Marathi

शाप की कोप (Short Story: Shaap Ki Kop)

  • नीलता

  • कौशलजींचं निधन झालं आणि एक वर्षाच्या आतच एके संध्याकाळी वादळी वार्‍या-पावसाने त्यांच्या दारातील ते औदुंबराचं झाडं उन्मळून पडलं. झाडाखाली असलेल्या दिनेशच्या रिक्षेचा अगदी चेंदामेंदा झाला. झाड पडल्यामुळे तेथील दत्त मंदिर भंगलं. त्यातील मूर्तीही भंगली. हे असं का व्हावं?

कौशल पंडित हे गायक-नट होते. अभिनय हा त्यांना परंपरेने मिळालेला वारसा होता आणि गायनाची आवड उपजतच होती. त्या दोन्ही गुणांमुळे ते संगीत नाटकात गाजत होते. त्यांना वयाच्या मानानं खूप लवकर यश लाभलं होतं. मात्र या कलागुणांमुळे त्यांचा शाळेशी फारसा संबंधच आला नव्हता. वडील नट होते… या व्यवसायातील चढउतार त्यांना माहीत होते. त्यांनी मुलाला समजावत एकदा म्हटलं होतं, “कौशल, बाळा, सिनेमा-नाटकात काम करणं हे ठीक आहे रे. पण पोटापाण्यासाठी नोकरी कर. शिक्षण घे.” वडिलांनी त्यांना चार ठिकाणी चिकटवलंही होतं. पण हा गुणी मुलगा कुठेही आठवडाभरापेक्षा जास्त दिवस टिकला नाही.
कौशलजींची संगीत नाटकं, विनोदी-गंभीर सिनेमे गाजत होते. प्रसिद्धी-पैसा मिळत होता. तरुण वयात त्यांनी शौकही खूप केले. मुलाचं हे लक्षण पाहून बापाने त्यांचं लग्न लावून दिलं. कौशलजींचा संसार सुरू झाला. त्यांना तीन मुलगे आणि एक मुलगी झाली. मुलीनं या क्षेत्रात थोडंफार नाव कमावलं. थोरल्या मुलानं नववीत शाळा सोडली आणि फोटोग्राफीचा उद्योग सुरू केला. त्याची प्रगती होत गेली. कुणाचीच जबाबदारी नको, म्हणून तो बायका-मुलांसह घराबाहेर पडला. दोन नंबरचा मुलगा दारुडा निघाला. त्याला कौशलजींनीच घराबाहेर काढलं.
कौशलजींनीही शौक केले होते, मात्र स्वतःच्या हिमतीवर. त्यांची ‘एकच प्याला’ नाटकातली दारुड्या तळीरामची भूमिका गाजायची, पण म्हणून त्यांनी कधी दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नव्हता. धाकटा मुलगा दिनेशही काहीच करत नव्हता. प्रसिद्धीच्या शिखरावर असणारे कौशलजी घरच्या या विस्कटलेल्या घडीमुळे, मुलांच्या नाकर्तेपणामुळे व्यथित होत. तरीही त्यांनी आपलं कर्तव्य म्हणून दोन मुलांना व मुलीला भरपूर पैसा दिला होता. धाकट्या मुलाला तर राहतं घर दिलं होतं.
त्याच सुमारास त्यांच्या राहत्या बंगल्यातील पुढील आवारात एक औदुंबराचं रोपटं उगवलं. श्रद्धाळू कौशलजींनी त्या जागी एक लहानसं दत्त मंदिर बांधलं. यामुळे त्यांना मानसिक समाधान लाभत होतं. तिथे दत्ताची नित्य पूजा होऊ लागली. कौशलजी बहुतेक दौर्‍यावरच असत, तरी मुलगा दिनेश दत्ताची पूजा-आरती मनोभावे करीत असे. पुढे दिनेशचंही लग्न झालं. थोड्याच दिवसात कौशलजींची पत्नी निवर्तली आणि त्यांचे भोग सुरू झाले.
दारुडा मुलगा घरी परतला. “या घरात राहायचा मला हक्क आहे. मी इथेच राहणार”, असं म्हणून घरातच राहू लागला. भावाभावांत भांडणं होऊ लागली. थोरला मुलगाही लांब राहून, पैसा मिळत असूनही घरावर दावा करू लागला.
एके दिवशी सकाळी दारुडा झोपेतून उठलाच नाही. बापाला शंका आली की, हा घातपात असावा. पण प्रकरण मिटवलं गेलं. तरी चर्चा होतच राहिली. कारण फोटोग्राफर मुलाने भावाचे फोटो सर्वत्र प्रसारित केले होते. तो आता बापाच्या मागे लागला होता. म्हणत होता, “बाबा, त्याला पाठीशी घालू नका. मी त्याला पोलिसात देईन. तुमचीच नाचक्की होईल. मला पैसे द्या.”
खरं तर, बापाच्या कमाईवरच ते जगत होते. स्वतःच्या पायावर उभे राहायची एकाचीही लायकी नव्हती. त्या उतारवयात बापाला सांभाळण्याऐवजी त्याला संपवायलाच निघाले होते. कौशलजींचं वय जरी उताराला लागलं असलं, तरी ते अजून सिनेमा-नाटकात हुकमी एक्का होते. संपूर्ण सिनेमा ते स्वतःच्या अभिनयावर पेलत होते. तरी त्यांना घरी समाधान लाभत नव्हतं.
दिनेशला काहीच कमाई नव्हती. कौशलजींनी विचार करून त्याला एक रिक्षा घेऊन दिली आणि त्याची उपजीविका सुरू झाली. तरी ऐतखाऊ मुलाला ते कष्ट नको झाले होते. बापाने मात्र त्याला स्पष्ट सांगितलं होतं, “रिक्षेच्या कमाईवर उभं राहायचं. नाही तर थोरला घरात येईल आणि तुला जेलमध्ये जावं लागेल. मी प्रकरण मिटवलंय, त्याअर्थी मला खरा प्रकार माहीत आहे. तेव्हा जरा सांभाळूनच राहा. तरी मी तुझ्या पाठीशी आहे.”
त्यांनी दिनेशला तर पाठीशी घातलं, पण नंतर त्यांनाच त्याची भीती वाटू लागली. त्यांना वाटलं, हे आपण काय बोलून बसलो? ‘मला खरा प्रकार माहीत आहे!’ म्हणजे आपण त्या घटनेचे साक्षीदार आहोत! मग ज्याने भावाला संपवलं, तोच आपलाही काटा काढू शकतो. पण दिनेशच काकुळतीनं म्हणाला होता, “बाबा, खरंच तसं काही नाही. तोच कुठेतरी विषारी दारू पिऊन घरी आला असेल. तुम्ही प्रकरण मिटवायला नको होतं. केस पोलिसात जायला हवी होती. खरं कारण पुढे आलं असतं. भाऊ गप्प झाला असता.”
त्याच्या या अशा बोलण्याने कौशलजींनाही समजेनासं झालं होतं की खरं काय! पण त्या वेळेपासून त्यांची मुलाबद्दलची भीती मात्र कमी झाली होती. तरी त्यांचं मनःस्वास्थ्य हरवलं ते हरवलंच. पुढे नाटकात काम करत असतानाच त्यांचा स्टेजवरच मृत्यु झाला. त्यांच्या इच्छेप्रमाणे, आवडत्या कामात रत असतानाच त्यांना मृत्यु आला. हे जरी खरं
असलं, तरी त्यांचा मृत्यु घराबाहेर…
स्वतःच्या मुलांपासून दूर… दूरच्या गावी… परक्या लोकांमध्ये झाला होता. म्हणजेच तोही एक प्रकारे अपघाती मृत्युच होता.
नंतर त्यांच्या मुलांनी त्यांना घरी आणलं. तिथे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी स्थानिक जनसमुदाय लोटला होता. चाहत्यांनी सजवलेल्या गाडीतून त्यांची अंत्ययात्रा काढली. वृत्तपत्रवाल्यांनी त्यांना प्रसिद्धी दिली. तिथे अनेकांनी खर्‍या-खोट्या शब्दांत आपल्या भावना बोलून दाखवल्या. कौशलजींच्या देहावर हारावर हार पडत होते. हे सारं खरं! तरी कौशलजींच्या मनात मुलांबद्दलची काळजी, त्यांच्यातील दुही असणारच. हे शल्य मनात ठेवूनच त्यांचा आत्मा पंचतत्वात विलीन झाला असणार!
एक पर्व संपलं. एक हाडाचा, सच्चा तळमळीचा कलाकार काळाच्या आड गेला. त्यांच्यावरील प्रेमानं त्यांच्या चाहत्यांना नक्कीच दुःख झालं असणार! पण आपला प्रेमळ पिता गेला, त्याचं दुःख त्यांच्या मुलांना कितपत झालं असेल? याचंही शल्य त्या आत्म्याला सलतच असणार! का ‘आपण मेलं, जग बुडालं!’ असा विचार करून त्यांचा आत्मा शांतपणे पुढील मार्गक्रमण करीत असेल! माहीत नाही.
कौशलजींचं निधन झालं आणि एक वर्षाच्या आतच एके संध्याकाळी वादळी वार्‍या-पावसाने त्यांच्या दारातील ते औदुंबराचं झाडं उन्मळून पडलं. झाडाखाली असलेल्या दिनेशच्या रिक्षेचा अगदी चेंदामेंदा झाला. झाड पडल्यामुळे तेथील दत्त मंदिर भंगलं. त्यातील मूर्तीही भंगली. हे असं का व्हावं?
सार्‍यांनी दिनेशला समजावलं, “तू पुन्हा दत्त मंदिराची उभारणी कर. त्या जुन्या मूर्तीचं विसर्जन कर. नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना कर.” पण रिक्षेचा धंदाच बंद पडल्यामुळे, तो यातलं काहीच करू शकत नव्हता. त्याची रोजीरोटीच बंद झाली होती. त्याचे
हाल होत होते. त्याच्या मनात आलं,
“बाप गेला आणि अरिष्ट कोसळलं.”
त्याने भावाला आपली परिस्थिती सांगितली. भाऊ म्हणाला, “दिनू, झाड पडलं. मंदिर भंगलं. आपल्यावर दत्तात्रेयाचीच अवकृपा झाली असावी.”
“पण का? मी तर त्याची नित्यनेमाने मनोभावे पूजा करत होतो.”
“हो, सारं खरं. आता तू भाड्याने
रिक्षा चालवायला सुरुवात कर.”
त्याला भावाचा सल्ला पटला. त्याने पुन्हा भाडोत्री रिक्षा चालवायला सुरुवात केली. तरी त्याच्या मनात आलं, ही शापित वास्तू असावी.
ही बिल्डरला विकावी. नवीन इमारत उभी राहिल्यावर वास्तू चांगली होईल. आपल्याला पैसा व जागा मिळेल. येथेही त्याने मोठ्या भावाचा व बहिणीचा सल्ला घेतला. त्यांनाही
त्याचा विचार पटला. फुकटात चार
पैसे मिळणार असतील, तर कोण कशाला सोडेल?
त्यांचा बिल्डरशी व्यवहार झाला. करार झाला. ‘स्वरानंद’ या बैठ्या बंगल्याच्या जागी तीन मजली इमारत उभी राहिली. एका कुटुंबाच्या जागी तिथे नऊ कुटुंबं राहू लागली. सारे पैसेवाले होते. पण पैसा म्हणजे समाधान नव्हे. तिथे बहुतेक तरुण जोडपी राहायला आली होती. आज त्या गोष्टीला तेरा वर्षं झालीत.
नवीन जागेचा पहिला दणका दिनेशलाच बसला. त्याची तरुण पत्नी किरकोळ दुखण्यात दगावली. त्याने ती जागा विकली आणि तीन वर्षांच्या मुलीला बरोबर घेऊन, ती जागा सोडली. जिथे त्याचा जन्म झाला होता. जिथे त्याचं बालपण, तारुण्य गेलं होतं, ती जागा एका पेठकर नावाच्या व्यक्तीने खरेदी केली. त्यांना लग्नाच्या दोन मुली होत्या.
त्या जागेत आजपर्यंत कुणीही सुखी नाहीत. त्या तेरा वर्षांत प्रत्येकाचेच तीन तेरा वाजलेत. पेठकरांच्या मोठ्या मुलीनं झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्त्या केली. धाकटी बिजवराशी लग्न करून गेली.
कुटुंब नंबर दोन. त्यांचा एकुलता एक मुलगा घरजावई झाला. सासुरवाडीला राहायला गेला.
नंबर तीन. ‘स्वरानंद’मध्ये आल्यावर लग्नाला चार वर्षं उलटल्यावर एकीला सुंदर मुलगा झाला. दोन वर्षांत पाठोपाठ दुसराही झाला. त्यांना वाटलं, हा नक्कीच या नव्या जागेचा गुण असावा. पण… दोन्ही मुलांची चालणं, बोलणं यातील प्रगती झपाट्याने होत होती. थोरला तीन वर्षांचा झाला आणि त्याची एकाएकी अधोगती होऊ लागली. त्याचं बोलणं बंद झालं. चालणं थांबलं. पुढे पुढे तो फक्त आडवाच राहू लागला. त्याच्या तोंडातून विचित्र आवाज येऊ लागले. त्याला काही समजेनासंच झालं. डॉक्टरी उपाय पुष्कळ झाले. नवस सायास झाले. एका डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, “हा आठ वर्षांच्या वर जगणार नाही.” आणि तो चार वर्षं अंथरुणावर पडून होता. तो कुणाला ओळखत नव्हता. तो आठव्या वर्षी गेला. पण त्या दुर्दैवी आईवडिलांचं दुर्दैव एवढ्यावरच संपलं नाही. त्यांचा धाकटा मुलगाही त्याला चौथं वर्ष लागताच तसाच झाला. तोही चार वर्षं अंथरुणावर लोळागोळा होऊन राहिला आणि आठव्या वर्षी गेला. ती मुलं कायम डोळ्यापुढे येत राहणार!
याला काय म्हणायचं? जागेचा गुण? कोप? का शाप? का त्या मातापित्यांचे भोग?
तेथील रहिवाशांना नंतर त्या जागेवरील दत्त मंदिराची घटना समजली. तेव्हा त्यांनी ती जागा शांत, पवित्र व्हावी म्हणून पुन्हा नव्याने दत्त मंदिराची स्थापना करावी, असा विचारही मांडला. पण तो कोणी उचलून धरला नाही. एकाने पुन्हा इशारा दिला की, “जोपर्यंत या जागी दत्ताची स्थापना होत नाही, तोपर्यंत या वास्तूत अशा घटना घडतच राहतील.” पण ज्यांना त्याची झळ पोहचली नव्हती, त्यांनी ही गोष्ट मनावर घेतली नाही.
कुटुंब नंबर चारमध्ये नवीन लग्न झालेलं जोडपं आणि सासू होती. तीनच माणसं. त्या तिघांची तोंडं एकमेकांकडे होती. ते एक आदर्श कुटुंब होतं. पण ते या जागी आलं आणि त्यांच्यात भांडणं सुरू झाली. आवाज बाहेर जाऊ लागले. एकाच घरात सासू-सुनेच्या दोन वेगळ्या चुली झाल्या. तरीही भांडणं मिटेनात. शेवटचा पर्याय म्हणून मुलाने आईला वृद्धाश्रम दाखवला. आता घरात नवरा-बायकोची भांडणं होत आहेत.
सासू-सासरे-मुलगा-सून असंही एक चौकोनी सुखी कुटुंब होतं. सासर्‍यांनी या जागेत सारा पैसा घातला, पण सुनेनं त्यांना वृद्धाश्रमात पाठवलं. थोड्याच दिवसात मुलाचा अपघाती मृत्यू झाला. त्यांची दीड वर्षांची मुलगी होती. शेवटी सुनेनं स्वतःच्या गरजेसाठी सासू-सासर्‍यांना घरी आणलं. आजी-आजोबांचा जीव नातीत रमताच, त्यांच्या जिवावर सून नोकरीसाठी बाहेर पडली.
एका घरात एक उच्च पदस्थ घरातील तरुण जोडपं राहत होतं. त्यांना सहा वर्षांचा मुलगा होता. नवरा-बायकोची सतत भांडणं होत. त्याला कारण त्याची नवीन प्रेयसी. आपल्या भांडणाचा मुलावर विपरीत परिणाम होऊ नये, म्हणून पत्नी सामोपचाराने घेत असे. पण सहनशक्तीला मर्यादा होती. एके दिवशी त्यानेच राहतं घर बायकोच्या नावे केलं आणि तो घर सोडून निघून गेला. आज तो ‘तिच्या’समवेत राहतोय आणि बायको सहा वर्षांच्या मुलाला घेऊन एकटी राहतेय.
पुढच्या कुटुंबात पैसा अमाप होता. तोही बिल्डर! पण दारूच्या व्यसनाने पैसा पुरेना. पुढे कामं मिळेनात. त्याच्या बायकोने त्याला ‘व्यसन मुक्ती केंद्रात’ ठेवलं. तिथून तो दोन महिन्यांनंतर घरी परतला. मात्र पुन्हा तेच! कोणतंही व्यसन हे मनानेच सुटतं. कोणत्याही केंद्रात त्याच्यावर फक्त उपचार होतात. असो.
कुणी आर्थिक विवंचनेत! कुणी दुखण्याने ग्रासलेला! तर कुणाकडे मनुष्यहानी! ‘स्वरानंद’तील आनंदच हरपलाय. तेथील प्रत्येक कुटुंबच कशानं ना कशानं पिडीत आहे.
खरं तर, अशा समस्या कुठे ना कुठे असतातच. पण या ‘स्वरानंद’मध्ये प्रत्येकाच्याच वाट्याला काही ना काही भोग आहेच! तेथील कोणतंच कुटुंब सुखी समाधानी नाही. आता ती कोपर्‍यावरची इमारत बदनाम झालीय. त्या जागेबद्दल लोक काहीही बोलतात.
“त्या जागेत कुणाचा खून झाला होता.”
“त्या जागेत कुणाचा तरी बळी दिला गेलाय.”
“तिथे रात्री अपरात्री कुणी तरी फिरतं.”
“त्या जागी रात्री कुणाच्या तरी रडण्याचा आवाज येतो.”
वगैरे! वगैरे!!
आता त्या जागेबद्दल काहीही उठवायचंच, तर मग काहीही बोलावं! मात्र हे प्रत्यक्ष कुणी ऐकलं नाही… कुणी पाहिलं नाही… अफवांची खात्री कोण करणार? तरीही एक नक्कीच! की तिथे काही तरी आहे.
वास्तूचा दोष! म्हणजे दूषित वास्तू किंवा वास्तूचा कोप किंवा कुणाचा तरी तळतळाट, कुणाचा तरी शाप! आता हे शोधायला खोलात कोण शिरणार? त्यामुळे कुणीतरी वास्तू सोडून जातोय, तर कुणाची जागाच विकली जात नाहीये. तर कुणी ठरवताहेत की, ही ‘स्वरानंद’ची वास्तू पाडून पुन्हा नव्याने त्याची उभारणी करावी. त्यामध्ये सारे दोष नष्ट होतील. पण यावरही त्यांच्यामध्ये एकी होत नाहीये.
“तुका म्हणे भोग सारे।
गुण येईल अंगारे।”
या उक्तीप्रमाणे तेथील रहिवाशांचा भोग संपायचाय! का त्या वास्तूचाच भोग संपायचाय! निर्जीव वास्तूलाही भोग असतो? असेलही कदाचित! पण एक की, ही वास्तू निर्जीव नसते. त्यांनाही भावभावना, भोग असतात. पण ते समजून घ्यायची कुवत माणसामध्ये नसते. ज्यांच्यामध्ये अशी ताकद असते, ते स्पष्ट इशारा देत सांगतात की,
“ती वास्तू घेऊ नका.”
किंवा
“ती वास्तू घ्या. ती शांत, पवित्र आहे.”
किंवा
“तुमची ही पवित्र वास्तू तुमच्या सततच्या भांडणामुळे अपवित्र बनली आहे. त्या जागेत अमुक एक पूजाविधी करावा लागेल.” वगैरे. मानणारे मानोत आणि न मानणारे सोडून देवोत! पण हे शास्त्र आहे. मात्र त्याचा आधार घेऊन लोकांना फसविणार्‍यांचा धंदाही आजकाल जोरात चाललाय, मात्र बाकीच्या गोष्टींशी आपल्याला काही देणं घेणं नाही. पण माणसाचं ज्याप्रमाणे वास्तूवर प्रेम जडतं, त्याचप्रमाणे वास्तूचंही प्रेम त्या घरात राहणार्‍या माणसांवर असतं. जडतं म्हणा. माणूस दिवसभर कुठेही कितीही फिरला तरी, तो मुक्कामाला स्वतःच्या वास्तूतच परत येतो. तिथेच त्याला शांत वाटतं, याचं कारण हेच!
एवढ्या वर्षानंतर दिनेशला आजही आवाज ऐकू येतात… वडिलांचे शब्द कानी येतात म्हणे. ते म्हणतात,
“दिनू, वडिलोपार्जित आपली वास्तू तू पैशासाठी बिल्डरला विकलीस.
स्वतःचं घर मोडून नंतर भाड्याच्या घरात राहायला गेलास. का रे? स्वरानंदचा आनंद गमावलास. घर
बंद पाडलंस. पुन्हा स्वतःची वास्तू होणार आहे का? या गोष्टीचं मला फार दुःख होतंय.”
हे त्यांचं दुःख त्या वास्तूतच झिरपतंय का? तो त्यांचा शाप? वास्तूचा कोप? की कुणाचा भोग? माहीत नाही इथे पुढे काय घडेल? तेही माहीत नाही. पण शाप, कोप लागतो.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

बीमारियों से दिलाएंगी छुटकारा अदरक की ये इफेक्टिव होम रेमेडीज़ (11 Surprising Health Benefits Of Ginger)

यूं तो अदरक हमारे रोज़मर्रा के खानपान में शामिल ही रहता है, फिर वो सुबह…

April 16, 2024

लहान मुलांना धाडस आणि जिद्दीचं बाळकडू देणाऱ्या ॲनिमेटेड ‘बुनी बियर्स’ चित्रपटाचे पोस्टर लॉंच! (The Poster Launch Of The Animated Movie ‘Bunny Bears’, Which Gives Courage And Stubbornness To Children!)

कोवळ्या वयात असणाऱ्या मुलांच्या अंगी चांगल्या संस्कारांची जर पेरणी झाली, तर मुलं मोठी होऊन नक्कीच…

April 16, 2024

‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या सीझनची घोषणा, अमिताभ बच्चनचा प्रोमो व्हायरल ( Kaun Banega Crorepati 16 Promo Registration Begins Amitabh Bachchan Announces It)

'कौन बनेगा करोडपती'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमिताभ बच्चन लवकरच त्यांच्या शोच्या 16व्या सीझनसह…

April 16, 2024
© Merisaheli