Marathi

केसांची ही रेशीम रेष…(This Silky Line Of Hair…)

डोक्यावरील केस उगवणे, ते वाढणे, त्यांना पोषणमूल्य प्राप्त होऊन ते वाढत राहणे व नैसर्गिकरित्या ते गळल्यानंतर पुनःश्‍च नवा केस उत्पन्न होणे हे चक्र व्यक्ती जिवंत असेपर्यंत अव्याहतपणे चालू राहतं. मात्र यात बिघाड झाल्यास काळजी घ्यावी लागते.
आकर्षक व्यक्तिमत्त्व हे परिपूर्ण असावं लागतं. नितळ त्वचा, पाणीदार डोळे, उंच गळा, सुडौल शरीर या समवेत नितळ-सुंदर केसदेखील परिपूर्ण सौंदर्यात समाविष्ट असतात. आकर्षक व्यक्तिमत्त्व अंतर्बाह्य परिपूर्ण असणं आणि त्यात सौंदर्याची भर पडणं हे अत्यंत दुर्लभ मानलं जातं. सौंदर्याच्या व्याख्येत जेवढी नितळ त्वचा येते तेवढेच मुलायम केस देखील येतात. म्हणूनच व्यक्तिमत्त्व व सौंदर्य जोपासण्यासाठी तथा ते वृद्धिंगत करण्यासाठी त्वचा व केस यांना समसमान महत्त्व देणं गरजेचं असतं. या लेखात आपण परिपूर्ण केस आणि केसांचा सांभाळ यावर विस्तारानं चर्चा करू.
केसांची रचना
आपल्या शरीरात पेशी, पेशीसमूह, रक्तवाहिन्या यांचं जाळं पसरलेलं असतं. शरीराच्या अंतर्गत अवयवांची रचना विविध स्तरांवर आधारलेली असते. प्रत्येक स्तराचं कार्य, त्याची रचना भिन्न असते. या स्तरांच्या सातत्यपूर्ण कार्यासाठी विविध पोषणमूल्य व जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. या स्तरांसाठी आवश्यक पोषणमूल्यांची मात्रा देखील भिन्न ठिकाणी भिन्न असते.
शरीरातील अवयवांचे संरक्षण करणारी त्वचा ही संपूर्ण शरीरावर आच्छादलेली असते. त्वचेवर जे केस असतात, ते आणि त्वचा हे दोन्ही शरीरातील अवयवांच्या भागाप्रमाणे बदलत जातात. उदाहरणार्थ - डोक्यावरील त्वचा अत्यंत नाजूक असते आणि मुबलक केसांनी आच्छादलेली असते. तर तळपायावरील त्वचा कडक असून केस विरहीत असते. आता डोक्याच्या त्वचेवर जे सर्वाधिक केस उगवतात ते केरोटीन नावाच्या प्रथिनांपासून निर्मित असतात. या केरोटीन पासून निर्मित अति सूक्ष्मतम तंतू त्वचेखाली असतात ज्यांना फे फॉलीसी म्हणतात. या फॉलीसीतून जे उगवते त्यास केस असे संबोधतात. केस उगवणे, ते वाढणे, ते गळणे ही प्रक्रिया अव्याहतपणे चालू असते.
थोडक्यात केसांची रचना तीन स्तरीय असते. केरोटीन निर्मित भाग, दृश्य स्वरूपातील क्युटीकल भाग आणि तिसरा मेलनिन- मेड्युला भाग. मेलनीन भाग केसांना मृदुता आणण्याचं काम करतो तर मेड्यूला जीवनसत्व आणि पोषणमूल्य पुरवण्याचं कार्य करतं. केसांच्या टोकाशी रक्तवाहिन्यांचं जाळं विणलेलं असतं. फॉलीसी स्तरावरील अतिसूक्ष्मतम रक्तवाहिन्या केसांपर्यंत रक्तातील पोषणमूल्य, पेशीतील पाणी सातत्याने पुरवायचे कार्य करते. आता केसांचा पुढील भाग तयार होतो. केसांचा सजीव व निर्जीव भाग. केसांच्या मुळाशी तंतू असल्याने ते सजीव असतात तर केसांचा अग्रभाग हा कोरडा असल्याने तो निर्जीव असतो. म्हणूनच केस ओढल्यास ते दुखतात पण कापल्यावर दुखत नाहीत.
केसांच्या मुळाशी रक्तवाहिन्यांचं जाळं पसरलेलं असतं. तसंच केसांच्या मुळाशी तैलीय ग्रंथीचंदेखील जाळं पसरलेलं असतं. या तैलीय ग्रंथीतून जो अतिसूक्ष्म स्राव पाझरत असतो त्याला सिबम असं संबोधलं जातं. केसांची टोकं अतिसूक्ष्म असतात. त्यात सातत्यानं पाझरणारं सिबम हे तर अतिसूक्ष्म रूपात आढळतं. परंतु हे अतिसूक्ष्म रुपातील सिबम केसांचं मुख्य आरोग्य व सौंदर्य ठरवतं. केसांची मृदुता, केसांची वाढ, केसांचा पोत इत्यादी सर्व सिबमवर अवलंबून असतं. म्हणूनच सिबमचं महत्त्व सर्वात जास्त मानलं जातं. अर्थात सिबमचं प्रमाण देखील तितकंच महत्त्वाचं असतं. अति मात्रेतील सिबम केसांना शुष्कता आणतं. केस जाड करतं व पर्यायानं कोरडा कोंडा निर्माण करतं.

केसांचे प्रकार
व्यक्तींच्या एकदंर प्रकृती, मन, आहार, स्वास्थ्यावरून केसांचे 5 प्रकार ठरविता येतात. सामान्य केस, कोरडे केस, तैलीय केस, मिश्र केस आणि संवेदनशील केस.
सामान्य केस ः व्यक्तीस या प्रकारचे केस लाभणं हे अत्यंत दुर्लभ मानलं जातं. सामान्य केस दैवी देणगी असते, असं सौंदर्यशास्त्र मानतं. मऊ पीळदार, चमकदार, लांबसडक केस अत्यंत नैसर्गिक मानले जातात. अशा सौंदर्यपूर्ण केसांस सामान्य संबोधणंच असामान्य आहे. परंतु उत्तम मन, प्रकृती स्वास्थ्य लाभणार्‍यांना सामान्य केसांचं वरदान लाभतं.
कोरडे केस ः रुक्ष व अल्प कडक केस या प्रकारात येतात. कोरडे केस मोकळे असतात. वार्‍याच्या हलक्या झुळुकीनंही उडतात. कोरड्या केसांना चमकही कमी असते. आरोग्य व सौंदर्याबाबतही असे केस डल असतात. त्यांना नैसर्गिक चमक लाभत नाही. उन्हाळ्यात - हिवाळ्यात अशा केसांची विशेष काळजी घ्यावी लागते.
तैलीय केस ः अति मात्रेत चमकणारे अन् एकमेकांस चिकटून राहणारे केस तैलीय प्रकारात समाविष्ट होतात. तैलीय केस दिसायला आकर्षक असतात पण त्वचा व केसांच्या आरोग्यासाठी ते अपायकारक असतात. उन्हाळ्यात व पावसाळ्यात तैलीय केस जास्त संवेदनशील होतात.
मिश्र केस ः केसांचं आरोग्य व त्वचेची देखभाल व्यवस्थित न केल्यास या प्रकारचे केस तयार होतात. मिश्र केस त्वचेलगत तैलीय असतात तर टोकाला कोरडे असतात. तिनही ऋतूमध्ये या केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. मिश्र केस वारंवार स्वच्छ करावे लागतात.
संवेदनशील केस ः या प्रकारचे केस हे व्याधीपूर्व-पश्‍चात तयार होतात. संवेदनशील केस एका विंचरण्यात अथवा स्वच्छ करण्यात गळतात. उशीवर केस गळून पडतात ते या प्रकारात येतात. अशा केसांना वैद्यकीय सहाय्यतेची गरज असते.
डोक्यावरील केस उगवणे, ते वाढणे, त्यांना पोषणमूल्य प्राप्त होऊन ते वाढत राहणे व नैसर्गिकरित्या ते गळल्यानंतर पुनःश्‍च नवा केस उत्पन्न होणे हे चक्र व्यक्ती जिवंत असेपर्यंत अव्याहतपणे चालू राहतं.
केसांच्या समस्या
आधुनिक राहणीमान, बदलती जीवनशैली आणि पर्यावरण प्रदुषण यांचा असमतोल, यामुळे केसांच्या समस्या उद्भवणं अत्यंत नित्याचं झालं आहे. केसांच्या मूळ समस्या दोन प्रकारात येतात. एक म्हणजे केस गळती आणि दुसरा कोंडा निर्मिती.

केस गळती
प्रत्येक निरोगी केस तीन प्रक्रियांद्वारा प्रवास करत असतो. त्यातल्या पहिल्या प्रक्रियेस अथवा अवस्थेस अ‍ॅनाजन म्हणतात. या अवस्थेत केसांची नैसर्गिक वृद्धी होत असते. दुसर्‍या अवस्थेला कॅटाजन म्हणतात. या अवस्थेमध्ये केस पॅपीलापासून मुक्त होतो. तिसर्‍या अवस्थेस टिलोजन म्हणतात. या अवस्थेमध्ये वृद्ध केस गळून नवीन केस निर्मिती होते. या तिनही अवस्थेत केस गळतच असतात. पण अंतिम अवस्थेत केस गळती होणे व ती 15 टक्के पेक्षा अधिक मात्रेत असणे यास गळती संबोधतात.
24 तासाच्या अवधीत अंदाजे 100 केस गळतात. पण जर यात 20 टक्क्यापेक्षा अधिक भर पडली तर त्या केस गळतीस अ‍ॅलोपेशीया असं म्हणतात. अ‍ॅलोपेशीयाचे काही प्रकार आहेत. अ‍ॅड्रोजेनिक अ‍ॅलोपेशीया, स्कारींग अ‍ॅलोपेशीया, राई अ‍ॅलोपेशीया हे त्यातल्या त्यात महत्त्वाचे मानले जातात.

अ‍ॅलोपेशीयाची कारणं
वयात येणं : व्यक्ती वयात येताना तिच्या शरीरात अनेक संप्रेरके नव्याने तयार होत असतात. त्या संप्रेरकांचा बदल काही मात्रेत केसांसाठी न झेपणारा ठरतो. त्यामुळे केस शारीरिक बदलांच्या आघातामुळे गळतात.
हार्मोनल बदल : स्त्री-पुरुष यांचं शरीर नियमितपणे बदलत आकार घेत असतं. नवजात अर्भकापासून वृद्ध अवस्थेपर्यंत शरीरात अंतर्बाह्य बदल घडत असतात. हे बदल वैद्यकीय भाषेत हार्मोनल बदल या नावानं संबोधले जातात. हे वयाच्या कोणत्याही गटास कधीही उद्भवू शकतात.
वातावरणात बदल : अनेकदा कडक उन्हात सातत्यपूर्ण वावरल्यामुळे केस गळती होण्याची शक्यता असते. तसंच एअर कंडिशनरच्या खाली बसल्यावर देखील वायू प्रसरणामुळे केस गळती होते.
पाणी बदल : तलाव, विहीर इत्यादींचं पाणी क्षारयुक्त नसतं. परंतु कालवा आणि समुद्री पाणी क्षारयुक्त असतं. पाण्यातील अत्याधिक मात्रेतील क्षार केसांच्या टोकांना इजा पोहचवते आणि त्याद्वारे केस गळती होते.
आहार बदल : सात्त्विक आहारातून तामसी आहाराकडे अल्पावधीत वळल्यास आहार असंतुलन पश्‍चात केस गळती होते.
मासिक पाळी पूर्व-पश्‍चात : या दरम्यान शरीरात अनेक बदल घडतात. रक्ताच्या दोषामुळे देखील केस गळती संभवते.
व्याधी पूर्व-पश्‍चात : ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यासारख्या किरकोळ आजारापासून मधुमेह, रक्तदाबापर्यंत सर्वच व्याधीमध्ये व्यक्तीच्या सौंदर्यावर परिणाम घडून येतो. व्यक्तीच्या चयापचयाच्या क्रियेमुळे केस गळती उद्भवते.
ताण-तणाव : याद्वारा सर्वाधिक केस गळती होण्याचा संभव असतो. ताण-तणावामुळे रक्ताभिसरण असंतुलित होऊन त्याचा केसांच्या गळतीवर प्रत्यक्ष परिणाम होतो.
औषधोपचार : अँटिबायोटीक्स व अँटीड्युरिटिक मध्ये मोठ्या मात्रेत टॉक्सिन्स असल्या कारणाने यांच्या दीर्घ सेवनाने केस गळती होते.
सौंदर्य प्रसाधनं : नकली सौंदर्य प्रसाधने तथा प्रसाधनांचा अति वापर केस गळतीस कारणीभूत ठरतो.
केस गळती थांबविण्यासाठी आहार उपाय
भरपूर पाणी प्या.
फळांचा रस, भाज्यांचा अर्क यांचा आहारात समावेश करा.
पालेभाज्यांचा रस जरूर घ्या.
आवळा, चिंच, संत्र योग्य मात्रेत खा.
भाताची पेज प्या.
कडधान्य खा.
ब्रेड- तेल यांचं आहारातील प्रमाण कमी करा.
आलं-लसूण, कांदा योग्य प्रमाणात वापरा.
भाकरी व पोळी बदलून आहारात घ्या.
दही, ताक आहारात अत्याधिक मात्रेत समाविष्ट करा.

सौंदर्य उपाय
नारळाचे तेल कोमट करून लावा.
तेल लावल्यावर केसांना वाफ द्या.
संत्र्याचा ताजा रस केसांच्या मुळाशी लावा.
पुदिना पानं दह्यात वाटून लावा.
मुलतानी माती दह्यात वाटून लावा.
ताक आम्लवून ते 5 मिनिटासाठी लावा.
कोको ऑईल अरोमा लावा.
शिकेकाई युक्त आयुर्वेदिक साबण वापरा.
अंड्याचं बलक कुस्करून लावा.
आवळा रस लावा.
केसातील कोंडा
केसाच्या मुळाशी रक्ताभिसरणासाठी वाहिन्यांचं जसं जाळं पसरलेलं असतं, त्याप्रमाणे तैलीय पदार्थ सातत्यपूर्ण पसरावा यासाठी तैलीय ग्रंथींचं जाळं आच्छादलेलं असतं. तैलीय स्राव त्वचेलगत पसरण्यासाठी अतिसूक्ष्म तंतू निर्मिलेले असतात. या स्रावाला सिबम असं म्हणतात. सिबम योग्य मात्रेत त्वचेवर आच्छादलं जाणे केसांच्या परिपूर्ण पोषणासाठी गरजेचं असतं. सिबमच्या मात्रेवर केसांचं आरोग्य टिकून असतं.
सिबम अत्यल्प मात्रेत तयार झाल्यास केसांच्या मुळालगत त्वचा कोरडी होते. आणि अशा शुष्क त्वचेवर लगेचच घाण जमा होते. केस व्यवस्थित न धुतल्यास तिथे कोरडा कोंडा तयार होतो. तर सिबम अधिक मात्रेत पाझरल्यास केसांच्या टोकापाशी चिकट थर जमा होतो आणि त्याद्वारे ओला कोंडा तयार होतो. ओला-सुका कोंडा केसांचे आरोग्य व सौंदर्य बिघडवतो. म्हणूनच डोक्यात कोंडा तयार झाल्यास तो त्वरित स्वच्छ करावा लागतो.

कोंडा होण्याची कारणं
अति उष्ण तापमानात वावर : बर्‍याच व्यक्तींना उष्णता सहन होत नाही. अशा व्यक्ती उन्हात अधिक वेळ उभ्या राहिल्यास त्यांच्या केसात कोंडा निर्माण होतो.
पाण्याचा बदलता प्रकार : विहिरीचं पाणी केसात कोंडा तयार करते. कालवा, तलाव यातील पाणी केस अति रुक्ष करते. तसंच समुद्री पाणी सुद्धा केसात ओला कोंडा तयार करते.
अनियमित आहार : अति मिठाच्या सेवनाने डोक्यावरील त्वचा शुष्क होते. परिणामी केसात कोंडा होतो. तसेच अति मसाला, तेलयुक्त पदार्थाच्या सेवनाने केस रुक्ष होऊन तिथे कोंडा जमा होतो.
प्रसाधनं : सौंदर्य प्रसाधनं अतिशय जाणीवपूर्वक वापरायची असतात. ग्रे मार्केटमधील दुय्यम दर्जाची प्रसाधनं केसांचं आरोग्य बिघडवतात.
अति घाम : अति घाम आल्यामुळे त्वचा ओली राहते. घाम आणि सिबम एकत्रित आल्याने तिथे ओला व सुका कोंडा तयार होतो. असा कोंडा जाणं कठीण असतं.
औषधं : काही औषधांच्या रिअ‍ॅक्शन्स द्वारा केसात कोंडा तयार होतो.
केसातील कोंडा जाण्यासाठी आहार
पाणी मुबलक प्या.
आठवड्यातून तीन वेळा नारळ पाणी प्या.
गुळाचा वापर करा.
चिंच कमी वापरा.
गाजर, कोबी जास्त घ्या.
चहा, कॉफी आठवड्यातून 3-4 वेळाच घ्या.
सुपाचा समावेश वाढवा.
गरम पदार्थच घ्या.
शिळं अन्न खाऊ नका.
केमिकलयुक्त अन्न खाऊ नका.

कोंडा घालविण्यासाठी सौंदर्य उपाय
केस नियमित स्वच्छ करा.
केसांना गरम-थंड पाणी न लावता कोमट पाणी लावा.
शाम्पू पश्‍चात कंडिशनर करा.
कंडिशनर पश्‍चात भरपूर पाण्याद्वारा त्वचा स्वच्छ करा.
जास्वंद, मका, भृंगराज तेलानं मालीश करा.
तेल मालीश पश्‍चात केसांना वाफ द्या.
केसांतून सातत्याने कोरडा कंगवा फिरवा.
केसांना आंघोळीपूर्वी टाल्कम पावडर लावा.
मुलतानी माती दह्यात कालवून लावा.
दही व तुळस पावडर एकत्र करून लावा.
जास्वंदाची फुलं बारीक वाटून डोक्यावर चोळा.
अंड्यातील बलक व लिंबाचा रस एकत्रित करून लावा.
चंदन पावडर दुधात कालवून लावा.
रिठा साबणानं केस स्वच्छ करा.
  • स्वप्निल वाडेकर
    (सौंदर्य, आहार व आरोग्यतज्ज्ञ)
shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आलिया रणबीर केलं खास, दोन दिवसांनी फोटो व्हायरल (Inside Pics of Alia Bhatt and Ranbir Kapoor’s 2nd wedding anniversary celebrations)

14 एप्रिल रोजी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली. दोघांनी…

April 16, 2024

कहानी- काठ की हांडी (Short Story- Kath Ki Handi)

सारे षडयंत्र से अनभिज्ञ सुनीता, जिन्हें हमदर्द समझ रही थी, वही आस्तीन के सांप निकले."सुनीता,…

April 16, 2024

पार्लियामेंट की नई बिल्डिंग को देखने पहुंचे आयुष्मान खुराना, बोले- फीलिंग प्राउड, देखें तस्वीरें (Ayushmann Khurrana Visits New Parliament Building, Says- Feeling Proud)

एक्टर आयुष्मान खुराना ने अपनी लेटेस्ट फोटो और वीडियो सोशल मीडिया पर शेयर किए हैं.…

April 16, 2024

होकार (Short Story: Hokar)

सुधीर सेवेकर कागदपत्रं हातात आली की, मी तुमची ‘केस’ तयार करतो. वरती पाठवतो. काही आठवड्यात…

April 16, 2024
© Merisaheli