Marathi

अक्षम्य (Short Story: Ashamya)

अर्चना पाटील


मी केला तो व्यभिचार, तर मग अर्जुनने नवरा म्हणून ज्या गोष्टी केल्या, त्या बरोबर होत्या का? जेव्हा माणसाच्या गरजा पूर्ण होत नाहीत, तेव्हाच तो चुकीचा रस्ता स्वीकारतो. मग शिक्षा चुकीचा रस्ता वापरणार्‍या व्यक्तीला देताना, त्याला तसं करण्यास भाग पाडणार्‍या व्यक्तीलाही द्यायला हवी…


“मिस निधी दीक्षित, आता तरी तुमचा गुन्हा कबूल करा. सर्व पुरावे तुमच्याविरुद्ध आहेत.” न्यायाधीश कडक शब्दात बोलत होते.
“मी कोणाचाही खून केलेला नाही, एवढंच मला माहीत आहे. मी श्रीयुत दीक्षितांना मारलं नसतं, तर
त्यांनी मला मारलं असतं. मी जे काही केलं, ते स्वसंरक्षणासाठी केलंय.”
“कशी मान वर करून बोलते बघा. माझ्या निष्पाप मुलाचा जीव घेतला आहे या बाईने. स्वतः आयुष्यभर लफडी केली आणि शिक्षा माझ्या मुलाला मिळाली.
हिला फाशीचीच शिक्षा सुनवा न्यायाधीश साहेब, जेणेकरून पुन्हा कोणतीही विवाहित स्त्री व्यभिचार करण्यास धजावणार नाही.”
“मी केला तो व्यभिचार, तर मग जेवणाच्या वेळी तो सोबत असावा म्हणून तडफडणारं माझं मन, कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात त्याचं माझ्यासोबत नसणं, रात्रीअपरात्री मला डावलून फोनवर चिकटणं, सतत व्हॉट्सअ‍ॅप-फेसबुक आणि ते संपलं की मी, कधी माझ्यासोबत शॉपिंग नाही की, माझ्या मुलासोबत खेळणं नाही, किराणा-भाजीपाला काय असतं हे तर माहीतच नाही… नवरा म्हणून या गोष्टी बरोबर होत्या का? वैवाहिक सुख देत नाही, म्हणून कायद्यात कोणती शिक्षा आहे, ते पण सांगा. माझ्या आयुष्यात जर केवळ अर्जुन राहिला असता, तर मी आयुष्यभर केवळ वाटच पाहत राहिले असते त्याची प्रत्येक क्षणासाठी… आणि तितका संयम माझ्याजवळ नाही. जेव्हा माणसाच्या गरजा पूर्ण होत नाहीत, तेव्हाच तो चुकीचा रस्ता स्वीकारतो. मग शिक्षा चुकीचा रस्ता वापरणार्‍या व्यक्तीला देताना, त्याला तसं करण्यास भाग पाडणार्‍या व्यक्तीलाही द्यायला हवी.”


“शांत व्हा तुम्ही. मला माझं काम करू द्या.” न्यायाधीश ओरडले.
आजच्या सर्व वर्तमानपत्रात मिस्टर आणि मिसेस दीक्षित यांचीच बातमी आहे पहिल्या पानावर. मिसेस दीक्षित कोर्टात जे काही बोलतात, ते प्रत्येक वाक्य ब्रेकिंग न्यूज म्हणून येतंय. आधुनिक स्त्री, तिच्या गरजा, स्त्रियांनी बोलावं की नाही, सगळ्या न्यूजरूममध्ये स्त्री मनाचीच चर्चा. नकळतपणे निकाल देताना न्यायाधीशांच्या मनावरही या गोष्टींचा तणाव येतच होता. न्यायाधीशांनी एक महिन्यानंतरची तारीख दिली आणि केस परत लांबली.
निधी आणि अर्जुन एक सुशिक्षित जोडपं. संसाराच्या वेलीवर एक कोवळं फूल म्हणजे, वरुण. सुखाचा संसार. आर्थिकदृष्ट्याही अर्जुनचा सतत निधीला गृहीत धरण्याचा स्वभाव त्या दोघांना कायमचा दूर करून गेला. पहिले आपले मित्र, आपली कामं आणि मग उरला वेळ तर निधी आणि वरुण, असं हे अर्जुनचं वागणं त्याला कायमचं कुटुंबापासून दूर घेऊन गेलं. मुंबईसारख्या शहरात निधीला मन मोकळं करायलाही कोणी सापडत नव्हतं. माहेरी सांगणं म्हणजे, उलट आईचेच टोमणे पुन्हा ऐकणं… असा कसा आहे तुझा नवरा, दिवसातून एक फोनही करत नाही… वगैरे वगैरे.
एक दिवस वरुणसोबत बागेत फिरताना समीरशी तिची टक्कर झाली. त्याचं ते काळं टी-शर्ट, काळी जीन्स, गॉगल आणि चेहर्‍यावरचा रुबाब… सगळंच भावलं निधीला.
“सॉरी, सॉरी चुकून धक्का लागला.”
“इट्स ओके. होतं असं कधी कधी. ही मुलंपण ना… नुसती गरगर फिरवतात बागेत.”
“किती मुलं आहेत तुम्हाला?”
“दोन… आर्या आणि ओम. तुम्हीही रोज येता का बागेत?”
“हो ना, एकच मुलगा आहे मला वरुण. घरी एकटाच बोअर होतो तो, म्हणून यावं लागतं.”
“बरं मग… भेटू पुन्हा.”
दुसर्‍या दिवशी निधी केस मोकळे सोडून, नवा ड्रेस घालूनच बागेत आली. सकाळीच फेशियल करून घेतलं होतं. समीरला इम्प्रेस करायचं होतं तिला. समीर त्याच्या साध्या कपड्यात आला होता. आज थोडा गबाळाच दिसत होता; पण त्याने कालच निधीचं मन जिंकलं होतं. निधी मुद्दाम वरुणला समीर उभा असलेल्या घसरगुंडीजवळ घेऊन गेली.
“आज एकदम खुशीत दिसत आहात मॅडम तुम्ही. फुल मेकअप, नवा ड्रेस… ओहो!”
समीरच्या तोंडातून ही वाक्यं ऐकून निधीला खूपच सुखावल्यासारखं झालं. कधी नव्हे ते कोणी तिचं कौतुक
करत होतं.
“नाही हो, असंच. हे घ्या साबुदाण्याचे वडे. तुमच्या मुलांनाही द्या. माझ्या वरुणलाही खूप आवडतात.”
“वॉव, अप्रतिम. किती कुरकुरीत आहेत. माझी बायको बनवते चतुर्थीला; पण एकदम तेलकट बनवते हो. भज्याही तशाच तेलकट. तिला पाठवावं लागेल तुमच्याकडे ट्रेनिंगला.”
“बस हो, किती कौतुक कराल. घरी चलता का? निवांत बोलता येईल.”
“उद्या दुपारी येतो ना. चालेल का?”
“हो, चालेल की. माझे मिस्टर कंपनीच्या कामानिमित्त बाहेर गेले आहेत आणि वरुणही बारा ते पाच शाळेत असतो.”
“बरं, फोन करतो मी. फोन नंबर द्या.”
निधी रात्रभर बेचैन होत होती. समीर घरी आल्यावर नेमकं काय होईल, तिला समजत नव्हतं. दुसर्‍या दिवशी दुपारी बरोबर बाराला बेल वाजली.
“वेळेवर आहे ना मी. सवय आहे मला वेळेवर येण्याची.”
“या ना, आत या. बसा. काम काय करता तुम्ही?”
“हे विचारायला बोलावलं का घरी, तुझ्यासारख्या सौंदर्यसम्राज्ञीने?” असं बोलत असतानाच समीर कधी तिच्याजवळ आला आणि त्याने मर्यादा ओलांडली, हे निधीलाही समजलं नाही.
थोड्या वेळाने समीर निघून गेला. पण तो जितका वेळ घरात होता, निधीला आनंद देऊन गेला. हे नातं असंच सुरू राहिलं. निधीचा एकांत आणि समीरची निधीकडे असलेली ओढ, या दोन्ही गोष्टी जुळून आल्या. समीर आयुष्यात आल्यामुळे निधीचा आत्मविश्‍वास वाढला. निधी स्वतःकडे अधिक लक्ष देऊ लागली. अशीच लपत छपत समीर आणि निधीची दोन
वर्षं मजेत निघाली.
एके दिवशी दुपारी समीर नेहमीप्रमाणे निधीच्या घरी आलेला होता. अर्जुन बिझनेस टूरसाठी केरळला गेला होता आणि वरुण शाळेत.
“समीर, असा कसा तू अचानक माझ्या आयुष्यात आलास? पण आता, यापुढे तुझं आणि माझं नातं हे आयुष्यभर असंच, अक्षय राहावं म्हणून मी देवाकडे प्रार्थना करते.”
“चिंता नको करू. हातातल्या ओंजळीतलं पाणी ज्याप्रमाणे आपण टिकवू शकत नाही, त्याचप्रमाणे आयुष्यातील घडामोडीही आपण चालवू शकत नाही. पण एवढं मात्र नक्की, हे भावनांचं दान ज्याला मिळालं त्याच्याइतकं सुखी कोणी नाही. मी एवढा चाळीस वर्षांचा. माझंही लग्न झालं आहे, तरी मी तुझ्यामागे फिरतो. काय असेल असं तुझ्याजवळ?”
“खोटं, मीच तुमच्या गळ्यात पडते आहे, पहिल्या दिवसापासून. म्हणून तर तुम्ही इतक्या लवकर माझ्या बेडरूममध्ये पोहोचलात.”
“पहिल्याच नजरेत ओळखलं होतं मी तुला… काही तरी बिनसलंय. आणि थेट घरीच बोलावलंस तू मला. म्हणूनच माझीही हिंमत वाढली.”


तेवढ्यात दारावरची बेल वाजली.
“पिझ्झा आला वाटतं. मी बघते.”
दरवाजा उघडला, तर अर्जुनच समोर.
“तुम्ही आज कसे आलात? फोनही केला नाही.”
“अगं माझा फोन पाण्यात पडला. कसा फोन करू? हे शूज कोणाचे? कोण आलं आहे?” अर्जुन बोलत बोलतच घरात शिरला तर, समीर त्याला बेडरूममध्ये बेडवरच बसलेला दिसला.
“कोण हा? बेडमध्ये काय करतोय?”
समीर क्षणात शर्ट उचलून घरातून पळाला. निधीला उत्तर सुचत नव्हतं.
“मित्र आहे तो माझा. रोज येतो तो. तुला माझ्यासाठी वेळ नाही, म्हणून भाड्याने लावलाय मी त्याला, माझा टाइमपास करायला.”
अर्जुनने क्षणार्धात निधीच्या कानात लगावली आणि स्वतःची बंदूक काढली. निधीने फ्लॉवरपॉटने ती बंदूक खाली पाडली आणि स्वतः उचलली. पुढच्याच क्षणी निधीने अर्जुनवर गोळ्या झाडल्या. पुढे पोलीस आले.निधीला अटक झाली. केस सुरू झाली आणि केसचा निकाल काय लागेल, याची पांढरपेशा समाज वाट पाहत होता. निधीच्या बाजूने बोलणारं कोणीही नव्हतं. न्यायाधीशांनी एका महिन्यानंतरची तारीख दिली होती. त्या वेळेत समीर निधीला तुरुंगात जाऊन भेटला. समीरला पाहताच निधीने पाठ फिरवली.
“का आलास तू? आता माझ्याजवळ तुला द्यायला काहीच नाही.
“एकच सांगायला आलोय, गुन्हा कबूल करून घे. मी वकील लावलाय तुझ्यासाठी. त्यांनी शब्द दिला आहे, सहानुभूतीने तुला कमी शिक्षा मिळेल. फक्त तू कोर्टात वाद नको घालू. मी आयुष्यभर तुरुंगाबाहेर तुझी वाट पाहतो आहे. आणि तुझ्या शेवटच्या श्‍वासापर्यंत मी तुझ्यासोबत आहे. हिंमत हरू नकोस.”
“वरुणसाठी जीव तुटतोय रे माझा. माझ्यातली आई तडफडते आहे… तो मला कधीच माफ करणार नाही आणि माझ्या डोळ्यांनाही दिसणार नाही आयुष्यात…”
“होईल सगळं ठीक हळूहळू. कारण काहीही असलं तरी निधी तुझ्याकडून मनुष्यवधाचा गुन्हा झाला आहे आणि तो अक्षम्य आहे.”

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

मराठीतील विक्रमी चित्रपट ‘माहेरची साडी’चे निर्माते विजय कोंडके यांचा ३४ वर्षानंतर नवा चित्रपट ‘लेक असावी तर अशी’ (‘Lek Asavi Tar Ashi’ Is New Film Of Producer- Director Vijay Kondke : His Comeback After 34 Years Of Blockbuster Film ‘Maherchi Sadi’)

मोठमोठ्या कलाकारांना एकत्र घेऊन चांगल्या दर्जाचा सिनेमा बनवणं हे निर्माता दिग्दर्शकांसाठी मोठं आव्हान असतं. काही…

April 18, 2024

‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत स्मिता तांबेची वकिलाच्या भूमिकेत एन्ट्री (Actress Smita Tambe Enters As A Lawyer In “Man Dhaga Dhaga Jodte Nava” Serial)

स्टार प्रवाहवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत सार्थक-आनंदीचं नातं अतिशय नाजूक वळणावर आहे. काही…

April 18, 2024

वळवाचा पाऊस (Short Story: Valvacha Pause)

निशा नंदन वर्तक हा अचानक आलेला वळवाचा पाऊस !! अवंतिकेचा उदासपणा कुठच्या कुठे पळून गेला..…

April 18, 2024
© Merisaheli