Marathi

जीवनसाथी (Short Story: Jeevansathi)

 • लता वानखेडे
  अमृताचे मन या लग्नाला तयार होईना. सागरसारख्या विशाल मनाच्या माणसाला, आपला भूतकाळ लपवून, त्याला अंधारात ठेवून हा संबंध जोडायला तिचं मन तयार होत नव्हतं. विवाहासारख्या पवित्र बंधनाचा स्वीकार करण्यासाठी ती असत्याच्या मार्गावर चालणार नव्हती.

 • डिसेंबर महिन्याची कडाक्याची थंडी. सकाळची वेळ. बागेतील झोपाळ्यावर बसून अमृता गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत होती. उन्हाळ्यात कोमेजून गेलेल्या लतावेलींनी आता अंगावर लाल, गुलाबी फुलांचा साज चढविला होता. निसर्गाचे हे अद्भुत सौंदर्य अमृता नयनांनी जणू पित होती.
  तरुण वयात तिचा वर्षा ऋतू आवडता होता. तासन्तास खिडकीत बसून चांदण्या रात्री ती जलधारांचा खेळ पाहात असे. ती चांदणी पाटावरची फुलं. वाटायचं जणू आकाशातल्या चांदण्याच उतरून आल्यात झाडावर. श्रावणावर तिने अनेक कविता लिहिल्या होत्या. पण आज तो श्रावण, त्या चांदण्या आणि झाडांवरची रंगीबेरंगी फुलं तिच्या मनाला फुलवीत नव्हती. त्या श्रावणधारा तिला जणू तप्त लाव्हारस वाटायच्या!
  ‘अमृता, चल बेटा. दहा वाजले. कॉलेजमध्ये नाही का जायचं?’ आईच्या प्रश्‍नाने तिची विचार श्रृंखला तुटली. थोड्या नाराज मनानेच ती उठली. ती महिला महाविद्यालयात मानसशास्त्राची प्राध्यापिका होती. तिचं राहणीमानही खूप साधं होतं. साधं जीवन, उच्च विचारसरणी. कोणालाही मदत करण्याची सतत तयारी. हाच तिचा जीवनमार्ग होता.
  सिल्कची साधी गुलाबी साडी.त्यावर मॅचिंग ब्लाऊज तिने घातला होता. गळ्यात साधी पांढर्‍या मोत्यांची माळ. तिची आई तिला म्हणाली.
  “अमृता आज लवकर घरी ये. सागर आणि त्याचे बाबा येणार आहेत आज. तुला….”
  “आई! मला लग्न करायचं नाहीये. तुला समजत कसं नाही ग. मी अजून मनानं तयार नाहीये लग्नासाठी.”
  अमृता नाराजीने म्हणाली. डोळ्यातील आसवं लपविण्यासाठी तिने खाली पाहिलं. पण मायाळू आईच्या चाणाक्ष नजरेपासून ती आसवं लपवू शकली नाही.
  “अमृता, बेटा, काळ हेच प्रत्येक जखमेवरचं औषध आहे. तुझ्या भूतकाळातील ती घटना एक अपघात होता. एक वाईट स्वप्न होतं. तू ते विसरून जायचा प्रयत्न कर. भविष्यातील सोनेरी किरणं तुझ्या जीवनात नक्कीच प्रकाश आणतील.”
  अमृता कॉलेजमध्ये आली. पण तिथेही तिचं मन लागेना. सकाळच्या आईच्या बोलण्याने तिचं मन सैरभर धावत होतं.
  “काय अमृता तुझी तब्येत तर ठीक आहे ना. चेहरा का कोमेजलाय तुझा?” मैत्रीण म्हणाली.
  “अग, डोकं दुखतंय जरा. आज मी लवकर घरी जाते. पाहुणे येणार आहेत.”
  “कोणते पाहुणे? तुला पाहायला येणार आहेत का?” मैत्रिणीच्या या प्रश्‍नावर ती गप्प राहिली.
  “हर घडी बदल रही है रूप जिंदगी कभी छांव है कभी है धूप जिंदगी”
  तिचा सेलफोन वाजला. आईचा मिस कॉल होता.
  तिला वाटले, आपलं आयुष्यपण असेच आहे. कधी सुखाची सावली तर कधी दुःखाच्या यातना. कधी फुलांचा बहर तर कधी काट्यांचा कहर! कधी उन्हाचे चटके तर कधी अमृताचा वर्षाव!
  ती घरी आली. डोकं जरा जड झालं होतं. म्हणून तरी जरा झोपली. तिला बरं वाटत होतं. पाहुणे जायची वेळ झाली होती. अबोली रंगाची साधी साडी नेसून ती तयार झाली होती. नाराज मनाने ती ड्रेसिंग टेबल समोर बसली होती. तिचे जीवन एकाएकी नीरस बनले होते. इतक्यात तिची आई आली. तिने लेकीच्या गळ्यात सोन्याची चेन घातली. साडीवर मॅचिंग बांगड्या हातात घातल्या. डोळ्यात काजळ लावले. “आकाशातली माझी परी” म्हणत आईने तिचा पापा घेतला.
  डॉ. सागर, त्याच्या बाबांसोबत आला होता. त्याचे उच्च विचार आणि साधी राहणी अमृतालाही आवडली. अमेरिकेच्या मातीतही त्याला भारतभूमीचा विसर पडला नव्हता. तेथील ऐश्‍वर्यसंपन्न जीवनाला न भाळता भारताची सेवा करण्याचे व्रत त्याने घेतले होते. सागरलाही अमृता मनापासून आवडली.
  अमृताचे मन या लग्नाला तयार होईना. सागरसारख्या विशाल मनाच्या माणसाला, आपला भूतकाळ लपवून, त्याला अंधारात ठेवून हा संबंध जोडायला तिचं मन तयार होत नव्हतं. विवाहासारख्या पवित्र बंधनाचा स्वीकार करण्यासाठी ती असत्याच्या मार्गावर चालणार नव्हती. दुसर्‍या दिवशी रविवार. तिला सुट्टी होती. मनाशी एक ठाम निर्णय घेऊन, मोबाईलवर तिने सागरचा
  नंबर लावला.
  “बोला अमृताजी!” सागरचा हर्षभरीत आवाज आला.
  “उद्या तुम्हाला थोडा वेळ आहे?… थोडं महत्त्वाचं काम होतं… तुमच्याशी थोडा वेळ मला द्याल?”
  “होय अमृताजी, मी उद्या रिकामाच आहे. बोला कुठे भेटायचंय?”
  “उद्या पाच वाजता सनराईज कॅफे.”
  “ठीक आहे. मी पाच वाजता जरूर येईन.”
  अमृता आता निश्‍चिंतपणे झोपली. तिच्या डोक्यावरचं ओझं जणू उतरलं होतं.
  अमृताने सनराईज कॅफेसमोर स्कूटी उभी केली. सागर तिची वाट पाहात उभा होता.
  दोघांचीही कॉफी पिऊन झाल्यावर अमृता बोलू लागली.
  “मला तुम्हाला माझ्या जीवनातील एक महत्त्वाची घटना सांगायचीय. माझ्या बाबांची बदली त्यावेळी सातार्‍याला होती. माझं वय सोळा वर्षांचं होतं. मी अकरावीला शिकत होते. शहराबाहेर बाबांना सरकारी बंगला मिळाला होता. बंगला एकांतात होता. माझं कॉलेजही तिथून जरा लांबच होतं. म्हणून बाबांनी मला नवीन स्कूटी घेऊन दिली होती. मला इंग्रजी विषय अवघड वाटत होता. म्हणून कॉलेज सुटल्यावर मी आणि माझ्या दोन मैत्रिणींनी प्रा. जोशीसरांकडे इंग्रजीची ट्यूशन लावली. पावसाळ्याचे दिवस होते. ट्यूशन संपवून मी स्कूटीवरून घरी येत होते. रस्त्यात अचानक स्कूटी बंद पडली. तेवढ्यात पाऊस सुरू झाला. सोबत जोराचा वाराही होता. त्यामुळे लाइटही गेले. सर्वत्र काळोख पसरला. मी मध्येच अडकले होते. भीतीने मी थरथर कापू लागले. काय करावे काहीच सुचेना. वाटले स्कूटी लॉक करावी अन् पायीच घरी निघावं. मी स्कूटी लॉक करायला वाकले, तोच माझी ओढणी कुणीतरी ओढल्याचा मला भास झाला. मागे वळून पाहते तर एका जाडजूड नराधमाने माझ्या मजबुरीचा फायदा घेतला. माझी इज्जत त्याने धुळीला मिळवली. मी बेहोश झाले. त्याने मला गवतात फेकून दिले. त्या नराधमाचा चेहरा मी अंधारात पाहू शकले नाही. माझे जीवन अंधकारमय झाले. खूप शिकून प्राध्यापिका होण्याचं माझं स्वप्न अंधारात विरून गेलं होतं. मला माझ्या शरीराची घृणा वाटू लागली. माझा संपूर्ण देह अपवित्र झाला होता. मी त्या धक्क्यातून बाहेर येत नव्हते.”
  मला तपासण्यासाठी रोज डॉक्टर मधुरा येत असत. त्यांचा स्वभावही त्यांच्या नावासारखा गोड होता. त्या मला खूप समजावून सांगत असत.

 • ‘अमृता, आता तू कॉलेजमध्ये जाऊन तुझं शिक्षण पूर्ण कर. सावर स्वतःला. अभ्यासात मन लाव. असं किती दिवस घरात झोपून आपलं भविष्य बरबाद करणार आहेस? तुझे आईबाबा तुझी फार काळजी करतात.’
  ‘आंटी. मी आता पुढे शिकणार नाही. मी कलंकित झाले आहे. अपवित्र झाले आहे. समाज माझा अपमान करेल.’ म्हणून मी रडू लागले.
  ‘अमृता, अपवित्र, कलंक हे काय घेऊन बसलीस? अग, अपघातात आपला हात, पाय तुटला तर त्यावर आपण इलाज करतोच ना? बरं झाल्यावर चालायला लागतो. तुझ्या जीवनातही हा एक घडलेला अपघात आहे. एक वाईट स्वप्न म्हणून सर्व विसरून जा. नवीन दिवसाचे नवे किरण तुला बोलावत आहे. चल नव्या दिवसाची सुरुवात करूया.’
  ‘आंटी मी निराधार आश्रमात जाणार आहे. तेथे राहून त्या लोकांची सेवा करणार आहे. मला तेथे कोणीही ओळखणार नाही.’
  डॉक्टर आँटीनी मला खूप समजावलं. माझ्या पंखात पुन्हा उडण्याचं बळ त्यांनीच दिलं. बाबांनी मुंबईला बदली करून घेतली. मी कॉलेजात प्रवेश घेतला. जिद्दीनं अभ्यास केला. प्रगतीची एकेक पायरी चढत गेले. मला माफ करा. मी तुमच्या लायकीची नाही. मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही.”
  आपली कथा संपवून अमृता रडू लागली.
  “अमृता, सागरसाठी मला तूच पसंत आहेस.”
  मागून कोणीतरी बोलले म्हणून तिने मागे वळून पाहिले. तर मागे तिच्या डॉक्टर आँटी उभ्या होत्या. ती आश्‍चर्याने उठून उभी राहिली.
  “डॉक्टर आँटी तुम्ही इथे? बसा ना.”
  “अमृता, डॉक्टर सागर माझा भाऊ आहे. तुझा भूतकाळ त्याला माहीत आहे. म्हणूनच एवढ्या निडर मुलीशी लग्न करण्याचा त्याने निर्णय घेतलाय.”
  “होय अमृता, मला तू खूप आवडलीस. तुझा खरेपणा मला फार भावलाय. अन् खरं सांगू, आपलं जीवन खूपच धकाधकीचं बनलंय. पावलापावलावर एक नवीन आव्हान, एक नवीन संघर्ष. या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आपल्या अंगी निडरपणा हा हवाच. तरच आपण या जीवनरूपी संघर्षात जिंकू शकू. होय ना! अमृता!
  माझी जीवनसाथी बनशील ना?”
  डॉ. सागरच्या या प्रश्‍नाच्या उत्तरादाखल तिने प्रेमाने डॉक्टर आँटीला मिठी मारली.
shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

लहान मुलांना धाडस आणि जिद्दीचं बाळकडू देणाऱ्या ॲनिमेटेड ‘बुनी बियर्स’ चित्रपटाचे पोस्टर लॉंच! (The Poster Launch Of The Animated Movie ‘Bunny Bears’, Which Gives Courage And Stubbornness To Children!)

कोवळ्या वयात असणाऱ्या मुलांच्या अंगी चांगल्या संस्कारांची जर पेरणी झाली, तर मुलं मोठी होऊन नक्कीच…

April 16, 2024

‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या सीझनची घोषणा, अमिताभ बच्चनचा प्रोमो व्हायरल ( Kaun Banega Crorepati 16 Promo Registration Begins Amitabh Bachchan Announces It)

'कौन बनेगा करोडपती'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमिताभ बच्चन लवकरच त्यांच्या शोच्या 16व्या सीझनसह…

April 16, 2024

लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आलिया रणबीर केलं खास, दोन दिवसांनी फोटो व्हायरल (Inside Pics of Alia Bhatt and Ranbir Kapoor’s 2nd wedding anniversary celebrations)

14 एप्रिल रोजी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली. दोघांनी…

April 16, 2024
© Merisaheli