Marathi

मैत्रिणी (Short Story: Maitrini)

मनाला पूर्णतः शांत करायला मला दहा मिनिटंच तर हवी होती. बाहेर पुन्हा गलका झाला. पण आता मला तेवढासा राग आला नाही. तनूने बाहेर या म्हणून सांगितलं आहे, तेव्हा मला जायलाच हवं. बाहेर तनूची किटी पार्टी सुरू आहे. तिच्या नऊ मैत्रिणी आल्या आहेत.

मोठ्या मुश्किलीने मी आपला राग आवरत, हळूच खोलीचं दार बंद केलं. शाश्‍वत झोपला होता. बाहेरून येणार्‍या आवाजांमुळे मला चीड आली होती. म्हणून मी शाश्‍वतच्या बाजूला जाऊन झोपले. राग आला असताना, मला कधीच झोप येत नाही. मग आता तरी कशी येणार? तेवढ्यात तनू आत आली. जवळ येऊन हळूच म्हणाली, “आई, बाहेर चला ना. सगळ्या जणी तुम्हाला बोलवताहेत. या ना.” असं म्हणून तनूने माझा हात धरला. आता मी तिला नाही म्हणू शकले नाही. लाडकी सून आहे ना माझी! पण सर्व म्हणतात की, तनू माझी सून नव्हे, मुलगीच आहे. ती इतकी चांगली आहे की, ती या घरात आल्यापासून माझ्या घरात आनंद भरून राहिला आहे. ती मला ‘आई’ अशी हाक मारते तेव्हा, मी मला मुलगी नसल्याचं दुःख विसरूनच जाते. आताही माझा राग मावळलाच होता. मी म्हटलं, “येते मी. तू हो पुढे. दहा मिनिटं जरा डुलकी काढते नि येतेच तुमच्यामध्ये.”
“ठीक आहे आई,” असं म्हणून ती गेली. मनाला पूर्णतः शांत करायला मला दहा मिनिटंच तर हवी होती. बाहेर पुन्हा गलका झाला. पण आता मला तेवढासा राग आला नाही. तनूने बाहेर या म्हणून सांगितलं आहे, तेव्हा मला जायलाच हवं.
बाहेर तनूची किटी पार्टी सुरू आहे. तिच्या नऊ मैत्रिणी आल्या आहेत. सगळ्या तिच्याच वयाच्या. त्या सगळ्या माझा मान राखतात. पण त्यांचे कपडे बघून माझा मूड खराब होतो. इतक्या पुढारलेल्या आहेत त्या की, विचारू नका. कुणी वनपीस घातलंय, कुणी लांडा स्कर्ट घालून आली आहे. दुसर्‍या एकीने टॉप आणि जीन्स घातली आहे. ती इतकी तंग आहे की, मलाच अवघडल्यासारखं वाटतंय. आणखी एकीने साडी-ब्लाऊज घातलाय;
पण ब्लाऊज असा आहे की, बघवत नाहीये. कारण त्याच्या मागच्या बाजूला कपडाच नाही.
माझी तनू मात्र चांगली आहे. तीही आधुनिक कपडे घालते; पण ते तिला शोभून दिसतात.

आज तिने सैलसर काळा टॉप आणि जीन्स घातली आहे. सगळ्यांमध्ये ती उठून दिसते आहे. किटी पार्टी असल्यामुळे सगळ्या
जणी आपापल्या मुलांना घरी ठेवून किंवा शाळेत सोडून आल्या आहेत. तनूच्या मैत्रिणींच्या कपड्यांवरून मी तिला नेहमीच म्हणते की, मुंबईमध्ये तुझ्या मैत्रिणींना घालायला हे असलेच कपडे मिळतात का गं? त्यावर ती हसते आणि म्हणते, “त्यात काय झालं आई. त्यांना आवडतात असले कपडे. ते घालून त्या मजेत असतात. त्यात काय वाईट आहे? माझ्या या सर्व मैत्रिणी खूप चांगल्या आहेत.”
मग मी तिला डिवचते, “मला सांगू नकोस. त्यांच्या कपड्यांवरून तरी तसं वाटत नाही.” यावर ती फक्त हसते.
तनूबद्दल आणि तिच्या मैत्रिणींबद्दल मी सांगितलं; पण स्वतःची ओळख करून द्यायचीच राहिली. मी माया भार्गव. बासष्ट वर्षांची रिटायर्ड टिचर. वर्षातून एकदा, तीन-चार महिन्यांसाठी खडकीहून मुंबईला आवर्जून येते. खडकीला मी एकटीच असते. तिथे माझं घर आहे. फ्रेंड सर्कल आहे. आयुष्य तिथेच गेल्यामुळे माझं मन तिथेच रमतं. तिकडे घरकामाला राधा आहे. पण माझा एकुलता एक मुलगा मनोज, सून तनू आणि नातू शाश्‍वत यांच्या बोलवण्यावरून इकडे मुंबईला यावं लागतं.
तनू ही चांगली, सुशिक्षित गृहिणी आहे. शाश्‍वतचं संगोपन चांगल्या प्रकारे करता यावं, म्हणून तिने नोकरी करण्याचा विचारही केला नाही. मला तिचं हे वागणं आवडतं. कारण मनोज बरेचदा फिरतीवर असतो. तो एका मल्टिनॅशनल कंपनीत मोठा अधिकारी आहे.


“आँटी या ना,” अरे, हा तर तनूच्या मैत्रिणीचा आवाज आहे. माझी तंद्री भंग पावली. मी हळूच दरवाजा बंद केला आणि तनूच्या आधुनिक मैत्रिणींच्या मध्ये जाऊन बसले. दरवर्षी इथे येत असल्यामुळे मी तिच्या या मैत्रिणींना चांगलीच ओळखते.
सीमा म्हणाली, “आँटी, तुम्ही होतात कुठे? या अन् आमच्यासोबत हाऊजीचा गेम खेळा.”
मी सीमाकडे बघितलं. गुडघ्याएवढा स्कर्ट तिने घातला होता. वर स्लिव्हलेस टॉप होता. ही दहा वर्षाच्या मुलाची आई आहे. शोभतं का तिला हे असे कपडे घालणं? मी म्हटलं, “नाही गं. तुम्हीच खेळा. मी अशीच बसते.”
त्यावर नीता म्हणाली, “आँटी, तुम्ही एखादा कुठलाही आकडा सांगा. आम्ही त्यावर खेळू.”
मी हाऊजीचे आकडे सांगू लागले. आपापला नंबर लागलेला पाहून सार्‍या जणी खूश होत होत्या. मी विचार केला, वीस रुपयांचं बक्षीस लागलं, यात एवढं खूश होण्यासारखं काय आहे? केवढा हा बालिशपणा! मी आकडे सांगत राहिले. आपलं सगळं हाऊस जिंकल्यावर रेखा उठून नाचू लागली. हीच ती रेखा. जिने मर्यादा सोडून ब्लाऊज घातला होता. अन् तो बघून मला खूप राग आला होता. या रेखाला साथ देत, कविता आणि अंजलीही उठून नाचू लागल्या, तेव्हा मग नाइलाजाने स्मित करावं लागलं. कारण
तनू माझ्याकडे बघत होती. याच्यानंतर खाद्यपदार्थांचा समाचार घेतला गेला. तनूच्या फरमाईशीवरून

मी दहीवडे बनवले होते. तिच्या मैत्रिणींनी अतिशय आवडीने खाल्ले. एवढ्यात शाश्‍वत उठल्याची चाहूल मला लागली. म्हणून मी तिकडे गेले. मी जितके दिवस मुंबईत राहते, तितके दिवस स्वतःहून तनूला कामात मदत करते. बिचारी एरव्ही सगळी कामं एकट्यानेच करते. तिलाही कधीतरी आराम मिळाला पाहिजे ना! सगळे लोक आम्हा दोघींना सासू-सुनेपेक्षा आई-मुलगीच समजतात. तनूचे आई-वडील देवाघरी गेले आहेत. एक भाऊ आहे. तो कुटुंबासह परदेशात स्थायिक झाला आहे.

तनूच्या सर्व मैत्रिणी निघून गेल्या. मग आम्ही दोघींनी मिळून पसारा आवरला. मनोज तर टूरवर गेला होता. डिनरसाठी बरेच खाद्यपदार्थ शिल्लक राहिले होते. आम्हा सासू-सुनेचं एक बरं आहे, असेल ते आनंदाने खातो. शाश्‍वतचं होमवर्क घ्यायला तनू निघून गेली.
पावसाचे दिवस होते. म्हणून बाहेर फिरण्याऐवजी मी घरातच फेर्‍या मारत तनूच्या मैत्रिणींचा विचार करू लागले. एक बरं आहे, तनू सगळ्यांपेक्षा बरी आहे. साधी आहे. नीता, रेखा, अंजली तर, बापरे! विचारूनच नका! अशा सुना मला लाभल्या असत्या, तर माझं एक दिवसही पटलं नसतं. पुष्कळदा मला वाटतं की, मी लहान गावातली आहे म्हणून माझे विचार असे खुजे असतील का? पण मी तरी काय करू? तनूच्या या बड्या शहरातल्या मैत्रिणींचे तोकडे कपडे मला आवडत नाहीत. आता या वयात मी स्वतःला बदलू तर शकत नाही! मनोज टूरवरून उद्या येणार होता. दुसर्‍याच दिवशी संध्याकाळी आमच्यावर संकट कोसळलं. मनोज ज्या टॅक्सीने येत होता, तिला भयंकर अपघात झाला. मुंबईचं ट्रॅफिक आणि पाऊस, त्यावर हा अपघात. मनोजसोबत त्याचा सहकारी अनिलही होता. त्यालाही जखमा झाल्या होत्या. मात्र टॅक्सी खांबावर आदळल्यामुळे ड्रायव्हर आणि मनोज यांना जास्त मार लागला. मनोजचं डोकं फुटलं होतं. लोकांच्या मदतीने अनिलनेच ड्रायव्हर आणि मनोजला हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं.
या घटनेचा फोन आला तेव्हा, माझ्या पायाखालची जमीनच सरकली. शाश्‍वतला अंजलीच्या ताब्यात देऊन आम्ही घाईघाईने हॉस्पिटलमध्ये जायला निघालो, तर नीताने आपली कार काढली. पाठोपाठ तनूच्या बाकी सर्व मैत्रिणीही पोहोचल्या. आमचे अश्रू थांबत नव्हते. मनोज आय.सी.यू.मध्ये होता. त्याच्या डोक्याला जबर मार बसला होता. दहा टाके घालावे लागले. पायांनाही इजा झाली होती. खांद्याचं हाड मोडलं होतं. थोड्याच वेळात मनोजचे इतर सहकारीही हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. ती रात्र सर्वांसाठीच त्रासाची ठरली.
तनूने आपल्या मैत्रिणींना घरी परत पाठवलं. आम्ही घरापासून साधारण चाळीस मिनिटं दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये होतो. घरी जाण्यास मन तयार होत नव्हतं. अंजलीचा फोन आला, “तुम्ही निश्‍चिंत राहा, शाश्‍वतला मी सांभाळते.”
मनोज आय.सी.यू.च्या बाहेर आला. डोक्यापासून पायापर्यंत पट्ट्या बांधलेल्या मनोजला पाहून हृदयाची धडधड थांबल्यागत झालं. औषधांच्या अंमलामुळे तो झोपला होता. कमीत कमी आठवडाभर तरी मनोजला हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार, असं डॉक्टरांनी सांगितलं.
दुसर्‍या दिवशी सकाळीच सीमा आली. ती इतक्या साध्या कपड्यात होती की, मी तिला ओळखलंच नाही. ती म्हणाली, “आँटी, मी गाडी आणली आहे. माझ्यासोबत घरी चला. शाश्‍वतला अंजलीने तयार करून शाळेत पाठवलं आहे. तुम्ही अंघोळ वगैरे आटोपून, थोडं खाऊन घ्या अन् परत या हवं तर. मग मी तनूला घेऊन जाईन. ती थोडा वेळ शाश्‍वत बरोबर राहील. शाश्‍वतला आम्ही समजावून सांगितलं आहे की, पप्पा आजारी आहेत. अन् सर्व जण त्यांच्याजवळ आहेत.”
रात्री मीच शाश्‍वतजवळ राहिले. त्याची शाळेची वेळ होताच सकाळी सकाळी अंजली टिफिन घेऊन आली. म्हणाली, “शाश्‍वत, हा तुझा शाळेचा टिफिन. अन् आँटी, हा तुमच्यासाठी नाश्ता. याला सोडून तुम्ही तयार व्हा. मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये
नेऊन सोडते.”
“राहू दे बेटा, मी ऑटोरिक्षाने जाईन,” मी बोलले.
“काही नको. अहो, ऑटोच्या हादर्‍यांनी तुमची कंबर दुखते ना,” अंजली म्हणाली. मी तिच्याकडे बघतच राहिले.


पुढील काही दिवस मी बरीच अस्वस्थ होते. एकीकडे मुलाची काळजी, सुनेची ओढाताण आणि दुसरीकडे तिच्या फॅशनेबल मैत्रिणींनी या संकट काळात दिलेला दिवस-रात्र आधार. मनोजला वेदना होत होत्या खर्‍या; पण काळजीचं कारण उरलं नव्हतं. त्याला पूर्णपणे बरा व्हायला बरेच दिवस लागणार होते. आम्ही जितके दिवस हॉस्पिटलमध्ये होतो, तितके दिवस अंजलीनेच कामवाल्या बाईकडून घराची साफसफाई करून घेतली होती. तिच्याकडे घराची चावी ठेवलेलीच होती. तनूच्या मैत्रिणींनी इतके दिवस आमच्या खाण्यापिण्याची सोय केली होती. आम्ही घरी यायचो, अन् स्वयंपाकपाणी करायला जायचो; पण त्याआधीच तिथे जेवण तयार झालेलं असायचं.
मनोजला आम्ही ज्या दिवशी घरी आणलं, त्या दिवशी तर सर्व मैत्रिणींचे नवरेही सोबत आले होते. ते हॉस्पिटलमध्येही जाऊन-येऊन होतेच. हळूहळू सर्व पूर्ववत झालं. सर्व काही पूर्वीसारखं सुरळीत झालं. बदलले होते ते फक्त माझे विचार!
मनोजच्या आजारपणात मी अस्वस्थ होते. तरीही तनूच्या मैत्रिणींकडे माझं लक्ष होतं. दिवस-रात्र मी तिच्या मैत्रिणींना जाणून घेतलं, समजून घेतलं. किती छान होत्या सार्‍या जणी! मीच किती असमंजस होते. त्यांच्या बाह्यरूपाकडे पाहून त्यांच्या अंतर्गत गुणांकडे दुर्लक्ष करत राहिले. सगळ्यांचा संसार होता, मुलं-बाळं होती, घरची कामं होती. तरीही त्या आमच्यासाठी झटल्या. ते मी कसं विसरू शकेन? मी तर आजीवन त्यांची ऋणी राहीन. माझ्या तनूला त्यांचं किती प्रेम मिळालं, किती छान साथ लाभली. नाहीतर आमचं इथे कोण होतं? त्या सगळ्या मैत्रिणी नसत्या तर, आमचे कठीण दिवस कसे गेले असते? आम्ही एकट्या, सासू-सून काय करू शकलो असतो? अन् सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या गोष्टीवरून मी आधी त्रस्त होते आणि आता मात्र हसत होते, त्या त्यांच्या कपड्यांकडे माझं जराही लक्ष जात नव्हतं. मला तर त्यांच्या चेहर्‍यावर प्रेम आणि सहयोग दाटून आलेलं
दिसत होतं.
घरातील असंख्य कामं विसरून, थोड्या वेळासाठी या सगळ्या जणी, आपल्या मर्जीनुसार नटूनथटून जर आनंद मिळवत असतील, तर काय बिघडलं? त्यांच्या आधुनिक पेहरावांमुळे त्यांचे आंतरिक गुण तर नष्ट होत नाहीत ना? त्यांचं प्रेम, त्यांचा कोमल स्वभाव, दिवस-रात्र केलेली मदत, या गुणांनी त्यांच्या आधुनिक पेहरावांवर कुरघोडी केली आहे ना!
नंतर मला आठवला तो दिवस. दहा-वीस रुपयांची हाऊजी जिंकल्यानंतर त्या किती खूश झाल्या होत्या. त्यांच्या अंगात मुलांचा उत्साह दडला आहे, हेच त्याने सिद्ध झालं ना! खेळ कोणताही असो, कोणत्याही वयात तो जिंकण्याची मजा येतेच. मला त्या सगळ्यांबद्दल खूप प्रेम वाटू लागलं होतं. माझ्या चेहर्‍यावर नकळत हास्य फुललं होतं. मला हसताना

पाहून तनूला राहावलं नाही. तिने विचारलं, “आई, एवढं हसू कशाने येतंय?”
“मनोज अगदी पूर्ण बरा झाला नं की, तुझ्या सर्व मैत्रिणींना बोलावून एक छानशी पार्टी दे. मी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवेन.” मी म्हटलं. आणि नेहमीसारखीच माझ्या मनातली गोष्ट ओळखून, “आमची चांगली आई आहे ती,” असं म्हणत तनूने मला गळामिठी घातली.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

या कारणामुळे प्रार्थना बेहेरेने सोडली मुंबई, अलिबागला शिफ्ट होण्यामागचं कारण आलं समोर ( Prarthana Behere Share Why She Shifted To Alibag)

पवित्र रिश्ता या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रार्थनाने झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ…

April 16, 2024

‘जेलर’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर (The World Digital Premiere Of The Movie Jailor Will Soon Be On Ultra Zakas Marathi Ott)

गुन्हेगाराला सुधारण्याची संधी मिळाली तर गुन्हेगाराच्या आयुष्यात काय बदल घडून येऊ शकतो, या विषयावर आधारीत…

April 16, 2024

सलमान खान केस अपडेट- दोन आरोपींसह आयपी अॅड्रेसचा शोध ( Salman Khan House Firing Case Mumbai Police Traced Ip Address Of Criminal)

सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात आणखी एक नवीन अपडेट समोर आले आहे. 14 एप्रिल…

April 16, 2024

अजय-अतुलच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये थिरकल्या नीता अंबानी, ‘झिंगाट’वर केला डान्स, पाहा व्हिडीओ (Nita Ambani Dance On Zingaat In Ajay Atul Live Concert In Nmacc)

मुंबईतील बीकेसी येथे उभारण्यात आलेल्या नीता अंबानी कल्चरल सेंटरला नुकताच एक वर्ष पूर्ण झाले आहे.…

April 15, 2024

जान्हवी कपूरने शेअर केले राधिका मर्चंटच्या ब्रायडल शॉवरचे फोटो, पज्जामा पार्टींत मजा करताना दिसली तरुणाई (Janhvi Kapoor Shares Photos From Radhika Merchant Bridal Shower Party)

सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेल्या जान्हवी कपूरने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना सोमवारची सकाळची ट्रीट दिली…

April 15, 2024

A Strange Connection

The loneliness does not stop.It begins with the first splash of cold water on my…

April 15, 2024
© Merisaheli