Marathi

उन्हाळ्यात उचल घेणारे विकार (Summer picking disorders)

उन्हाळा आला की त्यासोबत येणार्‍या अनेक चांगल्या वाईट गोष्टींपैकी एक म्हणजे उष्म्याचे विकार. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच याचा त्रास होतो. परंतु आधीच काळजी घेतल्यास यातील एकही विकार आजुबाजुलाही फिरकणार नाही, बघा.

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच, हवामानात बदल होऊन उन्हाळ्याचं आगमन झालेलं आहे. वातावरणाचं तापमान हळूहळू वाढत आहे. त्यामुळे हवेतील बाष्पाचं प्रमाण कमी होऊन उष्मा असह्य झालेला आहे. आणि या उन्हाळ्याचा लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनाच त्रास होत आहे. या काळात अनेक प्रकारचे आजार आणि विकार उद्भवू शकतात. तेव्हा आपणच आपली काळजी घ्यायला हवी.

डिहायड्रेशन
सध्या जाणवू लागलेला उष्मा आता अधिकच ताप देऊ लागला आहे. सकाळचं अगदी नऊ-दहाचं ऊनही सहन होईनासं झालं आहे. घराबाहेर पडलं तरी, घरात राहिलं तरी अंगातून घामाच्या धारा निघून त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. अर्थात डिहायड्रेशन होतं आणि तोंड सुकतं, त्वचा कोरडी पडते, सांधे आखडतात, मळमळतं, डोकं दुखतं, घामाचं तसंच युरीनचंही प्रमाण कमी होतं आणि भूकही कमी होते.
उपाय : रोज कमीत कमी 10-12 ग्लास पाणी प्यायलंच पाहिजे. याशिवाय ताक, फळांचे ज्यूस, मिल्क शेक प्या. जेणेकरून शरीरातील पाण्याची तुट भरून काढली जाईल. खाण्यामध्येही काकडी, टोमॅटो, टरबूज, कलिंगड यांचा समावेश करा. शरीरातील पाणी कमी झालं असं वाटलंच तर लिंबूपाणी, ग्लुकोज किंवा ओआरएस पाण्यात घालून घ्या. चहा-कॉफीचं प्रमाण मात्र कमी करा.

नाकातून रक्त येणं
उन्हाळ्याच्या दिवसात कधी कधी अचानक नाकातून रक्तस्राव सुरू होतो, ज्याला नाकातील घोळणा फुटणं असं म्हणतात. बराच वेळ उन्हात फिरल्यामुळे, जास्त तिखट, मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे असं होऊ शकतं. रक्त उसळणं, उच्च रक्तदाब, चिंता तसेच अशक्तपणा यांसारख्या समस्यादेखील नाकातून रक्त येण्यास कारण ठरतात. ‘क’ जीवनसत्त्वाची कमतरता असणार्‍या व्यक्तींना ही समस्या वरचेवर सतावते.
उपाय : नाकातून रक्त येण्यास सुरुवात होताच सगळ्यात आधी त्या व्यक्तीस थंड ठिकाणी घेऊन जा. पायात मोजे, बूट, चप्पल घातली असल्यास काढून टाका. त्यामुळे शरीरातील उष्णता तळव्यांतून बाहेर निघून जाईल. त्यानंतर दोन बोटांनी नाक दाबून धरा, तोंडाने श्‍वास घ्या. म्हणजे रक्तस्राव व्हायचा थांबेल. किंवा मग नाक आणि कपाळावर बर्फ किंवा थंड पाण्याची पट्टी ठेवा. थंड वस्तू सुंघवा.

घामोळं
उन्हाळ्यात अंगाची आग होते आणि प्रचंड घाम येतो. हा घाम अंगात तसाच झिरपून त्वचेवर लाल दाणे दिसू लागतात. यालाच घामोळं म्हणतात. कपाळ, छाती, पाठ, मान, नाक इत्यादी ठिकाणी घामोळं येण्याचं प्रमाण अधिक असतं. जास्त प्रमाणात घाम येणार्‍या व्यक्तींना उन्हाळ्याच्या दिवसांत हा त्रास अधिक होतो. बरेचदा अशक्त मुलं, गरोदर स्त्रिया आणि रोगग्रस्त व्यक्तींना घामोळं येण्याचं प्रमाण जास्त दिसून येतं. घामोळ्यामुळे अंगाला येणारी खाज खाजविल्यानंतर अधिक वाढते. काही वेळा तर जखमाही होतात.
उपाय : थंड वातावरणात राहा. एसी, कुलर असेल तर उत्तम. घामोळ्यास कॅलेमाइन लोशन लावा. खाज येत असल्यास त्यावर बर्फ लावा. खाज सहनच होत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधही घेऊ शकता. याशिवाय गरम पदार्थ खाणं टाळा. जाड कपड्यांऐवजी सुती व सैलसर कपडे वापरा. आंघोळीसाठी कडुलिंबाच्या साबणाचा वापर करा.

उष्माघात
आजाराच्या नावावरूनच लक्षात येतं की, याकडे गंभीरतेनं पाहिलं नाही तर हा घात करणार. वातावरणात उष्णतेचं प्रमाण जास्त झाल्यास घाम येऊन शरीरातील तापमान नियंत्रित ठेवलं जातं. परंतु काही वेळा उष्मा अधिक वाढल्यास शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवणार्‍या यंत्रणेत बिघाड होतो आणि शरीरातील तापमान वाढतं. हे तापमान 102-103 डिग्री इतकं वाढल्यास, गंभीरावस्था येते. चेहरा लाल होणं, हृदयाचे ठोके जलद पडणं, डोकेदुखी, भोवळ येणं आणि बेशुद्ध पडणं ही सगळी उष्माघाताची लक्षणं आहेत. अशी लक्षणं दिसून आल्यानंतर तात्काळ उपचार न केल्यास जिवावरही बेतू शकतं.
उपाय : ऊन फार कडक असेल तर शक्यतो घराबाहेर पडू नका. जाणं गरजेचंच असेल तर पूर्ण शरीर झाकलं जाईल असे कपडे घाला. डोळ्यांचं उन्हापासून रक्षण करण्यासाठी डोळ्यांना काळा चष्मा लावा. तसेच शरीरातील पाणी कमी होऊ नये याकरिता थोड्या थोड्या वेळाने सतत पाणी पित राहा.

इन्फ्लुएंझा
इन्फ्लुएंझा हा संसर्गानं होणारा श्‍वसनाचा आजार असून त्यामुळे नाक, घसा आणि फुप्फुसं यांना विषाणूंची बाधा होते. शिंकल्यामुळे वा खोकल्यामुळे या विषाणूंचा एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे प्रसार होतो. डोकेदुखी, ताप, घसा खवखवणे, सांधेदुखी, अशक्तपणा आणि थकवा ही याची प्रमुख लक्षणं आहेत. तीन-चार दिवस जर ताप कमी झाला नाही तर लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं आहे.
उपाय : जेवण्यापूर्वी किंवा काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ साबणाने धुवा. नाहीतर सॅनिटायजरचा वापर करा. खोकताना वा शिंकताना तोंडावर रुमाल घ्या. पुदिना व मीठ घातलेला चहा, लिंबाचा रस आणि हर्बल टी प्याल्याने इन्फ्लुएंझापासून आराम मिळतो.


फूड पॉयझनिंग
उन्हाळ्यामध्ये बाहेरचं काहीही खाल्ल्यास किंवा दररोज शिळं अन्न खाल्ल्यासही फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता असते. कारण या दिवसात उष्णतेमुळे जेवण लवकर खराब होतं. ते खराब अन्न खाल्ल्यास उलटी, पोटदुखी, जुलाब, ताप आणि डिहायड्रेशन या समस्या उद्भवतात.
उपाय : जेवण बनवण्यापूर्वी, वॉशरूमला जाऊन आल्यानंतर किंवा घरातील पाळीव प्राण्यास हात लावल्यानंतर साबणानं हात स्वच्छ धुवावेत. अनपाश्‍चराईज मिल्क आणि त्यापासून बनविलेले पदार्थ खावेत. फूड पॉयझनिंग झाल्यास अगदी साधं आणि पचायला हलकं अन्न खावं. रेडी टू इट पदार्थ खरेदी करताना त्यावरील एक्सपायरी डेट नीट पाहावी.

अतिसार
उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरील अन्न खाण्याने किंवा उलटसुलट, अरबटचरबट खाल्ल्यानेही अन्नपचन नीट होत नाही आणि जुलाब लागतात. यालाच अतिसार असं म्हणतात. पोटदुखी, उलटी, डोकेदुखी आणि शौचास पातळ होणे ही याची लक्षणं आहेत.
उपाय : अतिसार झाल्यास कमीत कमी तीन दिवस दुग्धजन्य पदार्थ अजिबात खाऊ नये. नारळपाणी प्या. मोसमी फळांचे रस प्या आणि भाज्या धुऊन खा. खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. बाहेरचं आणि शिळं अन्न खाणं टाळा.

पोटाचे विकार
उन्हाळ्यातल्या उष्णतेमुळे आणि त्यामुळे आपल्या आतड्यामधील पाण्याच्या तसेच क्षारांच्या प्रमाणात होणार्‍या बदलामुळे अनेकांना उलट्या-जुलाबाचा त्रास होतो. उन्हाळ्यात पिण्याचे पाणी अनेक ठिकाणी कमी होते. त्यामुळे अशुद्ध आणि फिल्टर न केलेले पाणी पिण्याची वेळ येते. त्याचप्रमाणे उन्हाळी सुट्टीमुळे बाहेर जाणे, बाहेर खाणे, बागेत जाऊन तेथील उघड्यावरील पदार्थ खाणे, सरबते किंवा रस पिणे अशा गोष्टी घडत असतात. या सार्‍या बाहेर खाण्याच्या प्रसंगात, जे खाद्यविक्रेते असतात, त्यांच्या आरोग्याची तसेच त्यांनी याकरता वापरलेले पदार्थ चांगले असल्याची खात्री देता येत नाही. त्यात ते उघड्यावर असल्यामुळे हवेतील धूळ माती त्यात सहज जाते. साहजिकच हे पदार्थ सेवन केल्याने अन्नातून जंतुसंसर्ग होणे, आमांश होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे उन्हाळ्यात अपचन, उलट्या, जुलाब, डिसेन्ट्री, आमांश अशा कारणाने पोटाच्या तक्रारी वाढतात
उपाय : रस्त्याच्या कडेला उघड्यावर विकले जाणारे अन्नपदार्थ खाऊ नका. शिळं अन्न खाऊ नका. बाहेर विकली जाणारी सरबतं, फळांचे रस पिऊ नका. स्वतःच्या स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष द्या. घराच्या आजूबाजूला तसेच घरातही स्वच्छता राखा. पदार्थ बनविण्यासाठी लागणार्‍या भाज्या, फळं धुऊन घ्या.

टायफॉईड
उन्हाळ्याच्या दिवसात टायफॉईड होण्याचं प्रमाण जास्तच असतं. टायफॉईड झाल्यास रुग्णास सतत ताप येत राहतो, भूक कमी होते, वांती होते आणि सर्दी-खोकला यासारखे आजारही होतात.
उपाय : हा आजार होऊ नये तसेच झाल्यास लवकर बरा व्हावा म्हणून घरचं साधं व सात्त्विक अन्न खा. उकळवलेले स्वच्छ पाणी प्या. कुठलाही पदार्थ खाण्यापूर्वी हात साबणानं स्वच्छ धुवा. आणि स्वच्छता राखा.

गोवर
गोवर हा बहुतांशी लहान मुलांमध्ये आढळणारा, लागण होणारा आजार आहे. यात आधी सर्दी, खोकला, बारीक ताप आणि मग अंगावर लाल पुरळ उठतं. हा आजारही उन्हाळ्याच्या दिवसातच होतो.
उपाय : गोवरची लस देणे हा यावर प्रतिबंधक उपाय आहे. लहान मुलांना नऊ महिन्याचे असताना ही लस दिली जाते. तरीही गोवर झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

उन्हाळ्याच्या दिवसात होणारे इतर आजार
कांजण्या हा देखील उन्हाळ्यात होणारा आजार आहे. कांजण्या झाल्यास जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि बाहेरून आल्यानंतर स्वच्छतेची काळजी घ्या.
काही व्यक्तींच्या शरीराला घामाची दुर्गंधी येते. ही सामान्य बाब असली तरी असं होऊ नये म्हणून दिवसातून दोन-तीन वेळा स्नान करा. स्नान करून झाल्यानंतर टाल्कम पावडर लावा. आंघोळीच्या पाण्यात व्हाईट व्हिनेगर किंवा गुलाबपाणी घातल्यास घामास दुर्गंधी येणार नाही.
उन्हाळ्यात बरेच जण स्विमिंग करण्यासाठी जातात. स्विमिंग पूलमध्ये खूप जास्त वेळ राहिल्यानंतर कानात पाणी जाऊन फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. म्हणून स्विमिंग करताना इअर प्लग लावा किंवा कानांना कॅप लावून झाकून घ्या. म्हणजे कानात पाणी जाणार नाही.
उन्हाळ्याच्या दिवसांत डास, माश्या यांचा प्रादुर्भाव वाढतो. डास चावले की त्वचा लालसर होऊन सुजते. तसेच डासांचे चावणे अनेक रोगांना निमंत्रणही ठरू शकते. तेव्हा स्वच्छता राखून डासांचा प्रादुर्भाव थांबवा. मधमाशी वा एखादा किडा चावल्यास ती जागा स्वच्छ करून त्यावर बर्फ चोळा.

उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून हे करा-
उन्हाळ्यात सुती, सैल आणि फिकट रंगाचे कपडे वापरा.
पोटास तड लागेपर्यंत न खाता एक घास कमी जेवा.
रिकाम्या पोटी उन्हात बाहेर जाऊ नका.
उन्हातून आल्यानंतर लगेचच एसी किंवा कुलरसमोर बसू नका. बाहेरून आल्यानंतर शरीराचं तापमान सामान्य होऊ द्या.
टेबल फॅन फिरता ठेवा. त्याच्या अगदी समोर बसू नका. शिवाय सिलिंग फॅनच्याही अगदी खाली बसू नका.
खूप गरम पदार्थ खाऊ नका.
बाहेरून आल्यानंतर लगेच फ्रिजमधील थंड पाणी पिऊ नका.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

क्या आपकी राशि को मिल रहा है पितृ पक्ष का आशीर्वाद? जानें क्या करें और क्या न करें! (Is Your Zodiac Sign Getting The Blessings Of Pitru Paksha? Know What To Do And What Not To Do!)

पितृ पक्ष का समय अपने पूर्वजों को श्रद्धांजलि अर्पित करने का महत्वपूर्ण अवसर है, जो…

September 20, 2024

कहानी- अखंड सौभाग्यवती भव (Short Story- Akhand Saubhagyawati Bhav)

बहू के हाथ बालों पर फिसलते रहे और अम्मा रोती रहीं. जाने क्यों, आज रुलाई…

September 20, 2024

केवळ दारु पिण्यासाठी गोविंदाच्या पत्नीने स्विकारलेला ख्रिश्चन धर्म (Govinda’s Wife Secretly Changed Her Religion For Drinking Wine)

बॉलीवूड इंडस्ट्रीतील हिरो नंबर 1, अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलेला गोविंदा आज भलेही चित्रपटांपासून दूर…

September 20, 2024

‘मानवत मर्डर्स’मध्‍ये आशुतोष गोवारीकर प्रसिद्ध डिटेक्टिव्‍ह रमाकांत एस. कुलकर्णीच्‍या प्रमुख भूमिकेत ( Director Producer Ashutosh Govarikar Play Detective Roll In Manvat Murders)

सोनी लिव्‍ह रोमांचक क्राइम थ्रिलर सिरीज ‘मानवत मर्डर्स' घेऊन येत आहे. ही सिरीज सर्वात भयानक…

September 20, 2024

जेव्हा राहाने पहिल्यांदाच पोटात असताना लाथ मारलेली…. आलियाने सांगितला किस्सा (When Raha Kicked Mumma Alia Bhatt First Time During Pregnancy)

आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'जिगरा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून ती निर्माती म्हणून पदार्पण…

September 20, 2024

 शाहरुख खानशिवाय हे इंटरनॅशनल सिलिब्रेटीही घालतात विचित्र शूज, कारणही आहे खास( Shahrukh Khan, Justin Bieber And Taylor Swift Wears Customised Dirty Shoes Golden Goose)

लाखो लोकांचा हार्टथ्रॉब आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आपल्या अभिनयाने आणि शैलीने चाहत्यांची मने जिंकतो.…

September 20, 2024
© Merisaheli