Marathi

आठव्या वर्षापासून मुलांमध्ये मूल्यं जोपासा (Inculcate Values In Children From Eighth Year Onwards)


राधाची नऊ वर्षांची मुलगी मायक्रोव्हेवमध्ये स्वतःच जेवण गरम करून घेते, हे पाहिल्यानंतर सुमनला तिचं कौतुक वाटलं. पण त्याचबरोबर राधाची मुलगी ते काम करण्यासाठी खूप लहान आहे असंही तिनं राधेला बोलून दाखवलं. खरं तर, पालकांसाठी मुलं ही नेहमीच लहान असतात. आपण त्यांना काहीतरी करायला सांगायचो आणि भलतंच व्हायचं, अशी एक भीती त्यांना सारखी वाटत असते. त्यामुळे वेळ आली की आपोआप शिकतील, अशी समजूत करून घेतलेली असते. परंतु, ती वेळ येईपर्यंत मुलांना या गोष्टींमध्ये रस असेल की नाही, अशी आजची परिस्थिती आहे. तेव्हा मुलं साधारण आठ वर्षांची झाली की, त्यांना हळूहळू काही कामं शिकवण्यास सुरुवात करायला काहीच हरकत नाही. यासाठी संयमाची गरज आहे खरी, पण मुलांवर विश्‍वास ठेवला तर तीदेखील तितक्याच उत्साहानं अन् लवकर शिकतील. मग मुलं आठ वर्षांची झाली की, काय शिकवू शकतो आपण त्यांना?

कपडे धुण्यासाठी मशील लावणं
बर्‍याचशा कॉलेजवयीन मुलींनाही कपडे धुण्याचं काम येत नाही. परंतु तुमच्या मुलांची त्यांच्यामध्ये गणती होऊ देऊ नका. सध्या सगळ्यांच्या घरी वॉशिंग मशीन असतं. त्यामुळे आपलं अर्ध काम तर येथेच कमी होतं. वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी टाकण्यापूर्वी मुलीला एक छोटसं टेबल देऊन त्यावर उभं राहून पाहावयास सांगा. कपड्यांसाठी, डिटर्जंटचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण किती असावं ते सांगा. कपड्यांचा रंग जात असल्यास ते कपडे वेगळे ठेवावे. मशीनवरील बटणांचा अर्थ आणि कशासाठी उपयोगी ते समजवा. ड्रेन आणि ड्रायर म्हणजे काय हे सर्व एक-दोन वेळा कृतीतून दाखवून द्या आणि तिसर्‍या वेळेस त्यांच्याकडून करून घ्या. हळूहळू त्यांना एकट्यानं करता येऊ लागलं की त्या कामातून आनंदही मिळत जाईल.

पसारा आवरणं
मुलांना एकदा वापरायला घेतलेल्या वस्तू पुन्हा जागच्या जागी ठेवण्याची सवय नसते. आणि मग वस्तू मिळाल्या नाहीत की त्यांची चिडचिड होते. तेव्हा मुलांना स्वच्छता ही शिकवलीच पाहिजे. मुलांनी वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या पाहिल्या की हळूहळू ती सुद्धा त्याचं अनुकरण करतील. पसारा आवरण्यासाठी त्यांना वेळ द्या आणि वस्तू योग्य जागी ठेवण्यास सांगा. हे नियमितपणे केल्याने, मुलं स्वतःहून त्यांच्या वस्तू जागेवर ठेवण्याचा प्रयत्न करतील.

स्वयंपाक
मुलांना लहानपणी भातुकली खेळताना पाहिलं की आपल्या लक्षात येईल की मुलांना जेवण बनविण्याची खूप आवड असते. घरी आईला जेवण करताना पाहून अगदी तसं करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तेव्हा त्यांना थोडं समजायला लागलं की त्यांना स्वयंपाक करताना छोट्या छोट्या मदतीसाठी घ्या. यातून त्यांना आपणही स्वयंपाक करू शकतो असा विश्‍वास वाटू लागतो. सुरुवातीला त्यांच्याकडून सुकी भेळ, फ्रुट सॅलेड, कोशिंबीर, सँडविच इत्यादी सोपे पदार्थ करून घ्या. सोबत त्यांना सुरक्षिततेबद्दलही सांगा. सराव करण्यास सांगा.

भेटवस्तूंचं पॅकिंग
भेटवस्तू म्हणजे मुलांचा विक पॉइंट. आपल्या मित्रमैत्रिणींना भेटवस्तू द्यायला त्यांना फार आवडतं. त्यामुळे भेटवस्तू काय द्यायची इथपासून ते तिच्या पॅकिंगपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांना आवर्जून सहभाग हवा असतो. मग ते स्वतःच आपल्याला डिझाईन पेपर कापून देणं, सेलो टेप लावणं यासाठी मदत करतात. पॅकिंग करणं फार अवघड काम नसलं तरी त्यातील काही बारकावे त्यांना सांगितल्यास काम कसं अचूक होतं. तेव्हा गिफ्ट पॅक करण्यापूर्वी त्यावरील किंमतीचं लेबल काढून टाकण्याची त्यांना आठवण करा. मग गिफ्ट बॉक्समध्ये असेल तर ठीक नाहीतर त्या साईजचा बॉक्स घ्यायला सांगा. काही नाजूक, काचेच्या वस्तू असतील तर त्यासाठी बबल रॅप किंवा टिश्यू पेपरने रॅप करावयास हवे हे समजून सांगा. बॉक्सला बाहेरून डिझाइन पेपर लावून सेलो टेपने गिफ्ट व्यवस्थित पॅक कसं करायचं ते दाखवा. मुलांच्या आवडीचं काम असल्यानं ते पटकन शिकतात.

पैशांचं मूल्य आणि बचत
आपल्या मुलांना जागरूक ग्राहक होण्यास शिकवा. बाजारात वस्तू आणायला जाताना त्यांना सोबत घेऊन जा. वस्तूंच्या किमती मोठ्याने बोलून त्यांना सांगा. काही वस्तू आपल्याला आवडूनही आपण त्या घ्यायचे टाळतो कारण आपलं तेवढं बजेट नसतं. हे त्यांच्या लक्षात आणून द्या. कधीतरी त्यांच्याकडे पैसे देऊन खर्च करून वस्तू घेण्याची जबाबदारी सोपवा. त्यांना त्यांचे खर्च व्यवस्थापित करण्यासाठी आणि पैसे वाचवण्यासाठी प्रोत्साहित करा. अशा प्रकारे मुलं पैशांचं मूल्य जाणून बचत सुरू करतील.

प्रथमोपचार
लहान मुलांना पडल्यानंतर खरचटलं, कधी कापलं नि रक्त आलं की खूप रडायला येतं. छोट्याशा जखमेचाही ती बाऊ करतात. अशावेळी मुलांना धीरानं घ्यायला शिकवलं पाहिजे. सगळ्यात आधी जखम झाल्यास ती जागा स्वच्छ करण्यास सांगा. ती जखम पाण्याखाली धरा आणि मग पेपर टॉवेलने ते पाणी डिप करून घेऊन जखम कोरडी करायला सांगा. घरी औषध असल्यास कापसावर औषध घेऊन ते जखमेवर लावायचे कसे ते दाखवा. जखम मोठी असेल तर त्यावर बँडेज लावायचे कसे ते दाखवा. हे सगळं करता करता मुलं स्वतःच आपलं दुखणं विसरतील.

बागकाम
शाळेत जाणार्‍या मुलांना विज्ञान विषयामुळे झाड ही संकल्पना परिचयाची असते. पण झाडांचं महत्त्व अभ्यासापुरतं मर्यादित असतं. तेव्हा बी पासून झाड तयार होईपर्यंत काय काय करावं लागतं. ते प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच करून घ्या. कुंडी, माती, खत, पाणी असं झाडांसाठी लागणारं साहित्य, त्यांचा वापर कसा करायचा. त्यात बी वा रोप कसं लावावं. त्यास खतपाणी घालावं, सूर्यप्रकाशात ठेवावं, हे सगळं सांगा व त्यांच्याकडूनच करून घ्या. थोड्या दिवसांनी आपण लावलेलं रोप वाढलेलं किंवा बी रुजलेलं पाहिल्यानंतर त्यांना अतिशय आनंद होतो.
कुठलंही काम असो, त्यात सर्वोत्तम देण्याची त्यांना सवय लागली की पुढे आयुष्यभर यश मिळविण्यासाठी कराव्या लागणार्‍या मेहनतीचा त्यांना सराव होतो.
अर्थात या एवढ्याच गोष्टी नाहीत तर अगदी लहानपणापासून पाहिलं तर मुलांच्या स्वच्छतेच्या, खाण्यापिण्याच्या, शिष्टाचाराच्या सगळ्याच सवयी या पालकांच्या अनुकरणातून आकाराला येत असतात.
आपण पालक म्हणून जोपर्यंत या गोष्टी आचरणात
आणत नाही तोपर्यंत मुलांमध्ये त्या गोष्टी उतरणार नाही. मुलांना वाईट सवयींबाबत जागरूक करत असतानाच चांगल्या सवयींबाबतची सकारात्मकता त्यांच्यात टिकून राहण्यास त्यांना प्रोत्साहित करा. त्यासाठी पालकांनी मुलांच्या वयाचा बाऊ करू नये. वाईट सवयी लागण्यापूर्वीच आपल्या मुलांमध्ये चांगल्या सवयींचं मूल्य रुजवा.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

कहानी- गहने (Short Story- Gahane)

और अचानक आरती ने देखा कि मां अपने गहने निकाल कर चेक कर रही है.…

May 2, 2024

मध्यरात्री दिग्दर्शकाने फोन करुन बोलवलं अन्… कपिल शर्मा शो फेम अभिनेत्रीने सांगितला भयानक किस्सा (upasana singh share her casting couch experience in interview )

बरचदा कामासाठी कलाकारांना कास्टिंग काऊच सारख्या विकृत प्रकारांना सामोरे जावे लागते. कपिल शर्मा शो फेम…

May 2, 2024

श्रीनू देणार ओवीवरील प्रेमाची कबुली, लाली बसणार मोठा धक्का ( sara kahi tichyasathi update shreenu express his love for ovi in front of family )

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत नुकताच निशी-नीरजच्या लग्नाचा समारंभ पार पडला आणि थोड्याच दिवसात सचदेव कुटुंब…

May 2, 2024
© Merisaheli