Marathi

ग्रहण (Short Story: Grahan)


घंटी वाजवताच अरुणने दार उघडलं. त्याला बघून मी स्तिमितच झाले. माझ्यासमोर उभा असलेला अरुण, लग्नात पाहिलेल्या अरुणपेक्षा अगदी वेगळा दिसत होता. त्याचं रंगरूप पूर्णपणे बदललं होतं. निस्तेज डोळे, चेहर्‍याचा गुलाबी रंग उडालेला, तीस वर्षं वयाचा तो तरुण मुलगा साठीतल्या वृद्धासारखा कमरेत झुकलेला होता.


“कितीतरी वर्षं झाली. इतक्यांदा मनात आलं, पण जयपूरला जाणं काही जमलं नाही. एकदा जायलाच पाहिजे, असं कित्ती वाटलं, पण कसचं काय?… घरातल्या कामाच्या रगाड्यातून उसंत मिळेल तर ना? शिवाय नोकरीत महत्त्वाचं पद मिळालंय. एक ना धड, भारंभार चिंध्या, अशी गत झालीय माझी. रिटायरमेंट नंतर तरी फुरसत मिळेल की नाही कुणास ठाऊक?”
मी स्वतःशीच बडबडत होते. अन् आमचे हे, समोरच आरामात पेपर वाचत बसले होते. अचानक काय झालं कुणास ठाऊक. पेपर बाजूला करून मला म्हणाले,“अगं, ऐकतेस का? उद्या मला अरिअर्स आणि लोनचे पैसे मिळणार आहेत.”
“मग मी काय करू?” मी धुसफुसतच विचारलं.
“काय करू म्हणजे? चल, परवा जयपूरला जाऊयात. वर्माजी गेले, तेव्हा जाता आलं नव्हतं. आता जाता येईल त्यांच्याकडे. मिसेस वर्मांनाही बरं नाही, असं कळलंय…”
जयपूरशी किती तरी सुखद आठवणी जोडल्या
आहेत आमच्या. चार वर्षं आम्ही तिथे होतो.
या चार वर्षांत काही नाती खूप दृढ झाली होती. त्यातलंच एक होतं हे वर्मा कुटुंब. बदली होऊन आम्ही जेव्हा जयपूरला गेलो, तेव्हा आमच्या सरकारी क्वार्टरसमोरच वर्माजींचा अतिशय सुंदर असा पांढरा बंगला होता. प्रशस्त हिरवळ, फुलांचे ताटवे आणि व्हरांड्यात कुंड्या… असा निसर्ग त्या घरात फुलला होता. या छानशा बंगल्यात कोण राहत असेल, असा प्रश्‍न ते घर बघताच मनात आला होता. त्याचं उत्तर दुसर्‍याच दिवशी मिळालं. वर्माजी आणि त्यांच्या मिसेसशी आमची ओळख झाली. पुढे आमचा इतका घरोबा झाला की, एकमेकांशिवाय आमचे पानच हलेनासे झाले होते.
ते अगदी प्रेमळ आणि समाधानी दाम्पत्य होतं.
त्यांना एक लहान मुलगा होता. वर्माजी… त्यांना मी दादासाहेब म्हणू लागले होते. तर दादासाहेब मला मुलीसारखं प्रेम देऊ लागले होते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने मलाही एक किशोरवयीन भाऊ मिळाला होता. जयपूरची ती चार वर्षं कशी स्नेहादरात गेली, ते कळलंच नाही. आमच्या दोन्ही घरात मायेचे, जिव्हाळ्याचे संबंध इतके दाट झाले होते की, यांची बदली इंदूरला झाली, ते दादासाहेबांना सांगण्याची माझी हिंमतच होत नव्हती. आमच्या मोलकरणीने बदलीची बातमी त्यांना पोहचवली होती. ही बातमी ऐकून माझ्या इतकेच तेही दुःखी होतील असं मला वाटलं होतं. पण दादासाहेब हसतमुखाने लाडवाचा डबा हाती घेऊन आमच्याकडे आले होते.
“अभिनंदन बेटी!” मला गंभीर पाहून ते म्हणाले,
“अगं, जावयाची प्रगती होते, तेव्हा आपल्या सगळ्यांच्या जीवनात बहार येते ना! हा आनंद साजरा करण्यासाठी
हे लाडू…”
“पण दादासाहेब, मला जायचं नाहीय.” मी त्यांच्या पाया पडत बोलले होते.
“का गं बेटा?” त्यांनी आश्‍चर्याने विचारलं होतं.
“अं… अहो, इतकं छान घर-क्वार्टर इंदूरला थोडंच मिळणार आहे…”


“अच्छा… म्हणजे क्वार्टरसाठी तुला जायचं नाही… मला आपलं वाटलं की, आमच्या मुलीला आमच्या वियोगाचं दुःख सहन होणार नाही, म्हणून जावसं वाटत नाहीय.” ते माझी फिरकी घेत होते.
“मी नाही जाणार…” लहान मुलासारखी मी फुरंगुटून म्हणाले होते. तर माझ्या डोक्यावर आशीर्वादपर हात ठेवून ते म्हणाले होते, “असं नाही करायचं. तू आनंदाने जा. अगं, तिथल्या क्वार्टरमध्ये तू नंदनवन फुलवशील. कळलं?…”
आम्ही इंदूरला गेल्यावर सुरुवातीला आठवड्यातून एक-दोन वेळा दादासाहेबांशी फोनवर बोलाचाली व्हायची. पुढे हे संभाषण पंधरा दिवसांवर आलं नि नंतर महिन्यातून एकदा होऊ लागलं. हळूहळू हा कालावधी वाढतच गेला.
त्यानंतर अचानक एके दिवशी भल्या पहाटे दादासाहेब आणि आन्टीजी आमच्या घरी हजर झाले होते. त्यांच्या हाती लग्नाची पत्रिका आणि अक्षता होत्या. “अरुणचं लग्न ठरलंय…” अशी आनंदाची बातमी त्यांनी दिली होती.
“तू तर आम्हाला साफ विसरून गेली आहेस”, आन्टीजी तक्रार करत होत्या. मी मात्र कसंनुसं हसून वेळ मारून नेली होती.
आपल्या एकुलत्या एक मुलाचं लग्न दादासाहेबांनी धूमधडाक्यात केलं. जणू सगळं जयपूर शहरच तिथे लोटलं होतं. आम्ही तर चार दिवस लग्नघरी तळ ठोकला होता. सून रूपानं अतिशय सुंदर होती. दृष्ट लागावी, असं तिचं सौंदर्य होतं. तिचं नाव अंजली. अरुण-अंजली एकमेकांना अनुरूप होते. लक्ष्मी-नारायणाचा जोडा शोभत होता.
लग्नानंतर आम्ही इंदूरला परतलो. काही ना काही कारणांनी पुढे आमचं दादासाहेबांशी फारसं बोलणं होत नव्हतं. आठ महिन्यांनी वाईट बातमी समजली… एका अपघातात दादासाहेबांचं निधन झालं. खूप वाईट वाटलं. पण नेमकी त्याच वेळी मी किडनी स्टोनच्या त्रासापायी हॉस्पिटलमध्ये भरती होते. त्यामुळे आम्ही दोघंही वर्मा आन्टीच्या सांत्वनासाठी जाऊ शकलो नाही. आता दादासाहेबांना जाऊन सात महिने लोटले होते आणि आम्ही जयपूरला जायला निघालो होतो.
घंटी वाजवताच अरुणने दार उघडलं. त्याला बघून मी स्तिमितच झाले. माझ्यासमोर उभा असलेला अरुण, लग्नात पाहिलेल्या अरुणपेक्षा अगदी वेगळा दिसत होता. त्याचं रंगरूप पूर्णपणे बदललं होतं. निस्तेज डोळे, चेहर्‍याचा गुलाबी रंग उडालेला, तीस वर्षं वयाचा तो तरुण मुलगा साठीतल्या वृद्धासारखा कमरेत झुकलेला होता. डोक्यावरचे केस उडाले होते. मला पाहताच तो पाया पडला. त्याच्या डोक्यावर हात ठेवत, गदगदलेल्या स्वरात मी म्हटलं, “सुखी राहा. आयुष्यमान भव!”
“नको दीदी. आयुष्यमान भव सोडून, दुसरा कुठलाही आशीर्वाद दे-”
“वेडा आहेस का? अरे, बहिणीला आपला भाऊ चिरंजीवच नव्हे, तर अमर राहायलाच हवा असतो. म्हणजे, माहेरचे दरवाजे तिला सदैव उघडे राहतात.”
“कोण आलंय अरुण?” आतून आन्टीचा आवाज ऐकू आला.
मी धावतच आतल्या खोलीत गेले. आन्टी पलंगावरून उठून उभी राहिली. तिला पाहून मला हुंदका आवरलाच नाही, “हे काय झालं गं आन्टी?”
“शांत हो बेटा. असं रडायचं नाही. आमचे ग्रह फिरलेत. तुझे दादासाहेब तुला नेहमी हसतमुख बघायचे. आता तुला रडताना पाहून त्यांना त्रास होईल.”
किती तरी वेळ मी तिला गळामिठी घालून रडून घेतलं. मला थोपटून ती आत गेली नि आमच्यासाठी पाणी घेऊन आली.
“अरे, तू कशाला त्रास घेतलास? अंजली कुठे आहे?”
ती गप्प राहिली. तिच्या गप्प बसण्यात बरंच काही
दडलं असल्याचं मला जाणवलं. मला गप्प बसवेना,
“सांग ना आन्टी… अंजली कुठे बाहेर गेली आहे का?”
“बेटा, अंजली इथे राहत नाही. ती गेली निघून…” उसासा टाकून ती बोलली.
“कुठे निघून गेली? काय झालं अंजलीला? मला कुणीच कसं सांगितलं नाही?…” मी एकामागून एक प्रश्‍न
विचारले खरे, पण मी घाबरीघुबरी झाले होते.
“दीदी, अगं अंजली मला सोडून गेलीय”, अरुणने स्पष्ट केलं.
“काय? पण असं काय घडलं म्हणून ती सोडून गेली?”
“ती स्वतंत्र विचारांची मुलगी होती. आम्ही पारंपरिक पठडीतली, संस्कारी विचारांची माणसं. तिची नि आमची
मनं आणि मतं कधी जुळलीच नाहीत…”
“पण तिला काय हवं होतं?”
“तिला नेमकं काय हवं होतं, ते आम्हाला कधी कळलंच नाही. पण ती माझ्यासोबत खूश नव्हती, हे माझ्या लक्षात आलं…” थोडं थांबून अरुण पुढे बोलू लागला, “तुझा विश्‍वास बसणार नाही, इतकं हे कटू सत्य आहे. तिने पोलिसांतही तक्रार केलीय, कोर्टात केस चालू आहे. तिने इतके घाणेरडे आरोप केले आहेत की, सांगायलाही लाज वाटतेय…”
“कोणावर आरोप केलेत?”
“आम्हा सगळ्यांवर. अन् खास करून पप्पांवर. हुंड्यासाठी आम्ही तिचा छळ करतो, असा तिचा आरोप आहे. माहेरहून हुंडा कमी आणला, म्हणून सासू-सासरे खोलीत कोंडून ठेवतात, उपाशी ठेवतात, मारहाण करतात. आम्ही तिला जिवंत जाळण्याचाही प्रयत्न केला, असे आरोप अंजलीने केले आहेत. माझ्या चारित्र्यावरही तिने शिंतोडे उडविलेत. अन् मुलीला घेऊन निघून गेली.”
“हे सगळं कधी घडलं? तिच्या अशा वागण्याचं काही कारण तर असेल ना?” मी समस्येचं मूळ शोधू पाहत होते.
“लग्नापूर्वी बहुधा तिचं प्रेमप्रकरण असावं. तिचा कुणी क्लासमेट होता”, अरुण हळू स्वरात बोलला.
“आन्टी, हे घटस्फोट प्रकरण निकालात निघू दे. आपण अरुणचं दुसरं लग्न लावून देऊ”, मी थोडासा कठोर निर्णय घेण्याची सूचना केली.
त्यावर अत्यंत खचलेल्या स्वरात आन्टी बोलली, “अगं बाई, तिने घटस्फोट देण्यासाठी मोठी अट घातली आहे.”
“कोणती अट?”
“तिचं म्हणणं असं की, ती मुलगी अरुणचीही आहे. म्हणून मग सर्व पितृ संपत्ती मुलीच्या नावे केली जावी. अन् मुलीचं पालकत्वही तिलाच मिळावं. तिची तर इथपर्यंत मजल गेली आहे की, रोख रक्कम, प्रॉपर्टी यांचीही वाटणी आताच करून टाकावी. अन् माझ्या मृत्यूनंतर हे घरही तिला दिलं जावं.”
“फारच शहाणी दिसतेय.” मी रागात बोलले.
दुसर्‍या दिवशी दुपारी आम्ही इंदूरला परतलो. डोक्यातून अंजली-अरुणच्या जीवनाचा विचार निघत नव्हता. आमच्या बदलीचं पत्र पाहून दादासाहेब तेव्हा काय बोलले होते, त्याची मला आठवण झाली. ते म्हणाले होते, “या कागदाचा प्रभाव पाहा. कागदाच्या या तुकड्यापायी आमची मुलगी आमच्यापासून दूर चालली आहे.” नंतर लग्नसमारंभात अंजलीने त्यांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला होता, तेव्हा तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले होते, “कोणत्याही कागदाच्या तुकड्यापायी माझी ही मुलगी, मला सोडून जायची नाही.” आणि दुर्दैवाने हीच मुलगी त्यांना कागदाचा तुकडा दाखवून निघून गेली होती.
एका चांगल्या घरातल्या लोकांशी अंजलीने केलेली ही गैरवर्तणूक मला सहन होईना. म्हणून मग मी पत्ता शोधून थेट अंजलीचं घर गाठलं. तसं पाहिलं तर, अंजली आता ज्या मुक्कामावर पोहचली होती, तिथून अरुणकडे परतण्याचा कोणताही मार्ग नव्हता. कारण ती आपल्या जुन्या क्लासमेटची रूममेट होऊन त्याच्यासोबत राहत होती.
स्त्री-पुरुष लग्नाशिवाय एकत्र राहू शकतात, झोपू शकतात, गरज वाटल्यास मुलं जन्माला घालू शकतात… अन् नाहीच जमलं तर अंथरुणावरील चादर बदलतो, तसं एकमेकांना बदलूही शकतात. या सर्व गोष्टी आधुनिक युगाची भेट म्हणता येतील.
…अंजलीने मला ओळखलं. घरातल्या कॉर्नर टेबलावर ठेवलेला मुलीचा फोटो तिने दाखवला. तिला पाळणाघरात ठेवत असल्याचं तिने सांगितलं. इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्यावर मी तिला विचारलंच, “अरुणला भेटली होतीस?”
“दीदी प्लीज! अरुण या विषयावर आपण न बोलणंच बरं.” तिच्या स्वरात दटावणी होती.
“अंजली, मला फक्त एवढंच सांग की, तू असं का वागलीस?”
“दीदी, तसं पाहिलं तर ही माझी खासगी बाब आहे.


पण तुम्हाला जाणूनच घ्यायचं असेल, तर सांगते… अरुण आणि त्याच्या कुटुंबातील रूढी, परंपरा आणि नीतिनियम यात मी स्वतःला जखडून ठेवू शकत नव्हते. मला जीवनाचा उपभोग घ्यायचा आहे, आकाशात मुक्तपणे विहरणार्‍या पक्षाप्रमाणे. अरुणकडे पैसा-अडका, सुख-सुविधा भरपूर आहेत. फक्त वैचारिक स्वातंत्र्य तेवढं नाही. खरं सांगायचं तर तिथे जीवनच नाहीये. नीरस, उबग देणारे, बंदिस्त रूटीन जीवन ते लोक जगताहेत. सकाळी पूजाअर्चा, रांगोळी काढणं, झाडांना पाणी घालणं, तुळस पुजणं,
रांधा-वाढा-उष्टी काढा आणि रात्री नवर्‍याची शेज सजवा… या पलीकडे स्त्रीला तिथे जीवन नाही. घराच्या चार भिंतीत असं कोंडून घेणं मला जमणारं नव्हतंच. मला आऊटिंगला जायचं असायचं, पण आईबाबांच्या आज्ञेशिवाय अरुण काहीच करू शकत नव्हता. अशा या जगण्याला काही अर्थ आहे का? मी आपलं जीवन, माझ्या मर्जीनुसार जगू इच्छिते. कळलं?”
“असं होतं, तर मग अरुणशी लग्नच का केलंस?”
“त्याची पर्सनॅलिटी, डिग्री, संपन्नता पाहून. पण सगळं पोकळ नि बोगस! पहिल्यांदा मला जे दिसलं ते आरशासारखं लख्ख होतं. त्यात सगळं काही रंगीत दिसत होतं. पण लग्नानंतर माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला.”
“अगं पण, आपल्या जीवनाच्या सुखापायी तू अरुण आणि त्याच्या कुटुंबीयांची सुखशांती हिरावून घेतलीस? मनात आणलं असतंस,
तर तू ही परिस्थिती बदलू शकत होतीस. बाहेरच्या जगात सुख शोधण्यापेक्षा तू आपल्या आतील जगात… म्हणजे कुटुंबाच्या बाबतीत थोडा फार विचार केला असतास, तर काही तरी मार्ग निघाला असता…”
“कदाचित तसं घडलं असतंही. पण तडजोड ही फक्त स्त्रीकडूनच झाली पाहिजे, अशी अपेक्षा का? आपण आपलं वेगळं विश्‍व निर्माण करूया, म्हणून मी अरुणला हजार वेळा सांगून पाहिलं. पण तो आईबाबांचा आज्ञाधारक श्रावण बाळ. रात्री बारा-बारा वाजेपर्यंत बेडरूममध्येही यायचा नाही तो.”
“अगं, तो संस्कारी मुलगा आहे. संस्कारांच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी तू थोडीशी मुदत तरी द्यायचीस.”
“दीदी, लग्न म्हणजेच सबकुछ, असं असतं का? परस्परांवरील विश्‍वास आणि व्यक्तिगत समाधानाने संसार फुलतो, टिकतो. पण हे सगळं मला मिळालंच नाही. मग लादलेल्या या नात्याचं ओझं मी कशाला वाहवू?”
“हे सगळं समजण्यासारखं आहे अंजली. पण हुंडा, पोलीस तक्रार, खोटेनाटे आरोप म्हणजे…”
“विद्रोह करण्याचा तो माझा एक मार्ग होता. घर सोडण्यासाठीचं निमित्त पाहिजे होतं. नाही तर माझ्या चारित्र्याचे वाभाडे निघाले असते. कोण्या एकाची आहुती द्यायलाच हवी होती. नेहमी स्त्रीची दिली जाते, या खेपेला अरुणची दिली गेली.”
आता अंजलीला पटवून देण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. म्हणून मी जड मनाने घरी परतले.
मुलीच्या रूपाची तारीफ करताना आपण तिला चंद्रमुखी म्हणतो. पण चंद्रावरही डाग असतो… त्याला ग्रहणही लागू शकतं, हे मात्र विसरून जातो. सूर्यालाही ग्रहण लागतं ते चंद्रामुळेच… अरुणलाही अशाच चंद्राचं ग्रहण लागलं होतं…
कालचक्र आपल्या गतीने फिरत होतं. जिथून त्याची सुरुवात झाली, ते पुन्हा आलं. अरुणच्या जीवनाला ग्रहण लावणार्‍या चंद्रालाच ग्रहण लागलं. ज्या क्लासमेटसाठी अंजलीने अरुणचं घर टाकलं, त्याने दुसर्‍या मुलीशी लग्न लावलं. आपल्या प्रेमाचा दाखला देऊन अंजली त्याला अडवू लागली, तेव्हा त्याने तिला आरशात तिचं प्रतिबिंब दाखवलं. तो म्हणाला, “अंजली तुझ्याशी स्वातंत्र्याबाबत विचारविमर्श करता येईल. पण लग्नाच्या बंधनात अडकण्याचा विचार करता येणार नाही. लग्न म्हणजे जीवनभराचं बंधन असतं. या विवाह बंधनात अडकल्यानंतर त्या नात्याची मर्यादा आणि प्रतिष्ठा जन्मभर सांभाळावी लागते. जे तुला जमणार नाही. अंजली, मला अरुण व्हायचं नाहीये. सुख-दुःख, हार-जीत यामध्ये तसेच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
मला साथ देणारा जीवनसाथी मला हवाय. पण तुला फक्त स्वतःच्या सुखसोयींपलीकडे काही दिसतच नाही.
तू चांगली जीवनसाथी कधी होऊच शकणार नाहीस.
स्वतःच्या सुखासाठी तू अरुणला सोडू शकतेस, तर उद्या मलाही सोडशील गं. तुझा काय भरवसा? ही रिस्क मी घेऊ इच्छित नाही…”
अरुणचं घर त्यागून अंजलीने काय गमावलं? तिला याची जाणीव चांगलीच होत होती. आपल्याला जे ग्रहण लागलंय, ते क्वचितच सुटेल, हे मात्र ती पक्कं समजून चुकली होती.

  • डॉ. स्वाती तिवारी
shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

 रवी दुबेची पत्नी आणि अबु जानी यांचे अफेअर, वाचा काय म्हणाला संगीतकार (Is Ravi Dubey’s wife Sargun Mehta Having an Affair With Jaani?)

छोट्या पडद्यावर नाव कमावल्यानंतर पंजाबी फिल्म इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा बनलेल्या टीव्हीच्या सुंदर अभिनेत्रींमध्ये सरगुन…

November 20, 2024

२९ वर्षांचा संसार मोडला, ए आर रहमान आणि सायरा बानू यांचा घटस्फोट (AR Rahman, Wife Saira Announce Separation After 29 Years Of Marriage Due To Emotional Strain)

ऑस्कर पुरस्कार विजेते संगीतकार ए आर रहमान यांच्या वैयक्तिक आयुष्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत…

November 20, 2024

Romance The Night

kinky and raw sex may be good to ignite the carnal fire between two individuals,…

November 20, 2024
© Merisaheli