Marathi

प्रेमपत्र (Short Story: Prempatra)

  • नरेश शर्मा

रोहित आणि सोनालीचा सुखी संसार उद्ध्वस्त होण्याच्या वळणावर पोहचला होता. कारण होतं, अमेरिकेहून आलेली तीन पत्रं. ती साधीसुधी पत्रं नव्हती… प्रेमपत्रं होती. त्या पत्रांमधून रोहितच्या प्रेयसीने इष्काचे जे रंग उधळले होते, त्याने सोनालीची मनःशांती ढळली होती. त्याला मात्र सोनालीच्या या मनःस्थितीची काहीच कल्पना नव्हती…
रोहित आणि त्याच्या प्रेयसीला रंगे हात पकडून त्याचा सभ्यपणाचा बुरखा फाडावा आणि लोकांसमोर त्याचं हे बदफैली रूप उघड करावं, या भावनेनं ती पेटून उठली होती. विचार करून करून दिवसेंदिवस तिचं मानसिक संतुलन अधिकच ढळत चाललं होतं. रोहितने आपली घोर फसवणूक केली आहे, या विचाराने तिला खूप मनस्ताप होऊ लागला होता. आपल्या
मनाविरुद्ध, केवळ घरातील लोकांच्या आग्रहावर तिने रोहितशी लग्न केलं होतं. तीन वर्षं प्रामाणिकपणे या
माणसाशी आपण संसार केला, पण तो विश्‍वासघातकी निघाला, याचं तिला खूप खूप वाईट वाटत होतं. या तीन पत्रांद्वारे त्याच्या गैरवर्तनाविरुद्ध तिच्या हाती पुरावे आले होते… पलंगावर पडून सोनाली त्या तीन प्रेमपत्रांकडे निरखून पाहू लागली. गुलाबी, हिरव्या आणि निळ्या रंगातील त्या पत्रांना मंद मंद सुवास येत होता. सोनालीला मात्र ती पत्रं विषारी वाटत होती. एका महिन्यात त्या डाकिणीने रोहितला एक नाही… दोन नाही… तीन पत्रं पाठविली होती…
सोनालीनं तिसरं पत्र पुन्हा वाचायला सुरुवात केली. रोहितची तथाकथित प्रेयसी शेफालीनं आपलं प्रेम असं व्यक्त केलं होतं- “डिअर, माय लव्ह, एका आठवड्यानंतर मी मुंबईला पोहचते आहे. ऑफिसमध्ये रजा टाक. मला कोणताही बहाणा चालणार नाही. आपण खूप एन्जॉय करूया, अगदी गेल्या खेपेसारखंच…” सोनालीचं मन सैरभैर झालं… तिला एकेक गोष्टी आठवू लागल्या. रोहित या आधीही ऑफिसच्या कामासाठी मुंबईला जात होता, पण तिला कधी चुकूनही शंका आली नव्हती…
मग तिनं शेफालीचं पहिलं पत्र वाचलं. रोहितचा फोन नंबर हरवला, अन् त्यानं तिला खूप दिवसांत फोन केला नाही, म्हणून तिनं तक्रारीचा सूर त्या पत्रात लावला होता. सोनालीला असंही वाटून गेलं की, आपलं लग्न झालंय, हे रोहितनं कदाचित तिला सांगितलं नसावं. म्हणून ती बिनदिक्कतपणे त्याला घरच्या पत्त्यावर पत्र पाठवत असावी. तिला रोहितची घृणा वाटू लागली. पुरुषांची किती रूपं असतात? घरात एक, बाहेर काहीतरी वेगळंच. हेच त्याचं वास्तव आहे की काय? प्रेमाच्या नावाखाली वासनेचा खेळ खेळायचा… अन्यथा विवाहित पुरुषाला पत्नीऐवजी परस्त्रीशी संबंध ठेवण्याची गरजच काय?… तिनं तिन्ही पत्रं आपल्या कपाटात ठेवून दिली. अन् पुन्हा पलंगावर पडली. तीन वर्षं आपण केलेल्या संसाराची चित्रं ती डोळ्यासमोर आणू लागली. तिच्या
मनात द्वंद्व निर्माण झालं…
काय विचित्र माणूस आहे हा रोहित? तीन वर्षांत मी त्याला ओळखू शकले नाही! आपल्याशी किती कमी बोलतो हा. कदाचित आपली गैरकृत्यं उघडकीला येऊ नये म्हणून किंवा कदाचित शेफालीमध्ये गुंतला असेल म्हणून हा कमी तोंड उघडत असावा…
तसं पाहिलं तर, रोहितने सोनालीला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. पण दोघांचा जीवनविषयक दृष्टिकोनच अगदी
वेगळा होता. आपल्या जोडीदाराविषयी तिनं जी स्वप्नं बघितली होती, ती प्रत्यक्षात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोलमडली होती. रोहितची नोकरी चांगली होती. त्यामुळे पैशांची काही कमतरता नव्हती. पण तो नवरा म्हणून सोनालीच्या वाट्याला कमी येत होता. केव्हातरी तो तिला फिरायला घेऊन जायचा, पण अगदी मनाविरुद्ध. तेव्हाही त्याचा मोबाईल फोन वारंवार वाजायचा. अन् तो ऑफिसच्या गोष्टी फोनवर करत राहायचा. घरी उशिरानं येणं, तोंडदेखलं बोलणं अन् ऑफिसच्या फायलीत डोकं खुपसणं… असं रोहितचं यांत्रिक जीवन होतं. भावनांना तिथे विशेष वाव नव्हता.
लग्नानंतर मुलं होण्याबाबत प्लॅनिंग करण्यास सोनालीनं विरोध केला, तरी रोहितने काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. तो कोणत्याही बाबतीत आग्रही नव्हता. आयुष्य असंच कूर्मगतीनं, निरसपणे चाललं होतं. पण या प्रेमपत्रांनी तिचे डोळे उघडले होते. हृदयात जर दुसरी प्राणेश्‍वरी वसली असेल, तर त्याच्या मनात पत्नीबद्दल आत्मीयता राहणार तरी कुठून? या विचारांनी तिच्यात आणि रोहितमध्ये दुरावा निर्माण झाला. तिनं आपल्या वहिनीकडे फोनवरून या गोष्टीची वाच्यता केली. तिनं सोनालीला
रणनीती आखून दिली…
नेहमीप्रमाणे रोहित आजही उशिरानं घरी आला. डायनिंग टेबलावर सोनाली त्याची वाट पाहत होती. जेवण करण्याचा तिचा अजिबात मूड नव्हता. तिला रोहितचा अतिशय तिरस्कार वाटत होता. सभ्यतेचा आव आणून
ही माणसं दुसर्‍यांना कसं काय कष्टी करू शकतात, हा प्रश्‍न ती स्वतःलाच विचारत होती. रोहित फ्रेश होऊन डायनिंग टेबलाकडे आला. विचारात गढून गेलेल्या सोनालीला पाहून त्याला तिची गंमत करावीशी वाटली. त्याने अलगद तिच्या गालाचं चुंबन घेतलं. सोनाली संतापली. ओरडून म्हणाली, “बस्स झाला हा खोटेपणा. आय हेट धीस.” तिचं हे वर्तन रोहितला खटकलं. तरीही त्याने
ते दर्शविलं नाही. सोनालीने जरा घुश्शातच त्याला विचारलं, “तुम्ही अमेरिकेला जायचं म्हणत होतात ना, कधी जाणार आहात?”
जेवता जेवता अत्यंत कोरड्या स्वरात रोहित बोलला, “आता मला अमेरिकेला जायचं नाहीये. मी आता मॉरिशसचं प्लॅनिंग करतोय- तुला हनीमून गिफ्ट द्यायचं म्हणून!”
सोनालीनं छद्मी हास्य केलं. तिला वाटून गेलं, किती धूर्त असतात ही माणसं. बायकांना मूर्ख समजतात.
पण पोटातली गोष्ट ओठांवर अजिबात येऊ द्यायची नाही, म्हणून ती मुकाट्यानं जेवू लागली…
दोन दिवस सोनालीची घालमेल होत राहिली. त्या सटवीसोबत आधीच ठरविल्याप्रमाणे ऑफिसचं कारण सांगून रोहित मुंबईला जाईल… तेव्हा त्याचा पाठलाग करून प्रेयसीसह त्याला रंगे हात पकडून द्यायचं… असे बेत ती आखत होती. पण रोहितच्या निर्विकार वागण्यावरून त्याचा बेत नेमका काय आहे, याचा अंदाजच तिला येत नव्हता. तिचं घुम्यासासारखं वागणं रोहितच्या लक्षात आलं. त्याने एक-दोनदा, तुझं काही बिनसलंय का, हे विचारण्याचा प्रयत्नही केला… पण तिनं त्याला उडवून लावलं…
प्रेमपत्रानुसार, शेफाली दोन दिवसांनी मुंबईला पोहचणार होती. सोनालीचा तणाव वाढला होता. दुपारचे तीन वाजले होते नि अचानक रोहितचा फोन आला. तो घाईघाईत बोलत होता.
“तू संध्याकाळी तयार राहा. आपल्याला बाहेर, एका फार्म हाऊसवर जायचंय. तिथं एक शानदार पार्टी आहे. मी सहा वाजेपर्यंत घरी येईन. मग आपण निघू.”
सोनालीचं डोकं दुखू लागलं. आज याला अचानक बाहेर जायचं कसं काय सुचलं? यात काही काळेबेरं तर नाही ना? तिच्या डोक्यात संशयाचा भुंगा शिरला. दररोज गुन्हेगारीच्या किती बातम्या येतात. तिला वहिनीचे बोल आठवू लागले, “ताई, चरित्रहीन पुरुषांवर कधीच विश्‍वास ठेवू नका.
ते कधी, काय करतील त्याचा भरवसा नसतो. तुम्ही कायम सावध राहा बरं.”
आता तिचं डोकं सुन्न झालं. प्रेयसीसाठी आपला काटा काढण्याचा रोहितचा प्रयत्न आहे की काय? त्याचं हे फुलप्रुफ प्लॅनिंग तर नाही ना? या विचारांनीच तिचा थरकाप उडाला. तिची भीती अधिकच वाढली. तिनं भराभर आपली बॅग भरली आणि दुपारची गाडी पकडून सरळ माहेरी निघून गेली.
तिला अशी अचानक आलेली पाहून बाबा, भाऊ, वहिनी सारेच स्तंभित झाले… तिनं आपली कर्मकहाणी सगळ्यांना सांगितली, तेव्हा घरात एकच खळबळ माजली. हा सगळा प्रकार तिनं आधीच वहिनीच्या कानावर घातला होता. त्यावर तिनं दिलेल्या सल्ल्यानुसार सोनाली आपल्या
माणसांत परत आली होती. तिनं सरळ पोलिसांत तक्रार दाखल करावी, असं सगळ्यांचं मत पडलं. पण सोनालीच्या भावानं सबुरीचा सल्ला दिला. सोनालीनं रोहितसोबत राहणं आता सुरक्षित नाही, यावर मात्र सगळ्यांचं एकमत झालं. घटस्फोट घेऊन रोहितला चांगला धडा शिकवावा, असं स्पष्ट मत वहिनीनं दिलं होतं. पण अशा कोणत्याही निर्णयाप्रत सोनाली येत नव्हती…
सोनालीला रोहितचा फोन आला.
ती खूप संतापलेली होती. त्यामुळे ती त्याच्याशी बोललीच नाही. वहिनीने फोन घेतला. वहिनीने त्याची सर्व काळी कृत्यं त्याला ऐकवून भरपूर तोंडसुख घेतलं. चकित होऊन रोहित सर्व आरोप ऐकत राहिला. ‘असं काहीच नाही हो’, म्हणत राहिला. त्याच्या या नाटकी वागण्याने आगीत तेल ओतल्यागत झालं. त्याचा निरागसपणा कोणालाच पटला नाही.
दुसर्‍या दिवशीही त्याने सोनालीला दोनदा फोन केला. शेफाली नावाच्या मुलीला मी ओळखतही नाही, असं स्पष्टीकरण तो वारंवार देत होता.
हा गैरसमज दूर करून आपण एकत्र राहूया, असं त्याचं म्हणणं तिला पटलं नाही. परस्परांवरील विश्‍वासाला तडा जातो, तेव्हा घट्ट नातीही संपुष्टात येतात. इथे तर अविश्‍वास आणि तिरस्काराची दरी एवढी मोठी झाली होती की, ती साधणं कठीण होऊन बसलं होतं. अखेरीस रोहितचाही राग अनावर झाला. ‘तुला जे करायचंय, ते कर. पण अशा तर्‍हेने कोणालाही बदनाम करणं योग्य नाही’, असं त्याने तिला खडसावून सांगितलं. पण चोराच्या उलट्या बोंबा, असं समजून तिने याकडे दुर्लक्षच केलं…
तीन दिवसांनी सोनालीनं रोहितला घटस्फोटाचे कागदपत्र पाठवून दिले. प्रकरण आता कोर्टात गेलं होतं. पहिल्याच सुनावणीला दोघे समोरा-समोर ठाकले. रोहित तिला बघून क्षणभर थबकला, पण वहिनीने तिला ओढूनच पुढे नेलं…
एक वर्ष हळूहळू पुढे सरकलं. सोनाली रोहितपासून विभक्त झाली होती. कोर्टात खटला अजूनही चालूच होता. सगळे दिवस सारखेच, याचा प्रत्यय सोनालीला आला. माहेरच्या माणसांची सोनालीशी वागणूक बदलत चालली होती. आई-वडील, भाऊ-वहिनी यांना विवाहित मुलगी काही दिवसांनी जड होते, याची प्रचिती तिला येत होती. आता लहानसहान गोष्टींवरून घरात खटके उडू लागले होते. एके दिवशी तर वहिनीने आपल्या भात्यातला बाण बाहेर काढलाच… “तुमची जर खर्‍याची बाजू होती, तर आपल्या नवर्‍याला मुठीत का नाही ठेवलंत? इथे माहेरी राहून हुकूम सोडलेले मी खपवून घेणार नाही.” वहिनीच्या या टोचून बोलण्याने सोनाली घायाळ झाली. रिटायर्ड बाबा आणि वहिनीच्या आज्ञेत असलेला भाऊ, यांना मूग गिळून बसण्याशिवाय काहीच गत्यंतर नव्हतं. निरुपाय म्हणून सोनालीनं नोकरी धरली. स्वावलंबी जीवन जगण्यासाठी अन् वेळ घालविण्यासाठी ती आवश्यक होती…
एके दिवशी लंच टाइममध्ये सोनालीच्या मोबाईलवर एक कॉल आला. तिनं पाहिलं, तो अनोळखी नंबर होता. तरीही तिनं कॉल घेताच मस्तवाल आवाजात तो तरुण बोलू लागला, “हॅलो सोनाली, कशी आहेस?” आवाज तिला थोडा ओळखीचा वाटला. पुढे तो तरुण म्हणाला, “ओळखलंस? अगं, मी दिनकर… तुझा पूर्वीचा प्रियकर… तुझा रोहितशी घटस्फोट झाला की नाही?”
सोनालीला जबर धक्काच बसला. या माणसाला हे सगळं कसं काय माहीत? त्यानं फोन कट केला. सुन्न झालेल्या अवस्थेत तिनं अर्धा दिवस रजा टाकली आणि घरी आली. ती मनानं विस्कटून गेली होती.
डोकं फुटतंय की काय, असं तिला वाटू लागलं. डोकेदुखीवर असलेली गोळी घेऊन तिनं झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप लागेना… तिच्या स्मृतीपटलावर पाच वर्षांपूर्वीची… कॉलेज जीवनातील चलचित्रं उमटू लागली.
अमीर बापाचं बिघडलेलं कार्ट, असा तो दिनकर होता. दुर्दैवानं तो तिच्याच वर्गात होता. अन् तिच्यावर फिदा झाला होता. त्याच्याकडे ती नकळत ओढली गेली नि जाळ्यात फसली. एम.ए. प्रिव्हियसपर्यंत त्यानं सोनालीचा पिच्छा पुरविला. पण दिनकरचं असली रूप तिच्या नजरेसमोर आलं, तेव्हा तिनं त्याच्याकडे पाठ फिरवली.
प्रेमाच्या ओघात तिनं त्याला लिहिलेली प्रेमपत्रं त्याच्याकडे होती. त्याच्या आधारे दिनकरनं सोनालीला बरंच बदनामही केलं होतं… एम.ए. फायनलच्या आधीच अचानक दिनकरने कॉलेज सोडलं. तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला असल्याचं कळलं, तेव्हा सोनालीनं सुटकेचा निःश्‍वास टाकला होता. पोस्ट ग्रॅज्युएशन होताच घरच्यांनी तिच्या लग्नाचा लकडा लावला होता. दिनकरने केलेल्या नाहक बदनामीमुळे सोनालीच्या वडिलांनी घाईघाईने रोहितशी तिची सोयरीक जमवली. नाइलाजानं तिनं होकार दिला…
लग्न होईपर्यंत सोनालीच्या मानगुटीवर दिनकरचं भूत बसलं होतं. मात्र तो भारतात नसल्यामुळे लग्नसमारंभात काही बाधा आली नाही…
पहिल्या फोननंतर दोन-चार दिवसांनी दिनकरचा अमेरिकेहून पुन्हा फोन आला. या खेपेला त्याने हटवादीपणानं जे काही सांगितलं, ते ऐकून सोनालीच्या पायाखालची जमीन सरकली. तो बोलत होता, “सोनाली डार्लिंग, मी तुझ्यावर चांगलाच सूड उगवला आहे. तू माझी होऊ शकली नव्हतीस, म्हणून रोहितचीही होऊ शकली नाहीस… तुमचा घटस्फोट मीच घडवून आणलाय. विश्‍वास नाही बसत?… अमेरिकेहून शेफालीच्या नावानं आलेली प्रेमपत्रं… ती मीच पाठवली होती. तुझा विश्‍वास इतका कमकुवत ठरला की, तू रोहितशी काडीमोडच घेतलास. मूर्ख पोरी, आता तरी शहाणी हो. रोहितनंतर आता जर कुणाबरोबर संसार मांडशील, तर याद राख! तुझ्या प्रेमपत्रांची मालमत्ता मी अजूनही जपून ठेवली आहे. सगळ्या जगासमोर ती उघडून दाखवायला मी मागेपुढे पाहणार नाही…”
दिनकरचे विषारी शब्द सोनालीच्या कानात शिरले. तिनं फोन कट केला. ती मनानं उद्ध्वस्त झाली होती. आपली घोर फसवणूक झाली असल्याचं तिच्या लक्षात आलं होतं. तिनं स्वतःच्या हातानेच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला होता. रोहितच्या कथित प्रेयसीची शहानिशा न करता, त्याच्यावर अविश्‍वास दाखविला होता. आपला घात झालाय हे लक्षात आल्यामुळे ती कमालीची खचली. तिला रोहितची आठवण झाली. सगळा दोष तिचाच होता. रोहितबाबत तिनं आधीपासूनच चुकीचं मत बनवलं होतं. केलेल्या कृत्याचं प्रायश्‍चित्त घ्यावं म्हणून तिनं रोहितला फोन लावला, “रोहित, तुम्हाला एकदा भेटायचं आहे… प्लीज, नाही
म्हणू नका…”
“अगं, मला पण तुला भेटायचं आहे. बरंच काही बोलायचं आहे…” रोहितच्या प्रेमळ शब्दांनी सोनालीच्या मनातील त्याच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

सुप्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शिका व कोरिओग्राफर फराह खान आणि दिग्दर्शक साजिद खानची आई मेनका इराणी यांचं निधन (Farah Khan Mother Menaka Irani Died In Mumbai)

सुप्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शिका व कोरिओग्राफर फराह खान आणि दिग्दर्शक साजिद खानची आई मेनका इराणी यांचं…

July 26, 2024

ब्रेकअप की अफवाहों के बीच एयरपोर्ट पर अलग- अलग स्पॉट हुए अर्जुन कपूर और मलाइका अरोड़ा (Amidst Breakup Rumours, Arjun Kapoor And Malaika Arora Seen Separately At The Airport)

मलाइका अरोड़ा और अर्जन कपूर के ब्रेकअप की अफवाहें काफी दिनों से सोशल मीडिया की…

July 26, 2024

कहानी- एक खाली पृष्ठ (Short Story- Ek Khali Prishth)

उन्हीं दिनों एक बार मैंने आटोग्राफ बुक खोल कर उनके सामने रखी. वे उस खाली…

July 26, 2024
© Merisaheli