Marathi

मुलांचं शारीरिक आरोग्य (Children’s Physical Health)

मुलांचं आरोग्य चांगले राहावं याकरिता आपण त्यांच्या खाण्यापिण्याबाबत जास्त दक्ष राहतो. त्यांच्या पोषणाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतो. पण याबरोबरच त्यांच्या चांगल्या सवयींकडेही जरा जास्त लक्ष देणं गरजेचं आहे.


सहा ते बारा या वयोगटातील मुलांची शारीरिक वाढ होऊ लागते. या काळात आहाराबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. आरोग्य चांगलं राहण्यासाठी शारीरिक आरोग्य आणि स्वच्छता राखणं जास्त महत्त्वाचं असतं. आपल्या लहानग्याला स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी त्याचं महत्त्व पटवून द्या.

रोज व्यवस्थित आंघोळ करणे
शारीरिक आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि आवश्यक सवय म्हणजे नियमित व्यवस्थित स्नान करणे. मुलांना दिवसातून किमान एकदा स्वच्छ आंघोळ घालावी. याबरोबरच बाहेरून आल्यावर, खेळून आल्यावर, झोपण्याआधी हात, पाय, तोंड स्वच्छ धुण्याची सवय लावावी. काहीही खाण्याआधी हात स्वच्छ धुतले गेले आहेत की नाही, याकडे पालकांचा कटाक्ष असायला हवा. बरेचसे आजार हात स्वच्छ न धुता काहीही खाल्ल्यानेच होतात. याकरिता बाहेरून आल्यानंतर शरीराची स्वच्छता मुलांकडून राखली गेली पाहिजे. हात धुताना केवळ पाण्याने न धुता चांगल्या प्रतीचा साबण
वा हॅण्डवॉश वापरावा. मुलं सतत खेळत असतात. घामामुळे काख, पाय, मानेच्या खालचा भाग काळवंडतो. याकरिता शक्यतो दिवसातून दोनदा आंघेाळ केल्यास उत्तम.

केसांची निगा
तुमची 10-12 वर्षांची मुलगी सतत केसांना शाम्पू लावत असेल वा सतत शाम्पू बदलत असेल तर तिच्या केसांची काळजी घेणं आवश्यक आहे. मुलांच्या केसांची निगा राखण्यासाठी चांगल्या प्रतीचा कंडिशनरयुक्त शाम्पू वापरणे आवश्यक असते. तसेच कोणताही शाम्पू आठवड्यातून जास्तीत जास्त दोनदाच लावावा. अन्यथा मोठ्या व्यक्तींप्रमाणे लहान मुलांमध्येही केसांच्या समस्या दिसू लागतात. मुलांसाठी शक्यतो प्रेाटीनयुक्त शाम्पूचा वापर करणे चांगले. याबरोबर मुलांच्या केसांना आठवड्यातून दोनदा तेलाने मालीश केले पाहिजे. यासाठी आयुर्वेदिक घटक वापरल्यास जास्त फायदा होतो. मात्र 10-12 वयातील मुलांच्या केसांत जास्त वेळ तेल राहिल्यास मुरुमांची समस्या सतावू शकते. याकरिता केस लगेच धुवावेत.

चेहर्‍याची देखभाल
सहा ते बारा या वयातील मुलं आपल्या पालकांचे अनुकरण करीत असतात. आई वा बाबा जे क्रीम वा फेसवॉश वापरतात तेच त्यांना वापरायचे असते. परंतु मोठ्या व्यक्तींपेक्षा यांची त्वचा कोमल असल्याने याचे दुष्परिणाम चेहर्‍याच्या त्वचेवर होतात. या मुलांसाठी घरगुती घटक वापरल्यास जास्त लाभ होतो. अगदी लहान मुलांसाठी परंपरागत स्क्रब म्हणून वापरल्या जाणार्‍या मलई
व बेसनाच्या मिश्रणाचा प्रमाणेच, नैसर्गिक घटकांचा नेहमी वापर केल्यास त्याचा लाभ मुलांना होतो. मुलांच्या शरीरास साबणाचा अतिरिक्त वापर टाळावा. मुलांना सनस्क्रिन लोशन लावू नये. जर लावण्याची आवश्यकता वाटत असेल तर ते 15-20 एसपीएफ युक्त असावे.

काखेची स्वच्छता
शरीराची स्वच्छता राखण्यासाठी काखेची स्वच्छता राखणे गरजेचे असते. मुलांना स्वच्छतेच्या सवयी लावताना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते. वेळोवेळी काखेतील केस काढून टाकल्याने घामामुळे त्वचारोग होण्याची शक्यता कमी होते. मात्र तुमची मुलगी यासाठी वॅक्सींग अथवा हेअर रिमूव्हिंग क्रीमचा वापर करीत असेल तर त्वरित ते बंद करा. हेअर रिमूव्हिंग क्रीममुळे काखेतील त्वचा काळवंडते. तसेच लहान वयात वॅक्सींग केल्याने त्वचा खेचली जाऊन जळजळ होते. यामुळे संसर्ग होण्याची भीतीही असते. तेव्हा शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, खास मुलांसाठी असलेल्या क्रीमचा वापर करा. या वयातील मुलांना बॉडी स्प्रे आणि डिओडरण्टचा वापर करायची सवयही लागते. मोठ्यांसाठी असलेले बॉडी स्प्रे वा डिओडरण्ट वापरल्याने यांच्या मृदू त्वचेला अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते. मुलांसाठी सौम्य असे बॉडी स्प्रे, डिओडरण्ट बाजारात मिळतात. त्याचा वापर करा. तसेच हे स्प्रे प्रत्यक्ष त्वचेवर न मारता, कपड्यांवर मारा. ज्यामुळे त्वचेला अपाय होणार नाही. बाजारात मुलांसाठी अल्कोहोल फ्री डिओडरण्ट मिळतात. या डिओडरण्टमध्ये काही प्रमाणात ट्रायक्लोजन केमिकल असते. हे ट्रायक्लोजन बॅक्टेरियाला दूर ठेवते. पण याच्या वापरामुळे कधी कधी शरीरातील सीक्रेट हार्मोन्सना धोका पोहोचू शकतो. तेव्हा या गोष्टी वापरताना थोडीशी खबरदारी घ्यायला हवी. तसेच मुलांना सुगंधित वेट वाइप्सही देता येतील. याबरोबरच योग्य प्रमाणात टाल्कम पावडरचा वापर हाच चांगला पर्याय आहे.

पायांची काळजी
जास्त वेळ शूज घातल्यामुळे मुलांच्या पायांना दुर्गंधी येऊ लागते. याकरिता
शूज घालण्याआधी पाय स्वच्छ धुवावेत. पाय पूर्णतः कोरडे झाल्यानंतर तळव्यांसह पायाला टाल्कम पावडर लावून मगच शूज घालावेत. तसेच मुलांसाठी शक्यतो सुती मोजे वापरावेत. तसेच नेहमी वापरण्यात येणार्‍या चपला, शूज, मोजे शक्यतो डेटॉल टाकलेल्या पाण्याने धुवावेत.

ओठांची काळजी
काही मुलांना सतत ओठ चावण्याची वा ओठावरून जीभ फिरवण्याची सवय असते. यामुळे त्यांचे ओठ सतत फुटतात. ओठांची त्वचा रूक्ष होते किंवा ओठांमधून रक्तही येते. मुलांचे ओठ मृदू राहण्यासाठी ओठांना पेट्रोलियम जेली वा सौम्य लिप बामचा वापर करण्यास हरकत नाही. मात्र ही उत्पादने चांगल्या प्रतीची असावीत. याशिवाय तूप वा दुधाची साय ओठांना लावणे हा उत्तम उपाय आहे. यामुळे ओठ नैसर्गिकरीत्या मुलायम राहण्यास मदत होते. फॉलिक अ‍ॅसिड, बी जीवनसत्त्व, झिंक आणि लोहाची कमतरता असल्यास ओठ सतत कोरडे राहतात. तेव्हा याकरिता डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

नखांची काळजी
लहान मुलांना नखं कुरतडण्याची सवय असते. नखांमधील घाण पोटात जाऊन आजाराचा संसर्ग लगेच होण्याची भीती असते. म्हणून लहान मुलांची नखं वेळच्या वेळी कापावीत. हल्ली मोठ्या व्यक्तींचं अनुकरण करीत लहान मुलेही नखं वाढवतात, नेल पॉलिश लावतात. मुलांना याबाबत योग्यरीत्या समजावून यापासून दूर कसं ठेवता येईल, याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. आंघोळीनंतर हातांना व नखांना मॉइश्‍चरायजर लावणे आवश्यक असते. नखांची स्वच्छता बाळगण्यासाठी मुलांना हात धुण्याची,
नखं वेळेवर कापण्याची सवय पालकांनीच लावायला हवी.
प्युबिक एरिया
प्युबिक एरियाची काळजी घेणं जास्त आवश्यक असतं. वेळोवेळी अनावश्यक केस काढणे, दिवसातून दोन ते तीन वेळा थंड वा गरम पाण्याने हा भाग स्वच्छ करणे आवश्यक असते. याबरोबरच अंतर्वस्त्रांची निवडही योग्य असायला हवी. घट्ट अंतर्वस्त्रे वापरल्याने त्वचारोग होण्याची शक्यता असते. तेव्हा अंतर्वस्त्रे स्वच्छ आणि सुयोग्य असायला हवीत, याची दक्षता घ्यावी. मासिक पाळी सुरू झाल्यानंतर दिवसातून दोन वा तीन वेळा नॅपकीन बदलणे या गोष्टी अत्यावश्यक मानल्या पाहिजेत. प्युबिक एरियाची स्वच्छता राखण्यासाठी अ‍ॅण्टी सेप्टिक लोशनचा वापर करण्यास हरकत नाही.

दातांची काळजी
या वयातील मुलं जंक फूड, चॉकलेटच्या आहारी गेलेली असतात. यामुळे दातांची जास्त काळजी घेणं अपरिहार्य आहे. मुलांनी दिवसातून किमान दोनदा दात घासणे आवश्यक आहे. याकरिता काहीही खाल्ल्यानंतर चूळ भरणे आणि रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यानंतर दात घासण्याची सवय मुलांना लावायलाच हवी. या मुलांना शक्यतो फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट द्यावी. तसेच दातदुखी उद्भवत नसेल तरीही, सहा महिन्यातून एकदा त्यांच्या दातांची तपासणी करून घ्यावी. या वयात दुधाचे दात पडून नवीन दात आलेले असतात. हे दात वाकडे येत असतील तर यासाठी त्वरित उपाय करावेत. काही वर्षांनी दातांच्या रचनेत कृत्रिमरीत्या बदल करणे शक्य होत नाही. तेव्हा योग्य सवयींमुळे शारीरिक आरोग्य चांगले राहते, हे मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025

आपके मोबाइल की बैटरी की सबसे ज़्यादा खपत करते हैं ये ऐप्स (These Apps Drain Your Phone’s Battery the Most)

आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…

July 2, 2025
© Merisaheli