Marathi

मुकं करोति वाचालम्॥ (Short Story: Mukam Karoti Vachalam)


माझा जीवश्‍च कंठश्‍च मित्र मला दोन वर्षांनी भेटणार म्हणून मी हरखून गेलो होतो. गोव्याच्या घरात सामान ठेवून, मोर्‍याला न कळवताच शिरोड्याला त्याच्या घरी दत्त म्हणून उभा ठाकलो. येवा, कोकण आपलाच असा ह्या वृत्तीची ही माणसं दिलखुलास स्वागत करतात. ह्यावेळी त्याच्या घरांतील विचित्र सन्नाट्याने मी चिंतीत झालो.

अमेरिकेहून प्रोजेक्ट पुरे करून आल्यानंतर मला गोव्याच्या वैद्यकीय संस्थेमध्ये नियुक्ती मिळाली. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. निसर्गसौंदर्याने नटलेले गोवा. माझी मायभूमी. बालपणीच्या रम्य आठवणी. जवळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा गावी माझे आजोळ. तिथल्या मधाळ आठवणी. सर्वांवर कळस म्हणजे शिरोड्यात वास्तव्य करून असलेला माझा शाळू सोबती रमाकांत मोरचकर (मोर्‍या). माझा जीवश्‍च कंठश्‍च मित्र मला दोन वर्षांनी भेटणार म्हणून मी हरखून गेलो होतो. गोव्याच्या घरात सामान ठेवून, मोर्‍याला न कळवताच शिरोड्याला त्याच्या घरी दत्त म्हणून उभा ठाकलो. येवा, कोकण आपलाच असा ह्या वृत्तीची ही माणसं दिलखुलास स्वागत करतात. ह्यावेळी त्याच्या घरातील विचित्र सन्नाट्याने मी चिंतीत झालो. माझा मामेभाऊ त्याच गावात राहत होता. त्याने मला काहीच कळवले नव्हते. मी कोड्यात पडलो.
”काय मोरोबा, सगळं क्षेमकुशल ना?“
ओढलेल्या आवाजात त्याने प्रतिसाद दिला.
”हो. तसंच म्हणायचं.“
”न कळवता आलो म्हणून नाराज झालायस
की काय?“
वहिनी पाणी घेऊन बाहेर आल्या.
त्यांच्या चेहेर्‍यावर चिंतेचे सावट दिसले. तब्येतही काहीशी उतरलेली वाटली. माझा संभ्रम वाढला.
”सविता वहिनी, कशा आहात?“
”ठीक आहे.“ चेहेरा निर्विकार.
”चहा टाक जरा आंद्यासाठी.“ (आंद्या म्हणजे मी आनंद)
देवघरात काकी (मोर्‍याची आई) जप करीत होत्या. त्यांना नमस्कार केला. ”बस बाबा.“ चेहेर्‍यावर नाराजी.
माजघरात नजर टाकली तर एक 14-15 वर्षांची मुलगी शांतपणे बसली होती, जे तिच्या वयाला अजिबात शोभत नव्हते. कृश हातपाय व चेहरा फिकुटलेला. मी पुढे जाऊन
निरखून पाहिले.
”मोर्‍या, ही सुरभी ना? सुभ्या, ओळखलं नाहीस आपल्या चॉकलेट काकाला? हा आलं लक्षात. चॉकलेट दिलं नाही म्हणून रागावलीस ना?
हे घे चॉकलेट आणि बाहेर ये.“
तिने चॉकलेट घेतलेच नाही. उलट ती रडायलाच लागली.
”आंद्या, तिला बोलायला येत नाही.“ काकींनी धक्कादायक बातमी दिली.
”काय? लहानपणी चुरुचुरु बोलणार्‍या मुलीला बोलता येत नाही. कशामुळे? आजारी होती का? घशाचा काही आजार झाला होता का?


अशक्त वाटतेय. काय रे मोर्‍या?“
चहा घेऊन आलेल्या वहिनींनी आणखी एक धक्का दिला.
”गेल्या वर्षी एक दिवस दुपारी शाळेतून आली. तेव्हापासून मुकीच झाली. बोलताच येईना झालं.“
”काहीतरीच काय? शाळेत काय झालं? म्हणजे आता शाळेत जात नाही?“
”बोलायला येत नाही तर शाळेत जाऊन काय करणार? बसली आहे घरात.“ वहिनीचा उदास स्वर.
महत्प्रयासाने मी धक्क्यातून सावरलो. सुरभीचा गळा, कान, नाक वगैरे तपासले. स्पीच ऑडिओ माझा विषय नसला तरी डॉक्टर असल्यामुळे प्राथमिक ज्ञान होते.
”मोर्‍या, मला सांग हे नक्की कधी झालं. कळवायचं नाही का रे?“
”गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यांतल्या एका दिवशी मैत्रिणींबरोबर शाळेतून येत असताना एकदम हिचा आवाज बसल्यासारखा झाला. आणि काही वेळाने बाहेरच पडेना. तेव्हापासून असंच आहे.“
”अरे, त्या झाडाखालून आली होती, ते सांग ना.“ काकींची सूचना.
”कोणत्या झाडाखालून? त्याची फांदी पडली का हिच्या अंगावर?“
”पिंपळाखालून आली रे. फांदी कशाला पडायला पाहिजे? त्या झाडाखालून अमावस्येच्या दिवशी आलं की असंच होतं. शिवाय भर दुपारचे बारा वाजले होते.“
”ही एकटीच होती का?“
”नाही रे. होत्या तीनचार मैत्रिणी. पण हिलाच धरलंन
ना त्याने.“
”अण्णा महाराजांनी सांगितलं मला“ काकींचे विवेचन मला अगाध वाटले.
”आता हे अण्णा महाराज कोण?“
”गेल्या वर्षीपासून गावाच्या बाहेरच्या देवळांत येऊन राहिले आहेत. बरोबर एक शिष्य आहे. पूजा पठण, जप असा त्यांचा कार्यक्रम असतो. भक्तांना काही समस्या असल्या तर त्यांचं निवारण करतात. काही तोडगे सुचवतात. जडीबुटीची काही औषधं सुद्धा आहेत त्यांच्याकडे. गावात बर्‍याच जणांना गुण आलाय.“
”म्हणजे तू डॉक्टरकडे न जाता त्या बाबाकडे गेलास.“
”आई घेऊन गेली होती सुरभीला. बघता क्षणीच त्यांनी सांगितलं की पिंपळाखाली बाधा आहे. मंतरलेले दोरे दिलेत. हिला उपास करायला सांगितलेत. करतेय ती.“
”दिसतंय ते वहिनींच्या तब्येतीवरून. कसला रे गंड्या दोर्‍यावर विश्‍वास ठेवतोस? ही अंधश्रद्धा आहे. अज्ञानातून आलेली. विज्ञान युगाला साजेशी विचारसरणी नाहीये ही. ह्या बुवाबाबांच्या औषधाने गुण आला तर वैद्यकशास्त्र मोडीत काढायचं काय? बी. ए. पर्यंत शिकलायस ना तू? डॉक्टरांचा तरी सल्ला घ्यायचा.“
”दाखवलं ना! गोव्याहून येणार्‍या स्पेशालिस्टना दाखवलं. त्यांनी सांगितलं, स्वरयंत्राचं ऑपरेशन करावं लागेल. एक तर ते खर्चीक आहे आणि यशाची खात्री नाही. म्हणून मनात चलबिचल आहे.“
”ठीक आहे. पण म्हणून तिला अशी घरात डांबून काय होणार आहे? तिचं नाचायचं, बागडायचं वय आहे रे हे. वैद्यकीय उपाय करायचे सोडून कसल्या थोतांडाच्या मागे लागलायंस? बरं ते जाऊ दे. हिच्या ज्या मैत्रिणी त्यावेळी हिच्याबरोबर होत्या, त्यांना मी भेटू शकतो का?“
त्या मैत्रिणींशी बातचीत करून मी मनाशी काही आडाखे बांधले. त्याच पिंपळाच्या पारावर बसलो होतो. मोर्‍या त्याची आई व पत्नी संभ्रमात होते.
”मोरोबा, उद्या सकाळी आपण गोव्याला जाऊ या. माझा मित्र नाक, कान, घसा ह्यांचा तज्ज्ञ आहे. त्याचा
सल्ला घेऊ.“
”गोव्याच्याच डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलंय ना? मग हा काय निराळं सांगणार? जायचा यायचा त्रास आणि जबरदस्त फी.“
”त्याची तू काळजी करू नकोस. जाताना माझी गाडी आहे. येताना तुम्हाला कदंबच्या बसमध्ये बसवून देतो. रात्रीपर्यंत परत याल.“
”पण अण्णा महाराजांनी सांगितलंय की डॉक्टर काही करू शकणार नाहीत.“ काकींचा विरोधाचा सूर.
”काकी, त्यांचे दोरे आहेतच ना हातात? आता हे डॉक्टर काय म्हणतात ते बघू.“ नाखुषीनेच मोर्‍या तयार झाला.
घराबाहेर पडल्यामुळे असेल, सुरभी जराशी उल्हासीत वाटली. डॉक्टरांनी तपासून गोळ्या दिल्या. त्या कशा घ्यायच्या ते सांगितले. नंतर चर्चा करून डॉक्टरनी व मी कार्यवाही ठरविली.
सुरभीच्या तब्येतीविषयी मी फोनवर चौकशी करीत होतो. माझ्या मामेभावालासुद्धा लक्ष ठेवायला सांगितले होते. त्याच्या मुलीला सुरभीसोबत वेळ घालविण्याची विनंती केली होती. उपास-तपास, गंडेडोरे, अण्णा महाराजांकडे खेटे घालणे चालूच होते. पंधरा दिवसांनी मी पुन्हा शिरोड्याला मोर्‍याकडे हजर झालो. त्यावेळी सुरभीनेच पाणी आणले.
”काय सुभ्या, थोडसं बरं वाटतंय ना?“
मानेनेच होकार देत तिने हातातले चॉकलेट घेतले व किंचित हसली सुद्धा.
”मोर्‍या ही हसली का रे? आता हे बघ, त्या डॉक्टरने सुरभीला पंधरा दिवसांसाठी गोव्याला बोलावलं आहे. तिथे तिची ट्रिटमेंट होईल.“
”अरे बाप रे, म्हणजे पंधरा दिवस हिला हॉस्पिटलमध्ये ठेवायची? मला नाही रे हा खर्च परवडणार.“
”गप रे, माझं घर हॉस्पिटलच्या आवारातच आहे. तुझी वहिनीसुद्धा आली आहे. दोन दिवसांनी येऊन मी सुरभीला घेऊन जातो. ही तिला रोज हॉस्पिटलमध्ये नेईल.
ट्रिटमेंट पंधरा दिवस चालेल. परिणाम पाहून नंतरची कार्यवाही ठरवू.“
”पण ट्रिटमेंट काय असेल?“ वहिनीने घाबरतच विचारले.
”ते डॉक्टर ठरवतील. पण ऑपरेशन नक्कीच नाही.“
सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.
सुरभीची ट्रिटमेंट वीस दिवसापर्यंत लांबली. त्या दरम्यान दोन वेळा मोर्‍या आणि वहिनी येऊन गेले. वीस दिवसांनी माझी पत्नी व मी सुरभीला घेऊन शिरोड्याला गेलो.
”सुभ्या बेटा, आईला हाक मार.“
सुरभीने जोर लावून ”आ…आ“ असे म्हटले. वहिनींचा आनंद गगनात मावत नव्हता.
”सुभ्या, बाबाला नाही हाक मारणार?“
पुन्हा तिने ”बा…बा…“ असे म्हटले.
दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू पाझरले.
”भाऊजी, सुरभी बोलायला लागलीय. पण नीट बोलत नाहीये.“
”वहिनी, इतके दिवस तिच्या गळ्यातून आवाज फुटत नव्हता. आता नुकता फुटायला लागलाय. प्रॅक्टिस केल्यावर होईल सुधारणा.“
”पण इथे कसं जमणार
हे सगळं?“
”इकडच्या आरोग्य केंद्रात शितोळे नावाच्या बाई येतात. त्या हीच प्रॅक्टिस करतात. त्याला स्पीच आणि ऑडिओ थेरपी म्हणतात. त्या सराव करून घेतील. मग लागेल ती हळूहळू बोलायला.“
काकींनी आपले घोडे पुढे दामटले. ”अण्णा महाराजांनी वर्षभर उपाय केले. सुनेने उपास केले वर्षभर. त्याचंच फळ आहे हे आंद्या. तुझा डॉक्टर एका महिन्यात
काय करणार?“
”काकी, जे वर्षांत झालं नाही ते पंधरवड्यात झालं. कारण वैद्यकीय ज्ञान. तरीही सुरभी अजून पूर्णपणे बरी झालेली नाही.“
”पण झालं तरी काय होतं तिला?“
”आपण सगळे अण्णा महाराजांकडे जाऊनच
खुलासा करू.“
आमची वरात मठात दाखल झाली.
”नमस्कार अण्णा महाराज, सुभ्या बेटा. अण्णांना
हाक मार.“
”न्ना… न्ना…“ अशी अक्षरे ऐकून अण्णा चपापले,
पण क्षणभरच.
”साहेब, वर्षभर आम्ही कसून प्रयत्न करतोय. माईंची तपस्या, वहिनींचे उपासतपास आणि आमची साधना… आला ना गुण?“
”अरे वा! पण काय झालं होतं हिला?“
”अहो काय सांगू? त्या पिंपळाला टांगून एका मुलीने जीव दिला होता. तिच्या भुतानं हिला झपाटलं. आता जायला लागलंय
ते भूत.“
”मी त्या पिंपळाला लोंबकळलो. त्याच्या पारावर बराच वेळ बसलो. हिच्या मैत्रिणीसुद्धा होत्या सोबत. आम्हाला कोणालाच नाही झपाटलं.“
”सगळ्यांनाच झपाटत नाही. या मुलीचं प्राक्तनच तसं होतं.“
”आणि तुमच्या प्राक्तनात हिच्या पालकांचा पैसा होता.“ मी सुद्धा आवाज चढवला.
”काय म्हणायचंय तुम्हाला? माझ्यावर संशय घेताय?“
अण्णा गरजले.
”ओरडण्याने खोट्याचं खरं होत नाही. लबाडी करून लोकांना लुबाडण्याच्या वृत्तीने तुम्हाला झपाटलंय. खरी गोष्ट फार निराळी आहे.“ मी चवताळून बोललो.
”काय आहे सत्य?“ अण्णांचा आवाज नरमला होता.


”सुरभी जन्मतःच मुकी नाही. ती बोलत होती पण तोतरी. वर्गातल्या मुली तिला तोतरी तोतरी असं चिडवायच्या. त्यामुळे ती बोलणं टाळायला लागली. आतल्या आत कुढायला लागली. शिक्षक सुद्धा तिला रागावत होते. कायमचे आघात झाल्यामुळे तिचं मन काही व्यक्त करणं विसरूनच गेलं. त्याचा परिपाक म्हणजे मुकेपणा. कायम दाबून ठेवलेल्या भावना तिला निराशेच्या गर्तेत नेऊ लागल्या होत्या. ही शारीरिक नाही तर मानसिक समस्या होती.“
”मग ह्याच्यावर तू उपाय तरी काय केलेस?
फक्त त्या गोळ्या?“
”त्या गोळ्या शक्तिवर्धक म्हणजे टॉनिक होत्या. खरं टॉनिक हवं होतं तिच्या मनाला. ते माझ्या डॉक्टर मित्राने ओळखलं. ही सगळी पार्श्‍वभूमी मला सुरभीच्या मैत्रिणींनी सांगितली. गोव्याला मोकळ्या वातावरणात तिच्या मनाला उभारी आली. आजूबाजूची मुलं सुद्धा यायची. तिचं समुपदेशन केलं. निराशेच्या गर्तेतून बाहेर काढलं. नंतर बोलायला शिकवलं. तिच्या स्वरयंत्राला काहीही झालेलं नाही. अजून दोन महिन्यांनी ती व्यवस्थित
बोलायला लागेल.“
”हे सगळं आपणहून होईल का?“ वहिनींची रास्त शंका.
”आपणहून कसं होईल वहिनी? त्यासाठी इथल्या आरोग्य केंद्रात तिला रोज जावं लागेल. तेवढं तुम्हाला करावं लागेल.“
”करेन मी भावोजी. तुम्ही खूपच मदत केलीत आम्हाला.“
”मग माझी फी?“
”कोंबडी वडे.“
”अगदी बरोबर. राहणार आहे मी दोन दिवस. आता आधी ह्या अण्णा महाराजांना कोणता नैवेद्य द्यायचा ते बघू या.
काय म्हाराजा?“
”मला काही नको. मी जातो दुसरीकडे.“
”आधी सुरभीच्या हातातले गंडेदोरे सोडा. दुसरीकडे अजिबात जायचं नाही. कारण तिकडच्या लोकांच्या हातात गंडेदोरे बांधून त्यांना गंडवणार, तेव्हा इथेच ह्या मठात राहायचं. काम करून खायचं. फुकटचं नाही. हे गाव तुम्ही सोडूच शकत नाही. तुमचे फोटो आहेत माझ्याकडे. माझा भाऊ पोलिसात आहे. तो तुम्हाला कुठूनही शोधून काढील.“
”हो. डॉक्टरसाहेब, तुम्ही सांगाल तसंच वागेन.“ अण्णा नरमले.
घरी आल्यावर मी त्या सर्वांचे बौद्धिकच घेतले.
”मोर्‍या, काकूंचं एक राहू दे. पण तू सुद्धा सारासार विचार करू शकला नाहीस ना? अंधश्रद्धा आणि कर्मकांडामुळे आपल्या सर्वस्वाचा नाश होतो. गंडेदोरे, अंगारेधुपारे यांनी कुणाचा उद्धार होत नाही. मनात श्रद्धाभाव जरूर असावा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एखाद्या गोष्टीवर, व्यक्तीवर किंवा शास्त्रज्ञावर आपली श्रद्धा असते. डॉक्टरांनी दिलेलं औषध विश्‍वासाने घेतलं तरच गुण येतो. सकारात्मक विश्‍वासाला श्रद्धा म्हटलं तर नकारात्मक विचाराला अंधश्रद्धा म्हणता येईल. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत. श्रद्धा माणसाला प्रगतिपथावर दौडण्याची शक्ती देते व अंधश्रद्धा माणसाच्या बुद्धीला पंगू बनवून एकाच जागी जखडून ठेवते. म्हणूनच बुद्धीचा कस लावून विचार करावा.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

लवकरच आई होणाऱ्या दीपिका पादुकोणने भरतकाम सुरू केलं असल्याचा फोटो केला शेअर (Deepika Padukone Tries Her Hands On Embroidery During Pregnancy – Fans React With Love)

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलीवूडचे रोमॅंटिक कपल नेहमीच चर्चेत असते. लग्नाच्या सहा वर्षांनंतर…

April 17, 2024

मुलगा की मुलगी? रणवीर सिंहने दिलेल्या उत्तरामुळे जिंकली चाहत्यांची मनं (Ranveer Singh wants Baby Girl or Baby Boy, Actor Reveals in interesting way…)

बॉलिवूडचे सुपरस्टार जोडपे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण काही महिन्यांतच आई-वडील होणार आहेत. रणवीर सिंग…

April 17, 2024

मुकं करोति वाचालम्॥ (Short Story: Mukam Karoti Vachalam)

रेखा नाबर माझा जीवश्‍च कंठश्‍च मित्र मला दोन वर्षांनी भेटणार म्हणून मी हरखून गेलो होतो.…

April 17, 2024

श्रीराम नवमी : ‘मुखी राम विश्राम तेथेच आहे’ (Shri Ram Navami)

रामनवमी हा सण चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो. आज राम नवमी आहे. भगवान…

April 17, 2024
© Merisaheli