Top Stories Marathi

तरुण लाडूसम्राज्ञी (Young Lady Achieves As A Successful Laddoo Enterpreneur : Makes 23 Varieties Of Laddoo)

आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये लाडू सन्मानाने वावरतो. कोणत्याही सणसमारंभात लाडू बनवला जातो अन्‌ आवडीने खाल्ला जातो. घरोघरी आढळणारा आणि दारोदारी मिळणारा – म्हणजे हलवायाच्या आणि वाण्याच्या दुकानात देखील मिळणारा हा गोड लाडू देशभरात आवडीचा आहे. पूर्वीच्या काळी लग्नसमारंभात बुंदीचा लाडू, संक्रांतीला तिळाचा लाडू, दिवाळीला बेसनाचा आणि रव्याचा लाडू तर बाळंतिणीला डिंकाचा लाडू घरी केलाच जायचा.

हे झाले लाडवाचे ढोबळ प्रकार. पण एका तरुण उद्योजिकेने या लाडूचा राज्यव्यापी व्यापार सांभाळत तब्बल २३ प्रकारचे लाडू खवय्यांसाठी सादर केले आहेत. ही उद्योजिका आहे देवांगी पाटणकर! तिनं खाऊवाला ॲण्ड कंपनी हा आयकॉनिक ब्रॅण्ड विस्तारीत केला आहे. तिचे वाडवडील खाऊवाले पाटणकर म्हणून पुण्यामध्ये चांगलेच प्रस्थापित आहेत. शुक्रवार पेठेत १९५० साली स्थापन झालेल्या पाटणकर आणि मंडळी या दुकानाने व्यवसाय सुरू झाला. वसंतराव पाटणकरांनी सुरू केलेला हा व्यवसाय आता मोठा उद्योग झाला असून तरुण देवांगी पाटणकर त्याची धुरा सांभाळते आहे. अन्‌ २३ प्रकारचे लाडू बाजारात आणून खाऊवाला ॲण्ड कंपनीने महाराष्ट्रात मुसंडी मारली आहे.

लाडवाचे जे सर्वसाधारण प्रकार आपल्यास परिचित आहेत, त्यापेक्षा हे हटके प्रकार आहेत. म्हणजे लाडवात साखरेचा भरपूर वापर केला जातो. त्यामुळे मधुमेही लोक व फिटनेसबाबत जागरूक असणारे लोक त्याच्यापासून दोन हात लांबच राहतात, असे लक्षात आल्याने या कंपनीने फिटनेसवाल्यांसाठी प्रोटीन लाडू, होल ग्रेन लाडू आणि सेव्हन ग्रेन लाडू आणले आहेत. अन्‌ कॅलरीज्‌ वाढतील का, ही त्यांची भिती मनातून काढून टाकली आहे. तसेच मधुमेहींसाठी शुगर फ्री, होल व्हिट, रागी आणि मुगाचे लाडू सादर केले आहेत. अन्‌ उपवास करणाऱ्यांची पण सोय करत शिंगाडे, साबुदाणा, शेंगदाणे-गूळ व खजूर लाडू देत आहेत. लोकांच्या बदलत्या जीवनशैलीला अनुसरून देवांगी पाटणकरने टाकलेले हे पाऊल कौतुकास्पद आहे.

“दर्जेदार भरड, पीठ, कडधान्ये, सुकामेवा आणि शुद्ध तुपाचा वापर करून आम्ही लाडवांची चव टिकवून ठेवली आहे. अन्‌ आवश्यक त्या मसाल्यांचा वापर करून ते अधिकच स्वादिष्ट बनविले आहेत,” असं देवांगी पाटणकर सांगते. “करोनाच्या साथीने साफसफाईचे व शारीरिक संपर्क होऊ न देण्याचे महत्त्व आपल्या सर्वांना कळले. ते नजरेसमोर ठेवून लाडू तयार करताना कमीत कमी मानवी संसर्ग होईल, याकडे आम्ही लक्ष पुरवतो. त्यामुळे लाडू तयार करण्यापासून ते पॅकींग या सर्व प्रक्रिया अत्याधुनिक यंत्रांनी केल्या जातात. धान्य निवडणे, पीठ मिसळणे या क्रिया देखील यंत्राद्वारेच केल्या जातात. लाडवांचा आकार एकसाची असावा आणि वजनही समान असावे, ही कामे देखील यंत्राद्वारे केली जातात,” असे पुढे देवांगीने सांगितले.

लाडू वळणे, भाजणे, तळणे ही मुख्यतः बायकांची कामे असल्याने तुझ्या फॅक्टरीत महिला आणि पुरुष यांची टक्केवारी किती आहे? या माझ्या प्रश्नावर देवांगी अभिमानाने उत्तरली, “शंभर टक्के महिलाच आमच्या कंपनीत काम करतात. आमचं युनिट तसं लहान असलं तरी लाडू निर्मिती आणि कार्यालयात फक्त महिलावर्गच आहे.”

घराघरात मानाचे गोड स्थान असलेल्या चविष्ट लाडवाचे व्यापारक्षेत्र सध्या महाराष्ट्रापुरते मर्यादीत असले तरी येत्या ५ वर्षात ते देशभर विस्तारण्याची तसेच लाडवाबरोबरच चिवडा, आलेपाक, खजूर सॉस, चटणी, नमकीन, मसाले असे पदार्थ तयार करण्याचा देवांगीचा मानस आहे. तिने लाडू क्षेत्रात जो विस्तार केला आहे, तो पाहता, तिला लाडूसम्राज्ञी म्हणायला हरकत नाही.

देवांगी सुविद्य आहे. तिने बी. कॉम्‌. करून जाणीवपूर्वक मुंबईमध्ये रिसर्च ॲनालिस्ट म्हणून वर्षभर काम केले. नंतर लक्झरी ब्रॅण्ड मॅनेजमेन्ट या कोर्समध्ये एम.बी.ए. तिने लंडनला जाऊन केले. लंडनहून परतल्यावर तिनं पाटणकर इव्हेन्टस्‌ या आपल्या घरच्या कंपनीत काम करण्यास पुढाकार घेतला. ही कंपनी इव्हेन्टस्‌ आणि मॅनेजमेन्ट या व्यवसायात पुण्यात नाव राखून आहे. ही कंपनी देवांगी व तिचे आई-बाबा; सोनिया व रमेश पाटणकर यांनी स्थापन केलेली आहे. २०१८ साली इप्साने केलेल्या कॅलिफोर्निया सर्व्हेत बेस्ट ट्रॅडिशनल इव्हेन्ट मॅनेजमेन्ट कंपनी असा गौरव त्यांना प्राप्त झाला आहे.

देवांगीचा आणखी एक व्यक्तीमत्त्व पैलू म्हणजे ती उत्कृष्ट बुद्धीबळपटू आहे. तिनं बुद्धीबळात कॉमनवेल्थ गोल्ड मेडल मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तिने भारताचे १२ वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. खाऊवाला ॲण्ड कंपनी ही देवांगी व तिची आई सोनिया यांची संयुक्त निर्मिती आहे. “माझ्या कुटुंबियांचे सहाय्य आणि आशीर्वाद यांच्या बळावर माझी वाटचाल सुरू आहे,” असे देवांगी विनम्रपणे सांगते.

देवांगीच्या यशस्वी वाटचालीसाठी ‘माझी सहेली’च्या शुभेच्छा!

  • दीपक खेडकर
majhisaheli

Share
Published by
majhisaheli

Recent Posts

टाइगर श्रॉफ-  मैं कभी भी इसकी भरपाई नहीं कर पाऊंगा… (Tiger Shroff- Main Kabhi Bhi Iski Bharpai Nahi Kar Paunga…)

एक्शन हीरो के रूप में अपना एक अलग मुक़ाम बनाया है टाइगर श्रॉफ ने. उनसे…

April 17, 2024

मुलांनी लिव्ह इनमध्ये राहण्याच्या झीनम अमानच्या विधानावरुन जुंपले शीतयुद्ध, सायरा बानू आणि मुमताज यांच्या प्रतिक्रिया चर्चेत ( After Mumtaz, Now Saira Banu Speaks On Zeenat Aman’s Advocacy For Live-In Relationships)

जेव्हापासून झीनत अमानने सोशल मीडियावर प्रवेश केला, तेव्हापासून त्या तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाल्या आहे. झीनत…

April 17, 2024

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर प्रदर्शित (‘Swargandharva Sudhir Phadke’ Trailer Is Out)

मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून मराठी घराघरांत आणि मनामनात पोहोचलेलं एक अजरामर नाव म्हणजे स्वरगंधर्व…

April 17, 2024

रामनवमीच्या निमित्ताने अरुण गोविल यांनी केली कन्यापुजा ( Arun Govil performs Kanya Pujan, Washes Feets Of Little Girls, Feeds Them, Wishes Fans On Ram Navami )

रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये श्री रामची भूमिका करून लोकांची मने जिंकणाऱ्या अरुण गोविल (टीव्ही राम…

April 17, 2024
© Merisaheli