Marathi

नाती टिकविण्यासाठी वेळ कसा काढाल? (How Do You Find Time To Maintain A Relationship?)

आजकालच्या जोडप्यांना एकमेकांसाठी वेळ नाही-फुरसत नाही. घर-ऑफिस, पोरंबाळं, त्यांचं संगोपन आणि घरातील रामरगाडा यांच्या कचाट्यात प्रत्येक जण सापडला आहे. तेव्हा मनांची जोडणी करणारे, नातीगोती निभावणारे असे क्षण त्यांच्या आयुष्यात येतच नाहीत. मग हे नातं टिकविण्यासाठी वेळ कसा काढायचा?


पती आणि पत्नी दोहोंनाही आमचा एक साधासोपा सवाल आहे –
आपण जोडीदारासाठी शेवटचं गिफ्ट कधी खरेदी केलं होतं? काही आठवतंय का? आपल्या अर्धांगिनीला, आपण शेवटचं कधी मिठीत घेतलं होतं? काही आठवतंय का? आपण एकमेकांसह बाहेरगावी, पर्यटनस्थळी शेवटचं कधी फिरायला गेलो होतो? आहे का आठवणीत? आपण शेवटचा सिनेमा कधी पाहिला होता? आठवतंय का?
कदाचित काही महिने झाले असतील… किंवा एखादं वर्षदेखील लोटलं असेल. मात्र वरील प्रश्‍नांची उत्तरं चटकन् देता आलेली नाहीत ना! त्यासाठी डोकं खाजवावं लागलं ना! आजकालच्या जोडप्यांची हीच करुण कहाणी आहे. दोघंही नोकरी करणारे असले काय किंवा नसले काय, वेळ नाही-फुरसत नाही. घर ऑफिस, पोरंबाळं, त्यांचं संगोपन आणि घरातील रामरगाडा यांच्या कचाट्यात प्रत्येक जण इतका सापडला आहे की, मनांची जोडणी करणारे, नातीगोती निभावणारे असे क्षण आपल्या आयुष्यात येतच नाही आहेत. आपापल्या जबाबदार्‍या पार पाडताना एकमेकांच्या संबंधांत असलेल्या जबाबदार्‍यांचा विसर पडतो आहे. परिणामी परस्परातील नाती दुरावत आहेत. प्रेम व्यक्त करायला वेळ नाही, मग प्रेम करायला कुठून असणार? तेव्हा तुम्ही अशा चक्रात अडकला असाल, तर त्यातून बाहेर पडा. त्यासाठी या काही युक्त्या योजून पाहा.

उत्सव करा
एकमेकांचे, मुलांचे वाढदिवस आपण साजरे करतोच. पण त्या व्यतिरिक्त लहानसहान प्रसंग देखील मोठ्या प्रमाणावर साजरे करा. आपल्याला नोकरीत मिळालेले प्रशस्तिपत्रक, प्रमोशन, इन्क्रिमेन्ट किंवा मुलांना शाळा-कॉलेजात मिळालेले चांगले मार्क्स, एखाद्या स्पर्धेत मिळालेले यश, अशा सर्व गोष्टी उत्सव म्हणून साजर्‍या करा. त्यांचे कौतुक करा. त्याच्यामुळे घरातील माणसे उत्सवप्रिय होतील. अन् घरात आनंदाचे वातावरण राहील. आपला जोडीदार चांगला हौशी असल्याची भावना वाढीस लागेल.

भेटवस्तू द्या
आपल्या माणसाला केवळ वाढदिवशी किंवा लग्नाच्या वाढदिवशी भेटवस्तू द्यायला पाहिजे, हा शिरस्ता मोडून काढा. जातायेता बाजारात चांगली दिसलेली, जोडीदारास उपयुक्त असलेली एखादी वस्तू आवर्जून खरेदी करा. अन् त्याला आणून द्या. त्यासाठी वेळ काढा. अचानक मिळालेल्या या भेटवस्तूने जोडीदारास आनंद होईल. आपलेपणाची जाणीव निर्माण करील.

सवड काढा
आपल्या कामाच्या व्यस्त जीवनशैलीत जोडीदाराशी प्रेमाच्या दोन गोष्टी बोलायला, त्याला मिठीत घ्यायला वेळ मिळत नाही, ही वस्तुस्थिती असली तरी प्रयत्नांती परमेश्‍वर या न्यायाने त्यासाठी सवड काढता येईल. दररोज सकाळी फक्त 15 मिनिटं आधी उठा. आणि जोडीदारास जवळ घ्या. 15 मिनिटं आधी उठल्याने आपल्या झोपेवर परिणाम होण्याचा प्रश्‍न नाही. पण त्या 15 मिनिटांत जो प्रेमाचा ओलावा आपण दाखवाल, त्याच्याने आपल्या नातेसंबंधावर खूप चांगला परिणाम होईल. दोघंही मनानं एकत्र याल.

म्हणा प्लीज, थँक्यू
लहानसहान गोष्टींची पावती देण्यासाठी, आपण मुलांना प्लीज, थँक्यू म्हणण्याचे शिष्टाचार शिकवतो. पण स्वतः ते आचरणात आणतो का? विचारा बघू स्वतःलाच. तेव्हा आपल्या जोडीदाराच्या साध्या कृतीची पावती अशा रितीने देण्यास विसरू नका. जोडीदाराने केलेल्या आपल्या कामाचे आभार माना. काही काम करून घ्यायचे असल्यास प्लीज म्हणत आर्जव करा. अन् आपल्याकडून काही चूक झाली, तर निःसंकोचपणे सॉरी म्हणायला कचरू नका. या छोट्या शब्दांचा परिणाम चांगलाच होईल.

राग आवरा
संसार जुना झाला, नाती मुरली की नीरसता येते. जोडीदाराच्या लहानसहान कृती नकोशा वाटतात. लग्नाच्या नवलाईत ज्या कृती चांगल्या वाटत होत्या, त्यात आता वैगुण्य दिसू लागते. मग क्षुल्लक गोष्टींवरून राग येऊ लागतो. हा राग आवरायला शिका. ज्या गोष्टीचा राग येईल, ती तर आपला जोडीदार पूर्वीही करीत होता, ते आठवा. तेव्हा आपल्याला राग येत नव्हता. मग आता का राग येऊ द्यायचा? हा प्रश्‍न स्वतःला विचारून राग आवरा. म्हणजे भांडणाचा प्रसंग येणार नाही. परस्पर संबंध बिघडणार नाहीत.

बाहेर जेवा
रोज एकाच चवीचं जेवण कधी कधी नको वाटतं. तेव्हा वेगळी चव असलेले पदार्थ खावेसे वाटणं, अगदी स्वाभाविक आहे. त्यासाठी हॉटेलात जाणे आलेच. तेव्हा आपल्या व्यस्त जीवनशैलीतून, शक्य असल्यास आठवड्याला किंवा किमान महिन्यातून एकदा तरी, वेळ काढून बाहेर जेवायला जा. मुलांना तर हॉटेलात जाऊन खादडण्याची भारीच हौस असते. तेव्हा त्यांनाही घेऊन जा. सुट्टीच्या दिवशीची ही खादाडी जिभेचे चोचले पुरवील. अन् कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणील. वेगळ्या वातावरणात, वेगळे पदार्थ खाण्याचा आनंद काही औरच असतो. हा आनंद आपल्यापैकी बरीच जण घेत असतीलच. जे घेत नसतील, त्यांच्यासाठी हा प्रेमाचा सल्ला आहे.

मेसेज पाठवा
सकाळी ऑफिसच्या गडबडीत, ट्रेन-बस पकडण्याच्या चढाओढीत, ऑफिसची वेळ गाठण्याच्या धडपडीत जोडीदाराचा व्यवस्थित निरोप घेतला जात नाही. त्यावरून एकमेकांना चुटपुट लागू शकते. पण त्याची खंत बाळगू नका. ऑफिसात स्थिरस्थावर झाल्यावर एक छोटासा मेसेज मोबाईलवरून पाठवा. बोलायचं काही राहिलं असेल तर ते लिहून पाठवा किंवा नुसतंच हाय, अथवा गुड मॉर्निंग म्हटलंत तरी तो वाचणार्‍याला समाधान देईल. जोडीदाराला आपली आठवण आहे, या जाणिवेने तो सुखावेल.

हात मिळवा
घरात संधी मिळेल, तेव्हा जोडीदाराच्या हातात हात गुंफा. टी.व्ही. बघताना, ती स्वयंपाकघरात काम करत असताना, किंवा कारमधून प्रवास करताना अगदी सहजच हातात हात मिळवा. सुरुवातीच्या दिवसात एकमेकांचे हात हाती घेताना अंगावर रोमांच फुलत असत. ते दिवस पुन्हा आठवा. पुन्हा रोमांच फुलतील. अन् प्रेम घट्ट होईल. हस्तस्पर्शाची जादू अनुभवा. पुन्हा रोमँटिक व्हा अन् नाती घट्ट बनवा.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

व्यंग्य- संबोधन सूचक नया शब्द…  (Satire- Sambodhan Suchak Naya Shabd…)

“अंकल, अपना बैग हटा लीजिए, मुझे बैठना है.”जनाब अंकल शब्द के महात्म से परिचित नहीं…

May 21, 2024

कतरिना कैफ गरोदर ?विकी कौशलसोबतच्या त्या व्हिडिओमुळे रंगल्या चर्चा  (Katrina Kaif Is Pregnant, Her Viral Video From London With Vicky Kaushal Sparks Pregnancy Rumours)

बॉलिवूडच्या प्रेमळ जोडप्यांपैकी एक असलेल्या विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाला तिसरे वर्ष पूर्ण…

May 21, 2024
© Merisaheli