Others

पर्यटनाचा आकर्षण बिंदू! (A Region Encircled With Snow Mountains Is Tourists’s Favourite Destination)

भारतातील सर्वात प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ ते म्हणजे हिमाचल प्रदेश. जी देवभूमी म्हणून ओळखली जाते. त्याचं नैसर्गिक सौंदर्य पाहायला देश विदेशातून पर्यटकांची तर मांदियाळीच असते. तसेच ऋतुमानानुसार पडणार्‍या हिमवर्षावाची मज्जा घेण्यासाठी पर्यटक येथे आवर्जून येतात. त्याशिवाय येथे सफरंचदाच्या बागा, ऐतिहासिक मंदिरे, शुभ्र सफेद बर्फाच्छादित पर्वतरांगा, प्राचीन मठ, विस्तीर्ण उंच अशी देवदार झाडे, निळेशार पाण्याचे तलाव तसेच प्राणिसंग्रहालय आदी अशी बरीच पर्यटनाची आकर्षणे तुम्हाला पाहायला मिळतील. इतकंच नाही तर येथे स्थानिक लोकनृत्य, उत्सव, चविष्ट खाद्यपदार्थ, लोकरीचे विविध आकर्षक कपडे असं बरेच काही तुम्हाला अनुभवण्यास मिळेल.

दरवर्षी लाखो पर्यटक हिमाचल प्रदेशातील पर्यटन स्थळांना भेट देतात. खरंतर पर्यटन विकासावर शासनाचा खूप मोठा हस्तक्षेप आहे. जसे शासन निर्मित अटल टनल हा बोगदा 8.9 किलोमीटर (5.5 मैल) लांबीचा आहे. हा भारतातील सर्वात लांब असलेल्या बोगद्यांपैकी एक असून यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचे अंतर 46 किलोमीटर (28.6 मैल) ने कमी होण्याची शक्यता आहे. प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत सुखकारक असा अटल टलनचा बोगदा आहे.
एका दृष्टिक्षेपात हिमाचल प्रदेशातील पर्यटन स्थळे जाणून घेऊयात. येथील शिमला, कुल्लू, धर्मशाला, डलहौसी, कांग्रा, पालमपूर, मनाली, नग्गर, मलाना ही गावे तेथील काही ना काही वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहेत. यापैकी डलहौसी, सिमला व मनाली ही थंड हवेची गिरीस्थाने असून उन्हाळ्यात अनेक पर्यटक त्यांना भेट देतात. शिमला या राजधानीत वस्तुसंग्रहालय, वनस्पतिउद्यान, हिमालयन पक्षी उद्यान, जुने चर्च इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्याचप्रमाणे तेथील मॉल रोडवर विविध प्रकारच्या लोकरीपासून बनवलेले तयार कपडे, कानटोपी, स्वेटर तसेच लहान मुलांसाठी लाकडी खेळणी आदी वस्तूंची खरेदी करू शकता.

हिमाचल प्रदेशातील लोकप्रिय पर्यटनस्थळे
शिमला

अत्यंत रमणीय उंच देवदार वृक्षांनी वेढलेल्या अन् चंदेरी बर्फाने झाकळलेल्या ह्या धरतीवर पक्ष्यांप्रमाणे उडावेसे वाटते. असं अविस्मरणीय शिमला, हिमाचल प्रदेशातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.


जाखू टेकडी

शिमलापासून 2 किलोमीटर अंतरावर 8000 फूट उंचीवर वसलेलं जाखू टेकडी. या टेकडीचे वैशिष्टय म्हणजे टेकडीच्या माथ्यावर खूप जुनं असं हनुमान मंदिर आहे. या टेकडीची अशी आख्यायिका आहे की, हिंदू महाग्रंथ रामायण युगापासून ही टेकडी व हे मंदिर ह्या जागेवर  स्थित आहे. असं म्हटलं जातं की, हिंदू धर्मग्रंथात जे परिचित आहेत असे भगवान राम त्यांचे छोटे भाऊ भगवान लक्ष्मण यांच्या उपचारासाठी आवश्यक जडी-बुटी ‘संजीवनी’च्या शोधात असताना भगवान हनुमानाने या टेकडीवर काही क्षण आराम केला होता. त्यामुळे ह्या टेकडीला जाखू टेकडी असं म्हटलं जातं. या जागी भगवान हनुमानाची उंच उभी मूर्ती स्थापन केलेली आहे.

ख्रिस्ती चर्च
काही अंतरावर चालत गेल्यास शिमल्यामधील द रिज या स्थळाजवळ ख्रिस्ती चर्च तुमच्या दृष्टीस पडेल. सुमारे 1857 साली या चर्चची स्थापना झाली असून उत्तर भारतातील सर्वात जुनं चर्च आहे. चर्चमध्ये प्रवेश करताच मनाला एकप्रकारची शांतता लाभते. त्याचं बांधकाम अत्यंत विलोभनीय असून नक्षीदार कलाकुसरीने युक्त आहे. येथे थ्री इडियटस् सारखे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. याशिवाय येथे ब्रिटिशकालीन कार्यालयंही पाहायला मिळतील.

शिमला मॉल रोड

शिमला शहरातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणजे मॉल रोड. या सदाहरित निसर्गसौंदर्याने युक्त असलेल्या आल्हाददायी वातावरणात आनंद लुटण्यासाठी देश विदेशातील पर्यटकांसह नवविवाहित जोडपीही येथे येतात.  सर्वांचं आवडतं ठिकाण जेथे अनेक प्रकारच्या वस्तू मिळतात. मॉल रोडवरुन पायी भटकंती करण्यात एक वेगळीच मज्जा आहे. कारण तेथे पर्यटकांना खरेदीसाठी विविध वस्तू जसे.. लोकरीची विजार, स्वेटर, हातमोजे, लहान मुलांचे आणि मोठ्यांचे कपडे, रंगीबेरंगी  शॉल त्याचप्रमाणे रेस्टॉरंट, खाद्यपदार्थांची दुकाने, प्राचीन मंदिर इत्यादी आहेत. अशा थंडगार वातावरणात मॉल रोडवर शॉपिंग करताना गरम गरम मोमोस आणि जलेबी खाण्याची मज्जा काही औरच आहे.

मनाली मॉल रोड

मनालीला जायचं असेल तर मॉल रोडला भेट देण्यास विसरू नका. मनाली हे भारतातील हिमाचल प्रदेशात ब्यास नदीच्या काठावर समुद्रसपाटीपासून 6725 फूट उंचीवर आहे. तुम्हाला जर कुल्लू येथे जायचे असल्यास मनालीपासून तीन तासाच्या अंतरावर आहे. मनालीला तुम्हाला वाजवी दरात हॉटेलसुद्धा सहज उपलब्ध होऊ शकतात. येथील परिचित मॉल रोड या जागी विविध चविष्ट असे खाद्यपदार्थ, केसर, सुकामेवा, लोकरीचे कपडे तसेच कॅफे येथे विनामूल्य वायफायही उपलब्ध आहे.

कुल्लू

कुल्लू मनाली ह्या थंडगार जागी जाण्याचा मोह कोणालाही आवरता येणार नाही असं हे पर्यटन स्थळ! येथील उंच बर्फाच्छादित पर्वतरांगांमधून ढगांचा पाठशिवणीचा खेळ पाहताना मनात उत्साह निर्माण होतो. तसेच हिरवेगार देवदार व ओक वृक्ष, व्यास नदीचं संथ वाहणारं पाणी, त्याचबरोबर थंडगार आल्हाददायकहवेच्या सान्निध्यात तुम्हाला वेळेचे भानही राहणार नाही इतकं मनमोहक सौंदर्य आहे. आपणाला येथे रिव्हर राफटिंगची मज्जाही घेता येईल. त्याचप्रमाणे तेथे नदीकाठी स्थायिक असलेल्या बगिच्यामध्ये विविध रंगांनी युक्त असलेल्या मनोहरित फुलझाडांच्या सान्निध्यात तुम्हाला स्वतःचे भानही राहणार नाही इतकं रमणीय दृश्य पाहायला मिळेल.

सोलंगव्हॅली ‘स्नो पॉइंट’

थंडी असो की उन्हाळा या दोन्ही ऋतूंमध्ये एन्जॉय करण्यासारखं रमणीय ठिकाण म्हणजे सोलंगव्हॅली. मुख्यतः येथे पर्यटक सुट्टीत पॅराग्लायडिंग, स्केटिंग, जॉबिंग, रोप-वे, कवाड मोटर सायकलिंग, घोडेस्वार, याकस्वार आणि नेचर वॉकचा आनंद तसेच स्नो पॉइंट आदींचा आनंद घेण्यासाठी येतात.

हिडिंबा मंदिर

आपल्याला ज्या वास्तूकडे पाहताच मनःशांती मिळते असं मनाली येथील हिडिंबा देवी मंदिर. उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश राज्यातील मनाली येथील हिडिंबा देवी मंदिर. भारतीय महाकाव्य महाभारतातील भीमाची पत्नी हिडिंबा देवीला समर्पित असे हे एक प्राचीन गुहा मंदिर आहे. हे मनालीतील सर्वात लोकप्रिय मंदिर असून धुंगीरी म्हणून देखील ओळखले जाते. या मंदिराची ख्याती इतकी मोठी आहे की, हे मंदिर पाहण्यासाठी भारतातील पर्यटकांसह परदेशी पर्यटक ही आवर्जून येतात. खरंतर हिमवृष्टीच्या वेळी हे मंदिर पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे गर्दी करतात. मंदिर जंगलाच्या मध्यभागी वसलेली चार मजली इमारत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मंदिरात हिडिंबा देवीच्या पायांच्या ठिपक्यांची पूजा केली जाते.

हिमाचल प्रदेशामध्ये जाण्याचा काळ
हिमाचल प्रदेशात जाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये एप्रिल ते जून या काळात चांगले वातावरण असते. परंतु ज्यांना हिमवर्षाव अनुभवायला आवडते किंवा स्कीइंग, स्केटिंग करायला आवडते त्यांच्यासाठी नोव्हेंबर ते जानेवारी हा उत्तम काळ असतो. दिल्ली व चंदीगढहून विमानसेवा असते. मुंबईवरून शिमल्यासाठी थेट विमानसेवा उपलब्ध नाही. मुंबई-दिल्ली, चंदीगढ-शिमला व दिल्ली-शिमला, असा विमानप्रवास करता येईल. त्याचप्रमाणे रेल्वेनेही हिरवागार निसर्ग पाहात तुम्ही प्रवास करू शकता.
लेखक : कविता नागवेकर

majhisaheli

Share
Published by
majhisaheli

Recent Posts

काव्य- उम्र बढ़ती जा रही है… (Poetry- Umra Badti Ja Rahi Hai…)

अब यही आवाज़ दिल कीधड़कनों से आ रही हैज़िंदगी कम हो रही हैउम्र बढ़ती जा रही…

April 24, 2024

Are you Sexually Compatible?

if it’s not just about occasional periods when a couple’s sex life is dull, then…

April 24, 2024

 मनिष पॉलने घेतली ४८ लाखांची नवीकोरी कार, म्हणाला नवं बाळ घरी आलं….(Maniesh Paul Buys Green Mini Cooper Worth Rs 48 Lakh)

लोकप्रिय टीव्ही होस्ट आणि अभिनेता मनीष पॉलने चमकदार हिरव्या रंगाची मिनी कूपर कार खरेदी केली…

April 24, 2024

अभिनेत्री राधिका मदनच्या हस्ते ‘स्मार्ट+’ सेवेचे उद्‌घाटन : घराघरातून मनोरंजनाचे नवीन मानक स्थापन (Actress Radhika Madan Launches ‘Smart +’: New Content Service In Entertainment Industry)

डायरेक्ट टू होम अर्थात्‌ डीटीएच उद्योगाचा पाया घालणाऱ्या डिश टीव्हीने आता मनोरंजन क्षेत्रात नवा पुढाकार…

April 24, 2024
© Merisaheli