Marathi

भैरवी (Short Story: Bairavi)

  • अपर्णा देशपांडे
    आजही त्याने तबला जमवला. वादी ठोकून घेतल्या. मोबाईलवर गोहरजानची ठुमरी लावली आणि ताल धरला. वाजवत असताना कुठून तरी विलंबित लयीतला आलाप कानी आला. नकळत त्याचे कान त्या आवाजाकडे लागले. आवाज खूप गोड होता. राग… मारवा. ऐकून कळत होतं की, रियाज जबरदस्त असणार. भारावल्यासारखा तो खिडकीपाशी गेला.

कलकत्ता ते मुंबई असा कंटाळवाणा प्रवास करून निलय थकला होता. बिजूच्या रूमवर जाऊन मस्त आराम करावा, असं त्याला वाटलं; पण निग्रहाने त्याने तो विचार झटकला. आजच विरारमधील सेनगुप्ताने सांगितलेल्या सदनिकेत जाणं आवश्यक होतं. नाहीतर मालक ती सदनिका दुसर्‍या कुणाला भाड्याने देऊन मोकळा होणार होता. त्याला आवडली ती जागा. मुंबईमधील तो विशिष्ट गुदमरवून टाकणारा कोंदटपणा नव्हता इथे. छान मोकळी हवा होती. विशेष म्हणजे, इथून ऑफिस वीसच मिनिटाच्या अंतरावर होतं. फार अपेक्षा ठेवू नयेत, माणूस सुखी राहतो, हे त्याचं आनंदाचं सूत्र होतं, जे इथेही लागू होतंच. मुंबईत मोकळं राहायला मिळतंय, हेच खूप होतं त्याच्यासाठी.
काही दिवसातच तो तिथे रुळला. संध्याकाळी साडेसातपर्यंत तो घरी पोहोचे, तेव्हा येतानाच ‘साई’मधून पोळी-भाजीचं पार्सल आणलं की, जेवण्याची चिंता नसे. आठ वाजेपर्यंत जेवायचं आणि मग मनसोक्त तबला वादन. तबला, त्याचा श्‍वास! मुंबईला बदली झाल्याचं कळलं तेव्हाच त्याने बिजूमार्फत तबला-डग्गा पुढे पाठवून दिला होता. ‘कला परम साधन, त्या विना व्यर्थ जीवन’ यावर त्याचा ठाम विश्‍वास होता. त्याला कलकत्ता हे कलेशी बांधीलकी बाळगणारं शहर वाटे. त्याच्या मते, फक्त तिथेच कलाकाराला योग्य सन्मान मिळून, त्याला जिवंत ठेवलं जातं. बाकी ठिकाणी तर…
त्याचा रियाज इतका तगडा होता की, मोठमोठ्या गायकांच्या मैफलीत तो साथीला जात असे. आजही त्याने तबला जमवला. वादी ठोकून घेतल्या. मोबाईलवर गोहरजानची ठुमरी लावली आणि ताल धरला. वाजवत असताना कुठून तरी विलंबित लयीतला आलाप कानी आला. नकळत त्याचे कान त्या आवाजाकडे लागले. आवाज खूप गोड होता. राग… मारवा. ऐकून कळत होतं की, रियाज जबरदस्त असणार.
भारावल्यासारखा तो खिडकीपाशी गेला. शेजारच्या फ्लॅटमधून कुणी गात होती. इतके दिवस इथे राहतोय; पण आजच कसा आला हा आवाज? इतकी तयारी? सुरावर पक्की पकड! त्याने इकडून तिकडून बघायचा प्रयत्न केला. बाहेरच्या खोलीत कुणी महिला गात होती. काचेतून फक्त तंबोरा आणि हात दिसत होता. तिथेच उभं राहून त्याने ते सूर आतपर्यंत झिरपू दिले, भिंतीला टेकून डोळे मिटून.


अचानक तंद्री मोडली. गाणं थांबलं होतं. त्याची नजर पुन्हा समोर गेली. कुणी पुरुष आलेला दिसत होता. असं दुसर्‍याच्या घरात वाकून पाहणं किती असभ्य आहे, हे समजूनही चुकार नजर सारखी तिकडेच वळत होती.
नंतरचे दोन दिवस त्याने सतत कान देऊन ऐकलं; पण गाण्याचा आवाज नाही आला. गॅलरीत कपडे वाळत घातले होते, फक्त पुरुषाचे. त्याने बिल्डिंगच्या सचिवांना त्याबद्दल विचारलं.
“काय बाबू? तुमचाही नंबर लागलाय का तिकडे?” छद्मी हसत सचिव महाशय बोलले.
“प्रत्येक वेळी कुठल्या महिलेबद्दल चौकशी केली की, असाच अर्थ काढता का तुम्ही? मी काय विचारतोय, तुम्ही काय बोलताय!” चिडून बोलला निलय.
एक दिवस बिजू जाताना त्याला निरोपादाखल हात दाखवायला तो बाल्कनीत गेला, तेव्हा समोरच्या गॅलरीत एक महिला दिसली. अतिशय सात्त्विक रूप. साधी सुती साडी. या काळातही केसांचा अंबाडा. चाळिशीच्या आसपासची. खास गृहिणीसारखी.
“तुम्ही निलय बाबू नं?”
तो आवाक! नाव माहित्येय हिला?
“हो. तुम्ही कसं… ओळखलं?”
“उस्तादजींनी सांगितलं. तुम्हाला ओळखतात ते.”
“उस्ताद अमन खाँ? तुम्ही भेटलाय त्यांना? फार सिद्धहस्त आहेत ते!”
“हो, आमच्या मैफलीत तेच असतात साथीला.”
“वाटलंच मला, त्या दिवशी तुमचं गाणं ऐकून. पण फक्त एकदाच ऐकलं मी…”
अचानक ती आत गेली. दारावर कुणी आलं होतं बहुतेक. निलय तिची वाट बघत तिथेच थांबला होता. त्याला तिच्याविषयी जाणून घ्यायचं होतं. पण ती पुन्हा बाहेर आलीच नाही. तिचं वागणं गूढच वाटलं त्याला.
आज निलय घाईघाईत आणि उत्साहात घरी वापस आला. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रावणी सहानी यांच्या मैफलीत तालमीला साथ करायला बोलावणं होतं. साक्षात श्रावणीताईंचं गाणं असं जवळून ऐकायला मिळणार होतं. तो अत्यंत खूश होता. ही तर तालीम होती, खरा कार्यक्रम एक महिन्याने होता.
ताईंच्या घरी सगळी वादक मंडळी जमली होती, गाण्याच्या जुगलबंदीसाठी. अधीर मनाने तो वाट बघत असताना श्रावणीताई आल्या. आणि… पाठीमागून या कोण?… या तर… आपल्या समोरच्या बिल्डिंगमधल्या… त्या… तो आ-वासून बघत होता.
“निलय, या सुप्रसिद्ध गायिका अश्‍विनीताई,” ताईंनी ओळख करून देत म्हटलं.
“नमस्कार,” त्याने अचंब्याने हात जोडले. अश्‍विनीनेही हसून उत्तर दिलं.
“मी ओळखते. आमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहतात.”
“या अश्‍विनी? सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका?… मग आपल्या सोसायटीचे लोक असे का बोलले?”
त्याच्या मनात गोंधळ चाललेला असतानाच ताईंनी मैफल सुरू करायला सांगितलं. मस्त जुळवलेला तानपुरा, ताईंचा कसलेला आवाज आणि त्याला अश्‍विनीच्या स्वराची साथ! आहाहा ! ‘रुठे सैया, मानत नाही’ ही यमन रागातली बंदिश!!! आज तर तबलाही गाण्याच्या रंगात बुडाला होता. खुलून साथ करत होता. तबल्यालाही मूड लागतो साथ देण्यासाठी. कधी कधी कितीही हात फिरत ठेवला, तरी मनासारखे बोल येतच नाहीत. ऐकणार्‍याला लक्षात नसेल येत; पण वाजवणारा समाधानी नसतो. आज मात्र मस्त जमलं होतं सगळं. इतक्या सुरेल समाधीचा भंग करत मध्येच अश्‍विनीचा फोन वाजला. ती एकदम घाबरून उठली. फोन घेऊन बाहेर अंगणात गेली. ताईंनी गाणं चालू ठेवा, अशी खूण केली असल्याने तालीम थांबली नाही, पण निलयचं लक्ष मात्र उडालं.


अश्‍विनी आत आली, घाईघाईने पर्स उचलली आणि ताईंना निरोपाचा हात दाखवून निघालीही. निलयला थोडं विचित्र वाटलं. कलाकार थोडे मनस्वी आणि विक्षिप्तच असतात, असं आई मला म्हणायची. ते खरंच असावं बहुधा, असा विचार आला त्याच्या मनात. तो साथ करत होता; पण लक्ष उडालं होतं. तालीम झाल्यावर त्याने याबद्दल ताईंना विचारलं.
“अश्‍विनीचं आयुष्य एक रोलर कोस्टर राइड आहे. तुला काहीबाही बोलतील लोक; पण मी सांगते, विश्‍वास ठेवू नकोस अजिबात.” ताईही गुलदस्त्यातच बोलली.
त्यानंतर अश्‍विनी पुन्हा आलीच नाही रियाझ करायला. समोरच्या घरातही हालचाल जाणवली नाही. जवळपास दोन महिने गेले असतील. एका रात्री निलय गाढ झोपेत असताना दारावर थाप ऐकू आली आणि बेलही. दारात अश्‍विनी… अतिशय घाबरलेली.
“निलय, प्लीज माझी मदत कर. हे काही दिवस तुझ्याकडे ठेव. मी जमेल तसं घेऊन जाईन. तुला नसेल जमत, तर सकाळी ताईंकडे नेऊन दे, प्लीज!” हातातील डबा पुढे करत ती म्हणाली.
तिचा काकुळतीचा स्वर आणि अवस्था बघून तो म्हणाला, “इतक्या रात्री तुम्ही कुठे निघालात?”
“साई कॉलनीत मैत्रीण राहते. तिच्याकडे जमतं का बघते.”
“आत्ता अडचण असेल, तर इथे माझ्या फ्लॅटवर राहू शकता.”
“नको. मी करेन सोय.”
“बारा वाजलेत मॅडम, एकट्या इतक्या दूर जाण्यापेक्षा इथेच राहा.”
“चालेल? म्हणजे सोसायटीतले लोक…” आवाजात कंप.
“तुमची सध्याची अडचण सोडवणं जास्त महत्त्वाचं. बाकी चिंता मी करत नाही.”
ती बिचकतच आत आली. लगेच बाजूच्या दोन फ्लॅटचे लाइट्स लागलेले दिसले. त्याने बेफिकीरपणे तिकडे दुर्लक्ष केलं आणि तिच्या हातातली बॅग घेतली आणि आत गेला. आतल्या खोलीत तिला एक गादी घालून दिली आणि स्वतः बाहेर आला त्याचे पांघरूण घेऊन.
“तुम्ही झोपा आत. एक कॉट आहे. दार लावून घ्या. मी बाहेर झोपतो.”
तो बाहेर पहुडला; पण झोप लागेना. का आली असेल ही इतक्या रात्री? आपणही काहीच विचारलं नाही. का नाही विचारलं? अलिप्तता म्हणून की, प्रश्‍न विचारून तिला अडचणीत टाकू नये म्हणून? तो स्वतःशी बोलत असतानाच ती बाहेर आली.
“झोप येत नाहीये नं? मलाही येत नाहीये.” ती.
“ओह! या ना. बसा. एक विचारू?”
“इतक्या रात्री घर सोडून का आले, हेच ना?”
“नाही, तुम्हाला त्रास होणार असेल, तर राहू देत.”
“सगळ्या त्रासाच्या पलीकडे गेलेय मी आता. दोन महिन्यांपूर्वी मी तुमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहत होते. तो माझा स्वतःच्या मालकीचा फ्लॅट होता.”
“होता म्हणजे?”
“कैलाशने, माझ्या नवर्‍याने परस्पर विकला तो. आज थोड्या वेळापूर्वी कळलं मला. माझ्या सह्या त्याने कधीच घेतल्या होत्या, मला फसवून.”
“पण गेले दोन महिने तुम्ही कुठे होतात?”
“युरोप दौरे करत होते. खूप मोठी कहाणी आहे, सांगायला लागले तर सकाळ होईल.”
“श्रावणीताईंना पण माहीत नव्हतं, तुम्ही कुठे आहात ते?”
“नाही. त्या दिवशी तालीम सुरू असतानाच मला एक फोन आला होता, आठवतं? तो कैलाशचाच होता. त्याने मला न सांगता युरोप टूर ठरवली. आठ शास्त्रीय गाण्याच्या मैफलींचे पैसे स्वतःच अ‍ॅडव्हान्स घेतलेही.”
“तुम्हाला आधी न सांगता?”
“हं! मला? कधीच नाही! माझे सगळे कार्यक्रम तोच ठरवतो. पैसेही तोच घेतो. कधी कधी योगेंद्रनाथ त्याच्याकडे न देता रक्कम मला देतात, इतकंच.”
“तुम्ही नकार द्यायचा नं मग. नाही गाणार म्हणावं… म्हणजे, जर इच्छेविरुद्ध असेल तर…”
“काश ऐसा हो पाता… एका वचनामुळे गप्प आहे मी. मी मूळची भुवनेश्‍वरची. आमचं घराणंच गाणारं…” ती सांगू लागली.
…अश्‍विनी भुवनेश्‍वरमधील एका प्रसिद्ध घराण्यातली ज्येष्ठ संगीत सम्राटाची मुलगी. तिच्या वडिलांचे बालमित्र पंडित आनंद श्रीवास्तव हेदेखील अतिशय प्रसिद्ध गायक. भुवनेश्‍वरमध्ये त्यांचा दबदबा. अशा स्थितीत अश्‍विनीवरही संगीत क्षेत्रात उच्च स्थान मिळवण्याची जबाबदारी होती. तिला तिच्या कुमार वयातच धृपद गायकीत नाव कमावण्यासाठी ग्वाल्हेरला पाठवण्यात आलं. तिथे उस्ताद अमिनुद्दीन कागर यांच्याकडे तिचं शिक्षण सुरू झालं. वय फक्त बारा वर्षं. इतक्या लहान वयातही तिला गाण्याची आणि आपल्या घरच्या परिस्थितीची खूप जाणीव होती. अशातच एका अपघातात तिचे वडील आणि लहान भाऊ गेले. आईविना वाढलेली पोर पोरकी झाली. मग वडिलांचे परममित्र आनंद श्रीवास्तव तिला आपल्याकडे घेऊन गेले. तेही नावाजलेले गायक होतेच. अश्‍विनीच्या वडिलांची मालमत्ता, तेथील मौल्यवान वस्तू आणि तिच्या आईचे दागिने यांची ती एकटी मालकीण होती. आनंदकाकांकडे तिचं मन रमत नव्हतं. पण आपल्या एव्हढ्या मोठ्या घरात एकटी राहण्याची सोय नव्हती. मध्येच आठवण आली की, ती आनंदकाकांना सोबत घेऊन आपल्या घरी जाई. एके काळी वैभव मिरवलेली वास्तू आता फार उदासवाणी वाटे. तिच्या घराशेजारीच दीपेन राहायचा.
“दीपेन कोण?” अश्‍विनीची कहाणी मन लावून ऐकणार्‍या निलयने विचारलं.
“भुवनेश्‍वरमध्ये आम्ही एकाच वर्गात होतो. त्याची आई, भावीकाकी माझे खूप लाड करत असे. मग मी वारंवार दीपेनकडे जाऊ लागले. तो सतार उत्तम वाजवत असे. त्यांची गुलाबाची शेती होती. आयुष्यात कुणाचा तरी प्रेमळ आधार शोधणारी मी, दीपेनच्या प्रेमात पडले…”
“मग?”


“आनंदकाकांना हे आवडत नव्हतं. त्यांना वाटे की, माझ्या मालमत्तेसाठी भावीकाकी मुद्दाम मला आणि दीपेनला प्रोत्साहन देतात. त्यांनी मला ताकीद दिली की, मी दीपेनशी जवळीक वाढवली, तर माझी रवानगी महिला आश्रमात करतील. काही महिन्यांत मी अठरा पूर्ण झाले. काकांचा भाचा कैलाश नेहमी त्यांच्याकडे येत असे. अत्यंत वाह्यात, जुगारी आणि घाणेरडा कैलाश. पण काका मात्र त्याच्यावर खूश होते. कैलाश आपल्या काकांकडे मुद्दाम राहायला आला आणि मला त्याचा त्रास होऊ लागला. अशातच काकांचा आजार खूप बळावला. मी त्यांची खूप मनापासून सेवा केली; पण त्यांना आपला शेवट दिसू लागला असावा.” आज बर्‍याच काळानंतर अश्‍विनी कुणाजवळ मन मोकळं करत होती. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. निलयने कॉफी बनवून आणली.
‘अश्‍विनी’ हे कोडं हळूहळू उलगडत होतं. कॉफी घेता घेता त्याने विचारलं, “कैलाशमधील दोष काकांना दिसत नव्हते का?”
“दिसत असतीलही; पण ते गलितगात्र झाले होते. एक दिवस काकांची तब्येत खूप खराब झाली. श्‍वास अडकला. मी पळत जाऊन डॉक्टरला फोन केला. कैलाशने त्यांना एका अंगावर वळवलं. मी त्यांच्याजवळ गेले, त्यांचा हात हातात घेतला. कैलाश शेजारीच होता. अचानक त्यांनी माझा हात उचलून कैलाशच्या हातात दिला.”
“ओह नो!”
“त्याला म्हणाले, वचन दे तू हिला कधीच अंतर देणार नाहीस. मी हात सोडवायचा प्रयत्न करत होते, तर मलाही तसंच वचन मागितलं. मी हो म्हणत नव्हते. त्या काही सेकंदात माझं आयुष्य बदलण्याची ताकद होती. मी काही बोलणार इतक्यात त्यांच्या छातीत एक असह्य कळ आली आणि मी घाबरून हो म्हणाले. त्यांनी काही क्षण स्थिर बघितलं आणि…”
“हा तर आयुष्याचा सौदाच झाला.”
“माझ्यासाठी ते सगळंच फार भयानक होतं. खरं सांगू? मी वचन तोडून टाकणार होते. दीपेन, भावीकाकी असताना हे असलं काही सामोरं येईल, अशी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पण कैलाशनं वारंवार विनंती करून खात्री दिली की, तो सगळ्या वाईट गोष्टींपासून दूर राहील. मला खूप सुखी ठेवील… आणि एक म्हणजे हे की, तेव्हा दीपेन शिक्षण पूर्ण करण्यासाठी बाहेर होता. शिवाय त्याने मला कधीच त्याच्या भावना बोलून दाखवल्या नव्हत्या. त्याच्या मनात माझ्याबद्दल प्रेम होतं, हे मी त्याच्या वागण्यावरून जाणलं होतं; पण तो लग्नाबाबत किती गंभीर होता…” तिने सुस्कारा सोडला.
“दीपेनची प्रतिक्रिया काय होती?”
“त्याने मला कधीच त्याच्या मनातलं काहीच बोलून दाखवलं नाही. मी आतून कोलमडले होते. काकींनी सरळ बोलून दाखवलं की, त्यांची इच्छा होती मला सून करून घेण्याची. तरीही मी कैलाशशी लग्न केलं.लगेचच माझ्या मालमत्तेचे सगळे कागदपत्र कैलाशने त्याच्या ताब्यात घेतले. इतकंच काय, अधिकार दाखवला माझ्या गळ्यावर, गाण्यावर, कार्यक्रमाच्या निवडीवर… सगळ्यावरच! आता माझाच पैसा मलाच महाग झालाय. शिवाय माझ्या चारित्र्याबद्दल वाट्टेल ते बोलतो. मी कुठलीही तडजोड करून गाण्याचे कार्यक्रम मिळवते, असंही पसरवलं त्याने. खूप हिम्मत लागते, हे सगळं पचवायला.”
“हो, खरंच. पण तुमचं भुवनेश्‍वरचं घर?”
“विकलं त्याने केव्हाच!”
“पण इतका पैसा कुठे घालवतो तो?”
“त्याला लागतो… कारण त्याचं लग्न झालंय! माझ्याशी लग्न करण्याआधी त्याचं लग्न झालं होतं. मला आणि काकांना त्यानं अंधारात ठेवलं होतं.”
हा आणखीन एक झटका! हे सगळं ऐकून निलयला गरगरायला लागलं. कुठून कसा प्रवास झाला हिचा! काय वादळवाट तुडवलीय हिने! तरीही आपल्यातली ऊर्जा कशी तेवत ठेवते ही? अशा स्वरांची ताकद बाळगणार्‍या स्त्रीने हा कैलाशसारखा गळ्यातील काटा का सहन करावा?… निलयला ते सगळं असह्य झालं.
“सकाळ झालीये. मी निघू?” तिने आवरतं घेत विचारलं.
“पण जाणार कुठे?”
“माझे कार्यक्रम आयोजित करणारे ते योगेंद्रनाथ नाही का, ते स्वरसागर महोत्सवात भेटले होते, त्यांच्याकडे जाते. माझी काही रक्कम त्यांच्याकडे बाकी आहे. शिवाय हे दागिने आहेतच. त्यानंतर भुवनेश्‍वरला जाईन. तिथे मनाला जी शांतता मिळते, ती कुठेच मिळत नाही.
“कैलाशचं काय? तो इतक्या सहजासहजी सोडेल तुम्हाला?”
“त्याचं लग्न झालंय, हे सांगून त्याने माझ्यावर मोठे उपकार केले आहेत, खरंच! माझा पवित्राच बदलला. आत्ता मला कळतंय की, आमचं मॅरेज सर्टिफिकेट बनवताना त्याने इतकी दिरंगाई का केली होती. आम्ही कायद्याने नवरा-बायको होऊच शकत नाही. मी फार मोठ्या ओझ्यातून मोकळी झालेय. काकांना मरताना दिलेलं वचन मी निग्रहाने पाळलं होतं. फार हलकं वाटतंय आता. येते मी.”
“मॅडम, आज जी ताकद तुम्ही गोळा केलीय, ती आधीच काही वर्षांपूर्वी केली असती तर…”
“पिंजर्‍याचा दरवाजा उघडला जाऊ शकतो, हे पक्षाला माहीतच नसतं. जर दरवाजा उघडण्याची कला त्याला कळली तर…”
अश्‍विनी गेली. जाताना तिने निलयला तिच्या वडिलांचं गळ्यात बांधायचं साखळीतलं घड्याळ भेट दिलं. तिच्याजवळ असलेल्या मोजक्या जिव्हाळ्याच्या वस्तूतलं एक! जाताना चार पावलं पुढे जाऊन मागे फिरली, निलयचा हात हातात घेऊन थोपटला आणि झपाट्याने बाहेर पडली.
निलय कितीतरी वेळ तिच्या वाटेकडे बघत होता. मनात एक विचित्र पोकळी निर्माण झाली होती. एका निरर्थक वचनाने किती जणांचं आयुष्य ढवळून निघालं होतं. का असं होतं? का कुणा एकाच्या आयुष्याचे निर्णय दुसर्‍या कुणी घ्यायचे? आता यापुढे कैलाश तिला त्रास देणार नाही कशावरून? इतकी चांगली गायिका, इतके पैसे कमावणारी… निलयला स्वतःच्या मानसिक गुंतवणुकीचं आश्‍चर्य वाटलं. इतकी प्रतिभा घेऊन जन्मलेल्या कलाकाराला त्याच्या खाजगी आयुष्यात आई, वडील, भाऊ, पती यातील कुठल्याच नात्याकडून प्रेम मिळू नये, ही बाब त्याला अस्वस्थ करत होती.
थोडा वेळ झोप घेऊन, नाष्टा करून निलय ऑफिसला गेला. लंच अवरमध्ये एकटाच डबा खात बसला. काहीतरी टोचत होतं. अश्‍विनीची कहाणी? का तिची काळजी? का एक चांगल्या कलाकाराची ही अशी अवस्था… नेमकं काय होतंय?
दोन-तीन दिवस गेले. त्या संध्याकाळी तशाच उद्विग्न अवस्थेत तो घरी आला. आज तबला काढायचा मूडच नव्हता. तो नकळत त्याच गॅलरीत जाऊन उभा राहिला, जिथून अश्‍विनी दिसायची.
त्याने कपाटातलं ते साखळी घड्याळ काढलं. कितीतरी वेळ तसाच बसून होता आणि फोन वाजला. तिचाच होता…
“निलय?”
“तुम्ही?… कुठून बोलताय?”
“भुवनेश्‍वरवरून.”
“कैलाशनं माझं भुवनेश्‍वरचं घर विकलं नं? ते कुणी विकत घेतलं होतं माहितेय?”
“दीपेननं! हो, नं?”
“हो. आणि माझी रियाजाची खोली तशीच ठेवलीये.”
“ग्रेट! अविश्‍वासनिय! मला तर खूपच भरून येतंय.”
“ईश्‍वराने खूप मोठी कृपा केलीये माझ्यावर.”
“दीपेन आणि कुटुंब तिथेच राहतात का?”
“नाही. जोपर्यंत मी इथे असेन, तोपर्यंत मी इथेच राहावं असा हट्ट आहे भावीकाकींचा.”
“अशीही माणसं आहेत अजून…”
“निलय, पुढच्या आठवड्यात एक मोठा कार्यक्रम आहे. पंडित शंकर, श्रावणीताई, अमनुद्दीन खाँ असे मोठे कलाकार आहेत. तू येशील माझ्या आणि श्रावणीताईंच्या साथीला?”
ते ऐकून तर निलयला उडीच मारावी वाटली. त्याने लगेच होकार कळवला. बिजू हे सगळं ऐकत काय चाललंय याचा अंदाज बांधायचा प्रयत्न करत होता.
“कुठे जायचंय तुला आता?” बिजू.
“अरे, तबल्याची साथ द्यायला.”
“ते ऐकूनच तर विचारलं तुला की, कुठे जाणार आहेस?”
“भुवनेश्‍वरला.” बिजूच्या प्रश्‍नमालिकेला खंडित करून निलयनं त्याला उत्तर दिलं.
“निलय, एक विचारू?”
“तुझ्या प्रश्‍नाचं उत्तर ‘नाही’ असं आहे. मला तसं कधीच वाटलं नाही. मला मनापासून वाटतंय की, मी अश्‍विनीला जमेल तितकी मदत करावी. संगीत साधना ही फार अवघड वाट आहे, बिजू. तुमचं आयुष्य सतत तुमची कठोर परीक्षा घेतंय आणि तरीही तुम्ही संगीताची कास नाही सोडत. हे सोपं नाहीये. मीदेखील एक कलाकार आहे; पण सर्वस्व नाही झोकात त्यात. नोकरी सांभाळून वेळ उरल्यावर आमची संगीताशी निष्ठा!”
कार्यक्रम रविवारी होता म्हणून निलय शुक्रवारी संध्याकाळी भुवनेश्‍वरला पोहोचला. अश्‍विनीच्या वाड्यापर्यंत पोहोचायला रात्रीचे दहा वाजले. अश्‍विनी वाटच बघत होती. आल्याबरोबर तिने त्याला एक हळुवार आलिंगन दिलं. निलयने एक नजर टाकली सगळ्या घरावर. बरेच जुने धागे अजूनही शाबूत होते. इतकी जुनी वस्तू; पण अतिशय प्रसन्नता होती तिथे. आपल्या आयुष्यावर आता आपलाच ताबा, ‘मी इतर कुणाची कळसूत्री बाहुली नाहीए’ ही भावनाच अश्‍विनीसाठी नवी होती. त्याचा पुरेपूर आनंद तिच्या चेहर्‍यावर दिसत होता.
पहाटे सहालाच निलय उठला. रियाजाची वेळ आठची ठरली होती. अजून अवकाश होता.
“मी पाय मोकळे करून येतो,” असं म्हणत तो बाहेर पडला.
अश्‍विनीने सूचकपणे त्याच्याकडे पाहिलं. तो कुठे जाणार याची तिला कल्पना होती.
तिचं घर ओलांडून निलय पुढे गेला. एक पस्तिशीतला तरुण बागेत काम करत होता. दाट केस, त्याची कपाळावर झुल्फं, अतिशय नितळ रंग. चेहर्‍यावरचे भाव शांत. नजर फिरवावी तिथे गच्च फुललेले गुलाब होते. पलीकडच्या बाजूला एक झोपाळा होता. एक देखणी स्त्री त्यावर बसून भाजी निवडत होती. निलयला अंदाज आलाच.
“हॅलो , मी दीपेन.” त्याने पुढे होऊन फाटक उघडलं.
“मी निलय.”
कुणालाही बघितल्याबरोबर आवडावा असाच होता दीपेन. त्याची पत्नी राधा आणि त्याचा छोटाही फारच गोड होता. आत गेल्याबरोबर भावीकाकी बाहेर आल्या.
“नमस्कार करतो काकी.”
“आयुष्यमान हो. अश्‍विनीने खूप सांगितलं तुझ्याबद्दल. तुझी फार मदत झाली तिला,” काकी म्हणाल्या.
“असं काही नाही काकी.”
“अश्‍विनीने कसे दिवस काढले रे तिथे?”
“त्यांना फार मान आहे काकी मुंबईत. खूप नाव आहे त्यांचं.” उत्तराला बगल देत बोलला निलय.
“तू फार मोठा आधार झालास तिचा. नाहीतर कसं केलं असतं तिने?” दीपेन.
“अरे असं काहीच नाही. फक्त काही तास त्या माझ्याकडे थांबल्या होत्या, इतकंच. तेही कैलाशपासून लपण्यासाठी.” बराच वेळ इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्या.
“दीपेन मला एक सांग की, कैलाश हा बंगला कसा विकू शकला? त्याच्या नावावर थोडीच होता हा.”
“त्याने सगळ्या पेपर्सवर अश्‍विनीच्या सह्या घेऊन ठेवल्या होत्या किंवा डुप्लिकेट केल्या असतील. मी त्याला किती खोदून खोदून विचारलं. त्याने काहीच सांगितलं नाही. मला तिचा काहीच ठावठिकाणा माहीत नव्हता. तिचे कैलाशशी संबंध कसे आहेत, हा कसा माणूस आहे, काहीच माहीत नव्हतं. तो इथे आला तेव्हा मी शिक्षणासाठी बाहेर गेलो होतो. मला सगळी हकिकत इथे वापस आल्यावरच कळली. हा बंगला इतर कुणाच्या ताब्यात जाऊ नये, आपणच घेऊया, हे मात्र आईने सुचवलं. तिच्या भावना गुंतल्या होत्या या घरात.”


राधा चहा घेऊन आली होती. तिने हा संवाद ऐकला असावा, असं वाटलं निलयला. तो एकदम गप्प झाला. हे बघून तीच म्हणाली, “अश्‍विनीताईने आता पुन्हा कलकत्त्याला जाऊच नये. काय गाण्याचे दौरे करायचेत ते इथूनच करावेत. निदान आम्ही तरी आहोत सोबत.”
सगळा अगदी स्वच्छ मोकळा कारभार होता. कुठलीही लपवालपवी नाही की, किल्मिष नाही. हे नात्यांच्या चौकटींना छेदणारं काहीतरी त्या पलीकडचं होतं. निलयही त्यातलाच एक हिस्सा.
अश्‍विनीसोबत निलयची तालीम खूप मस्त झाली. संध्याकाळी श्रावणीताईही आल्या. मस्त मैफल जमली, अनेक महिन्यांनी. आज मारवा, कलावती राग आळवून झाले. ठुमरी तर अशी जमली की, निलय भान हरवून वाजवत होता. कार्यक्रम खूपच बहारदार झाला. खूप गर्दी होती. कुठून कुठून लोक आले होते. अश्‍विनीची शेवटची भैरवी तर… अब तो हमि से है चैन हमारे… लाजवाब!
कार्यक्रमानंतर श्रावणीताई विमानाने निघून गेल्या. रात्री जेवण करून दीपेन निलयबरोबर रेल्वे स्टेशनवर गेला.
“निलय आडवळणाने नाही विचारत, तू आणि अश्‍विनी यांचे भावबंध जुळायला हरकत नव्हती. सॉरी… मी…”
“नो नो. डोन्ट बी! अश्‍विनी या फारच ताकदीच्या गायिका आहेत. मी खूप आदराने बघतो त्यांच्याकडे. पण माफ करा, व्यक्ती म्हणून खूप चुकल्या असं वाटतं मला. काय गरज होती, काकांच्या वचनाला जागायची? काय गरज होती, कैलाशशी लग्न करण्याची? किती अवहेलना, किती छळ सहन केला. चीड येते ऐकून!”
हे ऐकून दीपेन बोलू लागला, “आम्ही अतिशय जवळचे मित्र होतो. न बोलताच समजायची मला तिची भाषा. आईवडिलांचं छत्र नाही, काकांकडे राहूनही गाण्याशी केव्हढं इमान… तिचं ते तंबोरा घेऊन बसणं… सुरेल तान घेणं… कार्यक्रमाआधी उतावीळ होणं… गाण्याला वाहून घेणं… माहीत नाही का, पण नाही जमलं मला माझ्या भावना बोलून दाखवायला.”
निलयने चमकून त्याच्याकडे बघितलं.
“तुझं प्रेम होतं तिच्यावर?”
“तिला कधीच सांगू नकोस निलय. हो ,माझं फार फार प्रेम होतं तिच्यावर. तिचंही असणारच; पण तिला बहुतेक कधी बोलावं वाटलंच नाही. कदाचित आयुष्याचा जोडीदार म्हणून नसेल बघितलं माझ्याकडे. तिने कैलाशशी लग्न केल्यावरही काही वर्षं मी वाट बघितली तिची…”
निलयसाठी हा फार मोठा धक्का होता. कोण चूक, कोण बरोबर… पण केव्हढी मोठी शिक्षा! दोघांनाही! त्याने फक्त दीपेनच्या खांद्यावर थोपटलं आणि ट्रेनमध्ये चढला. ट्रेनने वेग घेतला तशी त्याने मागे मन टेकवली. आतून गदगदून येत होतं. नियतीने चुकवलेल्या नात्यात मन अडकून पडलं होतं. मनात अश्‍विनीची भैरवी रुळत होती… ‘अब तो हमि से है
चैन हमारे…’

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

२० वर्षांनी तुटलेली मैत्री पुन्ही जुळली, मल्लिका शेरावत आणि इम्रान हाश्मी पुन्हा एकत्र ( Emraan Hashmi Mallika Sherawat Meets Each Other And End Their 20 Year Old Fight During Murder)

अखेर इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांच्यातील 20 वर्षांचा संघर्ष संपुष्टात आला आहे. आपसातील मतभेद,…

April 12, 2024

नाती टिकविण्यासाठी वेळ कसा काढाल? (How Do You Find Time To Maintain A Relationship?)

आजकालच्या जोडप्यांना एकमेकांसाठी वेळ नाही-फुरसत नाही. घर-ऑफिस, पोरंबाळं, त्यांचं संगोपन आणि घरातील रामरगाडा यांच्या कचाट्यात…

April 12, 2024

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओप्लास्टी, आता प्रकृती स्थिर (Sayaji Shine Hospitalied, Actor Goes Angioplasty In Satara)

आपल्या खणखणीत अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.…

April 12, 2024

घरी आलेल्या पाहुण्यांच्याबाबतीत प्रकर्षाने पाळला जातो हा नियम, खान ब्रदर्सनी सांगितलं सत्य (No One go hungry from Salman Khan’s house, father Salim Khan has made these rules for the kitchen)

सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या दातृत्वाचे अनेक किस्से बरेचदा ऐकायला मिळतात. भाईजान…

April 12, 2024
© Merisaheli