Marathi

अफलातून फंडे (Short Story: Afahlatun Fhande)


काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असल्यामुळे संसार, एकुलत्या एक मुलीचं संगोपन, आला-गेला सगळं सांभाळून बँकेत वरवर चढत होती. मात्र या कसरतीत स्वतःच्या कितीतरी आवडी-निवडी बाजूला ठेवायला लागल्या होत्या, एवढंच काय ते तिला वाईट वाटत होतं.


  • डोळे मिटून शांतपणे सुमन ट्रेनमध्ये बसली होती. खरं तर आज खूप दिवसांनी… दिवसांनी कसलं जवळजवळ पाच वर्षांनी! कारण बँकेमधून रिटायर्ड झाली आणि मग तिचा लोकलशी संबंधच संपला. रोज कर्जत ते व्ही.टी. असा प्रवास असायचा तिचा! खूप धावपळ व्हायची; पण काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असल्यामुळे संसार, एकुलत्या एक मुलीचं संगोपन, आला-गेला सगळं सांभाळून बँकेत वरवर चढत होती. मात्र या कसरतीत स्वतःच्या कितीतरी आवडी-निवडी बाजूला ठेवायला लागल्या होत्या, एवढंच काय ते तिला वाईट वाटत होतं. म्हणूनच मनाशी पक्का निश्‍चय केला होता की, या आवडी-निवडी रिटायर्ड झाल्यावर जोपासेन, पूर्ण करेन.
    आणि आता जावई आला होता. नात झाली होती. त्यामुळे नवर्‍याला म्हणजे, शेखरला ती म्हणाली, “आता मात्र मी माझ्या राहिलेल्या हौशी पूर्ण करणार आहे. त्यातली पहिली हौस म्हणजे गाणं. मी गाणं शिकणार आहे. नंतर मैत्रिणींसोबत पिकनिकला जाणार!”
    “अरे वा! अगदी खुशाल तुला हवं ते कर!” शेखर उत्साहाने म्हणाला. तसं त्याला चिडवण्यासाठी ती म्हणाली,
    “हो, पण मी नसताना घर तुम्हाला सांभाळायला लागेल. तुमची ट्रेकिंगची आवड जरा बाजूला ठेवायला लागेल.”
    तेव्हा मात्र घुटमळत तो म्हणाला, “ते मात्र कठीण आहे. अन् मग काहीबाही सांगत बसला.”
    त्याचा तो उडालेला गोंधळ बघून ती म्हणाली, “अहो, इतके घाबरू नका! तुम्हाला नाही डांबून ठेवणार घरात!”
    ते ऐकून त्याचा चेहरा पुन्हा फुलला आणि तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला, “थँक्स! ट्रेकिंग माझा श्‍वास आहे. ध्यास आहे.”
    त्याच गाण्याच्या क्लासची चौकशी करायला आज ती कर्जतहून अंबरनाथला निघाली होती. कुणीतरी तिला वर्तकबाईंचं नाव सुचवलं होतं. खूप छान शिकवतात,
    असं कळलं होतं. म्हणून तर तिला उत्साहाने कधी एकदा त्या बाईंना भेटतोय, असं झालं होतं.
    तेवढ्यात स्टेशन आलं. वर्तकबाईंना भेटली आणि त्यांनीही तिच्या उत्साहाचं कौतुक केलं. आणि मग लगेच पुढच्या आठवड्यात गाण्याचा क्लास सुरू झाला. बाईंच्या शिकवण्याने आणि आवाजाने ती अगदी तृप्त झाली, तर बाईंनासुद्धा हिचा आवाज आवडला होता. त्या म्हणायच्या, “कायम रियाझ सुरू ठेव. म्हणजे आवाजाचा पोत सुधारेल.”
    अन् मग बघता बघता सहा महिने गेले. खूप खूष झाली. उत्साहाने क्लासमधल्या गमतीजमती नवर्‍याला सांगत होती. कधी तरी फोनवरून मुलीला, मंजूलाही सांगत होती, गाण्याच्या क्लासला किती मजा येते ते! पण बहुधा हा आनंद तिला पूर्णपणे मिळावा अशी देवाची इच्छा नसावी. सुरुवातच अशी झाली की, तिला नकार देणंच शक्य नव्हतं.
    मंजू अंधेरीला राहत होती. तिचे सासू-सासरे तिच्याच सोबत राहत होते. त्यामुळे नातीला, शुभ्राला सांभाळायला ते होतेच. बाईच्या मदतीने ते तिला सांभाळत होते. त्यामुळे मंजू आणि तिचा नवरा निवांतपणे जॉब करू शकत होते. पण या वेळी जरा गंमतच झाली. कधीही कुठेही न जाणारे मंजूचे सासू-सासरे यात्रेला गेले होते, तेही मंजूच्याच आग्रहावरून! पण नेमके ते जायला आणि शुभ्रा आजारी पडायला एक गाठ पडली. त्यात भरीत भर म्हणून तिला सांभाळणारी बाईही स्वाइन फ्लूने आजारी पडली.
    आता झाली ना पंचाईत? काय करावं बरं?
    नेहमीप्रमाणे मंजूने आपली ही अडचण आईला फोन
    करून सांगितली आणि म्हणाली, “आई, प्लीज तू
    येऊन राहा ना आमच्याकडे! नेमकं इयर एंडिंग आहे, त्यामुळे मलाही सुट्टी मिळणार नाही.”
    त्यावर नकार देणं तिला शक्यच नव्हतं. शेवटी कर्तव्य, प्रेम वरचढ ठरलं आणि ती मंजूकडे राहायला गेली. सूर मात्र पाठलाग करत होतेच. पुढे पंधरा दिवसांनी नात बरी झाली. लेकीचे सासू-सासरेही आले आणि हिचा क्लास पुन्हा सुरू झाला. दोन महिने सरळ गेले आणि अचानक एके दिवशी धाकट्या नंदेचा फोन आला. ती रडत रडतच म्हणाली, “वहिनी, यांची तब्येत हल्ली सारखी बिघडते. कितीतरी औषधं आणि डॉक्टर झाले; पण काही गुणच येत नाही. तेव्हा आता डॉक्टर म्हणताहेत की, तुम्ही मुंबईला जा. सर्व टेस्ट इथे होणं शक्य नाही आणि टेस्टशिवाय आजाराचा छडा लागणार नाही. येऊ का आम्ही?”
    पुन्हा तेच झालं. कर्तव्य श्रेष्ठ ठरलं आणि मग नणंद आणि तिचा नवरा आला. आणि मग ‘सा’ खूप लांब गेला. त्यानंतर तिने जेव्हा पुन्हा गाण्याचे क्लास सुरू केले, तेव्हा बाई रागावल्या, म्हणाल्या, “अहो, असा
    खंड पडला तर काय उपयोग? की तुम्ही टाइमपास
    म्हणून येताय?”
    हे ऐकून तिला इतकं अपमानास्पद वाटलं, डोळे भरून आले. बाईंना फक्त ‘सॉरी’ एवढंच म्हणाली ती. अन् पुढचे पंधरा दिवस क्लासला वेळेच्या आधी तर गेलीच; पण नंतरसुद्धा तासभर बसून सराव करू लागली. त्यामुळे बाईंचा राग कमी झाला आणि पुन्हा एकदा त्या हिच्यावर खूश झाल्या.
    अशाच एका सकाळी चहा पिता पिता ती नवर्‍यासोबत गप्पा मारत होती आणि फोन वाजला. जरा वैतागूनच तिने फोन उचलला. फोन धाकट्या दिरांचा होता. म्हणाले, “वहिनी, आई थोडी आजारी आहे. तिने तुझ्याकडे येण्याचाच ध्यास घेतलाय. म्हणते की, तूच तिची नीट काळजी घेशील.
    आणू का?”
    नाही म्हणणंच शक्य नव्हतं. पुन्हा एकदा सुरांची आळवणी मागे पडली. घर येणार्‍या-जाणार्‍यांनी गजबजून गेलं. नुसतं चहा करण्याचं कामही तिला दिवसभर पुरत होतं. प्रत्येक जण तिचं कौतुक करत होतं. कर्तव्य श्रेष्ठ ठरलं, तरी या वेळी ती मनातून नाराजच होती. तरीही मनापासून सासूबाईंची सेवा करत होती. देवालाच तिची दया आली की काय; पण तीन महिन्यांमध्येच तिच्या सासूबाई गेल्या.
    तिची हल्ली चाललेली शारीरिक आणि मानसिक ओढाताण शेखरच्या नजरेतून सुटली नव्हती. म्हणूनच तो न
    बोलून तिला साथ देत होता. बाबांचं सगळं करण्यासाठी त्याने सध्या ट्रेकिंग बाजूला ठेवलं होतं. पण नियतीच्या मनात काय आहे कुणाला माहीत? पत्नी गेल्याच्या धक्क्यातून बाबा बाहेरच आले नाही. पुढे तीन महिन्यांमध्येच तेही गेले. दिवस कार्य पार पडली आणि आलेले नातेवाईकही गेले.
    पण ही मात्र आता खूप थकली होती. शारीरिक विश्रांतीची गरज होती तिला. तरीही काहीतरी शिकण्याची ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणूनच तिच्या मनात विचार आला की, गाणं तर लांब गेलं; पण निदान छान छान रांगोळ्या काढायला शिकवतात त्या संस्कारभारतीत नाव घालायला काय हरकत आहे? ते तर नक्कीच शिकता येईल. हा विचार तिने नवर्‍याकडे बोलून दाखवला. त्याने प्रोत्साहन तर दिलंच, सोबत थोडा भावुक होत म्हणाला, “सॉरी, आईबाबा, भावोजी आजारी पडल्यामुळे तुझी गाण्याची हौस तुला पूर्ण करता आली नाही. पण मला तुझं खूप कौतुक वाटतं की, त्रागा न करता तू हे सर्व मनापासून केलंस.”
    “अहो, पण त्यात तुमचा काय दोष? माझ्यावर त्यांचं प्रेम होतं. हक्क वाटत होता, म्हणून तर आले ना? शिवाय तोंडावर कुणी बोलून नाही दाखवत तरी आशीर्वाद, सदिच्छा मिळतातच ना! असू देत. त्यात काय, गाणं नाही तर रांगोळी शिकेन.” ती म्हणाली
    रांगोळी क्लासच्या चौकशीसाठी ती पुन्हा एकदा ट्रेनमध्ये बसली होती. एकटीच प्रवास करत असल्यामुळे डोळे मिटून शांतपणे बसली होती. थोड्या वेळाने कुणीतरी कुजबुजतंय असा तिला भास झाला. तिने डोळे किलकिले करून पाहिलं तर, चाळिशीतल्या दोघी आपापसात हसत बोलत होत्या.
    पहिली दुसरीला म्हणत होती, “बापरे! शोभा एवढी हुशार असेल, असं वाटलं नव्हतं. काय फंडा सांगितला तिने ना! मानलं बुवा!”
    “नाहीतर काय!” दुसरी म्हणाली, “तिचंच ऐकून मीही अंथरुणाला खिळलेल्या सासूबाईंना आणून ठेवलंय आणि सेवा करायला बाईसुद्धा ठेवली आहे. कालच सासर्‍यांना पडक्या आवाजात आवंढे गिळत सांगितलं की, नाना, मला सांगायलाही अपराधी वाटतंय; पण मनात असलं तरी सासूबाईंची सेवा करायला मला रजा मिळणार
    नाही आणि डोळे पुसले. झालं. अ‍ॅक्टिंग कामी आली.
    ते म्हणाले, अगं सूनबाई, कशाला वाईट वाटून घेतेस तू. तुझीही ओढाताण होतेच ना! मी दिलेले तुटपुंजे पेन्शनचे पैसे काय पुरणार. एवढं करतेस हेच खूप आहे. नाहीतर आजकालच्या सुना, एवढंही प्रेमाने करत नाहीत. त्या
    अप्पाची सून बघितली ना, कशी वागते ते! आणि मग आलेल्या गेलेल्यांना माझं कौतुक सांगतात आणि शिवाय लेकाला, म्हणजे अनिललाही म्हणतात, नशीबवान आहेस, अशी बायको मिळाली तुला. हे सगळं ऐकून काय वाटतं माहितीये, त्या शोभाला काहीतरी बक्षीस द्यावं. तिच्यामुळे हा मोठेपणा जमतोय.”
    त्यावर दुसरी हसत म्हणाली, “अगदी खरंय तुझं. मलाही मोठेपणा, चांगुलपणा मिळवायची संधी मिळालीय. सासूबाई आल्या की, त्यांच्या नातेवाइकांना फोन लावते आणि त्यांच्यादेखत आई, तुमचे पाय चेपू का? डोक्याला मालीश करू का? असं विचारते. मग त्या उसळून म्हणतात, बघ, तू एवढी शहरातली, नोकरी करणारी, तरी माझ्याशी प्रेमाने वागतेस अन् ती उषा! एवढी एकत्र राहते; पण काडीचंही प्रेम नाही तिच्या मनात! मला कशाला हात लावू देत नाहीस. अगं, खरं तर तिचा हेतू चांगला आहे की, सासूबाईंना विश्रांती मिळावी; पण तिला ते यांना बोलूनच दाखवता येत नाही. उलट माझ्याकडे आल्यावर मी गोड गोड बोलून त्यांच्याकडून हवं तेवढं काम करून घेते. त्या आल्या की, मुद्दामहून पोळीवाल्या बाईला म्हणते, आता जाऊन तुझ्या सासूबाईंना बघून यायचंय तर ये हो. नाहीतरी साहेबांना आणि मुलांना या आल्या की यांच्याच हातच्या पोळ्या लागतात. अन् मग पोळी, पुरणपोळी, गूळपोळी, मोदक, उकडीच्या करंज्या सगळे पदार्थ करून घेते.”
    “अगं पण, त्यांच्या किंवा तुझ्या नवर्‍याच्या लक्षात येत नाही, तू गोड बोलून काम करून घेतेस ते,” दुसरीने विचारलं.
    “कसं येणार? मुद्दामहून त्यांच्यादेखत आईला फोन करून सांगते की, आज पुरणपोळीचा बेत होता आणि सासूबाईंनी केलेल्या पुरणपोळ्या तुझ्याहून खमंग आणि छान मऊसूत झाल्या होत्या. ते ऐकून आनंदाने, अगदी कौतुकाने त्या माझ्याकडे बघतात. जिंकल्याचा भाव चेहर्‍यावर उमटतो त्यांच्या. अन् मनात मी म्हणते, म्हातारीला कसं फसवलं!”
    “अगं पण तुझी आई रागवत नाही?” दुसरीने शंका उपस्थित केली.
    तशी ही म्हणाली, “अगं, आईला मी आधीच सांगून ठेवलं आहे की, सासूबाई आल्या की मी काय काय डायलॉग मारणार ते!”
    “वा! म्हणजे थोडक्यात शोभाची शिकवणी आपल्याला उपयोगी पडतेय.” असं म्हणून फसकन हसल्या आणि तेवढ्यात त्यांचं स्टेशन आलं, म्हणून उतरल्या.
    हे सर्व ऐकणारी सुमन मात्र पार चक्रावली. मनाशीच म्हणाली, खरंच मी किती बावळट आहे. माझ्याजागी या असत्या तर गाणं सोडलं नसतं. धोरणीपणात, हुशारीत ही पिढी पुढे
    आहे. आता विद्याला फोन करून सांगते, म्हणजे तिच्या स्टाईलमध्ये म्हणेल,
    ‘शी! आऽऽपऽऽण किऽऽती मूऽऽर्ख ना!’
    खरंच! आज काहीतरी नवीन शिकल्यासारखं वाटतंय. अर्थात प्रत्यक्षात अंमलात आणता येईल की नाही, देव जाणे! अन् हे जेव्हा मी यांना सांगेन, तेव्हा हे नुसतेच मिश्कील हसतील.
    एवढ्यात तिचं स्टेशन आलं आणि ती क्लासच्या दिशेने चालू लागली. मात्र डोक्यात त्या मुलींचे ते भन्नाट फंडे रुंजी घालत होते. रांगोळी शिकण्याआधीच विचारांची रांगोळी चालू झाली होती.
  • ज्योती आठल्ये
shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

ग़ज़ल- तुम्हारे प्यार के होने की कहानी… (Poem- Tumhare Pyar Ke Hone Ki Kahani…)

ये धड़कनें भी अजीब हैंकभी-कभी बेवजह धड़कती हैंसांस लेने के लिएदिल पूछता हैजब तुम नहीं…

November 19, 2024

कहानी- मां की सीख (Short Story- Maa Ki Seekh)

राजेश मां की बातें सुन कर आश्चर्य एवं आक्रोश से कह उठा, "मां, कई वर्षो…

November 19, 2024

लेक आणि जावयाच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्ताने परिणीताची आई रीना चोप्रा यांनी भेट केलं स्वतः रेखाटलेलं सुंदर चित्र (Parineeti Chopra And Raghav Get Special Anniversary Gift From Her Mom Reena, And It’s ‘Hand-Painted’)

अभिनेत्री परिणीती चोप्राचं गेल्यावर्षी २४ सप्टेंबरला आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर लग्न झालं.…

November 19, 2024

असित मोदीसोबतच्या भांडणांच्या चर्चांवर जेठालालने सोडलं मौन(Jethalal Dilip Joshi Holds Producer Asit Modi’s Collar In Massive Fight, Threatened Producer To Leave The Show, Now Jethalal Reveals The Truth)

टेलिव्हिजनचा सर्वात लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा बऱ्याच काळापासून सर्वांचा आवडता शो…

November 19, 2024
© Merisaheli