Marathi

गोष्ट मुरलीधरची (Gost Murlidharchi)


प्रियंवदा करंडे!
इतक्यात काकासाहेबच दारापाशी आले. दिव्याच्या पिवळसर उजेडात डोळे बारीक करून पाहात त्यांनी विचारलं, “कोण तुम्ही?”


“अहो काका, मी मुरलीधर. मुरलीधर खांडाळेकर. आलं का लक्षात?” बोलता बोलता मुरलीधर आता आला आणि त्याने चक्क काकासाहेबांच्या पायांवर डोकं ठेवलं.
काकासाहेब दिवाणखान्याच्या गॅलरीत बसून आरामात पेपर वाचत होते. जवळच शारदा काकी लाडू वळत बसल्या होत्या. संध्याकाळचा मंद संधिप्रकाश आसमंतात भरून राहिला होता.
“शीतलची फार आठवण येते हो! तिला हे मुगाचे लाडू फार आवडतात. पण पोर एकदम साता समुद्रापलिकडे गेली! अमेरिकेत!” शारदाकाकी थोड्याशा थरथरत्या स्वरात म्हणाल्या.
“पण तिथे ती आपल्या संसारात सुखी आहे, बरोबर ना? तेव्हा तिच्याही वाटणीचा लाडू मलाच दे.” म्हणत काकासाहेबांनी दोन लाडू एकामागोमाग एक असे मटकावून टाकले.
एकुलती एक मुलगी शीतल, तिच्या नवर्‍या मुलांसोबत अतिशय आनंदात होती, हे शारदाकाकींना माहीत होतंच की! पण त्यांना इथे भारतात फार एकटं एकटं, सुनंसुनं वाटायचं. त्यात हा असा झाडाझुडपांनी गच्च वेढलेला सुंदर बंगला. मुंबईच्या उपनगरात बांधलेला, दहिसरला! त्यावेळी उपनगरात आतासारखी वस्ती नि वाहतुकीची साधनं नव्हती. रेडिओ होता, टी.व्ही. होता, पण टी. व्ही. वर आजच्या सारखी शेकडो चॅनेल्स नव्हती. टेलिफोन होते, पण मोबाईल नव्हते, माणसं एकमेकांना पत्रं लिहून खुशाली कळवत असत. त्यामुळे शारदाकाकींना शीतलच्या पत्रांची वाट पाहावी लागे.
“अग, दूध देतेस ना?” काका साहेबांच्या प्रश्नाने त्या भानावर आल्या. रोज संध्याकाळी कपभर दूध नि एखादा लाडू घेण्याचा काकासाहेबांचा परिपाठ होता. शारदाकाकींनी त्यांना गरमगरम दुधाचा कप दिला. इतक्यात बेल वाजली. रामा गड्याने लगबगीने दार उघडलं.
“कोन पायजे आपल्यास्नी?” रामाने विचारलं.
“काकासाहेब आहेत? त्यांना म्हणावं मुरलीधर आलाय.”
इतक्यात काकासाहेबच दारापाशी आले. दिव्याच्या पिवळसर उजेडात डोळे बारीक करून पाहात त्यांनी विचारलं, “कोण तुम्ही?”
“अहो काका, मी मुरलीधर. मुरलीधर खांडाळेकर. आलं का लक्षात?” बोलता बोलता मुरलीधर आता आला आणि त्याने चक्क काकासाहेबांच्या पायांवर डोकं ठेवलं.
“अरे, अरे हे काय करतोस? अरे…. ऊठ.” म्हणत काकासाहेबांनी त्याला दोन्ही हातांनी धरून उठवलं. त्याला दिवाणखान्यात घेऊन आले. आता शारदाकाकीही तिथे आल्या.
“अगबाई, मुरली? तू?” त्या आनंदाने म्हणाल्या.


“हो, काकी, मीच मुरली. मुरलीधर. एकेकाळचा तुमचा भाडेकरू. शिवाय खूप मस्ती करणारा… खूप वाईट वागणारा… तुम्हाला खूप त्रास देणारा तुमचा शेजारी.” बोलता बोलता तो चाळीशीतला तरुण रडायला लागला.
“रडू नकोस बाळा. अरे तू खूप चांगला आहेस, तेव्हाही तू चांगलाच होतास पोरा. आमच्या सोनेरी दिवसांचा तू सोबती आहेस, साक्षीदार आहेस. खा, हा मुगाचा लाडू. खा. तुलाही आमच्या शीतलसारखा मुगाचा लाडू आवडतो हे ठाऊकाय् मला.” काकासाहेब त्याच्या पाठीवर प्रेमाने थोपटत म्हणाले.
पण मुरलीधर वीसपंचवीस वर्षं मागे गेला होता. त्या टुमदार बंगलीत तळमजल्यावर तो छोट्याशा ब्लॉकमध्ये राहात होता, त्यावेळची गोष्ट त्याला आठवत होती.
“अरे मुरलीधर, नको लोकांच्या झाडांवर चढूस, नको मारामार्‍या करूस. अरे! आता कॉलेजात जातोस, तर नीट अभ्यास कर.”
वडिलांचं छत्र नसलेल्या आपल्या मुलाला-मुरलीधरला त्याची आई घसाफोड करून वळण लावायला बघायची, पण मुरलीधर ऐकतच नसे. रोज काही ना काही उचापती करून तो त्याच्या दादाला आणि आईला अगदी जेरीस आणीत असे. आई आणि दादा अगदी हैराण झाले होते. दादाच्या तुटपुंज्या पगारात त्याला मुरलीधरचे शिक्षण तेही कॉलेजचे, दोन धाकट्या बहिणींच्या शाळेच्या शिक्षणाचा खर्च, आईच्या औषधांच्या खर्चाचा बोजा असं सगळं काही निभवायचं होतं. पण अति मौजमस्तीच्या स्वभावामुळे ना मुरलीधर घरी मदत करायचा ना त्यांना आपल्या चांगल्या वागण्याने आनंद द्यायचा. त्याने कधी मनापासून अभ्यास केला नाही की कधी दादाच्या कष्टांची बूज राखली नाही. दादांना अशावेळी त्याच्या घरमालकांचा काकासाहेबांचा खूप आधार वाटायचा.
आणि एके दिवशी मुरलीधरने मर्यादा ओलांडली. काकासाहेबांची गच्चीवर एक स्वतंत्र स्टडीरूम होती. त्या खोलीला कुलुप लावलेले असायचे. मुरलीधरला वाटले, ही खोली आपल्याला भाड्याने मिळाली तर किती बहार येईल! गच्चीत मित्रांना घेऊन मजा करता येईल. थोडं स्वातंत्र्य मिळेल वागणुकीचं!
पण काकासाहेब म्हणाले, “अरे ही खोली आमच्या घराचाच भाग आहे, ती कशी देऊ भाड्याने?”
मुरलीधरला काकासाहेबांनी खोली दिली नाही याचा संताप आला. एके दिवशी काकासाहेब घरात नाही असे पाहून त्याने एक हातोडा आणला आणि कुलुपावर हातोड्याने घाव घालायला सुरुवात केली. मुरलीधरच्या वयस्कर आईचं काळीज भीतीने लकलकत होतं. त्याचा दादा बिचारा खोलीत डोकं गच्च धरून बसला होता. शारदाकाकी आणि शीतल घाबरून गेल्या होत्या. शेवटी घण घण घण घण घाव बसून कुलुप तुटलं.
मुरलीधरने ते तोडून टाकलं! काकासाहेबांना घरी आल्यावर ही सर्व हकीगत कळली. मुरलीधरची आई नि दादा त्यांच्यासमोर खाली मान घालून अपराध्यासारखी उभी होती. मुरलीधरला आता तोंड दाखवायला जागा नव्हती. आजूबाजूच्या लोकांनी पोलिसाला बोलावून आणले होते. पोलिसांनी काकासाहेबांना विचारलं, “साहेब, कम्प्लेन्ट नोंदवायची ना?”
तशी काकासाहेब म्हणाले, “कशासाठी? अहो माझी चावी हरवली होती, म्हणून मीच मुरलीला म्हटलं हातोडीनं कुलुप तोड. दुसरं कुलुप लावू नंतर. अहो मी त्याचा काका लागतो, या आता तुम्ही.”
काकासाहेबांचं बोलणं ऐकून सगळे चकित झाले. सगळ्यांचीच मनं हेलावून गेली. रात्री मुरलीधर हळूच काकासाहेबांना भेटायला आला. त्यांच्या पाया पडला. म्हणाला, “काका, माझी लाज राखलीत. नाहीतर जेलमध्ये खडी फोडायला गेलो असतो… येतो…”
आणि त्यानंतर त्याचं आयुष्यच बदललं. वाल्याचा जणू वाल्मिकीच झाला होता.
“अरे, मुरलीधर… कसला विचार करतोयस? लाडू खा. चहा घे. नंतर जेवूया सावकाश. कित्ती वर्षांनी भेटतोयस्.”
काकासाहेबांच्या शब्दांनी मुरलीधर भानावर आला. म्हणाला, “काकासाहेब, तुमच्या शांत, मृदू शब्दांनी मला आयुष्याचा अर्थ शिकवला. तुमच्या क्षमाशील स्वभावाने मी आमूलाग्र बदललो. मी शिकलो, पुढे नोकरी केली. आज माझी फॅक्टरी आहे. काका, पण हे सर्व तुमच्यामुळे झालं. मी नवा बंगला बांधलाय. तुमचंच नाव दिलंय् बंगल्याला. ’सदाशिव निवास’ असं नाव आहे काका… आपल्या घराचं. आता तुमच्या पवित्र हस्ते बंगल्याचं उद्घाटन करू. हे सगळं होईपर्यंत इतकी वर्षं गेली काका. पण निश्चय केला होता जेव्हा चांगला माणूस बनेन तेव्हाच तुम्हाला तोंड दाखवेन… तुम्ही मला घडवलंत. माझ्या चुका पोटात घालून मला जागं केलंत. माणूस म्हणून जगायला शिकवलं. काका, या बंगल्याच्या जवळच एक छोटा आश्रमही बांधलाय. चुकलेला मुलांना पोटाशी धरून सरळ रस्त्यावर चालायला शिकवण्यासाठी. त्या वास्तूचंही उद्घाटन करायचंय् तुम्हाला. काका, आता मी तुमचा पुतण्या शोभतो ना? मुरलीधरला पुढे बोलवेना. काकांच्या कुशीत शिरून तो अश्रूंना वाट करून देऊ लागला. काकासाहेब मायेने त्याला थोपटत राहिले.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

आगळ्या नवरा-नवरीची वेगळी लव्हस्टोरी, लवकरच उलगडणार गुपित, हॅशटॅग तदेव लग्नम् ची रिलीज डेट जाहिर (Hashtag Tadaiv Lagnam Release Date Disclose)

शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत 'हॅशटॅग तदेव लग्नम्' हा सिनेमा येत्या २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार…

September 19, 2024

अनुपम खेर- मां के लिए उसके बेटे से बढ़कर कोई स्टार नहीं होता… (Anupam Kher- Maa Ke Liye Uske Bete Se Badkar Koi Star Nahi Hota…)

'मेट्रो इन दिनों' और 'इमरजेंसी' में अनुपम खेर अभिनय की एक अलग ऊंचाई को छूते…

September 19, 2024

‘इश्क इन द एअर’ मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित : दोन परस्पर विरोधी शहरांमधील प्रेमिकांचा प्रणयरम्य प्रवास घडविणारी मालिका (Trailer Of ‘Ishq In The Air’ Released : Series Is A Romantic Journey Of A Young Couple Having Different Careers)

अॅमेझॉन एमएक्स प्लेयर या अॅमेझॉनच्या विनामूल्य व्हीडिओ स्ट्रीमिंग सेवेने आज आगामी प्रेम-नाट्य मालिकेसाठी अधिकृत ट्रेलरचे…

September 19, 2024

कहानी- यादगार हनीमून..  (Short Story- Yadgar Honeymoon)

कमरे में केसरिया किरणों के शुभागमन से पता चला कि रात बीत चुकी है. रातभर…

September 19, 2024

हिमेश रशेमियाच्या वडीलांचे छत्र हरपले, वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास ( Himesh Reshammiya Father Vipin Passes Away At The Age Of 87 )

हिमेश रेशमियाचे वडील आणि प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक विपिन रेशमिया यांचे निधन झाले आहे. ते 87…

September 19, 2024
© Merisaheli