Marathi

महाशिवरात्र स्पेशल : अभूतपूर्व केदारनाथ (Mahashivratra Special: Phenomenal Kedarnath)


सन 2013 मध्ये केदारनाथकडे ढगफुटीने आलेला प्रलय सगळ्यांनी बघितला असलेच. ह्या काळात इकडे सरासरी पेक्षा 375% जास्त पाऊस झाला. त्यानंतर आलेल्या प्रलयात सगळंच्या सगळं वाहून गेलं. पण ह्या प्रचंड अशा प्रलयातसुद्धा केदारनाथ मंदिराच्या पूर्ण रचनेला जरासुद्धा धक्का लागला नाही हे विशेष. ही श्रद्धा म्हणावी की…?


केदारनाथ मंदिर कोणी निर्माण केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्यांपर्यंत. पण आपल्याला त्यात जायचं नाही. केदारनाथ मंदिर हे साधारण 8 व्या शतकात बांधलं गेलं असावं, असं आजचं विज्ञान सांगतं. म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीतकमी 1200 वर्षांपासून अस्तित्वात आहे.

अभ्यासपूर्ण कलाकृती
केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग आज 21 व्या शतकातही अत्यंत प्रतिकूल असा आहे. एका बाजूला 22,000 फूट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसर्‍या बाजूला 21,600 फूट उंचीचा करचकुंड आणि तिसर्‍या बाजूला 22,700 फुटाचा भरतकुंड. अशा तीन पर्वतांतून वाहणार्‍या 5 नद्या म्हणजे मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी. ह्यातील फक्त मंदाकिनी नदीचं ह्या क्षेत्रात राज्य आहे . थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगानं वाहणारं पाणी. अशा प्रचंड प्रतिकूल असणार्‍या जागेत एक कलाकृती साकारायची म्हणजे किती खोलवर अभ्यास केला गेला असेल.
केदारनाथ मंदिर ज्या ठिकाणी आज उभं आहे तेथेे आजही आपण वाहनानं जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी त्याचं निर्माण कां केलं गेलं असावं? त्याशिवाय 100-200 नाही तर तब्बल 1000 वर्षापेक्षा जास्ती काळ इतक्या प्रतिकूल परिस्थितीत मंदिर कसं उभं राहीलं असेल? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पृथ्वीवर हे मंदिर साधारण 10 व्या शतकात होतं तर पृथ्वीवरच्या एका छोट्या आईस-एज कालखंडाला हे मंदिर नक्कीच सामोरं गेलं असेल, असा वैज्ञानिकांनी अंदाज बांधला. साधारण 1300 ते 1700 ह्या काळात पृथ्वीवर प्रचंड हिमवृष्टी झाली होती. त्यावेळेस हे मंदिर ज्या ठिकाणी आहे, तिथे देखील नक्कीच हे मंदिर बर्फात पूर्णतः गाडलं गेलं असावं व त्याची शहानिशा करण्यासाठी वाडिया इंस्टीट्युट ऑफ जीओलॉजी डेहराडूनने केदारनाथ मंदिराच्या दगडांवर लिग्नोम्याटीक डेटिंग ही टेस्ट केली. लिग्नोम्याटीक डेटिंग टेस्ट ही दगडांचं आयुष्य ओळखण्यासाठी केली जाते. ह्या टेस्टमध्ये असं स्पष्ट दिसून आलं की साधारण 14 व्या शतकापासून ते 17 व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे मंदिर पूर्णतः बर्फात गाडलं गेलं होतं. तरीसुद्धा कोणतीही इजा मंदिराच्या बांधकामाला झालेली नाही.

प्रचंड प्रलयातही दिमाखात उभं
सन 2013 मध्ये केदारनाथकडे ढगफुटीने आलेला प्रलय सगळ्यांनी बघितला असेलच. ह्या काळात इकडे सरासरी पेक्षा 375% जास्त पाऊस झाला. त्यानंतर आलेल्या प्रलयात तब्बल 5748 लोकांचा जीव गेला (सरकारी आकडे). 4200 गावाचं नुकसान झालं. तब्बल 1 लाख 10 हजारपेक्षा जास्त लोकांना भारतीय वायुसेनेने एअरलिफ्ट केलं. सगळच्या सगळं वाहून गेलं. पण ह्या प्रचंड अशा प्रलयातसुद्धा केदारनाथ मंदिराच्या पूर्ण रचनेला जरासुद्धा धक्का लागला नाही हे विशेष.
अर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांच्या मते ह्या प्रलयानंतरसुद्धा मंदिराच्या पूर्ण स्ट्रक्चरच्या ऑडिट मध्ये 100 पेकी 99 टक्के मंदिर पूर्णतः सुरक्षित आहे. आयआयटी मद्रास ने मंदिरावर एनडीटी टेस्टिंग करून बांधकामाला 2013 च्या प्रलयात किती नुकसान झालं आणि त्याची सद्यस्थिती ह्याचा अभ्यास केला. त्यांनी पण हे मंदिर पूर्णतः सुरक्षित आणि मजबूत असल्याचा निर्वाळा दिला आहे. दोन वेगळ्या संस्थांनी अतिशय शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या चाचण्यांत मंदिर पास नाही तर सर्वोत्तम असल्याचे निर्वाळे आपल्याला काय सांगतात? तर तब्बल 1200 वर्षानंतर जिकडे त्या भागातलं सगळं वाहून जातं, एकही वास्तू उभी राहत नाही. तिकडे हे मंदिर दिमाखात उभं आहे आणि नुसतं उभं नाही तर अगदी मजबूत आहे. ह्या पाठीमागे श्रद्धा मानली तरी ज्या पद्धतीने हे मंदिर बांधलं गेलं आहे. ज्या जागेची निवड केली गेली आहे. ज्या पद्धतीचे दगड आणि संरचना हे मंदिर उभारताना वापरली गेली आहे, त्यामुळेच हे मंदिर ह्या प्रलयात अगदी दिमाखात उभं राहू शकलं असं आजचं विज्ञान सांगतं आहे.

मंदिराची अभेद्य संरचना
हे मंदिर उभारताना उत्तर-दक्षिण असं बांधलं गेलं आहे. भारतातील जवळपास सगळीच मंदिरं ही पूर्व-पश्चिम अशी असताना केदारनाथ दक्षिणोत्तर बांधलं गेलं आहे. याबाबत जाणकारांच्या मते जर हे मंदिर पूर्व-पश्चिम असं असतं, तर ते आधीच नष्ट झालं असतं. किंवा निदान 2013 च्या प्रलयात तर नक्कीच नष्ट झालं असतं. पण ह्याच्या दिशेमुळे केदारनाथ मंदिर वाचलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात जो दगड वापरला गेला आहे तो प्रचंड कठीण आणि टिकाऊ असा आहे. अन् विशेष म्हणजे जो दगड या मंदिराच्या बांधकामासाठी वापरला गेला आहे तो दगड तिकडे उपलब्ध होत नाही. मग फक्त कल्पना करा की ते दगड तिथपर्यंत कसे वाहून नेले असतील? एवढे मोठे दगड वाहून न्यायला (ट्रांसपोर्ट करायला) त्याकाळी एवढी साधनंसुद्धा उपलब्ध नव्हती. या दगडाची विशेषता अशी आहे की वातावरणातील फरक तसेच तब्बल 400 वर्षं बर्फाखाली राहिल्यावर पण त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये फरक झालेला नाही. त्यामुळे मंदिर निसर्गाच्या अगदी टोकाच्या कालचक्रातही आपली मजबुती टिकवून आहे. मंदिरातील हे मजबूत दगड कोणतंही सिमेंट न वापरता एशलर पद्धतीने एकमेकात गोवले आहेत. त्यामुळे तापमानातील बदलांचा कोणताही परिणाम दगडाच्या जॉइंटवर न होता मंदिराची मजबुती अभेद्य आहे. 2013 च्या वेळी एक मोठा दगड, विटा घळई मधून मंदिराच्या मागच्या बाजूला अडकल्याने पाण्याची धार ही विभागली गेली आणि मंदिराच्या दोन्ही बाजूने पाण्याने सर्व काही आपल्यासोबत वाहून नेलं; पण मंदिर आणि मंदिरात शरण आलेले लोक सुरक्षित राहिले. ज्यांना दुसर्‍या दिवशी भारतीय वायूदलाने एअरलिफ्ट केलं होतं.

1200 वर्ष आपली संस्कृती, मजबुती टिकवून ठेवणारं मंदिर
श्रद्धेवर विश्वास ठेवावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तब्बल 1200 वर्ष आपली संस्कृती, मजबुती टिकवून ठेवणारं मंदिर उभारण्यामागे अगदी जागेची निवड करण्यापासून ते त्याची दिशा, त्याच बांधकामाचं साहित्य आणि अगदी निसर्गाचा पुरेपूर विचार केला गेला ह्यात शंका नाही. टायटॅनिक जहाज बुडाल्यावर पाश्चिमात्य देशांना एनडीटी टेस्टिंग आणि तपमान कसं सगळ्यावर पाणी फिरवू शकतं हे समजलं. पण आमच्याकडे तर त्याचा विचार 1200 वर्षापूर्वी केला गेला होता. केदारनाथ त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. काही महिने पावसात, काही महिने बर्फात, तर काही वर्षं बर्फाच्या आतमध्ये राहून सुद्धा ऊन, वारा, पाऊस ह्यांना पुरून उरत समुद्रसपाटी पासून 3969 मीटरवर 85 फूट उंच, 187 फूट लांब, 80 मीटर रुंद मंदिर उभारताना त्याला तब्बल 12 फुटाची जाड भिंत आणि 6 फुटाच्या उंच प्लॅटफॉर्मची मजबुती देताना किती प्रचंड विज्ञान वापरलं असेल, ह्याचा विचार जरी केला तरी आपण स्तिमित होतोय.
आज सगळ्या प्रलयानंतर पुन्हा एकदा त्याच भव्यतेने 12 ज्योतिर्लिंगापैकी सगळ्यात उंचीवरचं असा मान मिळवणार्‍या केदारनाथच्या वैज्ञानिकांच्या बांधणीपुढे आपण नतमस्तक होतो.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

आमिरने वयाच्या ४४व्या वर्षी साकारला १८ वर्षांचा रँचो, लोक हसतील अशी होती भिती (Aamir Khan Almost Refused Rajkumar Hirani’s 3 Idiots At Age 44 But Ended Up Doing It Because…)

आमिर खानने थ्री इडियट्‌स या चित्रपटामध्ये १८ वर्षाच्या कॉलेज तरुणाची रँचोची भूमिका साकारली होती. ही…

April 29, 2024

रामायणापूर्वी बी ग्रेड सिनेमात काम करत होत्या दीपिका चिखलिया, प्रेक्षकांमध्ये उमटलेले नाराजीचे सूर (Deepika Chikhalia Act In B grade Movie )

दीपिका चिखलियाचा जन्म २९ एप्रिल १९६५ रोजी मुंबईत झाला. अभिनेत्रीची कारकीर्द खूपच अनोखी ठरली आहे,…

April 29, 2024

फारच फिल्मी आहे महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांची लव्हस्टोरी, आई सिनेमाच्या सेटवर झालेली ओळख (Mahesh Manjrekar And Medha Manjrekar Mate On Aai Movie Set, Know Their Filmy Lovestory)

मेधा मांजरेकर यांच्याशी महेश यांनी दुसरे लग्न केले होते. एका सिनेमाच्या सेटवर त्यांनी मेधा यांना…

April 29, 2024
© Merisaheli