांत
    झोप लागली.
    पहाटे, पहाटे उजाडता, उजाडता त्याला थंडी वाजायला लागली. कुडकुडायला व्हायला लागले. गोधडी गुरफटून घ्यावी म्हणून त्याने प्रयत्न केला. पण गोधडी हाताला लागेना. त्यासाठी त्याने डोळे उघडले मात्र आणि तो जागेवरून तीनताड वर उडाला. तो कोणत्याच सदनात नव्हताच. तो मोकळ्या माळावर झोपला होता. तो धडपडत उठून उभा राहिला. त्याने आजूबाजूला पाहिलं. तेथे त्याच्या आसपास असेच चार पाच जण अंगाचं मुटकुळं करून झोपले होते. त्याला समजेना की हे असं कसं झालं? त्याला कंदीलवाल्याचे शब्द आठवले. त्यानं विचारलं होतं,“काय? पटली का ओळख? भुतांची?”
    या कोकणात, या गावात पोचल्या पोचल्याच त्याला भुतानं सलामी दिली होती. त्याला वाटले आता त्या मित्राकडे न जाता इथंच जी मिळेल ती गाडी पकडून मुंबई गाठावी.
    पण आपले मित्र? त्यांचं काय? ते कुठे आहेत? या चार-पाच मुटकुळ्यात तेही असतील का? पाहावं तरी?
    त्यानं पाहिलं, प्रत्येकाच्या तोंडावर अंगावर अंगभर पांढरे पलंगपोस पांघरलं होतं. जणू ती प्रेतंच होती. त्या सकट त्यांची मुटकुळी झाली होती. ते उताणे झोपलेले नव्हते. म्हणूनच ती प्रेतं नसावीत असे समजायचे. सतीशने आवाज दिला अंदाजेच!
    “अनय, ए .. बन्या उठा.
    पहाट झालीय.”
    त्याला वाटले, या पाचात ती दोघं नसतील तर? देवा, ते दोघं यांच्या मध्येच असू देत. मी तुला हात जोडतो. त्याच्या आवाजाने ते पाचही जण धडपडत उठून बसले. सतीश म्हणाला,“थँक्स गॉड.” कारण त्यांच्या मध्ये अन्या-बन्या होते.
    सतीशला समोर उभा पाहून अनय संतापून उभा राहिला व म्हणाला,
    “अरे, काय मित्र आहेस का कोण? मध्येच कुठे गडप झालास? मी इथं एकटा पडलो ना!”
    “मी ही एकटा पडलो होतो, पण मन्या तू इथं कसा?”
    “कसा म्हणजे? तू कसा इथं? सत्या तू कुठे होतास?”
    “मी…मला एक कंदीलावाला त्या वाटसरू सदनात घेऊन गेला.”
    मी म्हणालोही की,
    “माझे मित्र कुठे आहेत? त्यांना
    येऊ दे.”
    “मग?”
    “तो म्हणाला, त्यांची काळजी तू नको करूस. तू चल ते सापडले की तेही इथे येतील.”
    “मग?”
    “मग काय? पण तुम्ही तिथं नव्हताच. म्हणजे नाहीच आलात. ”
    “वा. नाही कसं?
    एका कंदीलवाल्यानेच आम्हाला त्या वाटसरू सदनात नेलं. तिथं एका वृद्धेनं मला भाकरी पिठलं करून जेवू घातलं.”
    “मला म्हणजे?”
    “अरे आत गेल्यावर अन्या कुठं गायबच झाला.”
    “वा रे, मी नाही, तूच दिसला नाहीस. मलाही त्या आजीने गरम गरम झुणका (पिठलं) भाकरी वाढली. छान होतं जेवण.”
    “काय सांगतोस?”
    आता ते बाकीचे तिघंही बोलू लागले.
    “मीही हा अनुभव घेतलाय.”
    “मीही घेतलाय.”
    “झोपायला कांबळी आणि वाकळं होती. पण त्यावेळी तिथं तुम्ही कुणीच नव्हतं. मी एकटाच होतो.”
    सतीश म्हणाला –
    “याचा अर्थ प्रत्येकालाच पण स्वतंत्रपणेच हा अनुभव अनुभवायला मिळालाय, ते सदन एवढंसं असूनही आपण तेथे सारेच रात्री मुक्कामाला होतो. तरी ते एकमेकांना समजलं नाही. आपण तर एकमेकांना पाहिलं नाही, हाही प्रत्येकालाच आलेला अनुभव आहे.”
    त्यातलाच एक अनोळखी वाटसरू म्हणाला,“म्हणजे बाप्पा, ते सदन भूत सदनच म्हणायचे तर! ”
    सतीश म्हणाला, “मित्रा काहीही असो, त्या आजींनी शब्द दिल्याप्रमाणं तेथे आपणा कुणालाच कोणताही अपाय झालेला नाही.”
    पाहुणा म्हणाला, “ंहो, हे एकदम खरंच हाय. उलट तेथे त्यांनी आपली जेवणाखाण्याची, झोपायचीही सोय केली. आपली काळजीच घेतली.”
    “हां, पण आत्ता आपण इथे असे उघड्यावर कसे भाऊ?”
    “माहीत नाही. त्यांची वेळ
    संपली असेल.”
    “हो. असेल. त्यांनाही काही बंधनं असणारच.”
    “पण भाऊ, त्यांची वेळ होताच ते पहा त्यांचं सदनही गायब झालंय.”
    “काय, मग हे पांढरं पांघरूण आता कुणाला परत करायचं?”
    “मित्रा, ते पांघरूण तरी कुठे आहे?”
    “बाप रे!”
    मग तुम्ही कुठले? कुणाकडे चाललात? वगैरे एकमेकांची चौकशी झाली. तोच बबनचा मोबाईल वाजला. त्याबरोबर रेंज आली वाटतं, म्हणत सार्‍यांनीच मोबाईलची बटणं दाबायला सुरुवात केली व ते दोघं निरोप घेत निघून गेले.
    सुंब्याचा बबनला फोन आला होता. तो म्हणाला.
    “अरे कुठे आहात तुम्ही? मी कधीपासून प्रत्येकाला फोन करायचा प्रयत्न करतोय, लागतच नाहीय.
    आत्ता कसाबसा बबनचा लागला.
    कुठे आहात? मी येतोय.”
    “हां. आम्ही कुठं आहोत? आम्ही ना त्या वाटसरू… नाही नाही आम्ही उघड्या माळावर आहोत.”
    “हं. समजलं, वाटसरू सदन ना?”
    “हो. ते नाहीय आता.”
    “माहीत आहे. येतोय मी. तिथेच थांबा.”
    नंतर सारे सुंब्याच्या घरी गेले. ते घर म्हणजे मोठी अशी प्रशस्त वास्तू होती. मुंबईतील दोन-दोन खोल्यांची छोटी अख्खी चाळ मावेल एवढे अंगणच होते. तेवढंच परसही (मागचे अंगण) मोठं होतं. अवाढव्य (मुंबई-पुण्याच्या मानानं) स्वयंपाकघर, बाहेर प्रशस्त हॉल, तीन खोल्या (बेडरूम) तीही अघळपघळच! तेथील माणसांची नुसती
    घरंच मोठी, नाहीत तर त्यांची मनंही तेवढीच माणुसकीनं भरलेली मोठी आहेत. एका थोर कवीनं म्हटलंच आहे की,
    “कोकणातील माणसं साधी भोळी,
    काळजात त्यांच्या भरली शहाळी.”
    पाठीमागे विहीर होती. ती पाण्याने भरलेली होती. पलीकडे गोठा होता. त्यात दोन दुभती जनावरं व दोन कालवडं होती. घरी माणसंही भरपूर होती.
    सख्खी चुलत एकत्र होते. बाहेर मुलांचा हैदोस चालू होता. घर गोकूळ होतं. मुलांच्या धुडगुसात त्यांचा कुत्रा बाज्याही सामील होता.
    धान्यानं भरलेलं कोठार. गोठ्यात गाई, गुरं आणि माणसांनी माणुसकीने भरलेलं घर! या परीस स्वर्गीय आनंद तो काय? शहर गावचे मित्र येणार म्हणून जेवायचा बेत त्या माय माउलीनं खासच केला होता.
    बिरड्याची उसळ, अमसुलाचं सार, मसाले भात, भजी तळणं आणि मुख्य पक्वान्न म्हणजे उकडीचे एवढाले मोठे मोठे मोदक.
    बाप रे! अन्या, बन्याला वाटलं आपल्या गावी, मुंबईला गणपतीत मोदक करताना बायांचा जीव मेटाकुटीला येतो. मग नैवेद्यच म्हणून ते हव्या त्या किंमतीला विकत आणायचे.
    स्वयंपाक म्हणजे काय? स्वतः केलेली पाक सिद्धी! मग? विकतचा नैवेद्य का दाखवायचा? त्याचं श्रेय कुणाला? जाऊ दे, हा वहावत जाणारा, न संपणारा वादाचा विषय. नको. दुपारी चहानंतर सारे त्यांची बाग पहायला गेले. ती पाहूनही त्यांना ‘बापरे!!’ च झालं.
    नजर पोचणार नाही इथपर्यंत नारळी, पोफळी (सुपारी) आणि काजू विस्तारला होता. त्या मागे आंब्याची हजार, बाराशे लेकुरवाळी(आंबेमोहरांनी लगडलेली. छोट्या छोट्या कैर्‍या लागलेली) वैभवी झाडं उभी होती.
    खरंच!! या वैभवाचं सौंदर्य वाचून समजणार नाही. बबनने विचारलं,
    “काय रे सुंब्या, या सार्‍या अफाट बागेची देखरेख एकटा गडी कसा काय करतो? चोर्‍या होत नाहीत का?”
    त्यावर सुंब्या म्हणाला,
    “का? कशाला होतील चोर्‍या?
    अरे, इथे प्रत्येकाचीच अशी लहान मोठी बाग असते. फार क्वचित हजारभर आंबे चोरीला जातात.
    पण त्याचं एवढं काय?”
    आम्ही त्याचं उत्तर ऐकून अचंबित झालो. वाटलं तिकडे मुंबई-पुण्याला एकेका आंब्याला किंमत मोजावी लागते. एखादा आंबा वाया गेला तरी जीव कासावीस होतो आणि हा? शांतपणे हे सांगतोय, हजारभर आंब्यांची चोरी!
    तोच पुढे म्हणाला, “इथे काही जण झाडं विकतात तर काही कामगार लावून माल निर्यात करतात. तसं आम्ही करतो ते काम फार कष्टाचं व फार जिकरीचं असतं. ”
    हे आमचं बोलणं चाललं असतानाच काही कामगार इकडून तिकडे लगबग करत होते. बाया डोक्यावर पाटी घेऊन जात होत्या. आम्हाला गंमत वाटली की प्रत्येक बाईच्या केसात अबोलीचा वळेसर (हारमाळ) होता. त्या काळ्यासावळ्या सडसडीत उंच होत्या. गुडघ्यापर्यंतचं लुगडं, पायात जाडजूड वहाणा, चालणं तरातरा, तुरुतुरु, एकूणच चपळ कळत होत्या. त्यातील एक वृद्धा जवळ येत म्हणाली –
    “पोर्‍या शहरी मित्र जणू?”
    “हो आजी.”
    “हूं. त्यांना आपला मेवा देऊन पाठव.”
    “हो.”
    “येतो रं.”
    “हूं.”
    ती जशी अचानक आली तशीच तरातरा निघून गेली होती.
    “सुंब्या कोण रे?”
    “आजी आहे. चल परतूया.”
    “हूं”
    घरी येईपर्यंत सांज होत आली होती. उद्याला परतायचे होते. त्या तिघांना आपला अनुभव सांगायचा होता. तेवढ्यात आठ-नऊ वर्षाचा एक चुणचुणीत मुलगा वाटेत आडवा आला. सुंब्याला म्हणाला,
    “दादा, काजू दे.”
    सुंब्याने खिशातून चार पाच काजू काढून त्याच्या हातावर ठेवले. तो उड्या मारत पळत गेला.
    अनयनं विचारलं,“काय रे? तुझ्या खिशात नेहमी काजू असतात वाटतं?”
    “नाही. पण बागेत जाताना मात्र मी काजूच्या पाचसहा बिया बरोबर ठेवतो. मला माहीत आहे, मला पाहून तो समोर येणार व काजू मागणार.”
    “हूं.”
    सार्‍यांनाच त्या मुलाचं कौतुक वाटलं. मुठीत काजूगर घेऊन उड्या मारत जाणार्‍या त्या मुलाकडे सारेच पहात राहिले. सुंब्या म्हणाला,“चला आता, आपण त्या पलीकडच्या रस्त्याने जाऊ. विहीर दाखवतो. ”
    ते सारे सुंब्याबरोबर फिरत होते. सुंब्या म्हणाला, “ती पाहा विहीर.”
    विहीर खूपच मोठी होती. त्याला खाली उतरायला पायर्‍या होत्या, ते पाहूनच मन भरलं होतं. कारण ही विहीरही भरलेली होती. त्याला
    वळसा घालून ते पुढे निघाले. तर पाठीमागून कुणा स्त्रीचा रडण्याचा आवाज आला. अनयने विचारले,
    “काय रे, कोण रडतंय?”
    “आहे एक वेडी. चल जाऊ या.”
    “पण ती? रडतेय ना?”
    “हूं. येईल तिचं कोणी तरी. हे नेहमीचेच आहे. चल, संध्याकाळ होईल. मग दिसणार नाही काही.”
    मनात प्रश्‍न घेऊनच सारे सुंब्याबरोबर परतले. ते सारे गप्पांत उलगडायचे होते. लागले तर, वाटलेच तर कबुलीजबाबही द्यायचा होता.
    शहरात एवढं चालायची कधी सवय नसते. एवढं चालायची वेळही येत नाही. पण इथं? किती फिरलो याला सुमार नव्हता, पण त्या चालण्यात मजा होती. बोलत बोलत चाललेलं जाणवलंच नव्हतं. पण त्याचं घर जवळ आल्यावर मात्र पाय दुखायला लागले होते. तरी मजा आली होती.
    इथे सुंब्याला आलेले अनुभव ऐकायचे होते आणि मुख्य म्हणजे कबूल करायचे होते की, “भूत ही योनी आहे.”
    रात्री जेवणात केळीच्या पानावर आंबेमोहोर तांदळाचा भात, अमसुलाचं नारळाचं वाटण घातलेलं सार, पोळ्या, वांग्याची भाजी होती. वा! त्याची चव काय वर्णावी? असं त्यांना झालं होतं. प्रत्येक पदार्थातच ताजा ताजा नारळाचा चव (खवलेलं खोबरं) होता.
    बन्या म्हणाला, “अन्या, मला वाटतं इथे बायांचे केस कसे काळेभोर आणि चमकदार असतात. त्याचे हेच रहस्य असावे. रोज जेवणात ताजा नारळ केसांना शुद्ध खोबर्‍याचं तेल.”
    “हो रे. शहरी बाया बघ, शॅम्पूनं त्यांचे केस कसे दिसतात?”
    “रंग उडाल्यासारखे निस्तेज.”
    “ए, यावर चर्चा करायला आपण आलोय का? पण बबन्या तू म्हणतोस ते खरं आहे. अरे बायाच कशाला, आपणही शाम्पूच वापरतो की.”
    “पण मी नाही.”
    सुंब्या म्हणाला. त्यावर बबन्या म्हणाला- “समजलं, तुझ्या सुरेख केसांचं रहस्य! बरं, चला आता घरी जायला हवं.”
    “उद्या ना?”
    “हो. मग आज रात्री गप्पांचा अड्डा कुठे?”
    “बाहेर, वाड्याच्या भिंतीवर. चला.”
    “बाहेर?”
    “हो. का रे? भय वाटतंय?”
    “तसं नाही. जाऊ. बाहेरच बसू.”
    सुंब्यानं बाहेर चार खुर्च्या पण मांडायची सोय केली आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. सतीशने मित्रांना सांगितलेला आपला अनुभव सुंब्यालाही सांगितला, मग अनय म्हणाला, “माझा अनुभव ऐका. मीही एकटाच होतो त्या रस्त्यावर. बबन्या-सत्या दोघांचाही पत्ता नाही. मला भीती वाटायला लागली. या दोघांचा रागही आला. मी गांगरून गेलो होतो. कुठं जायचं ते समजत नव्हतं. तोच मला माझ्या समोरून एक कंदीलवालाच चालताना दिसला. मला जरा धीर आला. मी त्याला गाठायसाठी झपाझपा चालू लागलो. त्याच्या हातातील कंदिलाच्या मागे पुढे होण्यावरून समजत होते की तो अगदी संथपणे चालत होता. पण सुंब्या, तरी मी त्याला गाठू शकलो नाही. मग मी टाळ्या वाजवल्या. ‘ओ, भाऊ जरा, जरा थांबा हो.’ अशी सादही घातली. पण माझा कोणताच आवाज त्याच्यापर्यंत पोचत नसावा. माझी गती वाढवणं एवढंच आता माझ्या हाती होतं. मी तर ते करतच होतो आणि अचानक माझ्या लक्षात आलं की, कंदिलवाला थांबलाय. कंदील हलायचा थांबला होता. मी त्याला गाठले व विचारले, “भाऊ, मी रस्ता चुकलोय. मला मदत हवीय.”
    पण तो निर्विकार होता. ढिम्म होता. बहुधा तो बहिरा असावा. मग मी अंदाजाने त्याच्या खांद्याला स्पर्श करायचा प्रयत्न केला, पण ते जमेना. मग मी सरळ कंदील पकडलेला त्याचा हातच पकडायचा प्रयत्न केला आणि सतीश माझा हाक कंदिलावरून आरपार जात होता. आता माझी चांगलीच तंतरली रे. मी, मी बेशुद्धच पडलो.”
    “मग?”
    “मग काय? तो कंदीलही विझला. सर्वत्र मागेपुढे अंधार पसरला आणि थोड्या अंतरावरच एक दार उघडले गेले. मी पाहिलं दारात एक वृद्धबाबा उभे होते.”
    “वृद्धबाबा की आजी?”
    “आजी नाही, आजोबाच. त्यांनी दारातूनच मला म्हटलं, ये बाळा घाबरू नकोस. ये घरात ये. मी भारल्यासारखा त्या घरात गेलो आणि माझी भिती गेली. तेथे माझी ही छान सोय झाली बघ. पण सकाळी म्हणजे पहाटे पाहतो तो काय? इथे.. ”
    बबन म्हणाला, “माझा अनुभवही असाच तरी थोडा वेगळा आहे.”
    “सांग.”
    “मीही रस्त्यावर एकटाच होतो. घाबरलो होतो. काही सुचत नव्हतं. तोच एक 9-10 वर्षाची एक मुलगी पुढे आली. काही न बोलता तिने माझा हात धरला व मला त्या सदनात घेऊन गेली. पण मला हे समजत नाही की , इथं ते ‘वाटसरू सदन’ एकच मग आपण कुणालाच कसे दिसलो नाही?”
    “तुला काय वाटतं? ही भुताटकी का रे? तू तर इथे जन्मापासून राहतोस. तुझा काय अनुभव?”
    “माझा अनुभव ना? सांगतो ऐका.”
    “सांग. तुझा अनुभव जास्त बोलका असणार. सांग.”
    “हूं.”
    तेवढ्यात आता एका पोर्‍याने गरम आटीव मसाला दुधाचे चार पेले बाहेर आणले. सुंब्याने तत्परतेने ते सर्वांना दिले व एक स्वतःला घेत म्हणाला –
    “घ्या आवडेल.”
    त्या तिघांनी याची अपेक्षाही केली नव्हती. इथं खरंच फारच छान होतं. बबन म्हणाला –
    “सुंब्या, इथं खरंच रे! वा! शहरात कोजागिरी पौर्णिमेलाही भरपूर पैसा टाकूनही ही चव चाखायला मिळणार नाही. थँक्स रे. बरं. पण एक सांग तुझं नाव सुंब्या कसं?”
    “माझ्या आज्याचं नाव आहे हे. ते मला वारसाने मिळालंय. पूर्वी नवीन बाळाला पूर्वजाचं नाव ठेवत आज्यांचं. आजा हयात असेल तर पणज्याचं. मुलींना आजी, पणजीचं, चुलत आजीचं नाव ठेवत. माझं नाव सुब्बाजी आहे.”
    “बरं. ते सोड. तुझा अनुभव सांग.”
    “ंहूं. मित्रांनो, मगाशी विहिरीपाशी रडणारी ती स्त्री.”
    “तिचं काय?”
    “तिला त्याच विहीरीत ढकलून दिलं होतं. तिला मरून चार वर्षे झालीत.”
    “बाप रे! तरी… ती.”
    “हो. ती रोज त्याच वेळी विहीरीपाशी रडत बसते. तो मुलगा आठवला का?”
    “हां. काजू मागणारा ना?”
    “हां. त्याला काजू खूप आवडतात. एका माळ्याचा तो मुलगा सहा वर्षांपूर्वी झाडावरून पडून त्याचा दुर्दैवी अंत झाला.”
    “बापरे ! काय?”
    “ती वृद्धा आठवली का?”
    “हो. ती तुला म्हणाली ना, यांना मेवा देऊन पाठव. तिच ना?”
    “बबन्या, तुला मेवा तेवढा बरोबर आठवला रे.”
    “असू दे, अनय. तर ती…”
    “सुंब्या, तू सांग पुढं. ”
    “तर त्या आजीला जाऊन पंचवीस वर्षे होऊन गेलीत.”
    “काय खरंच! त्या वेळी म्हणे मी दीड-दोन वर्षांचा होतो. माझ्यावर तिचं खूप प्रेम होतं. ती माझे खूप लाड करायची. ती गेल्यावरही म्हणे तिनंच मला सांभाळलं आहे.”
    “बापरे!”
    “मित्रांनो, आजही या घरादाराला तीच सांभाळत आहे. मघाशीही बागेत आपल्याबरोबर ती होतीच. घराला जसा एक वास्तुपुरुष असतो, तशीच ती घराची, वाड्याची वास्तू स्त्री आहे. अशी आमची ठाम श्रद्धा आहे.”
    “ंहूं.”
    तेवढ्यात तिनं बाहेर डोकावत म्हटलं. तिनंच! त्या आजीनंच.
    “पोरा, लई वकुत झाला.
    झोपा बरं.”
    “हो आजी.” सुंब्यानं म्हटलं.
    अनयनं विचारलं, “सुंब्या, पण ती म्हणजे त्या आजी इथं कशा?”
    “ती इथंच राहते. मी म्हणालो ना, ती ‘वास्तू स्त्री’ आहे.”
    “मग? त्यांची तुम्हाला भीती नाही वाटत?”
    “नाही वाटत. आम्हाला सवय झालीय. ती गेलीय हेच खरं वाटत
    नाही बघा.”
    “तरी ते सत्य नाही का?”
    “हां. पण तिचं वावरणं, तिचं प्रेम हे तर सत्यच आहे, म्हणूनच मी म्हणालो होतो ना की, ही एक योनी आहे.”
    “हो रे, पटले बघ. अनुभवानंच नियम सिद्ध होतो.”
    “हूं. पटलं ना. चला झोपू या. नाहीतर आजी रागवेल.”
    “पुन्हा आजी!”
    “सुंब्या, कुठं झोपायचं?”
    “चला आत दाखवतो. चौघांना चार पलंग आहेत. सारी सोय झाली आहे. ”
    “आत? आत झोपायचं?”
    “अनयला खरं तर विचारायचं
    होतं की.”
    “त्या आजींच्या सहवासात?”
    “पण सारे सुंब्याच्या मागून मुकाट्याने आत गेले. झोपायची सोय उत्तम होती.”
    रात्री सार्‍यांना छान झोप लागली. दुपारचं गोडाचं जेवण होऊन भरपूर मेवा बरोबर देऊन त्यांची पाठवणी झाली. आज या गोष्टीला एवढी वर्षे होऊन गेलीत तरी ते सत्य अनुभव ते मित्र विसरले नाहीत. ते घर आणि ते सदनही.
    सुंब्या म्हणालाच होता की,“जसं हे घर, ही आजी तुम्ही विसरणार नाहीत तसेच ते वाटसरूंसाठी रात्रीत निर्माण होणारं ‘वाटसरू सदन’ही तुम्ही विसरणार नाही.”
    ते आजही त्यांच्या चांगलंच
    स्मरणात आहे, कारण त्यांनी त्याचा अनुभव घेतलाय.
shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

मलायका अरोरा देखील करणार दुसरं लग्न, लग्नाची पत्रिका घेऊन पोहोचली पहिल्या पतीच्या घरी? (Malaika Arora Reached Her First Husband Arbaaz Khans House For Gave Her Marriage Card)

सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या मलायका हिच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरू आहे. अरबाज खान याच्यानंतर…

April 30, 2024

Invest Smart, Retire Rich

Struggling With Your Investments? Shreeprakash Sharma offers Help! Ragini realised yet another financial year was…

April 30, 2024

अधिपतीच्या आयुष्यात नवीन मास्तरीणबाईंची एण्ट्री, भुवनेश्वरीची नवी चाल, प्रोमो व्हायरल ( Zee Marathi Serial Tula Shikwin Changlach Dhada New Promo Viral )

तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत सध्या अक्षराने अधिपतीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. शाळेतील शिक्षण…

April 30, 2024
© Merisaheli