Marathi

भय इथलं संपत नाही (Short Story: Bhay Ithale Sampat Nahi)

  • लता वानखेडे
  • गुरुजींनी सरपंचांचा निरोप घेतला. बाहेर काळाकुट्ट अंधार पसरला होता. ‘सुमनची शिकवणी घ्यावी की नाही?’ पण नकार द्यायला गुरुजींची हिंमत होत नव्हती. नकार द्यावा, तर नोकरीवर गदा येणार हे नक्की होतं.
  • गावाबाहेर सरपंच रावसाहेबांचा भला मोठा वाडा होता. वाड्यासमोरच मोठ्या जागेत बाग होती. गणपत माळी बागेची मशागत करत होता. एवढ्यात सुधाकर गुरुजींची सायकल वाड्यासमोर येऊन थांबली. ते बागेजवळ आले. संध्याकाळचा गार वारा अंगाला झोंबून गेला. जाईचा सुगंध चौफेर दरवळत होता. गणपत माळ्याने गुरुजींना ओळखलं.
    “रामराम गुरुजी!” माळी बोलला,
    “काय काम काढलंत आज इकडं?”
    “जरा काम होतं सरपंचांकडे. आहेत का ते वाड्यात?” वाड्याकडे पाहत त्यांनी विचारलं.
    “आहेत की. जावा आत.”
    गुरुजी आत गेले. मोठ्या बैठकीत त्यांना बसवण्यात आलं. कामवालीनं दिलेलं पाणी त्यांनी भीत-भीतच एका दमात पिऊन टाकलं!
    सरपंच आले. म्हणाले, “रामराम गुरुजी! कसं काय चाललंय शाळेचं कामकाज!”
    “साहेब! शाळा व्यवस्थित सुरू आहे. आपण मला…”
    “माझी मुलगी सुमन नववीत आहे, तुमच्या शाळेत. तिचं गणित, इंग्रजी जरा कच्चं आहे. ते पक्कं करावं म्हणतो मी. रोज इथं येऊन तिची शिकवणी घेत जा. पैशांची काळजी करू नका.”
    तेवढ्यात सुमन तिथे आली. गोरी पान, उंच, नाजूक बांध्याची. तिने गुरुजींना नमस्कार केला.
    “शि… शि… शिकवणी. हो… हो… घेईन… घेईन ना!”
    गुरुजींनी सरपंचांचा निरोप घेतला. बाहेर काळाकुट्ट अंधार पसरला होता. ‘सुमनची शिकवणी घ्यावी की नाही?’ पण नकार द्यायला गुरुजींची हिंमत होत नव्हती. नकार द्यावा, तर नोकरीवर गदा येणार हे नक्की होतं.
    सरपंच विधुर होते. एका गाडीच्या अपघातात त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. मुलगी सुमनसह ते एवढ्या मोठ्या वाड्यात राहत होते. सुमनची काळजी घ्यायला फरीदा होती. ती फारच सुंदर, पण विधवा होती. बेसहारा होती, म्हणून सरपंचांनी तिला सुमनची आया म्हणून नोकरी दिली होती. वाड्यातच राहायला एक खोलीही दिली होती. सुमनला फरीदाचा फार लळा लागला होता. फरीदाला ती दीदी म्हणायची.
    आज रविवार. गुरुजी झोपेतून जरा उशिराच उठले. नाश्ता करीत असतानाच सरपंच आले. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या आणि सुशिलानं-गुरुजींच्या पत्नीनं चहा आणला. तरुण, सुंदर सुशिलावर सरपंचांची नजर खिळली. गुरुजींचा राग अनावर झाला, पण करणार काय? सरपंच गेल्यावर गुरुजी सुशिलावरच रागवले, “तुला कोणी सांगितलं होतं चहा आणायला? अगं, तो सरपंचाच्या वेषात लांडगा आहे, लांडगा. त्याची नजर वाईट आहे. एखाद्या तरुण स्त्रीवर या लांडग्याची नजर पडली, तर तिची शिकार केल्याशिवाय चैन पडत नाही त्याला!”
    ‘आलिया भोगासी असावे सादर’ या म्हणीला अनुसरून गुरुजी रोज चार वाजता सुमनला शिकवायला वाड्यावर जाऊ लागले. सुमन हुशार होती. ती जिद्दीने अभ्यास करू लागली. लवकरच तिचे गणित, इंग्रजी हे विषय पक्के झाले. फरीदा रोज त्यांना चहा आणि बिस्किटं द्यायची.
    निसर्गाचं कालचक्र सुरूच होतं. दिवसानंतर रात्र अन् रात्रीनंतर दिवस… सुखानंतर दुःख, तर
    दुःखानंतर सुख… अविरत सुरूच होतं!
    सुमन बारावीत पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाली. तिचा मेडिकलला नंबर लागला.
    एक दिवशी सरपंचांनी बोलावलं म्हणून गुरुजी हजर झाले. गणपत माळी वाड्याबाहेरच भेटला.
    “सरपंच आहेत ना वाड्यात?” गुरुजींनी विचारलं.
    “नाही. ते तर सकाळीच मुंबईला गेले.”
    “ठीक आहे. मी थोडा वेळ वाट बघतो.”
    दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. गणपत माळी सांगत होता… “सुमनताई गेल्यात शहरात. डागतर व्हणार हाईत त्या. फरीदा दीदीपण त्यांच्यासोबत हाईत. फरीदाचा शौहर सलीम, सरपंचांच्या शेतावर मजुरी करत होता. एकदा सरपंचांची वाकडी नजर फरीदावर पडली. सलीमला कामासाठी गावाला पाठविलं अन् इकडं फरीदाची अब्रू लुटली या सरपंचानं. फरीदा अन् सलीम पोलीस ठाण्यात गेले तक्रार नोंदवायला, तर सरपंचाच्या ट्रकनेच सलीमला उडवून दिलं. बेसहारा फरीदा त्यांची रखेल बनली.” गणपत माळ्याने डोळे पुसले आणि गुरुजींच्या सर्वांगावर भीतीने काटा आला. घराकडे त्यांची सायकल
    वेगात चालली.
    त्यांच्या घरासमोर खूप गर्दी जमली होती. त्यांनी घराकडे धाव घेतली. लाडक्या सुशिलाचं निर्जीव शरीर छतावरील पंख्याला लटकलं होतं. तिला पाहताच त्यांनी जोराने टाहो फोडला. शेजार्‍यांनी सुशिलाचं शरीर खाली उतरवलं. जवळच
    एक पत्र सापडलं.
    सरपंच नावाच्या लांडग्याने कोमल, नाजूक निष्पाप स्त्रीच्या अस्तित्वावरच आघात केला होता. लांडगा मात्र
    फरार होता.
    पत्नीच्या विरहाने सुधाकर गुरुजींचं मानसिक संतुलन बिघडलं. वडिलांच्या नीच कर्माचं प्रायश्‍चित्त करण्याचं सुमनने ठरविलं. तिने सुधाकर गुरुजींशी विवाह केला.
    डॉ. सुमन एक प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ बनली होती. ती पतीची मनापासून सेवा करीत असे. त्यांची प्रकृती आता बरीच सुधारली होती. त्यांच्या संसार वेलीवर निर्भया नावाची कळी उमलली होती.
    “स्त्री कालही सुरक्षित नव्हती आणि आजही ती सुरक्षित नाही. काल तिला उडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, आज मात्र ती कल्पना चावलासारखं आकाशात उंच उडण्याचं साहस करतेय. समाजात लांडगे कालही होते आणि आजही आहेत… पण म्हणून घाबरायचं नाही… भय इथलं संपत नाही, म्हणून भीत भीत जगायचं नाही. निर्भय व्हायचं. निर्भय होऊनच जगायचं.” डॉ. सुमन बोलत होत्या. आज त्यांच्या ‘निर्भया’ या मानसोपचार विशेष हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. त्या प्रसंगी त्या
    बोलत होत्या. अगदी निर्भयपणे बोलत होत्या…
shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

लापता लेडीजमध्ये आमिर खानने या भूमिकेसाठी दिली होती ऑडिशन… (Aamir Khan Wanted To Act In Laapataa Ladies, But Kiran Rao Denied It)

आमिर खान प्रोडक्शनचा चित्रपट ‘लापता लेडीज’ १ मार्च २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात…

May 14, 2024

मदर्स डे निमित्त मलायका अरोरा आणि तिचा लेक अरहानची मजेशीर मस्ती, व्हॉट्सअप व्हायरल(Malaika Arora’s Son Arhaan Khan Sells All Her Leaked WhatsApp Chat Reveals In Betwwen Malaika Arora And Her Son)

मलायका अरोरा तिच्या लूक आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर त्याची फक्त एक झलक…

May 14, 2024
© Merisaheli