FILM Marathi

आदिवासी तरुणी कुसरीची भूमिका मिळायला भाग्य लागतं, जे मला लाभलं – सुरुची अडारकर (Actress Suruchi Adarkar Is In High Spirits About Her Role Of Aadivasi Girl in ” Ghaat”)

कलाकार म्हणून सगळेच ज्या वेगळ्या भूमिकेचा शोध घेत असतात. तशी अभिनयाचा कस लावणारी भूमिका करिअरच्या सुरुवातीला करायला मिळणं, हा नशीबाचाच भाग आहे, असं सुरूची अडारकर म्हणते आहे. तिची छत्रपाल निनावे लिखित – दिग्दर्शित आणि शिलादित्य बोरा यांच्या ”प्लॅटून वन’, मनीष मुंद्रा यांच्या ‘दृश्यम फिल्म्स’ आणि मिलापसिंह जडेजा, संयुक्ता गुप्ता आणि कुणाल कुमार निर्मित ‘घात’ या चित्रपटात विशेष उल्लेखनीय भूमिका आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला असून सुरुचीच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या निमित्त सुरुची अडारकरशी साधलेला संवाद…

घातचा अनुभव कसा होता? जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे यांच्यासारख्या मातब्बर कलाकारांसोबत प्रत्यक्ष काम करताना कसं वाटलं ?

खूप छान! इतक्या ताकदीच्या कलाकारांसोबत काम करताना खूप शिकायला मिळतं. ‘घात’मध्ये त्यांच्यासोबत काम करताना त्यांचं कलाकार आणि माणूस म्हणून बलस्थान समजलं. अभिनयाच्या बाबत म्हणाल तर, छान गिव्ह अँड टेक होती आमची.

‘घात’साठी स्वतःला कसे तयार केले ?

पहिल्यांदा मी ऑडिशन दिली तेव्हा या चित्रपटाबद्दल फार काही माहिती नव्हतं. मी फक्त मनापासून ऑडिशन दिली. त्यानंतर लुक टेस्ट आणि पुन्हा ऑडिशन झाल्यावर माझी निवड झाली आणि छत्रपाल निनावे सरांनी सगळी गोष्ट सांगितली. ती ऐकल्यावर वाटलं,  अशी भूमिका करायला मिळतेय,  हे आपलं नशीबच आहे. आमची काही वर्कशॉप्स झाली. कारण नुसतंच स्क्रिप्ट वाचलं, चर्चा केली, मेकअप केला आणि भूमिका केली. एवढीच या सिनेमाची मागणी नव्हती. हे पात्र, ती परिस्थिती समजून घ्यावी लागणार होती. त्यासाठी वर्कशॉपची खूप मदत झाली.

मुख्य प्रश्न होता,  आदिवासी मुलीसारखं दिसण्याचा. मी तिथल्या महिलांचं, मुलींचं निरीक्षण केलं. त्यांच्या लकबी,  त्यांची कामं, त्यांच्या सवयी, बोलण्याचे हेल, लहेजा याचा अभ्यास केला. या सगळ्या आदिवासी मुली, महिलांच्या चेहऱ्यात एक सहज गोडवा, निरागसता होती. त्यांचे डोळे पाणीदार आणि फिकट मातकट रंगाचे होते. डोळ्यांसाठी मी निरनिराळ्या लेन्स लावून पाहिल्या. त्यांच्यासारखा त्वचेचा रंग येण्यासाठी मेकअपची मदत घेतली.

वर्कशॉपचा अनुभव कसा होता?

उत्तम. या वर्कशॉपच्या निमित्ताने आम्ही खरोखर त्या भागांत गेलो. जिथे साधी चारचाकीही जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी पायी गेलो. मैलोनमैल चालणं म्हणजे काय, नक्षलवाद्यांची भीती म्हणजे काय, आपण वर्षभर कष्ट करून पिकवलेलं धान्य सहज कुणीतरी चोरुन नेणं म्हणजे काय हे सगळं जवळून पाहिलं. गावकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या. आजही जिथे वीज नाही. अंधार पडल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशातच कामं आवरावी लागतात, जिथे शिक्षण नाही, पक्के रस्ते नाहीत. तिथे राहताना कसं वाटत असेल याची एक बारीकशी झलक पाहिली. या वर्कशॉपमुळे या लोकांची देहबोली, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचा वावर सगळ्याचा थेट अनुभव मिळाला. त्याची ‘कुसरी’ हे पात्र उभं करण्यासाठी मदतच झाली.

 कुसरीहे पात्र रंगवण्यासाठी लेखक-दिग्दर्शक छत्रपाल निनावे यांची किती मदत झाली?

खूप मदत झाली. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कायम प्रोत्साहन दिलं. भूमिका समजून घ्यायला मदत केली. या भूमिकेची भाषा झाडीबोली आहे. तिचा लहेजा, हेल हे सगळं तंतोतंत जमण्यासाठी सरांची खूप मदत झाली. आमची पात्रं त्यांनी समजावून दिली पण ती फुलवण्याचं स्वातंत्र्य आम्हाला दिलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मला ही इतकी सुंदर भूमिका दिली, माझ्यावर विश्वास दाखवला. त्यांचे मी आभार मानीन. त्यांच्या मदतीशिवाय ही ‘कुसरी’ उतरूच शकली नसती.

घातने तुला काय दिलं?

बरंच काही. एक वेगळी भूमिका दिली. प्रत्येक कलाकार अशी वेगळी भूमिका मिळावी, या शोधात असतो. ती मला फारच लवकर मिळाली. मला या संपूर्ण प्रक्रियेने वेगळा अनुभव दिलाय. मी तर म्हणेन एक वेगळं शिक्षण दिलंय. हे खूप विशेष आहे.

विविध चित्रपट महोत्सवात ‘घात’ला उत्तम प्रतिसाद मिळालाय. याबद्दल काय सांगशील ?

हे यश अलौकिक आहे. लोक जेव्हा कलाकृती उचलून धरतात तेव्हा यश मिळतं. आमच्या सिनेमातली गोष्ट कल्पनेतली नाहीय. ती खरी आहे. शहरातल्या खूप लोकांना जंगलाची, त्यातल्या अनेक बाबींची माहितीच नसते. असे सिनेमे लोकांना विचार करायला भाग पाडतात. ‘मामी फिल्म फेस्ट’मध्ये मी पहिल्यांदा हा सिनेमा पाहिला. तेव्हा मला वाटलं, शूटिंगच्यावेळी आपण फक्त आपलं पात्र जगतो. आता मी अख्खी गोष्ट पाहिली. अंगावर काटा आला होता. बर्लिनेल, मामी, केरळ, पिफ्फ हे सामान्य नाहीये. अश्या कलाकृती अभावानेच तयार होत असतात. ‘घात’ एक विलक्षण अनुभव देणारी फिल्म आहे. हा अनुभव सगळ्यांनी घेण्यासारखाच आहे.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

डिजिटल अरेस्टः साइबर फ्रॉड का नया तरीक़ा (Digital Arrest: New method Of Cyber Fraud)

सुनने में थोड़ा अटपटा ज़रूर लगता है, आए दिन डिजिटल अरेस्ट के नए-नए केसेस सुनने…

December 2, 2024

इन फन एक्टिविटीज़ से कम करें बच्चों का स्क्रीन टाइम (Reduce Your Children Screen Time With These Fun Activities)

इसमें कोई शक नहीं है कि टेक्नोलॉजी के बढ़ते प्रभाव ने हमारे रोज़मर्रा के कई…

December 2, 2024

‘फुलवंती’ने साजरी केली सक्सेस पार्टी, पाहा प्राजक्ता माळी आणि टिमची झलक ( Prajakta Mali Movie ‘Phulvanti’ celebrates success party)

पॅनोरमा स्टुडिओज, मंगेश पवार अँड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित 'फुलवंती' या चित्रपटाने…

December 2, 2024

लपलेले रहस्य (Top Story: Laplele Rahashya)

माझे वैभवशाली व्यक्तिमत्त्व माझ्या यशाला कारणीभूत आहे, असे भाबडे प्रेक्षक म्हणतात; पण हे त्यांचे बोल…

December 2, 2024
© Merisaheli