Marathi

आरंभाचा अंत (Short Story: Arambhacha Anta)


वहिनीमामी सर्वांचे लाडकोड पुरवायची. वाढदिवस अगत्याने साजरे करायची. जितक्या आस्थेने आपल्या नातेवाईकांची देखभाल करायची तितक्याच आपलेपणाने जावांच्या आप्तेष्टांचीही. या कामाच्या रगाड्यासंबंधी तिची काही तक्रारसुद्धा नसायची. तक्रार करायची असती तर तिने नियतीविषयी केली असती.


“वहिनीमामी, अग वहिनीमामी, कुठे आहेस तू? पोटात भुकेचा डोंब उसळलाय. कुठे गायब झालीय ही?”
“मी आणि गायब होईन? तुझे मामा बरे गायब होऊ देतील? मागील दारी जरा आवराआवर करीत होते. भूक लागलीय ना? मला माहीत होतं आज तू येणार ते. मस्तपैकी ढोकळा आणि गाजर हलवा केलाय.”
“वॉव. दोन्ही माझ्या आवडीचे. मस्तच ट्रिट. मी येते पटकन.”
मग जेवणार्‍या टेबलावर गप्पांच्या मैफलीत ढोकळे आणि गाजर हलव्याचा चट्टामट्टा. वहिनीमामी म्हणजे माझी मोठी मामी. सर्वांचे लाडकोड अगदी निगुतीने पुरविणारी. दिवसभर कामाच्या रगाड्यात असून चेहर्‍यावर नाराजीची छटासुद्धा नसायची. ठेंगणी, ठुसकी, गोरीपान मामी, आपल्या मोठ्या अंबाड्यावर भरघोस गजरा माळला की, जणू काही लक्ष्मीच भासायची. मी तर तिची खूपच लाडकी. लग्न होऊन ती या घरात आली आणि लगेच माझा जन्म झाला. म्हणून तिचं आणि माझं गूळपीठ. आई सांगते, “तू फक्त दूध प्यायला माझ्याकडे. इतर सगळा वेळ तू वहिनीच्या ताब्यात.” मोठी आई म्हणजे माझी आजी तिला दटावायची, “सुने, अगदी लाडोबा केलायस तिचा. सासरी गेल्यावर काय करणार?” हसून वहिनीमामी उत्तर देई, “सगळ्यात सरस ठरणार.”
वहिनीमामी सर्वांचे लाडकोड पुरवायची. वाढदिवस अगत्याने साजरे करायची. जितक्या आस्थेने आपल्या नातेवाईकांची देखभाल करायची तितक्याच आपलेपणाने जावांच्या आप्तेष्टांचीही. या कामाच्या रगाड्यासंबंधी तिची काही तक्रारसुद्धा नसायची. तक्रार करायची असती तर तिने नियतीविषयी केली असती. सर्वांचे निगुतीने करणार्‍या वहिनीमामीला
स्वतःचं अपत्य नव्हतं. पण त्याबद्दल तिने कधी खेद व खंत व्यक्त केली नाही; अथवा आपणहून इतर काही प्रयत्नसुद्धा केले नाहीत. मोठी आई मात्र व्यथित असायची.
“दादा, तुझ्याहून लहान भावंडांनासुद्धा मुलं झाली. दोघं डॉक्टरकडे तरी जा. सूनबाईच्या मनाचा तरी विचार कर.”
“आई, कोणाकोणाला उशिरा होतात मुलं. काही जणांना होतच नाहीत. पण मला नाही वाटत आमच्या मंडळींची काही तक्रार असेल. भाई, अण्णाची मुलं आमचीच की.
काय हो मंडळी?”
“हो तर का? आमचेच बाळगोपाळ ते.”
मग मोठ्या आईची बोलतीच बंद होई. माझी आईसुद्धा विनवीत असे, “वहिनी, दादा मनावर घेत नाही तर राहू दे. आपण जाऊ या डॉक्टरकडे. कारण तरी कळेल.”
“वन्स, असं कसं? यांच्या मनात नाही तर मी कशाला मनावर घेऊ? नशिबात असेल तर होईलच की.”
सर्वांना आश्‍चर्य वाटायचं अशी कशी ही? हिच्यात काही न्यून असेल का? जावांच्या मुलांचे लाडकोड पुरवणारी आपल्या अपत्याच्या बाबतीत एवढी उदासीन कशी? एकदा मात्र अचंबित होण्यासारखा प्रसंग घडला.
मी दुपारीच कॉलेजमधून घरी आले. चोर पावलाने जाऊन वहिनीमामीचे डोळे झाकण्याचा विचार होता. ती घरात कुठेच नव्हती. मागील दारी गोठ्याच्या समोर बाईसाहेब उभ्या. आदल्याच दिवशी आमची तानी गाय व्याली होती. तिच्या वासराकडे अनिमिष नेत्रांनी पाहत होती वहिनीमामी. मी मागून जाऊन तिचे डोळे झाकले.
“त्या पाडसाला पाहता पाहता या पाडसाला विसरलीस ना, वहिनीमामी?” माझे हात ओले झाले होते. म्हणजे वहिनीमामीच्या डोळ्यांत अश्रू!
डोळे पुसत, गोडसं हसत तिने मला मिठीत घेतले.
“हे माझं लाडाकोडाचं वासरू कसं बरं विसरेन? चल, भुकेली आहेस ना? गरमगरम थालीपीठ करू या.”
“वहिनीमामी, खाण्याचं राहू दे. आधी सांग रडत होतीस ना? का ग? घरात काही झालंय का?”
“छे ग. खुळी आहेस का? काय होणार घरात? माझ्या भरल्या संसारात आहे का कसलं न्यून? पण काय झालं माहितीय का, आपल्या तानीचं वासरू हुंदडताना पाहिलं आणि वाटलं किती यातना झाल्या असतील तानीला त्याला जन्म देताना? आली डोळ्यांत टिपं…”
मामी चक्क खोटं बोलत होती. ज्या गावाला कधी गेलीच नाही त्या गावची वाट तिला कशी माहिती असणार? की तानीच्या नशिबात आहे तेवढं सुद्धा सुख आपल्या नशिबी नाही अशी खंत वाटत होती? म्हणजे हसर्‍या मुखवट्याआड हा दुःखी चेहरा होता. मग का नाही ती दोघं प्रयत्न करत अपत्यप्राप्तीसाठी? असंख्य शंकाकुशंका व प्रश्‍नांची भुतं मला वाकुल्या दाखवू लागली. मामाचं तर तिच्यावर खूप प्रेम होतं. प्रत्येक दिवाळीला घरच्या तीन सुनांना व लेकीला म्हणजे माझ्या आईला दागिना दिला जायचा. मोठा मामा फर्मान काढायचा. “मंडळी, तुमचा दागिना मी ठरवणार, तसा कोणताही दागिना तुम्हाला खुलून दिसतो. पण माझी आपली आवड. चालेल ना? ”
“इश्श्य, चालेल म्हणून काय विचारता? खूपच आवडेल.”
ओवाळणीत मिळाल्यावर लगेच ती वापरायला सुरुवात करायची. ती दोघं अगदी ‘मेड फॉर इच अदर’ आहेत, अशी सर्वांचीच खात्री होती. त्या दोघांत, पण कुटुंबात सर्वांनाच वहिनीमामी हवीहवीशी वाटायची. जेवण वाढायला तर तिनेच असले पाहिजे, असा जणू अलिखित नियमच होता. एकदा वहिनीमामी कामात गुंतली होती म्हणून जयामामी वाढायला आली तर, भाईमामाने (तिच्या नवर्‍याने) आश्‍चर्य व्यक्त केलं.
“हे काय? आज तू का वाढतेयस? वहिनी कुठे?”
“भाऊजी, ही आलेच,” असं म्हणत ती वाढायला हजर झाली.
“जेनु काम तेनु थाय,” असा शेरा भाईमामाने फेकल्यावर जयामामी नाराज झाली.
“भाऊजी, काहीतरीच काय? जयासुद्धा उत्तम काम करते हं.”
त्यावर दादामामाची मखलाशी, “मंडळी वाढायला असली की दोन घास जास्तच जातात.”
अशी माझी वहिनीमामी. तिच्याशिवाय कुणाचं पान हलायचं नाही की नाही हलायचा पानावरचा घास.
माझ्या आजोबांची पेढी होती. दादामामा ती सांभाळत असे. गावातील कपड्याचं दुकान दोन मामा सांभाळत. तिघंही जेवायला दुपारी घरी येत. धाकटी मामी नोकरी करीत होती, वहिनीमामीच्या जिवावर. कामावरून आल्याबरोबर हातात वाफाळत्या चहाचा कप, खाणं यायचं व कानावर मधाळ शब्द, “दमली असशील ना दिवसभर काम करून? खाऊन वर जा आणि विश्रांती घे थोडा वेळ.”
दुसर्‍याच्या विश्रांतीसाठी आर्जवं करणारी वहिनीमामी स्वतः मात्र अविश्रांत कार्यरत असे. मोठी आई कृतक्कोपाने तिला रागे भरे, “
पायाला भिंगरी लागलीय काय गो तुझ्या सुने. ये पड जरा.”
ती मोठ्या आईजवळ देवघरात आडवी होई. तेवढ्यात कोणाचा ना कोणाचा हाकारा आली की, झाली सज्ज. मला नेहमी प्रश्‍न पडे कसल्या मातीची बनलीय ही? स्वतः अपत्यहीन असून इतरांच्या मुलांचं कोडकौतुक करण्यात पुढे. सदैव हसतमुख राहून, सर्वांच्या आवडीनिवडी आपल्या मेंदूच्या कॉम्प्युटरमध्ये साठवून, त्याप्रमाणे कार्यवाही करण्यास तत्पर. कुठे असेल हिच्या ऊर्जेचा उगम? न उलगडणारं कोडंच होतं तेच
परंतु मोठी आई गेली आणि वहिनीमामीच्या कामाची गतीच मंदावली. चेहर्‍यावरच्या प्रसन्नतेला उदासीनतेचं ग्रहण लागलं. शेवटच्या आजारात ती कायम मोठ्या आई जवळच असे. मोठ्या आईच्या मृत्यूनंतर ती सदैव देवघरातच राही. कसला तरी विचार करीत. सगळ्यात वावरत असून नसल्यासारखीच होती. सर्वांच्याच ते ध्यानात आलं होतं. पण हा हन्त! अखेर तिनं अंथरूण धरलं. डॉक्टर सकाळ संध्याकाळ येऊन तपासत. रिपोर्टस् नॉर्मल. औषधं बदलून देत, पण तिची तब्येत खालावतच गेली. दोन्ही मामी सेवेला हजर होत्या. इतर सर्व येऊन जाऊन असत. दादा मामा सकाळी व संध्याकाळी थोडा वेळ तिच्याजवळ बसे. नखांतही रोग नव्हता. पण निदान झालं, “त्यांची जगण्याची उमेद संपली आहे.”
उतारवयात अपत्यहीनतेचं दुःख असह्य झालं की काय? कृश शरीर, चेहरा उदसीनतेने झाकोळलेला, अशी वहिनीमामी अविचल पडून होती. क्षीण आवाजात दोन-चार शब्दांचा उच्चार होई. खाण्यापिण्याची वासना केव्हाच उडाली होती. लौकीकार्थाने ती आमच्यात नव्हतीच. “चिंगे रोज येशील ना?”


“हो वहिनीमामी, मी रोज कॉलेजला जाताना आणि सुटल्यावर येत जाईन. पण तू लवकर बरी हो. तुला असं बघवत नाही.” मी गहिवरले. क्षीणसं कसंनुसं हसून तिने आपला कृश हात माझ्या हातावर ठेवला. त्यानंतर रोज दिवसातून दोनदा माझी हजेरी असे. पण फार काळ ते करावं लागलं नाही.
एका संध्याकाळी काहीशी उत्सुकता तिच्या चेहर्‍यावर उमटली. वहिनीमामी बरी होणार, या जाणिवेने मी मनोमन सुखावले.
“ये बस, भूक लागलीय ना?”
“नाही ग वहिनीमामी, तुला बरं वाटतंय ना?”
“हो. खूपच बरं वाटतंय. तुला काहीतरी सांगायचंय.”
“सांग नं.” काय सांगायचं असेल हिला हा मला संभ्रम.
“माझ्या लग्नाच्या वेळची गोष्ट. समारंभ पार पडला. सत्यनारायण, गर्भादान विधींचा सोहळा झाला. अंगभर शिरशिरी आणि मनात हुरहुर बाळगून मी वावरत होते. मध्येच एखाद्या चोरट्या कटाक्षाने दोघांची नजरानजर होत होती. त्यातून समाधानाची पावती मिळत होती. संध्याकाळी सगळे पाहुणे परतले. चिंगे, तुला रमण आठवतो का ग?”
“हो तर, रमणमामा ना? नकला किती मस्त करायचा.”
“हो, तोच तो. माझा आतेभाऊ. तोच जायला निघाला. त्याला पोहोचवायला मी दारापर्यंत गेले. त्याने माझे हात हातात घेतले. आणि म्हणाला, निमा मी बडोद्याला स्थायिक होतोय. परत कधीच येणार नाही. मी काकुळतीला येऊन विनंती केली, असं नको करूस रे रमण. कधी तरी येत जा ना. काहीही न बोलता हात सोडवून, पाठ फिरवून ते निघून गेला. डोळे पुसत पुसत मी वळले तर मागे हे उभे. यांनी पाहिलं म्हणून गेला का? सगळीकडे निजानीज झाल्यावर वैवाहिक जीवनाचा आरंभ करण्यासाठी मी आमच्या खोलीत पदार्पण केलं, एकदम दचकलेच. खाली एक चटई, त्यावर उशी आणि पांघरूण. तुझ्या मामाला विचारलं ते त्यांनी उत्तर दिलं, मी खाली चटईवर झोपणार. क्षणभर मी सुन्न झाली. विचार केला, तेव्हा रमणला निरोप दिल्यानंतरचा ह्यांचा ताठर चेहरा नजरेसमोर आला.”
“अहो, पण झालं तरी काय?”
“मन दुसरीकडे गुंतलेलं असताना, सहजीवन म्हणजे निव्वळ बलात्कार.”
“ काहीतरीच काय बोलता? रमण विषयी काही…”
“उगीच चर्चा कशाला? नजरेची भाषा कळते मला मंडळी.”
“अहो, आतेभाऊ आहे माझा.”
“जे काही पाहिलं त्यातून जे उमगलं, त्यावरून हा निर्णय घेतला.”
“मी खूप विनवण्या केल्या. शपथा, आणाभाका सगळं झालं, पण ते ढिम्म. मी चटईवर आणि ते पलंगावर असं झोपले. ते कायमचंच. वर मला धमकीही दिली होती की, आपल्या या नात्याविषयी कुणाला काही कळता कामा नये. त्यानंतर माझं नखसुद्धा दिसणार नाही.
मी रात्रभर रडरड रडले. शेवटी मनावर काबू केला. ठरवलं, या गोकुळासाठी हास्याचा मुखवटा चढवायचा, दुःखाचा चेहरा गाडून. ते असिधाराव्रत आजपर्यंत निभावलं. आता नाही सहन होत. वेगवेगळे दोघंही जळत राहिलो आयुष्यभर. खरं सांगू माझं आणि रमणचं प्रेम होतं एकमेकांवर. पण ते व्यक्त करण्याची संधीच कधी मिळाली नाही. यांच्याकडून मागणी आली. सगळे हुरळले आणि जीवनाला अशी कलाटणी मिळाली.”
तिने दीर्घ उसासा सोडला. जसं काही तिच्या मनावरचं मणाचं ओझं उतरलं होतं. तिला जोराची धाप लागली. तिची कहाणी ऐकून माझ्या संवेदना गोठल्यासारख्या झाल्या. तिने माझा हात हलविला.
“चिंगे, कॉफी…”
भानावर येऊन मी तिच्या कपाळावर हलकेच थोपटलं.
“वहिनीमामी, शांत राहा. मी लगेच घेऊन येते कॉफी दोघींसाठी.”
खोलीबाहेर पडले व माझा संयम सुटला. हुंदके आवरले नाहीत. पण आश्‍चर्य एका गोष्टीचं वाटत होतं. आपली दुःखद कहाणी सांगताना वहिनीमामीचे डोळे कोरडे होते. सगळ्या भावनाच शुष्क झाल्या होत्या का? तिला मनोमन कुर्निसात करून, कॉफी घेऊन चेहर्‍यावर कसंनुसं हसू आणून मी तिच्या खोलीत गेले. माझ्या हातांतील कप खाली पडले आणि रडतच मी कोसळले. वहिनीमामी न परतीच्या प्रवासाला निघून गेली होती. म्हणजे काही क्षणापूर्वी ती विझण्यापूर्वीचा उजळणारा दिवा होती.
अस्पर्शा, अव्यक्ता गृहलक्ष्मी झालीस तू॥
व्यक्त होऊन मुक्त जाहलीस तू॥

– रेखा नाबर

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

हिमेश रशेमियाच्या वडीलांचे छत्र हरपले, वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास ( Himesh Reshammiya Father Vipin Passes Away At The Age Of 87 )

हिमेश रेशमियाचे वडील आणि प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक विपिन रेशमिया यांचे निधन झाले आहे. ते 87…

September 19, 2024

रणबीरच्या आयुष्यातील दुसऱ्या स्त्रीला पाहिल्यानंतर आलियाला बसला धक्का (The Great Indian Kapil Show New Promo Alia Bhatt Meets Ranbir Kapoor Ex-Girlfriend On Show)

कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा त्याच्या विनोदबुद्धीने आणि कॉमिक टायमिंगने लोकांना हसवतो. आता लवकरच कपिल शर्मा…

September 19, 2024

आई होताच दीपिकाने सासरच्या घराशेजारी खरेदी केले नवे घर, किंमत माहितीये?(Deepika Padukone Buys New Luxurious Flat Which is Close To Sasural Just After Welcoming Baby Girl)

आई झाल्यापासून दीपिका पदुकोण आनंदी झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अभिनेत्रीने एका मुलीला जन्म दिला…

September 19, 2024

क्यों हैं महिलाएं आज भी असुरक्षित? कौन है ज़िम्मेदार? (Why Are Women Still Unsafe? Who Is Responsible?)

कहीं 3-4 साल की मासूम बच्चियां, तो कहीं डॉक्टर और नर्स, कहीं कॉलेज की छात्रा,…

September 18, 2024
© Merisaheli